Thursday, March 19, 2020

कोरोना : पुणे – मुंबईहून येणा-यांची नोंद होणार,
 रुग्‍णालयात 20 बेड आरक्षित
तहसीलदार परळीकर यांची माहिती
------------------------------------------------------------------------------------------------------------लोहा दि.
      कोरोना व्‍हायरसचा पादूर्भाव होऊ नये यासाठी तालुका प्रशासन यंत्रणा सज्‍ज झाली आहे. पुणे-मुंबई व अन्‍य भागातून लोहा तालुक्‍यात येणा-या प्रत्‍येक नागरिकांची नोंद केली जात आहे. त्‍यांना आवश्‍यक त्‍या सूचना देण्‍यात येत आहेत. लोहा ग्रामीण रुग्‍णालयात दहा व शहरातील खाजगी रुग्‍णालयात दहा असे वीस बेड आरक्षित केले आहेत.  शहरी भागाची संपूर्ण जबाबदारी मुख्‍याधिकारी यांच्‍यावर आहे. नागरिकांनी काळजी घ्‍यावी, घाबरु नये, कोरोनाची लक्षणे आढळल्‍यास तात्‍काळ जवळच्‍या दवाखान्‍यात दाखवावे, असे आवाहन लोहा तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.
      कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 नुसार तालुक्‍यातील गटविकास अधिकारी, मुख्‍याधिकारी न.पा. , गटशि‍क्षणाधिकारी, महिला बालविकास अधिकारी आणि तालुका आरोग्‍य अधिकारी यांच्‍या सेवा अधिग्रहीत करण्‍यात आल्‍या आहेत.
      जिल्‍हाधिकारी डॉं. विपीन ईटनकर यांनी जे आदेश दिले आहेत, त्‍याची अमलबजावणी तालुका प्रशासन करीत आहे. ग्रामीण भागात गावातील गल्‍ली निहाय कोरोना बाबत जनजागृती, नवीन येणा-यांची नोंद घेतल्‍यानंतर  लक्षणे आढळल्‍यास त्‍याची तातडीने माहिती देण्‍यासाठी पथक कार्यान्‍वीत करण्‍यात आले आहे. ग्रामसेवक, शिक्षक, आशा वर्कर्स, अंगणवाडी कार्यकर्ती, सेविका, यांची त्‍या- त्‍या गावात नेमणूक करण्‍यात आली असून ते दैनंदिन अहवाल सबंधिताना देतील असे तहसीलदार परळीकर यांनी सांगीतले.
      कोरोनाचा प्रादूर्भाव होवू नये यासाठी प्रभावीपणे अमलबजावणी तालुका प्रशासन करीत आहे. तहसीलदार परळीकर यांनी केलेल्‍या उपाययोजना बाबत सांगितले की, ग्रामीण रुग्‍णालयात 10 व शहरातील खाजगी रुग्‍णालयात 10 असे 20 बेड आरक्षित करण्‍यात आले आहे. तसेच खबरदारीची उपाययोजना म्‍हणून शहरातील 4 लॉजिंग मध्‍ये विलगीकरणांची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. नगरपालिका क्षेत्रातील सर्व जबाबदारी मुख्‍याधिकारी यांच्‍यावर सोपविण्‍यात आली आहे.
      सर्दी, खोकला, निमोनिया, ताप, अशी लक्षणे असतील तर त्‍यांनी तात्‍काळ रुग्‍णालयात दाखवावे. कोरोनासाठी शासनाकडून मोफत उपचार केला जाणार आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांनी गर्दी टाळावी. लग्‍न - समारंभा टाळावेत, घाबरु नये भीती बाळगु नये असे आवाहन तहसिलदार परळीकर यांनी केले आहे.




राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षात आज करोना संदर्भात आढावा घेऊन उपयुक्त सुचना दिल्या. त्यानंतर येथील श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयात जाऊन कोरोना संदर्भात उभारण्यात आलेल्या वार्डची पाहणी केली. यावेळी आमदार अमर राजुरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक अधिष्ठाता डॉ. निळकंठ भोसीकर उपस्थीत होते.   (छायाचित्र- विजय होकर्णे, नांदेड)

Wednesday, March 18, 2020


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 18 :- जिल्ह्यात सोमवार 30 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात सोमवार 16 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 30 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


कोरोना व्हायरसचा धोका :
राष्ट्रीय लोकअदालत 25 एप्रिलला ;
इतर कायदेविषयक शिबीर रद्द
नांदेड दि. 18 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन 11 एप्रिल रोजीची राष्ट्रीय लोकअदालत 25 एप्रिल रोजी आयोजीत करण्याचे कळविले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे सर्वसामान्य किमान कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणारे सर्व कायदेविषयक शिबीरे, कार्यक्रम व मोबाईल व्हॅन इत्यादी कार्यक्रम पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्याचे कळविले आहे. 
मुंबई राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्याकडून 11 एप्रिल रोजी जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांनी दिली आहे.  
000000


कोरोना विषाणू नियंत्रणासाठी
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे
कामकाजाबाबत आवाहन
नांदेड दि. 18 :- कोरोना विषाणू नियंत्रणासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात येत्या 31 मार्च पर्यंत अनुज्ञप्तीचे नूतनीकरण, वाहनांची पुर्ननोंदणी, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, परवाना संबंधी, वाहन नवीन नोंदणीचे कामे करण्यात येतील. वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा नोंद आदी कामे करण्यात येणार नाहीत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळीच उपाययोजना केल्या आहेत. त्याअनुषंगाने प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध कामानिमित्त मोठया प्रमाणात अभ्यागतांचे येणे-जाणे असल्यामुळे गर्दी जमा होते, त्यामुळे कोरोना व्हायरस प्रसार होण्याची संभावना कमी करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या परिपत्रकान्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कळविले आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे  31 मार्च पर्यंत शिकाऊ अनुज्ञप्त्यासाठी घेतलेल्या अर्जदारांचे अपॉईंमेंट पुढील महिन्यामध्ये रिशेडयूल करण्यात येईल. ज्या अर्जदारांची शिकाऊ अनुज्ञप्ती 31 मार्च पूर्वी संपणार आहे अशा अर्जदारांची पक्क्या अनुज्ञप्तीची चाचणी घेण्यात येणार आहे. सर्व पक्की अनुज्ञप्तीचे अपॉईंटमेंट पुढील महिन्यामध्ये रिशेडयुल करण्यात येणार आहेत. जिल्हयातील सर्व कॅम्प कार्यालय 31 मार्च 2020 पर्यंत बंद राहतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक  परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सज्ज
-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन
नांदेड दि. 18 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी शासन विविध माध्यमातून जनजागृती करीत असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सज्ज असल्याचे, प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ,  शासकीय वैद्यकीय महावि‍द्यालय अधिष्‍ठाता डॉ. चंद्रकांत मस्‍के, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले, रेल्वे स्थानक, विमानतळ, खाजगी बसस्थानक 24 तास तत्पर ठेवण्यात आली आहेत. अत्यावश्यक साधन सामग्रीसह आरोग्य तपासणी पथक तैनात करण्यात येणार आहेत. कोरोना संदर्भात शिक्षक, अशा कार्यकर्त्या यांच्यावतीने व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सज्ज असून आवश्यक त्या सुचना सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना यावेळी देण्यात आल्या. 
000000


वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...