वृत्त
क्र. 651
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर पालकमंत्र्याच्या सल्ल्याने
प्रशासकाची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी करणार
नांदेड, (जिमाका) दि. 15 :- राज्यातील मुदत संपलेल्या
ग्रामपंचायतीवर योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज सुरळीत
राहण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी हे प्रशासकाची नियुक्ती करतील.
राज्यातील 19 जिल्ह्यातील
1 हजार 566 ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून
दरम्यान समाप्त झाली आहे. 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते
डिसेंबर 2020 या कालावधी दरम्यान समाप्त होत आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर
प्रशासक नियुक्तीचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी
अधिकारी यांना प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन
होती.
सन 2020 चा महाराष्ट्र
अध्यादेश क्र. 10 दि. 25 जून 2020 अन्वये नैसर्गिक आपत्ती किंवा आणिबाणी किंवा
युध्द वित्तीय आणिबाणी किंवा प्रशासकीय अडचणी किंवा महामारी यामुळे राज्य निवडणूक
आयोगाच्या वेळापत्रकानुसार पंचायतीच्या निवडणूका घेणे शक्य झाले नसेल तर शासनास
राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अशा पंचायतीचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची
नियुक्ती करण्याबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 151 मधील
पोट-कलम 1 मध्ये खंड (क) मध्ये तरतूद करण्यात आली आहे.
मुदत संपलेल्या
ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून ज्या व्यक्तीची नियुक्ती केली आहे. अशा
व्यक्तींकडून कर्तव्ये पार पाडताना झालेल्या गैरवर्तवणूकीबद्दल किंवा लाच्छणास्पद
वर्तणुकीबद्दल अथवा कर्तव्यात दुर्लक्ष केल्याबाबत त्या व्यक्तीस पदावरुन दूर
करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतील. मुख्य कार्यकारी अधिकारी
यांच्या आदेशाविरुध्द आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसांच्या
मुदतीत प्रशासकास शासनाकडे अपील करता येईल. प्रशासक नियुक्तीच्या अनुषंगाने
कोणत्याही प्रकारचा वाद किंवा तांत्रिक अडचण उद्भवल्यास त्यावर अंतिम निर्णय
घेण्याचा अधिकार ग्रामविकास विभागास राहील असे ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य
सचिव यांनी 13 जुलै 2020 च्या शासन निर्णयान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment