Sunday, September 30, 2018


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
नांदेड विमानतळावर स्वागत

नांदेड, दि. 30 :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार हेमंत पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकूळे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.
याप्रसंगी मनपा आयुक्त लहूराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर तसेच अधिकारी उपस्थित होते. येथून मुख्यमंत्री यांचे हेलिकॉप्टरने किल्लारी जि. लातूरकडे प्रयाण झाले.






Saturday, September 29, 2018


महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा दौरा
नांदेड, दि. 29 :-  राज्याचे महसूल मंत्री संजय राठोड हे रविवार, दि. 30 सप्टेंबर 2018 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.  
रविवार, दि. 30 सप्टेंबर, 2018 रोजी सांयकाळी 7.00 वाजता शासकीय विश्रामगृह , नांदेड येथे आगमन व राखीव.
सोमवार, दि. 1 ऑक्टोबर, 2018 रोजी सकाळी 10.00 वा. वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण.              10.15 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव . 10.55 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
****  


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा
नांदेड, दि. 29 :-  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार, दि. 30 सप्टेंबर 2018 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.  
रविवार, दि. 30 सप्टेंबर, 2018 रोजी शिर्डी येथून निघून विमानाने दुपारी 1.05 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. हेलिकॉप्टरने किल्लारी ता. औसा जि. लातूरकडे प्रयाण करतील.  सांयकाळी 4.50 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व 4.55 वाजता विमानाने दिल्लीकडे प्रयाण. करतील.
000000


Friday, September 28, 2018


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 28 :- जिल्ह्यात शुक्रवार 12 ऑक्टोंबर 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 29 सप्टेंबर ते शुक्रवार 12 ऑक्टोंबर 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


माहिती अधिकार दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
कायदाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
आरटीआय ऑनलाईन प्रणालीचा वापर
नांदेड दि. 28 :- "माहिती अधिकार दिन" हा 28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येतो. "माहिती तंत्रज्ञानाचा- माहिती अधिकार कायदा अंमलबजावणीत होणारा प्रभाव" या विषयावरील व्याख्यानात सहा. जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी अशोक जाजू यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाचे आयोजन उपजिल्हाधिकारी  (सामान्य) अनुराधा ढालकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे केले होते.   
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशभरात 12 ऑक्टोंबर 2005 पासून लागू करण्यात आला आहे. शासनाने वेळोवळी जाणीवपूर्वक उचलेल्या पावलांमुळे अल्पावधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरुपात लोकाभिमूख झाला आहे. राज्यात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायदाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन स्तरावरुन सर्व त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
श्री. जाजू यांनी या कायदाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरटीआय ऑनलाईन प्रणालीचा वापर प्रशासनाच्या कारभारात कसा करावा याची माहिती दिली. आरटीआय ऑनलाईन प्रणाली जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयात कार्यान्वीत करण्यात आली आहे. ही सुविधा         https://rtionline.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार नागरिकांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे माहिती अधिकार अर्ज व अपील दाखल करुन शकतात. तसेच नांदेड जिल्हा संकेतस्थळ www.nanded.gov.in वर माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4 अन्वये प्रत्येक कार्यालयनिहाय, सर्व कार्यासन प्रमुख, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांची 1 ते 17 मुद्यांची माहिती प्रसिद्ध केली आहे. ही माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होऊ शकते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले. यावेळी माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. शेवटी हिमायतनगरचे तहसिलदार डॉ. अशिष बिरादार यांनी आभार मानले.  कार्यक्रमास प्रथम अपिलीय अधिकारी, जन माहिती अधिकारी, सहाय्यक जन माहिती अधिकारी व आरटीआय ऑनलाईन संकेतस्थळाचे कामकाज हातळणारे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.  
00000


