Monday, September 14, 2020

 

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास

सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे

नांदेड दि. 14 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.


000000

 

शालेय शिक्षण मंत्री

प्रा. वर्षा गायकवाड यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 14 :- राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 

मंगळवार 15 सप्टेंबर 2020 रोजी मुंबई येथून विमानाने दुपारी 2.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 2.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4 वाजता जिल्हा परिषद, नांदेड येथे शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. बुधवार 16 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 9.30 वा. नांदेड येथून मोटारीने परभणीकडे  प्रयाण.

00000

Saturday, September 12, 2020

 

नीटसाठी भारत सरकारच्या

नॅशनल टेस्टींग एजन्सीने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

कोविड-19 पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना दिलासा   

नांदेड (जिमाका) दि. 12 :- उद्या रविवार 13 सप्टेंबर रोजी सर्वत्र होणाऱ्या नीट NEET (UG) 2020 च्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत स्वायत्त संघटन असलेल्या नॅशनल टेस्टींग एजन्सीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात कोविड-19 पॉझिटिव्ह (बाधित) असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच अटी व शर्तीनुसार स्वतंत्र परीक्षा घेण्यात येईल, असे म्हटले आहे. याबाबत दिनांक 11 सप्टेंबर रोजी नीटच्या सल्लागार समितीची बैठक होऊन त्यात कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेता नीटच्या परीक्षा सुरक्षित कशा होतील याबाबत सविस्तर चर्चा झाली. जे विद्यार्थी कोविड-19 बाधित आहेत अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यावर विचारविमर्श करण्यात आला. 

नीट परीक्षेबाबत जी प्रमाणीत कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली त्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेवर अधिक भर देण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राला मास्क, हँडग्लोज (हातमोजे), 50 एमएल पर्यंत सॅनिटायजरची लहान बॉटल, परीक्षा केंद्रात प्रवेश करतांना किमान 6 फुटाचे एकमेकांपासून सुरक्षित अंतर, स्वत:ची पारदर्शक पाण्याची बॉटल हे आरोग्याच्यादृष्टिने आवश्यक असलेले साहित्य घेण्याबाबत सुचविले आहे. याबाबत वेळोवेळी नीटच्या संकेतस्थळावर माहिती दिलेली आहे. 

ज्या विद्यार्थ्यांना कोविड-19 ची बाधा झालेली आहे अथवा जे विद्यार्थी कोविड-19 बाधित आहेत अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने येऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित पालकांनीसुद्धा याबाबत योग्य ती खबरदारी घेत नॅशनल टेस्टींग एजन्सी यांनी सूचविल्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्राच्या छायाप्रतीसह कोविड-19 बाधित असल्याचा रिपोर्ट / सक्षम प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र  घेऊन ते नीटच्या संकेतस्थळावर ईमेल करणे बंधनकारक आहे. याबाबत स्वतंत्र तारिख नंतर कळविण्यात येणार आहे. सदर ईमेल हा ncov19@nta.ac.in  या ईमेल आयडीवर पाठवावा,  असे आवाहन नॅशनल टेस्टींग एजन्सीचे महासंचालक डॉ. विनीत जोशी यांनी केले आहे. 

00000

      

377 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

384 बाधितांची भर तर आठ जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  शनिवार 12 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 377 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 384 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 122 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 262 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 552 अहवालापैकी  1 हजार 144 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 11  हजार 93 एवढी झाली असून यातील  6  हजार 861 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 868 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 39 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.  

या अहवालात गुरुवार 10 सप्टेंबर रोजी हदगाव तालुक्यातील तामगाव येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी साईनगर नांदेड येथील 48 वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, देगलूर नरंगल येथील 41 वर्षीय महिलेचा तसेच  उस्मानगर नांदेड येथील 83 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर आज शनिवार 12 सप्टेंबर रोजी सिडको नांदेड येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, इंदिरानगर लोहा येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, दीपनगर नांदेड येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथे, तर तरोडा नाका नांदेड येथील 47 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 303 झाली आहे.    

