Saturday, January 23, 2021

 

 55 कोरोना बाधितांची भर तर

40 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 23 :- शनिवार 23 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 55 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 46 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 9 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 40 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 2 हजार 629 अहवालापैकी 2 हजार 528 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 254 एवढी झाली असून यातील 21 हजार 139 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 330 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 7 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 582 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 18, माहूर तालुक्यांतर्गत 1, लोहा तालुक्यांतर्गत 1, किनवट कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, कंधार तालुक्यांतर्गत 6, खाजगी रुग्णालय 7 असे एकूण 40 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 32, बिलोली तालुक्यात 1, हिमायतनगर 2, मुखेड 1, नांदेड ग्रामीण 5, हदगाव 1, लोहा 1, परभणी 3 असे एकुण 46 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 4, कंधार तालुक्यात 1, उमरी 1, हदगाव 1, किनवट 2 असे एकुण 9 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 330 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 16, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 20, मुखेड कोविड रुग्णालय 14, महसूल कोविड केअर सेंटर 10, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 185, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 38, खाजगी रुग्णालय 23 आहेत.   

शनिवार 23 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 167, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 77 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 813

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 74 हजार 308

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 254

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 139

एकुण मृत्यू संख्या-582

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-34

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-12 

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-330

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-7.          

00000

 

राष्‍ट्रीय मतदार दिनानिमित्त आकाशवाणीवर

निवडणूक विषयक प्रश्‍नमंजुषा कार्यक्रम

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सोमवार 25 जानेवारी रोजी आकाशवाणीवर निवडणूक विषयक प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 7 ते रात्री 9 वा. यावेळेत केले आहे. या कार्यक्रमात निवडणूक विषयक विविध प्रश्‍न विचारले जाणार असून विजेत्‍यांना उत्तेजनार्थ बक्षिसे  देण्‍यात येणार आहे. या प्रश्‍नमंजुषेच्‍या कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.   

मा. भारत निवडणुक आयोगाच्‍या निर्देशानुसार सोमवार 25 जानेवारी 2021 रोजी राष्‍ट्रीय मतदार दिवस नांदेड जिल्ह्यात साजरा करण्‍यात येणार असून त्‍याचे नियोजनही करण्‍यात आले आहे. या राष्‍ट्रीय मतदार दिवसाच्‍या अनुषंगाने मा. मुख्‍य निवडणूक अधिकारी महाराष्‍ट्र राज्‍य यांच्या कार्यालयाच्‍यावतीने मतदार जनजागृतीसाठी प्रश्‍नमंजुषेचा कार्यक्रम 25 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वा. या कालावधीत Radio City 91.1, Radio Mirchi 98.3, Fever 104, All India Radio, Big FM 93.5 या रेडीओ चॅनलवर प्रसारीत होणार आहे.

00000

 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील

मुख्य रोडवर प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 23 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे मान्यवरांचे हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोमवार 25 जानेवारी 2021 रोजी (24 जानेवारीच्या मध्यरात्री पासून) ते मंगळवार 26 जानेवारी 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध केले आहे.

000000

 

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 चा   

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ

नांदेड (जिमाका) दि. 23  :- केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागांची महत्वकांक्षी असलेल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 (pmkvy 3.0) या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार आहे. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील 8 लाख उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून यासाठी 948.90 कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. 

नांदेड येथील प्रधानमंत्री कौशल्य केंद्र (pmkk) एमपावर प्रगती, किड्स किंगडम शाळेच्या जवळ नांदूसा रोड खुरगाव  येथे सीसीटीव्ही स्थापना तंत्रज्ञ, फील्ड टेक्निशियन आणि इतर होम अप्लायन्सेस, मेकअप कलाकार (CCTV  Installation Technician. Field Technician And Other Home Appliances. Makeup Artists) या तीन अभ्यासक्रमासाठी विनामुल्य कौशल्य प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात येणार असून नांदेड जिल्ह्यासाठी 522 प्रशिक्षणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त रेणुका तम्मलवाड यांनी दिली.