29 सप्टेंबर शौर्य दिनानिमित्त
आजी-माजी सैनिकांचा बचत भवन येथे सत्कार
नांदेड, दि. 28 : - भारतीय सैनिकांचा सन्मान आणि सत्कार या भावनेतून शौर्य दिनाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांचा सत्कार जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे शनिवार 29 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 11.30 वा. करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला एनसीसीचे कंमाडींग अधिकारी कर्नल विकासराय शांडील्स, मेजर बिक्रमसिंग थापा, ईसीएचएस अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यातून आपल्याला सैनिकांप्रती असलेली भावना अधिक वृध्दीगंत होण्यास मदत होणार आहे.
29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकदवारे अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यामुळे 29 सप्टेंबर हा दिवस भारतवासियांसाठी अभिमानाचा दिवस आहे. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत जावी तसेच माजी सैनिकांचा सन्मान व्हावा यासाठी राज्य शासनामार्फत 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी, परकीय शक्तीपासून देशवासियांचे रक्षण करण्यासाठी, आपत्ती काळात देशबांधवांच्या मदतीसाठी सज्ज असणारे, कोणत्याही अडचणीत आपली कर्तव्ये चोखपणे बजावणारे भारतीय सैनिक हे आपल्या सर्वांसाठी आदर आणि अभिमान आहेत. भारतीय सैनिकांचे काम हे निश्चितच गौरवाचे, कर्तृत्वाचे आणि अभिमानाचे असून यांचे फार मोठे ऋण आपल्यावर आहेत.
शौर्य दिनाच्या निमित्ताने सैनिकांप्रती आपल्याला असलेली आदराची भावना अधिक वृध्दीगंत व्हावी यासाठी नांदेड जिल्हयातील सर्व विरपत्नी, विरमाता, विरपिता, शौर्यपदकधारक आजी / माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना शौर्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास जिल्हा प्रशासनातर्फे निमंत्रित करण्यात आले आहे, असे नांदेड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. 
0000

Thursday, September 27, 2018

डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण व चर्चासत्र संपन्न
ऑनलाईन फेरफारमुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम कमी होणार 
                            - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 27 :- डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम हा राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असून याद्वारे शेतकऱ्यांना अचूक, संगणीकृत व डिजीटल स्वाक्षरीयुक्त गा. न. नं. 7/12 व 8-अ उपलब्ध होणार आहे. फेरफार ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ व श्रम कमी होणार आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यासाठी डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम विभागीय स्तरावरील प्रशिक्षणवर्ग व चर्चासत्र आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकरी श्री. डोंगरे बोलत होते.   
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामदास जगताप, गणेश देसाई, कृष्णा पाष्टे, नांदेड, लातूर, परभणी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी नांदेड, सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, सर्व तालुक्याचे तहसिलदार, नायब तहसिलदार तथा डीबीए, मंडळ अधिकारी, मास्टर ट्रेनर्स यांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, या प्रकल्पात जिल्ह्याची कामगिरी चांगली असून किनवट तालुक्यातील खंबाळा वगळता जिल्ह्यातील सर्व गावांचे शंभर टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी विशेष करुन तलाठी व मंडळ अधिकारी यांनी परिश्रम घेतले आहे. या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.  प्रकल्प यशस्वी व 7/12 दुरुस्ती, प्रत्येक प्रकारचा फेरफार ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयाद्वारे विविध प्रकारच्या आज्ञावली विकसीत केलेल्या आहेत. त्यात नविन सुविधा वेळोवेळी विकसीत करण्यात येतात. त्या वापरात असतांना तलाठ्यांना विविध तांत्रिक अडचणी येतात. या अडचणीवर मात करण्यासाठी व अज्ञावली वापराची कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जमाबंदी आयुक्त पुणे यांनी विशेष विभागीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन नांदेड येथे करण्याचे निर्देश दिल्यानुसार या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वेणीकर म्हणाले, राज्यातील जनतेला अचूक संगणकीकृत गा. न.नं 7/12 व 8-अ ऑनलाईन उपलब्ध होणे आणि सर्व फेरफार ऑनलाईन पद्धतीने होण्याच्यादृष्टिने राज्य शासनाने डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सुरु आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात चावडी वाचन पूर्ण करण्यात आले असून खातेदारांकडून प्राप्त आक्षेप / तक्रारी नुसार प्रत्येक संगणीकृत गाव न. नं. 7/12 मुळ हस्तलिखीत गाव. नं. नं. 7/12 शी तंतोतंत जुळविण्याचे काम जिल्ह्यात 99.94 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांपैकी 16 तालुक्यांचे रि. एडीटचे काम किनवट तालुक्यातील खंबाळ वगळता शंभर टक्के पूर्ण करण्यात आले असून या 16 तालुक्यांचे प्रख्यापन देखील पूर्ण करण्यात आले आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी व 7/12 दुरुस्त करण्यासाठी व प्रत्येक प्रकारचा फेरफार ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयाद्वारे विविध प्रकारच्या आज्ञावली विकसीत करण्यात आलेल्या आहेत.
या संगणकीय अज्ञावली वापराची कार्यपद्धतीबाबत व प्रत्यक्ष अंमलबजावणीतील येणाऱ्या अडीअडचणी बाबतचे मार्गदर्शन सकाळच्या सत्रामध्ये करण्यात आले. मार्गदर्शनानंतर अडचणी शंकानिरसन करण्यात आले. लातूर , नांदेड, हिंगोली, परभणी येथील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. आभार लोहा तहसीलदार विठ्ठल जवळगेकर यांनी मानले.
000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...