Wednesday, May 24, 2017

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी
 केंद्रीय सैनिक बोर्डाकडून आर्थिक मदत
नांदेड, दि. 24 :- जिल्हयातील माजी सैनिक / विधवांच्या (हवालदार पदापर्यत)  दोन पाल्यांसाठी 12 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. जे पाल्य सन 2016-17 या वर्षात इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत त्यांनी ऑनलाईन अर्ज केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांचेकडे मंगळवार 20 जुन 2017 पर्यत सादर करावे.  
ज्या माजी सैनिक / विधवांनी पेनुरी, मॅरेज मदतीसाठी अर्ज सादर केले नाहीत त्यांनीही ऑनलाईन अर्ज सादर करावे. ऑनलाईन  अर्ज www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध्‍ा आहेत. अधिक माहितीसाठी नांदेड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कप्तान सुनिल गोडबोले यांनी केले आहे.

000000

Tuesday, May 23, 2017

कृषि तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे
- जिल्हाधिकारी डोंगरे
                "उन्नत शेती-समृद्ध शेतकरी" पंधरवड्याचे 25 मे ते 8 जून या कालावधीत आयोजन   

नांदेड, दि. 23 :- कृषि तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती जोडव्यवसाय व विक्री तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे , असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. "उन्नत शेती-समृद्ध शेतकरी" पंधरवडा जिल्हयात गुरुवार 25 मे ते 8 जुन 2017 या कालावधीत साजरा होणार आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयात त्याअनुषंगाने पंधरवडा नियोजन बैठकीत आज ते बोलत होते.   
            "उन्नत शेती-समृद्ध शेतकरी" पंधरवड्यात जिल्ह्यातील प्रत्येक गावात पीक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान तसेच शेती जोडव्यवसाय, प्रक्रिया, शेतमाल विक्री व्यवस्थापन याविषयी कृषि विभागाबरोबर इतर विभागाने सहभागी व्हावे, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिल्या. जिल्हयात पिकाची सरासरी उत्पादकता तसेच शेती जोडव्यवसायाचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषि संलग्न विभागांनी प्रयत्न करुन ठिबक सिंचन, पीक प्रात्यक्षिके, कृषि यांत्रिकीकरण, गुण नियंत्रण, फलोत्पादन आदी योजना शेतक-यांपर्यत पोहचविण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिले.   
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. टी. एस. मोटे, प्रकल्प संचालक (आत्मा)  एस. व्ही. लाडके, कापुस संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. बेग, कृषि विज्ञान केंद्राचे श्री. शिंदे व देशमुख, कृषि व कृषि संलग्न विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

000000

Monday, May 22, 2017

झारखंड राज्याचे अल्पसंख्यांक आयोगाचे
उपाध्यक्ष गुरविंदर सिंग यांचा दौरा
नांदेड, दि. 22 :- झारखंड राज्याचे अल्पसंख्याक आयोगाचे गुरविंदर सिंग हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
मंगळवार 23 मे 2017 रोजी पुणे येथून रेल्वेनी नांदेड येथे सकाळी 9.25 वा. आगमन. नांदेड येथील स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. रात्री नांदेड येथे राखीव व मुक्काम. बुधवार 24 मे 2017 रोजी सायंकाळी 5.30 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथून रेल्वेनी पुणेकडे प्रयाण करतील.
000000


