Friday, November 25, 2022

 जागरूक मतदार हाच लोकशाहीचा आधारस्तंभ

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत   

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- कोणताही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदार यादीची नोंदणी परिपुर्ण असणे हे अत्यावश्यक असते. जागरूक मतदार हा लोकशाहीचा मुख्य आधारस्तंभ असतो. प्रत्येक नागरिकांनी आपली लोकशाही अधिक भक्कम करण्यासाठी मतदार यादीत आपले नाव आहे किंवा कसे हे तपासून त्याबाबत जागरूक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. मतदान यादीत आपले नाव तपासून घेऊन मतदान करणे हे आपले अद्यकर्तव्य आहे व जबाबदारीही आहे हे मतदारांनी विसरता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.  

 

संविधान दिनाचे औचित्य साधून  व भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसील कार्यालयामार्फत बेघर, भटके विमुक्त जमातीतील व्यक्ती या दूर्लक्षित घटकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते. भावेश्वरनगर, चौफाळा ब्रम्हपूरी भागात आयोजित या शिबिरास उपविभागीय अधिकारी विकास माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे, तहसीलदार किरण अंबेकर आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचा उद्देश हा कोणीही मतदार वंचित राहू नये यासाठी शासन आपले दारी आल्याचे सांगत मतदार नोंदणी सोबत आधार लिंक करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले. विविध अर्ज भरण्याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे यांनी सविस्तर माहिती देऊन नाव नोंदणी, दुरूस्ती, वगळणी व आधार लिंकबाबत मार्गदर्शन केले.

 

या विशेष शिबिरात एकुण 47  नाव नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले तर 59 लाभार्थ्यांची आधार जोडणी करण्यात आली. तर मतदार यादीतील दुरूस्तीसाठी एकुण 8 अर्ज प्राप्त झाले एकुण 114 अर्ज या एकाच विशेष शिबिरात भरून घेण्यात आले. आभार तहसीलदार किरण अंबेकर यांनी केले  तर 8 डिसेंबर पर्यंतही आपणास नाव नोंदणी दुरूस्ती, वगळणी करता येईल. यासाठी आपल्या भागातील बिएलओ यांना संपर्क करून नोंदणी करण्याबाबत त्यांनी आवाहन केले.

 

कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचलन नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी केले तर सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी  मंडळ अधिकारी जोंधळे, तलाठी भांगे, पर्यवेक्षक नबी, बुरसपट्टे, महसूल सहायक अनुसया नरवाडे सह बिएलओ सुफळे, मोतेवार, सोनी, गोत्राम, मठपती, शिपाई  जोंधळे, यूसूफ यांनी परिश्रम घेतले.

000000





No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...