00000

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री

अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन

नांदेड (जिमाका) दि. 23  :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार 26 जानेवारी 2021 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्याकारणाने सर्व निमंत्रितांनी मास्क घालुनच कार्यक्रमास उपस्थित रहावे. तसेच सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्यादृष्टिने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.

000000

 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते

धर्माबाद तालुका क्रीडा संकुलाचा आज लोकार्पण सोहळा

नांदेड (जिमाका) दि. 23 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत तालुका क्रीडा संकुल धर्माबादचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते रविवार 24 जानेवारी 2021 रोजी तालुका क्रीडा संकुल मैदान धर्माबाद येथे सकाळी 11 संपन्न होणार आहे. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तथा तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष राजेश पवार, नगरपरिषद अध्यक्षा श्रीमती अफजल बेगम अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.    

धर्माबाद तालुका क्रीडा संकुल लालबहादुर शास्त्री महाविद्यालय, धर्माबादची 1 हे. 60 आर. जागा प्राप्त करुन देण्यात आली होती. याकरीता शासनामार्फत 100 लाख मंजुर करण्यात आले होते. या रक्कमेतून तालुका क्रीडा संकुल समितीच्या मान्यतेने सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरमार्फत बॅडमिंटन इनडोअर हॉल (अद्यावत वुडन कोर्ट, विद्युत व्यवस्थेसह), दोनशे मीटर धावनपथ व विविध खेळाची क्रीडांगणे (कबड्डी, खो-खो व व्हॉलीबॉल ) या राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील शालेय खेळाडू, ज्येष्ठ नागरीक व क्रीडाप्रेमी यांना विविध खेळाचे सराव करण्याची संधी उपलब्ध होवुन तालुक्याच्या क्रीडा सुविधेच्या वैभवात भर पडणार आहे. 

हे क्रीडा संकुल पुर्ण करुन घेण्यासाठी तहसिलदार दत्तात्रय शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांचे मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी किशोर पाठक, गुरुदिपसिंघ संधु, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शीवकांता देशमुख, अनिल बंदेल, सा.बां.विभागाचे कनिष्ठ अभियंता मनुरक, तालुका क्रीडा संयोजक अहमद लडडा, श्री. वाघमारे, श्री. शब्बीर आदी परीश्रम घेत आहेत. 

तालुका क्रीडा संकुल लोकार्पण सोहळा कार्यक्रमासाठी तालुक्यातील खेळाडू, ज्येष्ठ नागरीक, क्रीडाप्रेमी व इतर यांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थीत राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा संकुल समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

 

पूर्णा प्रकल्पावर 2 वर्षापासून “कालवा स्वच्छता अभियान” राबविणाऱ्या

मानवलोक संस्थेचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला गौरव 

नांदेड (जिमाका) दि. 23 :-  कालव्यांची डागडुजी हा शासनस्तरावर दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत चालला  आहे. हा प्रश्न सामाजिक बांधिलकी व सेवाभावातून सोडविण्यासाठी मागील दोन वर्षांपासून कालवा स्वच्छता अभियानाद्वारे सोडविणाऱ्या मानवलोक सेवाभावी संस्थेचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत गौरव केला. जलसंपदा विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मानवलोक संस्थेने त्यांच्याकडील सात जेसीबी व इतर अत्यावश्यक यंत्रसामुग्री सेवाभावातून कामासाठी उपलब्ध करुन दिली. केवळ कालवे दुरुस्त नाहीत म्हणून शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नयेत ही भूमिका मानवलोकने जपून या कामात पुढाकार घेतल्याचे या संस्थेचे कार्यवाहक अनिकेत लोहिया यांनी सांगितले.  

00000



  वृत्त   नांदेड जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे-पालकमंत्री अतुल सावे यांचे निर्देश  मुंबई, दि. १३, नांदेड जिल्हा प...