Sunday, May 21, 2017

जलयुक्त शिवार अभियांतर्गत
विविध कामांना जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या भेटी
नायगाव, बिलोली तालुक्यातील कामांची पहाणी
नांदेड, दि. 21 :- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नायगाव व बिलोली तालुक्यातील  नाला खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट नालाबांध, शेततळे, ढाळीचे बांध, सलग समतल चर, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आदी कामांना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज प्रत्यक्ष भेटी देवून पहाणी केली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. एम. कांबळे, बिलोलीचे उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे, वने, पाटबंधारे, कृषि आदि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नायगाव तालुक्यातील गगनबीड येथील ढाळीचे बांध, सलग समतलचर व वृक्ष लागवडीसाठी खोदलेल्या खड्डयांची तसेच देगाव, नायगाव नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाची पहाणी श्री. डोंगरे यांनी केली. यानंतर बिलोली तालुक्यातील मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत लोहगावातील प्रकाश मारोती वसमते यांचे शेततळे, उत्तम माधवराव लंगडापुरे यांच्या शेवगा लागवडीची पाहणी त्यांनी केली. शेतातील शेवगाचे पीक पहावून समाधान व्यक्त केले. शेतमालावर प्रक्रिया करणारे प्रकल्प बचत गटाच्या माध्यमातून स्थापन केल्यास स्थानीक पातळीवर रोजगाराबरोबर शेतकऱ्यांच्या मालांना भाव मिळेल व त्यांना मोठी आर्थिक मदत होईल, अशा विश्वास श्री. डोंगरे यांनी यावेळी व्यक्त केला.  तसेच भू-संजीवनी व्हर्मी कम्पोस्टिंग कामाचे भूमिपूजन ही त्यांचे हस्ते करण्यात आले.
तळणी गावातील शंकर भूमंना तोटावाड यांचे समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत तयार केलेल्या भू-संजीवणी व्हर्मी कम्पोस्टिंगची पहाणी व साईनाथ नागोराव अंकितवार यांच्या भू-संजीवनी नॉडेप कंपोस्टिंगच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. तळणी येथील सिमेंट नालाबांधची पहाणीही त्यांनी केली. कार्यकारी अभियंता श्री. शाहू यांनी या नालाबांधची माहिती त्यांना दिली.
सगरोळी येथील गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत तलावातील गाळ काढण्याच्या कामालाही श्री. डोंगरे यांनी भेट दिली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना उत्कृष्ट गाळाची माती उपलब्ध होणार आहे. शेतात गाळ टाकल्याने जमिनीचा पोत सुधारेल आणि उत्पादन क्षमतेतही वाढ होईल. त्यामुळे या योजनेला लोकसहभागातून अधिक गती दिली पाहिजे. शेतकऱ्यांनीही या योजनेत सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी सगरोळी येथील संस्कृति संवर्धन मंडळाचे प्रमोद देशमुख, जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश पाटील, सरपंच व्यंकटेश पाटील सिदनोड, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. एम. कांबळे, कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तालुका कृषि अधिकारी लतीफ शेख, आदि अधिकारी उपस्थित होते.
000000


डीबीटीद्वारे खत विक्रीचे प्रशिक्षण
जिल्हा परिषदेत संपन्न
नांदेड, दि. 21 :-  येत्या खरीप हंगामसाठी डीबीटीद्वारे खत विक्री व ई-पॉस (e-Pos) मशिन वापराबाबतचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात काल संपन्न झाले. यावेळी शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती माधवराव मिसाळे, कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती दत्तात्रय रेड्डी, समाज कल्याण समितीचे सभापती सौ. शिला निखाते तसेच माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती पवार पुढे म्हणाल्या की, येत्या 1 जून पासून रासायनिक खताची विक्री ई-पॉस  (e-Pos) मशिनद्वारे होणार असून याबाबत प्रशिक्षणाचा लाभ घेण्यात यावा.  बियाणे व खते मिळणेबाबत सर्वांनी खबरदारी घ्यावी. तसेच यावर्षी चांगला पाऊस पडावा, चांगले काम व्हावे व शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत असेही त्यांनी सांगितले.
शिक्षण व आरोग्य समिती सभापती श्री. मिसाळे म्हणाले की, कृषिनिविष्ठा विक्रेत्यांनी आपला व्यवसाय प्रामाणीकपणे करावा. कोणावरही कार्यवाही करण्याची वेळ येऊ नये तसेच येणाऱ्या तक्रारीची शहाणीशा करुनच कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
माजी आमदार माधवराव पाटील म्हणाले की,  ई-पॉस  (e-Pos) मशिन वापराबाबतचे प्रशिक्षण परिपूर्ण घेऊन येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खते उपलब्ध होतील याची सर्वांनी काळजी घ्यावी. व्यापाऱ्याचे प्रश्न सोडविण्यात येथील असेही सांगितले
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की, कृषि विभागामार्फत डीबीटी प्रकल्प राबविण्याबाबत करण्यात आलेली कार्यवाही कौतूकास्पद आहे. खत विक्रेत्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन डीबीटी प्रकल्प यशस्वी करावा.  शेतकऱ्यांना योग्य दर्जाचे, योग्य किंमतीत व योग्यवेळी कृषिनिविष्ठा उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी. तसेच निविष्ठा वाटपादरम्यान कुठल्याही प्रकारची अनियमितता होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशाही सूचना त्यांनी केल्या.  
जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी जिल्हयाची सर्वसाधारण माहिती तसेच खरीप हंगाम 2017 मध्ये लागणारे  बियाणे व खते पुरेशे प्रमाणात उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. तसेच  खरीप हंगामासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना, निविष्ठा उपलब्धतेबाबत नियंत्रण कक्ष, विक्री केंद्रावर शासनाचे टोल फ्री क्रमांकाचे भरारी पथकाचे क्रमांकाचे फ्लेक्स लावण्यात येत असून शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते उपलब्ध दर्जा तसेच अडचणीबाबत याचा उपयोग होणार असल्याची माहिती दिली. गुरुवार 1 जून 2017 पासून रायायनिक खताची विक्री e-Pos मशिनद्वारे होणार असून त्यासाठी सर्व खत विक्रेत्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती दिली. e-Pos मशिनचे 20 मे रोजी भोकर, देगलूर, मुखेड, बिलोली व  किनवट, माहूर , हिमायतनगर, हदगांव या तालुक्यातील खत विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये 1 हजार 100 खत विक्रेत्यांना e-Pos मशिनचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती  कृषि विकास अधिकारी श्री. मोरे यांनी  दिली.

