Saturday, November 26, 2022

 संविधान जनजागृती अभियान चित्ररथाचे

जिल्हाधिकारी राऊत याच्या हस्ते उदघाटन

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- भारतीय स्वातंत्र्य व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी  वर्षानिमित्त नांदेड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने संविधान जनजागृती अभियान सुरु करण्यात आले, असून या अभियान चित्ररथ वाहनास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हिरवी झेंडी दाखवून उदघाटन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक सौ.वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून हे अभियान अंमलात आले, असून समाज कल्याण विभागाच्या 20 टक्के उपकर योजनेतून संविधान जनजागृती अभियान राबविले जात आहे. यातून संविधानाचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने हे अभियानाची सुरवात जिल्हा परिषदकडून केली आहे.

 

या अभियानाचे उदघाटन शनिवार दि.26 नोव्हेंबर रोजी अर्थात संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी आयटीआय परीसरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले येथील पूर्णाकृती पुतळा येऊन चित्रवाहनास हिरवी झेंडी दाखवून संविधान रॅलीस सुरुवात करण्यात आली. या अभियानास अभिजित राऊत व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी शुभेच्छा दिल्या. चित्रवाहनाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील 275 गावांमध्ये जाऊन संविधानाचा प्रचार व प्रसार केला जाणार असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी सांगितले.

00000



 भारतीय संविधान दिनानिमित्त

जिल्हा माहिती कार्यालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- भारतीय संविधान दिनानिमित्त नांदेड जिल्हा माहिती कार्यालयामध्ये आज भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी विनोद रापतवार यांनी संविधानातील कलमाचे महत्व सांगितले. याप्रसंगी माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, उपसंपादक अलका पाटील, लिपीक टंकलेखक अनिल चव्हाण, काशिनाथ आरेवार, शिपाई गंगाधर निरडे, गंगा देशमुख उपस्थित होते.   

00000

Friday, November 25, 2022

 जागरूक मतदार हाच लोकशाहीचा आधारस्तंभ

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत   

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- कोणताही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदार यादीची नोंदणी परिपुर्ण असणे हे अत्यावश्यक असते. जागरूक मतदार हा लोकशाहीचा मुख्य आधारस्तंभ असतो. प्रत्येक नागरिकांनी आपली लोकशाही अधिक भक्कम करण्यासाठी मतदार यादीत आपले नाव आहे किंवा कसे हे तपासून त्याबाबत जागरूक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. मतदान यादीत आपले नाव तपासून घेऊन मतदान करणे हे आपले अद्यकर्तव्य आहे व जबाबदारीही आहे हे मतदारांनी विसरता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.  

 

संविधान दिनाचे औचित्य साधून  व भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसील कार्यालयामार्फत बेघर, भटके विमुक्त जमातीतील व्यक्ती या दूर्लक्षित घटकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते. भावेश्वरनगर, चौफाळा ब्रम्हपूरी भागात आयोजित या शिबिरास उपविभागीय अधिकारी विकास माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे, तहसीलदार किरण अंबेकर आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचा उद्देश हा कोणीही मतदार वंचित राहू नये यासाठी शासन आपले दारी आल्याचे सांगत मतदार नोंदणी सोबत आधार लिंक करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले. विविध अर्ज भरण्याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे यांनी सविस्तर माहिती देऊन नाव नोंदणी, दुरूस्ती, वगळणी व आधार लिंकबाबत मार्गदर्शन केले.

 

या विशेष शिबिरात एकुण 47  नाव नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले तर 59 लाभार्थ्यांची आधार जोडणी करण्यात आली. तर मतदार यादीतील दुरूस्तीसाठी एकुण 8 अर्ज प्राप्त झाले एकुण 114 अर्ज या एकाच विशेष शिबिरात भरून घेण्यात आले. आभार तहसीलदार किरण अंबेकर यांनी केले  तर 8 डिसेंबर पर्यंतही आपणास नाव नोंदणी दुरूस्ती, वगळणी करता येईल. यासाठी आपल्या भागातील बिएलओ यांना संपर्क करून नोंदणी करण्याबाबत त्यांनी आवाहन केले.

