Wednesday, July 15, 2020


वृत्त क्र. 653   
रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित
नांदेड, (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यातील रुग्णवाहिकेचे सुधारित भाडेदर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत निश्चीत करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे दर आकारणी करावी असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  
मुंबई उच्च न्यायालयाचे 9 जून 2020 रोजीचे आदेशान्वये रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदराबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने निर्देश दिले होते. त्यानुसार रुग्णवाहिकांचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
भाडेदर निश्चित करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमध्ये मारुती व्हॅनसाठी 25 कि.मी.अथवा 2 तासासाठी 500 रुपये भाडे, प्रति कि.मी. भाडे 12 रुपये. टाटा सुमो व मॅटॅडोर सदृश्य कंपनीचे बांधणी केलेली वाहने 25 कि.मी.अथवा 2 तासासाठी 550 रुपये भाडे, प्रति कि.मी. भाडे 14 रुपये. टाटा 407 स्वराज माझदा आदीच्या साठयावर बांधणी केलेली वाहने 25 कि.मी.अथवा 2 तासासाठी 650 रुपये भाडे, प्रति कि.मी. भाडे 14 रुपये. आय.सी.यू. अथवा वातानुकूलित वाहने  25 कि.मी.अथवा 2 तासासाठी 1 हजार रुपये भाडे, प्रति कि.मी. भाडे 24 रुपये याप्रमाणे राहतील असे प्रादेशिक परिवहन अधिकारी  शैलेश कामत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

वृत्त क्र. 652   
मोटार सायकल क्रमांकासाठी नवीन मालिका  
नांदेड, (जिमाका) दि. 15 :-  मोटार सायकल वाहनासाठी एमएच 26 बीयू ही नविन मालिका 20 जुलै पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमेलसह अर्ज 20 जुलै रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येतील. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.  
ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 21 जुलै 2020 रोजी सकाळी 11.30  वा. कार्यालयात त्यांची यादी प्रदर्शित करुन टेक्स्ट संदेशाद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000



वृत्त क्र. 651   
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर पालकमंत्र्याच्या सल्ल्याने
प्रशासकाची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी करणार 
नांदेड, (जिमाका) दि. 15 :- राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती  करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज सुरळीत राहण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशासकाची नियुक्ती करतील.
राज्यातील 19 जिल्ह्यातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल  ते जून  दरम्यान समाप्त झाली आहे. 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधी दरम्यान समाप्त होत आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.  
सन 2020 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 10 दि. 25 जून 2020 अन्वये नैसर्गिक आपत्ती किंवा आणिबाणी किंवा युध्द वित्तीय आणिबाणी किंवा प्रशासकीय अडचणी किंवा महामारी यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार पंचायतीच्या निवडणूका घेणे शक्य झाले नसेल तर शासनास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अशा पंचायतीचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 151 मधील पोट-कलम 1 मध्ये खंड (क) मध्ये तरतूद करण्यात आली आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून ज्या व्यक्तीची नियुक्ती केली आहे. अशा व्यक्तींकडून कर्तव्ये पार पाडताना झालेल्या गैरवर्तवणूकीबद्दल किंवा लाच्छणास्पद वर्तणुकीबद्दल अथवा कर्तव्यात दुर्लक्ष केल्याबाबत त्या व्यक्तीस पदावरुन दूर करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतील. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाविरुध्द आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसांच्या मुदतीत प्रशासकास शासनाकडे अपील करता येईल. प्रशासक नियुक्तीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा वाद किंवा तांत्रिक अडचण उद्भवल्यास त्यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामविकास विभागास राहील असे ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी 13 जुलै 2020 च्या शासन निर्णयान्वये कळविले आहे.   
00000