या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य श्री. सरोदे,श्री. एलमगोंडे, नांदेड जिल्हा कृषिनिविष्ठा संघटनेचे अध्यक्ष मधुकर मामडे, खत कंपनीचे प्रतिनिधी श्री. संजयकुमार, शिवा ग्लोबल इन्डस्ट्रीजचे श्री. वेणीकर व खत विक्रेते, आदी उपस्थित होते. उपस्थितीत पदाधिकारी,  खत विक्रेते, खत कंपनी अधिकारी यांचे आभार मोहीम अधिकारी ए.जी. हांडे यांनी मानले. 

000000

Saturday, May 20, 2017

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी
बँकांनी पीक कर्ज उपलब्ध करुन दयावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 20 :-  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी बँकांनी पीक कर्ज तातडीने उपलब्ध करुन दयावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे दिले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी कक्षात सर्व बँकेच्या जिल्हा समन्वयकांची बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक विजय दुर्वे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. बी. लाडे व बँकाचे जिल्हा समन्वयक आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात पिकांच्या पेरणी पूर्वी रक्कम मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी बँकांनी दिलेल्या उद्दीष्टानुसार पीक कर्जाचे तातडीने वाटप करावे. कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी मेळावे घेऊन पीक कर्ज मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी केले.
सुशिक्षित बेरोजगार, महिला बचतगटाकडून रोजगार व व्यवसायासाठी तसेच विविध योजनेच्या लाभासाठी कर्जाचे प्रस्ताव बँकाकडे येत असतात. हे प्रस्ताव ही तात्काळ मंजूर करुन त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले पाहिजे असेही त्यांनी सूचना दिल्या.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत बँकाकडे येणारी कर्ज प्रकरणे त्वरेने मंजूर करण्याबरोबर अर्थसहाय्यही उपलब्ध करुन दिले पाहिजे असे श्री. शिनगारे यांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान आवास योजना, महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना अर्थसहाय्य, मुद्रा योजना, आदी योजना संबंधी बँकांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावाही घेण्यात आला.
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक विजय दुर्वे यांनी पीक कर्ज व आदी योजनेंतर्गत दिलेली उद्दीष्ट व उद्दीष्टपुर्ती केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

000000
क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी
अर्ज सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 20 :- क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज मंगळवार 30 मे 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्राप्त करुन परिपूर्ण अर्जासह प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांनी केले आहे.    
या योजनेअंतर्गत क्रीडांगण विकसीत करणे, बंदिस्त प्रेक्षागृह, ॲस्ट्रोर्टफ हॉकी क्रीडांगण, लॉन टेनिस कोर्ट, जलतरण तलाव व विविध खेळांचे क्रीडा साहित्य आदी सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण- 2012 अन्वये राज्यातील महत्वाची एक प्रमुख शिफारस क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सुविधा सहाय्य करणे ही योजना दि. 1 मार्च 2014 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजुर करण्यात आली आहे. राज्यातील शैक्षणीक संस्था, खाजगी क्लब, क्रीडा मंडळे, प्राधिकरणे, स्थानीक स्वराज्य संस्था यामधून दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करणे त्यामुळे खेळाडुंच्या कामगिरीत वाढ होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
प्राप्त अर्जाची तपासणी करुन परिपूर्ण अर्ज आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत.  या योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्ज प्राप्त करुन घेण्यासाठी नांदेड क्रीडा कार्यालयातील क्रीडा अधिकारी एम. जे. सोनकांबळे यांच्याकडे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

0000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...