Tuesday, July 14, 2020


सुधारीत वृत्त क्र. 648   
शेतकऱ्यांनी कापसाच्या विक्रीसाठी
तहसिल कार्यालय व सहायक निबंधक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा
नांदेड दि. 14 :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या कापसाची खरेदी येत्या 3-4 दिवसात संपणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कापूस विक्रीविना त्यांचे घरी पडून असेल आणि ज्यांना शासकिय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्री करावयाचा आहे, त्यांनी तात्काळ संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालय व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच्यादृष्टिने ही योजना असून यात जर व्यापाऱ्याचा कापूस शेतकऱ्यांच्या नावे कापूस खरेदी केंद्रावर विक्री करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा कापूस हा चांगला प्रतीचा असल्याचे तात्काळ लक्षात येते हे लक्षात घेता त्याबाबतही योग्य ती काळजी विक्री केंद्रावर नियमानुसार घेतली जाणार आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता कापुस खरेदी केंद्रावर सामाजिक अंतर व स्वच्छतेचे पालन करुन कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यास शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
शासनाच्या आदेशानुसार कापसाची हमीभावाने खरेदी सुरू करण्याची परवानगी जिल्ह्यात भारतीय कापूस निगम (सीसीआय) व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित (MSCCGMF) मुंबई यांच्यामार्फत अर्धापूर तालुक्यातील सालासार कॉटस्पिन कलदगाव, हदगाव तालुक्यातील नटराज कॉटन तामसा, नायगाव तालुक्यातील जय अंबिका जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी कुंटूर,  भारत कॉटन नायगाव, भोकर तालुक्यातील व्यंकटेश कॉटन पोमनाळा,  मनजीत कॉटन भोकर, धर्माबाद तालुक्यातील मनजीत कॉटन व एल. बी. पांडे, धर्माबाद व किनवट तालुक्यातील एम. एस. कॉटेक्स प्रा. लि. चिखली फाटा किनवट यांना दिली आहे.
जिल्ह्यात कोव्हिड पुर्वी कापूस पणन महासंघ, सी.सी.आय., खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक व कृषि उत्पन्न बाजार समितीमधील अनुज्ञप्तीधारक व्यापारी यांच्यामार्फत एकूण 39 हजार 873 शेतकऱ्यांचा 8,61,252.71 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात कापसाचे सन 2019-20 या वर्षासाठी सर्वसाधारण क्षेत्र 3413.49 हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र 2318.10 हेक्टर क्षेत्र आहे. कापसाची सरासरी उत्पादक 9 क्विंटल प्रती हेक्टर असल्याचे कृषि विभागाने दिलेल्या माहितीवरून दिसून येते.
महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कापसाची प्राथमिक नोंदणी करण्यासाठी तालुकानिहाय ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली आहे. या ऑनलाईन लिंकवर दि. 25 एप्रिल, 2020 पर्यंत एकूण 35,134 शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी लिंकवर नोंदणी करताना दुबार नोंदणी केली होती. अशा दुबार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची नावे वगळल्यानंतर एकूण 28,159 शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी केली असल्याचे दिसून आले. स्थानिक लोकप्रतिनिधी व कापूस उत्पादक शेतकरी यांच्या विनंतीनुसार सदर ऑनलाईन लिंक पुन्हा  25 मे, 2020 पर्यंत सुरू करण्यात आली होती. या कालावधीत पुन्हा नव्याने एकूण 9,392 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी त्यांचे स्तरावर एकूण 2,297 शेतकऱ्यांची ऑफलाईन नोंदणी केली आहे. असे जिल्ह्यात एकूण 39,848 शेतकऱ्यांनी कापसाची नोंदणी केली आहे.
या कालावधीत काही कापूस खरेदी केंद्रावर अपघात, पावसामुळे खरेदीत व्यत्यय, जिनिंग फॅक्ट्रीमध्ये लागलेली आग, संचारबंदीमुळे कामगार त्यांचे गावी निघून जाणे इत्यादी कारणामुळे खरेदी केंद्रांना त्यांचे पूर्ण क्षमतेने कामकाज करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या.
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या व उपलब्ध जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीची संख्या पाहता सर्व शेतकऱ्यांचा कापूस वेळेत खरेदी होणे शक्य नसल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील शिल्लक कापसाची खरेदी पूर्ण होण्यासाठी जिल्ह्याच्या शेजारील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड व यवतमाळ जिल्ह्यातील भारतीय कापूस निगम (CCI) चे पांढरकवडा, झरी जामणी, घाटंजी व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित (MSCCGMF) मुंबई यांच्या उमरखेड, आर्णी, महागाव (गुंज), महागाव (खडका), पुसद व दिग्रस या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी करण्याबाबत संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना तसेच नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागालगत तेलंगणा राज्यातील भारतीय कापूस निगम (CCI) चे मदनूर, भैंसा आणि सोनाळा याठिकाणी नांदेड जिल्ह्यातील कापूस उत्पादकांच्या कापसाची खरेदी होण्यासाठी शासनास लेखी विनंती केली होती. परंतू तेथील स्थानिक लोकप्रतिनिधीनी स्थानिक कापसाची खरेदी पुर्ण झाल्याशिवाय इतर जिल्ह्यातील कापसाची खरेदी करण्यास विरोध दर्शविल्यामुळे या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील कापसाची खरेदी होऊ शकली नव्हती.
जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या विचारात घेता जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी         दि. 17 जून, 2020 च्या आदेशान्वये सर्व उपविभागीय अधिकारी यांना तलाठी, ग्रामसेवक व कृषिसेवक यांच्यामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष असलेल्या कापसाची पडताळणी करण्यासाठी गावपातळीवर सर्व्हेक्षण करणेबाबत आदेशीत केले होते. या पडताळणीमध्ये जिल्ह्यात एकूण 9,450 शेतकऱ्यांकडे अंदाजे 2 लाख 5 हजार 434 क्विंटल कापूस शिल्लक असल्याचे प्रत्यक्ष दिसून आले.
पडताळणीअंती शिल्लक असलेल्या सर्व कापसाची खरेदी करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सुधारित आदेशाद्वारे आदेशीत केले आहे. कोव्हिड नंतर 13 जुलै 2020 अखेर एकूण 11 हजार 543 शेतकऱ्यांचा 2,46,420.28 क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात केवळ कंधार व नायगाव तालुक्यातील जवळपास 1 हजार 12 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे बाकी आहे. या शिल्लक कापसाची खरेदी येत्या 3-4 दिवसात संपणार आहे. तेंव्हा याव्यतिरिक्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कापूस खरेदीविना त्यांचे घरी पडून असेल आणि ज्यांना शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्री करावयाचा आहे. त्यांनी तत्काळ संबंधित तालुक्यातील तहसीलदार व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा आणि खरेदी केंद्रावर चांगला प्रतीचा कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 
000000      

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...