वृत्त क्र. 650   
 नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 6.27 मि.मी. पाऊस
नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात 15 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 6.27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 100.34 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 276.72 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 31.05 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 15 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 15.00 (306.44), मुदखेड- निरंक (210.00), अर्धापूर- निरंक (239.67) भोकर- 3.50 (299.23), उमरी- 1.67 (211.29), कंधार- 7.83 (170.83), लोहा- 7.17 (262.16), किनवट- 17.29 (301.67), माहूर- 36.00 (293.25), हदगाव- 2.71 (295.72), हिमायतनगर-3.67 (506.66), देगलूर- 0.17 (232.27), बिलोली- निरंक (253.00), धर्माबाद- 5.33 (308.32), नायगाव- निरंक (225.60), मुखेड- निरंक (311.41). आज अखेर पावसाची सरासरी 276.72 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 4427.52) मिलीमीटर आहे.
                                                                       00000

वृत्त क्र. 649


कोरोनातून 22 व्यक्ती बरे
42 बाधित तर तिघांचा मृत्यू 
नांदेड (जिमाका) दि. 15 :- नांदेड जिल्ह्यात आज 15 जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 42 व्यक्ती बाधित तर तीन बाधितांचा मृत्यू झाला. यात दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. आजच्या अहवालात एकूण 263 अहवालापैकी 201 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील एकुण  बाधितांची संख्या आता 732 एवढी झाली आहे. यातील 412 बाधित बरे झाल्याने त्यांना  सुट्टी देण्यात आली आहे. 
आज 15 जुलै रोजी 22 बाधित बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 8 बाधित, मुखेड कोविड केअर सेंटर येथील 9, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 1 बाधित, खाजगी रुग्णालयातील 2 बाधित आणि औरंगाबाद येथील संदर्भीत झालेले 2 बाधित असे एकुण 22 बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.  
मंगळवार 14 जुलै  रोजी रात्री बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 62 वर्षीय 1 महिला, बुधवार 15 जुलै रोजी देगलूर येथील 58 वर्षाचा 1 पुरुष, कंधार येथील 46 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचारा दरम्यान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे मृत्यू झाला. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, मधुमेह इतर गंभीर आजार होते. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या 39 एवढी झाली आहे.  
नवीन बाधितांमध्ये  नांदेड गंगाचाळ येथील 24 व 52 वर्षाच्या 2 महिला, विजयनगर नांदेड येथील 40 वर्षाचा 1 पुरुष, जुनामोंढा नांदेड येथील 52 वर्षाचा 1 पुरुष, छत्रपती चौक नांदेड येथील 44 वर्षाचा 1 पुरुष, सन्मान गार्डन वजिराबाद येथील 58 वर्षाचा 1 पुरुष, तरोडा नाका नांदेड येथील 24 वर्षाचा 1 पुरुष, शीवरोड खंडोबा चौक रंघनाथनगर नांदेड येथील 33 वर्षाचा 1 पुरुष, वाजेगाव येथील 20 वर्षाचा 1 पुरुष, धनेगाव येथील 18 व 29 वर्षाचे 2 पुरुष, देगलूर रोड देगलूर येथील 65 वर्षाची 1 महिला, मोतेवार गल्ली देगलूर येथील 39 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर येथील नागोबा मंदिर येथील 45 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर मोतेराम तांडा येथील 60 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर तालुक्यातील होट्टल बेस येथील 32 वर्षाची 1 महिला, देगलूर येथील अंबिका नगर येथील 72 वर्षाची 1 महिला, आनंदनगर देगलूर येथील 60 वर्षाचा 1 पुरुष, माहूर येथील 38 वर्षाचा 1 पुरुष, नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील 50 वर्षाचा 1 पुरुष, नायगाव तालुक्यातील बालाजी नगर नर्सी येथील 66 वर्षाची 1 महिला, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील अनुक्रमे 22,42,32,60,60,65 वर्षे वयाचे 6 पुरुष, 24 व 55 वर्षाच्या 2 महिला, मुखेड तालुक्यातील परतपुर येथील 60 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 42 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड तालुक्यातील बामणी येथील 23,24,28 व 55 वर्षाचे 4 पुरुष, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील 75 वर्षाचा 1 पुरुष व 70 वर्षाची 1 महिला, लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील 24,23,26 वर्षाचे 3 पुरुष व 47 वर्षाची 1 महिला, लातूर सिटी येथील 42 वर्षाची 1 महिलेचा  यात समावेश आहे. 
आज रोजी 281 पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील 24 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात 12 महिला बाधित व 12 पुरुष बाधित आहेत. आज रोजी 377 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळी प्राप्त होतील.
आज रोजी एकुण 732 बाधितांपैकी 39 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 412 बाधित हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरीत 281 बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 74, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 86, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 32, नायगाव  कोविड केअर सेंटर येथे 14, जिल्हा रुग्णालय येथे 11, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 15, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे 5, किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 2, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 11 बाधित, माहूर कोविड केअर सेंटर 1 बाधित तसेच नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात 23 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 5 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. 
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे
सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 990,
घेतलेले स्वॅब- 8 हजार 980,
निगेटिव्ह स्वॅब- 7 हजार 251
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 42
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 732,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 23,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 39,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 412,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 281,
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या 377 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.                    
00000