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 4, मुखेड कोविड केंअर सेंटर 19, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 6, भोकर कोविड केंअर सेंटर 17, कंधार कोविड केंअर सेंटर 9,धर्माबाद कोविड केंअर सेंटर 22, नायगाव कोविड केंअर सेंटर 24, उमरी कोविड केंअर सेंटर 20, बिलोली कोविड केंअर सेंटर 16, औरंगाबाद येथे संदर्भीत 7, निजामाबाद येथे संदर्भीत 2, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 17, मुदखेड कोविड केंअर सेंटर 12, पंजाब भवन कोविड केंअर सेंटर 116, किनवट कोविड केंअर सेंटर 2, हदगाव कोविड केंअर सेंटर 17, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 16, लोहा कोविड केंअर सेंटर 25, माहूर कोविड केंअर सेंटर 19, हिमायतनगर कोविड केंअर सेंटर 2, मुंबई येथे संदर्भीत 1, हैदराबाद येथे संदर्भीत 4 असे 377 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 86, मुदखेड तालुक्यात 1, माहूर तालुक्यात 1, हिमायतनगर तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 2, परभणी 1, नांदेड ग्रामीण 2, हदगाव तालुक्यात 3, नायगाव तालुक्यात 1, उमरी तालुक्यात 15, कंधार तालुक्यात 6, हिंगोली 3 असे एकुण 122 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 148, बिलोली तालुक्यात 23, अर्धापूर तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 7, नायगाव तालुक्यात 16, मुखेड तालुक्यात 14, धर्माबाद तालुक्यात 8, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 3, मुदखेड तालुक्यात 11, लोहा तालुक्यात 11, कंधार तालुक्यात 5, भोकर तालुक्यात 4, माहूर तालुक्यात 6, उमरी तालुक्यात 4  असे  एकुण 262 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 868 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 275, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित  1 हजार 944, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 97, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 15, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 147, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 116, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 147,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 56, लोहा कोविड केअर सेंटर येथे 104, हदगाव कोविड केअर सेंटर 63, भोकर कोविड केअर सेंटर 36, कंधार कोविड केअर सेंटर येथे 58,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 182, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 19, मुदखेड कोविड केअर सेटर 68,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 36, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 53, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 55, उमरी कोविड केअर सेंटर 68, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 4, बारड कोविड केअर सेंटर 15, खाजगी रुग्णालयात 329 बाधित, लातूर येथे 1 बाधित  संदर्भित झाले आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 63 हजार 651,

निगेटिव्ह स्वॅब- 50 हजार 410,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 384,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 11 हजार 93,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-8,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,

एकूण मृत्यू संख्या- 303,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 6 हजार 861,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 868,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 314, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 39,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 63.94 टक्के  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000


Friday, September 11, 2020

 

केळी फळपिकाच्या गुणवत्तापूर्ण

उत्पादनासाठी शेतीशाळेचा लाभ घ्यावा

-         तालुका कृषि अधिकारी अनिल शिरफुले

नांदेड (जिमाका) दि. 11 :- केळी फळपिकाच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी शेतीशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अर्धापूर तालुका कृषि अधिकारी अनिल शिरफुले यांनी केले. 

फळ पिकावरील कीड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत केळी या पिकाची शेतीशाळा अर्धापुर तालुक्यातील चैनापूर येथील गणेश राठोड यांच्या शेतात नुकतीच संपन्न झाली.  यावेळी सरपंच  बालाजी जंगीलवाड यांच्या गावातील शेतकरी उपस्थित होते. तालुका कृषि अधिकारी अनिल शिरफुले यांनी हॉर्टसॅप अंतर्गत प्रथम फळपिक शेतीशाळा घेण्यात आली.  

सध्या आढळून येणाऱ्या फळपिकावरील कीड व रोगाबाबत चर्चा करुन उत्पादन व गुणवत्ता सुधारण्याची माहिती देण्यात आली. कृषि पर्यवेक्षक जी. पी. वाघोळे यांनी शेतीशाळेची मूळ संकल्पना सांगून शेतीशाळेची सुरुवात कृषि परिसंस्थेचा अभ्यास करून केली.  प्रथम पिकवाढीवर  परिसंस्थेचा  जैविक अजैविक, वातावरणीय घटकांचा काय परिणाम होतो या बदलाची निरीक्षणे घेण्यात आली. सोबतच पूर्ण निसवलेल्या घडावर बुरशी, काळे ठिपक्याच्या प्रश्नांवर चर्चा झाली. घड व्यवस्थापण करताना घडावर पिकाचा काडीकचरा, अवशेष राहू नयेत. बाग स्वच्छ ठेवावी. काळी ठिपके रसशोषण करणाऱ्या किडीमुळे झाले असून त्यामुळे गुणवत्ता खराब होते. या परिस्थितीत अ‍ॅसिटामिप्रीड 20 एसपी 0.125 ग्राम किवा व्हर्टीसिलीयम लेकॉनि 3 ग्राम किंवा निमाअर्क (15 हजारपीपीएम) 5 मिली + स्टीकर 1 मिलि / लिटर पाण्यात मिसळून ठराविक अंतराने फवारणी करावी. कांदेबाग लागवड करताना 500 ग्रामच्या आतील नवीन कंद लागवडीस वापरावा. लागवडी पूर्वी कंदप्रक्रिया क्लोरोपायरीफॉस अधिक स्ट्रेप्टोसायक्लीनचा वापर करुन लागवड करावी अशी माहिती दिली. या शेतीशाळेस गावातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. शेवटी कृषि सहाय्यक व्ही. एस. केळकर यांनी आभार उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले.

