Friday, November 25, 2022

 जिल्ह्यातील 500 पात्र नागरिकांना

आपदा मित्र योजनेची संधी

 

स्वयंसेवकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत जिल्ह्यात आपदा मित्र योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांची केंद्र सरकारने निवड केली असून यात नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात 500 पात्र स्वयंसेवकांची आपदा मित्र म्हणून निवड केली जाणार आहे. या आपदा मित्रांना 12 दिवसांचे निवासी आपत्कालीन प्रशिक्षण विनामुल्य देण्यात येणार असून यात 7 दिवसांचे शिक्षण व 5 दिवसांचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण असणार आहे.

 

प्रशिक्षित आपदा मित्रांना ओळखपत्र, आपत्कालीन प्रतिसाद किट व शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्‍वेच्‍छेने आपदा मित्र म्‍हणून आपली नोंदणी करण्‍यासाठी वय वर्षे 18 ते 40 वयोगटातील पात्र इच्छुकांनी  https://forms.gle/aGK78nfmk6LdAp4e7 या गुगल लिंकवर जाऊन नोंदणी करण्यासाठी गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे. राष्ट्र सेवेसाठी पात्र युवकांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

आपदा मित्र म्‍हणून नोंदणी करण्‍यासाठी अटी व शर्ती याप्रमाणे आहेत. वयोगट 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती (माजी सैनिक, सेवानिवृत्त वैद्यकीय व्यावसायिक, स्थापत्य अभियंते यांना वयाचे निकष शिथिल करण्‍यात येईल). सदर व्‍यक्‍ती नांदेड जिल्‍ह्यातील स्थानिक रहिवासी असावी, शिक्षण किमान 7 वी पास, शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले असावे, (वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य) नेहरू युवा केंद्र संघटन, राष्ट्रीय छात्र सेना (NCC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS), भारत स्काऊट गाईड, यांच्यामधून 20 टक्के स्वयंसेवकांची निवड करण्‍यात येईल, सेवानिवृत्त सैनिक, अग्निशमन विभाग, होमगार्ड, सिव्हील डिफेन्स मध्ये कार्यरत व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल. आपत्ती प्रतिसाद कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करण्‍याचा पूर्वीचा अनुभव असेल तर त्‍यास प्राधान्य, आधार कार्ड अनिवार्य, होमगार्ड, अग्निशमन अधिकारी/ कर्मचारी यांचा समावेश, 500 स्वयंसेवकांमध्ये 25 टक्के महिला स्वयंसेवकांचा समावेश करण्यात येईल असे आपत्ती व्यवस्थापन विभाग नांदेड यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...