Tuesday, July 14, 2020


सुधारीत वृत्त क्र. 648   
शेतकऱ्यांनी कापसाच्या विक्रीसाठी
तहसिल कार्यालय व सहायक निबंधक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा
नांदेड दि. 14 :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या कापसाची खरेदी येत्या 3-4 दिवसात संपणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कापूस विक्रीविना त्यांचे घरी पडून असेल आणि ज्यांना शासकिय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्री करावयाचा आहे, त्यांनी तात्काळ संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालय व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच्यादृष्टिने ही योजना असून यात जर व्यापाऱ्याचा कापूस शेतकऱ्यांच्या नावे कापूस खरेदी केंद्रावर विक्री करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा कापूस हा चांगला प्रतीचा असल्याचे तात्काळ लक्षात येते हे लक्षात घेता त्याबाबतही योग्य ती काळजी विक्री केंद्रावर नियमानुसार घेतली जाणार आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता कापुस खरेदी केंद्रावर सामाजिक अंतर व स्वच्छतेचे पालन करुन कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यास शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
शासनाच्या आदेशानुसार कापसाची हमीभावाने खरेदी सुरू करण्याची परवानगी जिल्ह्यात भारतीय कापूस निगम (सीसीआय) व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित (MSCCGMF) मुंबई यांच्यामार्फत अर्धापूर तालुक्यातील सालासार कॉटस्पिन कलदगाव, हदगाव तालुक्यातील नटराज कॉटन तामसा, नायगाव तालुक्यातील जय अंबिका जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी कुंटूर,  भारत कॉटन नायगाव, भोकर तालुक्यातील व्यंकटेश कॉटन पोमनाळा,  मनजीत कॉटन भोकर, धर्माबाद तालुक्यातील मनजीत कॉटन व एल. बी. पांडे, धर्माबाद व किनवट तालुक्यातील एम. एस. कॉटेक्स प्रा. लि. चिखली फाटा किनवट यांना दिली आहे.
जिल्ह्यात कोव्हिड पुर्वी कापूस पणन महासंघ, सी.सी.आय., खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक व कृषि उत्पन्न बाजार समितीमधील अनुज्ञप्तीधारक व्यापारी यांच्यामार्फत एकूण 39 हजार 873 शेतकऱ्यांचा 8,61,252.71 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात कापसाचे सन 2019-20 या वर्षासाठी सर्वसाधारण क्षेत्र 3413.49 हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र 2318.10 हेक्टर क्षेत्र आहे. कापसाची सरासरी उत्पादक 9 क्विंटल प्रती हेक्टर असल्याचे कृषि विभागाने दिलेल्या माहितीवरून दिसून येते.
महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कापसाची प्राथमिक नोंदणी करण्यासाठी तालुकानिहाय ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली आहे. या ऑनलाईन लिंकवर दि. 25 एप्रिल, 2020 पर्यंत एकूण 35,134 शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी लिंकवर नोंदणी करताना दुबार नोंदणी केली होती. अशा दुबार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची नावे वगळल्यानंतर एकूण 28,159 शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी केली असल्याचे दिसून आले. स्थानिक लोकप्रतिनिधी व कापूस उत्पादक शेतकरी यांच्या विनंतीनुसार सदर ऑनलाईन लिंक पुन्हा  25 मे, 2020 पर्यंत सुरू करण्यात आली होती. या कालावधीत पुन्हा नव्याने एकूण 9,392 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी त्यांचे स्तरावर एकूण 2,297 शेतकऱ्यांची ऑफलाईन नोंदणी केली आहे. असे जिल्ह्यात एकूण 39,848 शेतकऱ्यांनी कापसाची नोंदणी केली आहे.