000000

  

 

मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा 

प्राथमिकतेने कोविड रुग्णालयांना करावा

-         सहायक आयुक्त (औषधे) रोहित राठोड 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- मेडिकल ऑक्सिजन उत्पादकांनी त्यांच्या पूर्ण क्षमतेने मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन करून प्राथमिकतेने त्याचा पुरवठा जिल्हयातील कोविड रूग्णालयांना करावा अशी सूचना पुरवठादारांनी मेडिकल ऑक्सिजचा पुरवठा कोविड रुग्णालयांना निर्धारीत किंमतीतच करावा अशी सुचना सहायक आयुक्त (औषधे) रोहित राठोड यांनी दिल्या. 

कोविड रूग्णालय व इतर आजारावर उपचार करणारे इतर रूग्णालयांची मेडिकल ऑक्सिजनची मागणी पाहता जिल्हयात मेडिकल ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही यासाठी  अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने जिल्हयातील मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादक, पुरवठादार, खाजगी कोविड रूग्णालयांचे प्रतिनिधी व इंडियन मेडिकल आसोसिएशनचे प्रतिनिधींची संयुक्त बैठक नुकतीच घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

जिल्ह्यात कोविड- 19 विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव व रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता  रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ते पाऊल उचलत आहे. रुग्णांसाठी शासकिय जिल्हा रुग्णालय तथा खाजगी कोविड रूग्णालय कार्यरत आहेत. रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याअनुषंगाने या बैठकीत जिल्हयात मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याबाबत व येणाऱ्या अडचणी विषयी सविस्तर चर्चा झाली. तसेच कोविड रुग्णालयांच्या प्रतिनिधींना मेडिकल ऑक्सिजनच्या वापरासंबंधी उपकरणांची जुळवणी, ऑक्सिजन फ्लो रेट, दाव व उपलब्ध मेडिकल ऑक्सिजनसाठा व रिकामी झालेली नळकांडे तात्काळ पुर्नभरणीसाठी उत्पादकाकडे त्वरीत पाठवणे इत्यादी बाबत दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. 

इंडियन मेडिकल आसोसिएशनच्या प्रतिनिधींना जिल्हयातील इतर खाजगी रूग्णालयात गरजेपेक्षा जास्त मेडिकल ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा होणार नाही त्याबाबत त्यांच्या सभासदांना सुचित करावे. जिल्हा प्रशासन हे मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करतांना होणाऱ्या अडचणी दूर करण्याकरिता प्रयत्नशील आहे, असे सहायक आयुक्त (औषधे) रोहित गठोड व  औषध निरिक्षक मा. ज. निमसे यांनी सांगितले.

00000




 

इसापूर धरण 95 टक्के भरल्याने  

पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- येत्या काही दिवसात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यास जलाशय प्रचालन आराखड्यानुसार पैनगंगा धरणातील अतिरिक्त पाणी नदीपात्रात सांडव्याद्वारे सोडण्यात  येईल. त्यावेळी पैनगंगा नदीला पूर येऊ शकतो. संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवीत व वित्तहानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरीकांना आपली जनावरे, घरघुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात यावेत, असा सर्तकतेचा इशारा कार्यकारी अभियंता ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी दिला आहे.   

पैनगंगा नदीवरील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापुर धरण 11 सप्टेंबर 2020 रोजी 95.65 टक्के भरले आहे.  धरण पाणी पातळी 440.56 मी आहे. इसापूर धरणाच्या वरच्या भागातील धरणे भरली आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान झाल्यास धरण 100 टक्के भरणार आहे. 

इसापूर धरणाचा जलाशय प्रचालन आराखडा मंजुर आहे. या मंजुर आराखड्यानुसार पुढील वेळापत्रकाप्रमाणे जलाशयामध्ये पाणीसाठा साठविणे आवश्यक आहे. यापेक्षा जास्त पाणी धरणात आल्यास जास्तीचे पाणी सांडव्याद्वारे धरणाच्या खालील बाजुस पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येईल. 

दिनांक 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत 75 टक्के विश्वसाहर्ता (पाणीपातळी) (मी)- 440.79 एवढी आहे तर टक्के 97.70 असून 90 टक्के विश्वसाहर्ता पाणीपातळी मी. 440.86 एवढी आहे. तर टक्केवारी 98.61 आहे. दिनांक 16 ते 30 सप्टेंबर कालावधीत 75 टक्के विश्वसाहर्ता (पाणीपातळी) (मी)- 440.97 असून 99.70 टक्केवारी आहे. 90 टक्के विश्वसाहर्ता पाणीपातळी मी. असून 440.94 आहे. तर टक्केवारी 99.40 एवढी आहे. दिनांक 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत 75 टक्के विश्वसाहर्ता (पाणीपातळी) (मी)-441.00 असून 100 टक्केवारी आहे. 90 टक्के विश्वसाहर्ता पाणीपातळी मी. 441.00 असून तर टक्केवारी 100 आहे, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कार्यकारी अभियंता ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी कळविले आहे.

0000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...