Sunday, May 21, 2017

जलयुक्त शिवार अभियांतर्गत
विविध कामांना जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या भेटी
नायगाव, बिलोली तालुक्यातील कामांची पहाणी
नांदेड, दि. 21 :- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नायगाव व बिलोली तालुक्यातील  नाला खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट नालाबांध, शेततळे, ढाळीचे बांध, सलग समतल चर, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आदी कामांना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज प्रत्यक्ष भेटी देवून पहाणी केली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. एम. कांबळे, बिलोलीचे उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे, वने, पाटबंधारे, कृषि आदि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नायगाव तालुक्यातील गगनबीड येथील ढाळीचे बांध, सलग समतलचर व वृक्ष लागवडीसाठी खोदलेल्या खड्डयांची तसेच देगाव, नायगाव नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाची पहाणी श्री. डोंगरे यांनी केली. यानंतर बिलोली तालुक्यातील मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत लोहगावातील प्रकाश मारोती वसमते यांचे शेततळे, उत्तम माधवराव लंगडापुरे यांच्या शेवगा लागवडीची पाहणी त्यांनी केली. शेतातील शेवगाचे पीक पहावून समाधान व्यक्त केले. शेतमालावर प्रक्रिया करणारे प्रकल्प बचत गटाच्या माध्यमातून स्थापन केल्यास स्थानीक पातळीवर रोजगाराबरोबर शेतकऱ्यांच्या मालांना भाव मिळेल व त्यांना मोठी आर्थिक मदत होईल, अशा विश्वास श्री. डोंगरे यांनी यावेळी व्यक्त केला.  तसेच भू-संजीवनी व्हर्मी कम्पोस्टिंग कामाचे भूमिपूजन ही त्यांचे हस्ते करण्यात आले.
तळणी गावातील शंकर भूमंना तोटावाड यांचे समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत तयार केलेल्या भू-संजीवणी व्हर्मी कम्पोस्टिंगची पहाणी व साईनाथ नागोराव अंकितवार यांच्या भू-संजीवनी नॉडेप कंपोस्टिंगच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. तळणी येथील सिमेंट नालाबांधची पहाणीही त्यांनी केली. कार्यकारी अभियंता श्री. शाहू यांनी या नालाबांधची माहिती त्यांना दिली.
सगरोळी येथील गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत तलावातील गाळ काढण्याच्या कामालाही श्री. डोंगरे यांनी भेट दिली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना उत्कृष्ट गाळाची माती उपलब्ध होणार आहे. शेतात गाळ टाकल्याने जमिनीचा पोत सुधारेल आणि उत्पादन क्षमतेतही वाढ होईल. त्यामुळे या योजनेला लोकसहभागातून अधिक गती दिली पाहिजे. शेतकऱ्यांनीही या योजनेत सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी सगरोळी येथील संस्कृति संवर्धन मंडळाचे प्रमोद देशमुख, जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश पाटील, सरपंच व्यंकटेश पाटील सिदनोड, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. एम. कांबळे, कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तालुका कृषि अधिकारी लतीफ शेख, आदि अधिकारी उपस्थित होते.
000000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...