 

कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचलन नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी केले तर सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी  मंडळ अधिकारी जोंधळे, तलाठी भांगे, पर्यवेक्षक नबी, बुरसपट्टे, महसूल सहायक अनुसया नरवाडे सह बिएलओ सुफळे, मोतेवार, सोनी, गोत्राम, मठपती, शिपाई  जोंधळे, यूसूफ यांनी परिश्रम घेतले.

000000





 संविधान दिनानिमित्त आयोजित रॅलीला

नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे नांदेड येथे महात्मा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंत संविधान दिनाचे औचित्य साधून भव्य रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या रॅलीस हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार माळोदे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, समाज कल्याण अधिकारी बापु दासरी, अशोक गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.

 

स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीला अधिकार बहाल करणाऱ्या राज्यघटनेचा 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण स्विकार केला. भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगिकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रतीही अर्पण केलेली आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचे व त्याचबरोबर सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय घटनेमुळे प्रत्येकाला मिळाले आहे. याचबरोबर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व दर्जा व संधीची समानता आपल्या संविधानाने दिलेली आहे. संविधानातील या मानवी मूल्यांचा जागर प्रत्येक व्यक्ती पर्यंत व्हावा या उद्देशाने आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या रॅलीसाठी विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

00000






 दुर्गम ग्रामीण भागात योजनांच्या

प्रभावी अंमलबजावणीसाठी कटिबद्धता आवश्यक

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या धर्माबाद येथे भेट देऊन घेतला आढावा   

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- नांदेड जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता प्रत्येक तालुक्यातील वाडी, वस्ती, तांड्यांपर्यंत विविध शासकीय योजना पोहचण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. जिल्ह्यात पायाभूत आवश्यक असलेल्या आरोग्य, शिक्षण, कृषि, सामाजिक न्याय याबाबत वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. याचबरोबर प्रलंबित भूसंपादन, गुंठेवारी, शासकीय कार्यालय बांधकाम, नागरी सुविधा यांच्या आढाव्यासह खऱ्या गरजू पर्यंत पोहचण्यासाठी तालुका यंत्रणांच्या प्रमुखांनी अधिक दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या धर्माबाद येथे त्यांनी तहसिल कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन तहसिलचे कामकाज व नागरिकांच्या सुविधा याबाबत आढावा घेतला.  

 

सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी आवश्यक असलेल्या विविध शासकीय सेवा-सुविधाबाबतच्या दस्तऐवजासाठी तहसिल कार्यालयावर जबाबदारी आहे. कोणत्याही योजनेची पात्रता, त्याचे निकष पूर्ततेबाबतची जी काही प्रमाणपत्रे शासकीय यंत्रणांना द्यावी लागतात ती वेळेच्या आत देण्यासमवेत कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे शंकासमाधान झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. धर्माबादचे तहसिलदार दत्तात्रय शिंदे, मुख्याधिकारी निलिमा कांबळे, पोलीस निरीक्षक संजय हिवारे यांच्यासह विविध विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांशी भेटून त्यांनी चर्चा केली.

0000



 जिल्ह्यातील 500 पात्र नागरिकांना

आपदा मित्र योजनेची संधी

 

स्वयंसेवकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत जिल्ह्यात आपदा मित्र योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांची केंद्र सरकारने निवड केली असून यात नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात 500 पात्र स्वयंसेवकांची आपदा मित्र म्हणून निवड केली जाणार आहे. या आपदा मित्रांना 12 दिवसांचे निवासी आपत्कालीन प्रशिक्षण विनामुल्य देण्यात येणार असून यात 7 दिवसांचे शिक्षण व 5 दिवसांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण असणार आहे.