या कालावधीत काही कापूस खरेदी केंद्रावर अपघात, पावसामुळे खरेदीत व्यत्यय, जिनिंग फॅक्ट्रीमध्ये लागलेली आग, संचारबंदीमुळे कामगार त्यांचे गावी निघून जाणे इत्यादी कारणामुळे खरेदी केंद्रांना त्यांचे पूर्ण क्षमतेने कामकाज करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या.
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या व उपलब्ध जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीची संख्या पाहता सर्व शेतकऱ्यांचा कापूस वेळेत खरेदी होणे शक्य नसल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील शिल्लक कापसाची खरेदी पूर्ण होण्यासाठी जिल्ह्याच्या शेजारील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड व यवतमाळ जिल्ह्यातील भारतीय कापूस निगम (CCI) चे पांढरकवडा, झरी जामणी, घाटंजी व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित (MSCCGMF) मुंबई यांच्या उमरखेड, आर्णी, महागाव (गुंज), महागाव (खडका), पुसद व दिग्रस या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी करण्याबाबत संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना तसेच नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागालगत तेलंगणा राज्यातील भारतीय कापूस निगम (CCI) चे मदनूर, भैंसा आणि सोनाळा याठिकाणी नांदेड जिल्ह्यातील कापूस उत्पादकांच्या कापसाची खरेदी होण्यासाठी शासनास लेखी विनंती केली होती. परंतू तेथील स्थानिक लोकप्रतिनिधीनी स्थानिक कापसाची खरेदी पुर्ण झाल्याशिवाय इतर जिल्ह्यातील कापसाची खरेदी करण्यास विरोध दर्शविल्यामुळे या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील कापसाची खरेदी होऊ शकली नव्हती.
जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या विचारात घेता जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी         दि. 17 जून, 2020 च्या आदेशान्वये सर्व उपविभागीय अधिकारी यांना तलाठी, ग्रामसेवक व कृषिसेवक यांच्यामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष असलेल्या कापसाची पडताळणी करण्यासाठी गावपातळीवर सर्व्हेक्षण करणेबाबत आदेशीत केले होते. या पडताळणीमध्ये जिल्ह्यात एकूण 9,450 शेतकऱ्यांकडे अंदाजे 2 लाख 5 हजार 434 क्विंटल कापूस शिल्लक असल्याचे प्रत्यक्ष दिसून आले.
पडताळणीअंती शिल्लक असलेल्या सर्व कापसाची खरेदी करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सुधारित आदेशाद्वारे आदेशीत केले आहे. कोव्हिड नंतर 13 जुलै 2020 अखेर एकूण 11 हजार 543 शेतकऱ्यांचा 2,46,420.28 क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात केवळ कंधार व नायगाव तालुक्यातील जवळपास 1 हजार 12 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे बाकी आहे. या शिल्लक कापसाची खरेदी येत्या 3-4 दिवसात संपणार आहे. तेंव्हा याव्यतिरिक्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कापूस खरेदीविना त्यांचे घरी पडून असेल आणि ज्यांना शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्री करावयाचा आहे. त्यांनी तत्काळ संबंधित तालुक्यातील तहसीलदार व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा आणि खरेदी केंद्रावर चांगला प्रतीचा कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 
000000      

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...