Tuesday, February 28, 2017

डिजीटल प्रदानांतर्गत ‘डिजीधन’ मेळावा
6 ऐवजी 24 मार्च रोजी होणार
नियोजन भवन येथे आयोजन
नांदेड दि. 28 :- केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमे अंतर्गत राज्यभरात डिजीधन मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात अशा या डिजीधन मेळाव्याचे सोमवार 6 मार्च 2017 रोजी आयोजन करण्यात येणार होते. तथापी निती आयोगाच्या बदललेल्या वेळापत्रकानुसार हा मेळावा शुक्रवार 24 मार्च 2017 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे , जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे. 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नियोजन भवन मध्ये मुख्य कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यात डिजीटल प्रदानाशी निगडीत बँका, तसेच विविध व्यापारी कंपन्या, शासकीय विभाग आदी सहभागी होणार आहेत.
 रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच डिजीटल व्यवहारांची माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात डिजीटल व्यवहार करणाऱ्यांसाठीच्या भाग्यवान बक्षीस विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात बँका व इतर सहभागी घटक विविध दालनांद्वारे डिजीटल प्रदानाच्या व्यवहारांची प्रात्यक्षिके, माहिती देणार आहेत.
0000000


पोलीस, सैन्यदल पूर्व प्रशिक्षणासाठी   
गुरुवारी नांदेड येथे निवड शिबीर
अ.जा., नवबौद्ध घटकातील तरुणांसाठी संधी

नांदेड दि. 28 :- अनुसूचित जाती व नवबौध्द  घटकातील युवक व युवतींसाठी अमरावती येथे आयोजित सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी गुरुवार 2 मार्च 2017 रोजी नांदेड जिल्हयातील उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी  केले आहे.
            सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक व युवतींसाठी सैन्य व पोलीसमध्ये भरती करण्याकरिता भरतीपुर्व प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर केला आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा असून प्रशिक्षण श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे होणार आहे. प्रशिक्षणार्थी 38 पैकी 30 टक्के महिला आरक्षण असल्याने 27 पुरुष व 11 महिला प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांसाठी सैन्य व भरतीपुर्व प्रशिक्षणासाठी पात्र अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.
            उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. उमेदवाराचे वय हे 18 ते 25 वयोगटातील असावे. उमेदवाराची पुरुष उंची 165 से.मी व महिला उंची 155 से.मी. छाती न फुगवता पुरुष 79 से.मी. (फुगवुन 84 से.मी. ) असावी. शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी पास. जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातील नोंदणी आणि ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक राहील. उमेदवार हा शारीरीक व मानसिक दृष्टया निरोगी असावा.
            प्रशिक्षणाच्या निवडीसाठी नांदेड जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक, युवतीनी गुरुवार 2 मार्च 2017 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेच्या समोर, नमस्कार चौक, नांदेड येथे मूळ कागदपत्रासह व साक्षांकित प्रतीसह उपस्थित राहावे. उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना जाण्या-येण्याचा भत्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी. एन. वीर यांनी यांनी केले आहे.

00000
दहावी, बारावी परीक्षा केंद्रांच्या
 परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड, दि. 28 :-  जिल्ह्यात बारावीच्या (उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र) परीक्षा केंद्र परिसरात 28 फेब्रुवारी 2017 ते 25 मार्च 2017 या कालावधीत व दहावी (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र) परीक्षा केंद्र  परिसरात 7 मार्च 2017 ते 1 एप्रिल 2017 या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर 28 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर 7 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत होत आहेत. या परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  

000000

Monday, February 27, 2017

आदिवासी क्षेत्रातील शिक्षकांचे
नेत्र विषयक प्रशिक्षण संपन्न
नांदेड, दि. 27 –  उपजिल्हा रुग्णालय  गोकुंदा येथे 21 व 22 फेब्रुवारी रोजी शासनाच्या दृष्टीदान योजने अंतर्गत  शिक्षकांच्या प्राथमिक दृष्टी तपासणी प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय नांदेड यांचे मार्फत घेण्यात आला. या प्रशिक्षणात शालेय स्तरावर विद्यार्थ्याची दृष्टी तपासून अंशतः ज्या विद्यार्थ्यांची दृष्टी कमी आहे त्यांना संदर्भीत करण्याचे प्रत्याक्षित दाखवून शिक्षकांकडून प्रत्याक्षित करून घेण्यात आले व त्याचा सराव ही करून घेण्यात आला.
शिक्षकांना आवश्यक साहित्य उदा E-chart, मोजपट्ठी टेप, रजिस्टर, संदर्भित करावयाचे कार्ड, पेन इत्यादीचे फोल्डर देण्यात आले. जेणे करून शिक्षकांना काम करताना सोयीचे होईल. ज्या विद्यार्थ्यांची दृष्टी कमी आहे त्यांना शालेयस्तरावरच तपासून  संदर्भीत करण्यात येईल म्हणजे त्यांचा नेत्रविकार दूर होऊन विद्यार्थ्याची दृष्टी कायम उत्तम राहील व अभ्यासात प्रगती होईल. संदर्भीत विद्यार्थ्याना आवश्यक उपचार शासकीय स्तरावर राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत देण्यात येतील व त्यांचा नेत्रविकार दूर होईल.या प्रशिक्षण आदिवासी भागातील 84 शिक्षकांना ( किनवट व माहूर ) देण्यात आले, ज्या शिक्षकांचे प्रशिक्षण झाले आहे ते शिक्षक त्यांचा शाळेतील इतर शिक्षकांना प्रशिक्षित करणार आहेत.
         या कार्यक्रमासाठी नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.पी.कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ गुंटूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. इंगळे, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. सिरसीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेत्रतज्ज्ञ डॉ. उंचेगावकर, डॉ. बंद्रेवार, नेत्र चिकित्सा अधिकारी विवेक दिक्षित, राहुल गोरे, विशाल साळवे व गजानन टेकाळे यांनी परिश्रम घेतले.