 

प्रशिक्षित आपदा मित्रांना ओळखपत्र, आपत्कालीन प्रतिसाद किट व शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्‍वेच्‍छेने आपदा मित्र म्‍हणून आपली नोंदणी करण्‍यासाठी वय वर्षे 18 ते 40 वयोगटातील पात्र इच्छुकांनी  https://forms.gle/aGK78nfmk6LdAp4e7 या गुगल लिंकवर जाऊन नोंदणी करण्यासाठी गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे. राष्ट्र सेवेसाठी पात्र युवकांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

आपदा मित्र म्‍हणून नोंदणी करण्‍यासाठी अटी व शर्ती याप्रमाणे आहेत. वयोगट 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती (माजी सैनिक, सेवानिवृत्त वैद्यकीय व्यावसायिक, स्थापत्य अभियंते यांना वयाचे निकष शिथिल करण्‍यात येईल). सदर व्‍यक्‍ती नांदेड जिल्‍ह्यातील स्थानिक रहिवासी असावी, शिक्षण किमान 7 वी पास, शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले असावे, (वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य) नेहरू युवा केंद्र संघटन, राष्ट्रीय छात्र सेना (NCC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS), भारत स्काऊट गाईड, यांच्यामधून 20 टक्के स्वयंसेवकांची निवड करण्‍यात येईल, सेवानिवृत्त सैनिक, अग्निशमन विभाग, होमगार्ड, सिव्हील डिफेन्स मध्ये कार्यरत व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल. आपत्ती प्रतिसाद कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करण्‍याचा पूर्वीचा अनुभव असेल तर त्‍यास प्राधान्य, आधार कार्ड अनिवार्य, होमगार्ड, अग्निशमन अधिकारी/ कर्मचारी यांचा समावेश, 500 स्वयंसेवकांमध्ये 25 टक्के महिला स्वयंसेवकांचा समावेश करण्यात येईल असे आपत्ती व्यवस्थापन विभाग नांदेड यांनी कळविले आहे.

0000

सामाजिक समता पर्व कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना तसेच संविधानानुसार काम करणाऱ्या सर्व यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही संविधानाची ओळख करून देण्याच्या अनुषंगाने दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून जिल्हाभर साजरा केला जात आहे. दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिन ते 6 डिसेंबर 2022 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन हा कालावधी सामाजिक समता पर्व म्हणूनही साजरे केले जात आहे. 

सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाअंतर्गत शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, समाजकार्य महाविद्यालय, सर्व अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयात या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये सर्व शासकीय कार्यालयामध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन, प्रभात फेरी, तज्ज्ञ व्यक्तींचे संविधान विषयक व्याख्यान, महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी दिली.  दिनांक 26 नोव्हेंबर रोजी प्रभातफेरी, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन, सामाजिक न्याय भवनात कार्यशाळा हे उपक्रम आहेत. 27 नोव्हेंबर रोजी निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, लेखी परीक्षा, वक्तृत्त्व स्पर्धा, 28 नोव्हेंबर रोजी संविधान विषयक व्याख्यान, 29 नोव्हेंबर रोजी सामाजिक न्याय भवनात कार्यशाळा, 30 नोव्हेंबर रोजी भित्तीपत्रक पोस्टर्स, बॅनर्स, चित्रकला स्पर्धा, 1 डिसेंबर रोजी युवागटांची कार्यशाळा, 2 डिसेंबर रोजी वस्तींना भेटी, 3 डिसेंबर रोजी ज्येष्ठ नगारिक, दिव्यांग, तृतीयपंथी, वृद्ध  यांची कार्यशाळा, 4 डिसेंबर रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर, तालुकास्तरावर योजनांच्या माहितीची कार्यशाळा, 5 डिसेंबर रोजी संविधान जागर, महापरिनिर्वाण दिन अभिवादनात्मक कार्यक्रम, 6 डिसेंबर रोजी समता पर्वाचा समारोप आदी विविध उपक्रम नियोजित केले आहेत.

00000

 


वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...