000000
अनुदानित शाळांच्या वेतनेतर अनुदानाच्या
निर्धारणासाठी उद्यापासून  शिबीर
नांदेड, दि. 27 :-  नांदेड  जिल्ह्यातील मार्च 2008 रोजी शंभर टक्के अनुदानीत असलेल्या सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वेतनेत्तर अनुदान वाटप करण्यासाठी अनुदान निर्धारण शिबीर मल्टीपर्पज हायस्कूल वजिराबाद नांदेड येथे आयोजित केले आहे.
या शिबिरासाठी तारखेनुसार उपस्थित राहण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे - बुधवार 1 मार्च 2017 रोजी नांदेड, अर्धापूर, लोहा व कंधार तालुका. गुरुवार 2 मार्च 2017 रोजी उमरी, धर्माबाद, मुदखेड, बिलोली. शनिवार 4 मार्च 2017 रोजी किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर व सोमवार 6 मार्च 2017 रोजी देगलूर, मुखेड, नायगाव व हदगाव तालुका याप्रमाणे आयोजित केले आहे.  
शिबिरास उपस्थित राहून सर्व मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आवश्यक त्या माहितीस्तव प्रस्ताव दाखल करावा. शिबिरास अनुपस्थित राहणाऱ्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या शाळेस वेतनेत्तर अनुदान मिळणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (मा.) यांनी केले आहे.

00000
दहावी, बारावीतील खेळाडुंना
गुणासाठी प्रस्ताव देण्याचे आवाहन
            नांदेड दि. 27 :-   जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 12 वी मधील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडुंना क्रीडा सवलतीचे वाढीव 25 गुण देण्यासंदर्भात शासन‍ निर्णयाच्या अनुषंगाने सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे मार्फत आयोजित राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त किंवा सहभाग नोंदविलेल्या खेळाडुंना सवलतीचे गुण देण्यात येतात. याकरीता विहित नमुन्यातील अर्ज प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह आपले परिपूर्ण प्रस्ताव क्रीडा प्राध्यापक व शारीरिक शिक्षक यांच्यामार्फत शुक्रवार 10 मार्च 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे सादर करावेत.
            जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांची प्रतीस्वाक्षरी घेवून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ लातूर विभाग लातूर येथे सादर करावेत. तसेच हे प्रस्ताव पालकांमार्फत स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. तसेच विहित मुदतीत प्राप्त न झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
            तसेच सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात मान्यता प्राप्त विविध खेळ संघटना मार्फत आयोजित केलेल्या राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त किंवा सहभाग झालेल्या खेळाडुंचे अर्जासोबत शासन निर्णय 21 एप्रिल 2015 अन्वये जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. याबाबत आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत यादी प्राप्त झाल्यानंतरच प्रस्ताव स्विकारले जातील. याबाबत खेळ निहाय प्राप्त यादीची प्रत नोटीस बोर्डवर लावण्यात येईल, त्यानंतर अर्ज सादर करावेत. क्रीडा सवलतीचे गुण मिळण्यापुर्वी नांदेड जिल्ह्यातील क्रीडा संघटनेनी शासन निर्णय 21 एप्रिल 2015 मधील परिशिष्ट अ मधील नियम व अटीच्या नुसार संघटनेचा अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे बुधवार 15 मार्च 2017 पुर्वी सादर करावेत. शासन निर्णयातील 15 अटीचे पालन न झाल्यास कोणत्याही संघटनेच्या खेळाडूस सवलतीचे गुण मिळणेबाबतच्या प्रस्तावाची शिफारस करण्यात येणार नाही. तसेच प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी सुद्धा खेळाडुंनी जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे खेळाडुच्या ग्रेस गुणचे प्रस्ताव शिफारस करावे.
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातली मुले-मुली खेळाडुंनी सवलतीचे गुण मिळण्याकरीता विहित मुदतीत कार्यालयीन वेळेत आपले अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादवे यांनी केले आहे.
           

00000
पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचा दौरा
नांदेड, दि. 27 :-  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे बुधवार 1 मार्च 2017 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 1 मार्च 2017 रोजी अहमदपूर येथून मोटारीने दुपारी 1.30 वा. शासकीय विश्रामगृह माळेगाव ता. कंधार येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा. शासकीय विश्रामगृह माळेगाव येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. सायंकाळी 4.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 5.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण करतील. सायं. 5.30 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व राखीव. सायं. 6.05 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथून देवगिरी एक्सप्रेसने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

000000

दुष्काळग्रस्तांना वेळेत मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे. पाणी, चारा व रोजगार हमीच्या कामांचा आढाव...