Saturday, October 29, 2016

आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द
नांदेड, दि. 29 :- जिल्ह्यात विधान परिषद, नगरपालिका, नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम असल्यामुळे जिल्ह्यात 14 ऑक्टोंबर पासून आचार संहिता लागू झाली आहे. त्यामुळे बुधवार 2 नोव्हेंबर 2016 रोजी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने महिन्याचा पहिला सोमवार म्हणून लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात येतो.

0000000
नांदेड विधापरिषदेसाठी
दोन उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल
नांदेड, दि. 29 :- महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक 2016  साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी आज दोन उमेदवाराने तीन नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयातील नामनिर्देशन कक्षाकडून देण्यात आली.
नामनिर्देशनपत्रे देण्याचा व स्विकारण्याचा आज चौथा दिवस होता. यात आज अमरनाथ आनंतराव राजूरकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणून दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर गजानन श्रीराम पवार यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.   

00000000
महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यावतीने
रावळकर कुटुंबियांना 3 लाख रुपयांची आर्थीक मदत
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते वितरीत
        नांदेड, दि. 29 :- अवयवदानामुळे अजरामर झालेल्या सुधीर रावळकर यांच्या पत्नी तिलोत्तमा रावळकर व मुलगी श्रृती यांना जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते 3 लाख रुपयांची आर्थीक मदत आज देण्यात आली. श्री. काकाणी यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन सांत्वन केले. महसूल अधिकारी, कर्मचारी रावळकर कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगीतले.
      
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात ही आर्थिक मदत सुधीरची मुलगी श्रृतीच्या नावे मुदत ठेवीमध्ये देण्यात आली. यावेळी सुधीरची आई रुक्मीणी प्रल्हादराव रावळकर, बहीण चंदा रावळकर, शोभा रावळकर, लता कल्याणकर, भाच्ची जान्हवी डांगे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसिलदार अरुणा संगेवार, अरविंद नरसीकर, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कुणाल जगताप, राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण नरमवार, तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष एन. जी. कानगुले, राज्य उपाध्यक्ष एम. एम. काकडे, महसूल अधिकारी कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष किरण अंबेकर आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
           रावळकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी पुढाकार घेतला होता. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनांनी मोठा प्रतिसाद  देवून रावळकर कुटुंबियांना आर्थिक मदत स्वत: स्वयंस्फुर्तीने दिली आहे. यावेळी रावळकर कुटुंबियांच्या पाठीशी खंबिरपणे आम्ही उभे आहोत असा विश्वास दिल्याने त्यांना एक मायेचा आधार मिळाला आहे.

000000

Friday, October 28, 2016

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीचे
नामनिर्देशनपत्रे 1 नोव्हेंबर रोजी स्वीकारले जाणार
        नांदेड, दि. 28 :  महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक 2016 साठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र स्विकारण्याची अंतिम मुदत बुधवार 2 नोव्हेंबर 2016 आहे. अधिनियमातील तरतुदी विचारात घेता 1 नोव्हेंबर 2016 रोजीची सुट्टी ही सार्वजनिक सुट्टी या व्याख्येत मोडत नसल्याने मंगळवार 1 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची कार्यवाही सुरु ठेवणे आवश्यक आहे. अशा सूचना उपसचिव व सह. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिल्या आहेत.  म्हणून नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2016 रोजी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येतील असे नांदेड जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.
         शासन राजपत्र 24 नोव्हेंबर 2015 अन्वये शासनाने 1 नोव्हेंबर 2016 रोजी शासकीय, निमशासकीय, कार्यालयांना भाऊबीज निमित्त सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी पराक्रम्य संलेख अधिनियम 1981 खाली जाहीर केले नाही.  लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1991 मधील नियम 33 मध्ये नामनिर्देशन पत्र सादर करणे आणि विधीग्राह्य नामनिर्देशन याबाबत तरतूद दिली असून त्याखालील दिलेल्या परंतुकामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे नामनिर्देशनपत्र जो दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केला आहे, त्या दिवशी सादर करता येणार नाहीत अशी तरतूद आहे. अधिनियमातील व्याख्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी याची व्याख्या दिली असून त्यात सार्वजनिक सुट्टी म्हणजे पराक्राम्य संलेख अधिनियम, 1981 मधील कलम 25 नुसार सार्वजनिक सुट्टी अशी आहे.  या तरतुदी विचारात घेता 1 नोव्हेंबर रोजी सुट्टी ही सार्वजनिक सुट्टी या व्याख्येत मोडत नसल्याने 1 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची कार्यवाही सुरु राहणार आहे.  

00000000
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी
4 नोव्हेंबर पासून सुरु होणार
नांदेड, दि. 28 :- बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या दिवाळी सुट्टीत बदल करण्यात आला आहे. शुक्रवार 4 नोव्हेंबर 2016 रोजी पासून विद्यार्थ्यांना शिकवणी सुरु होणार आहे, अशी माहिती प्राचार्य हरिवरा प्रसाद यांनी दिली आहे.  
शाळेतील संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक व नातेवाईकांनी आपल्या पाल्यास 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. शाळेत येताना सोबत सुट्टीपुर्वी दिलेले पालक बॉयोडाटा व पालकांचे ओळखपत्र पूर्ण करुन घेवून यावे, असे आवाहनही केले आहे.

00000000
कापूस, तुर पिकावरील किड नियंत्रणासाठी
कृषि विभागाचा संदेश
नांदेड, दि. 28 :-  जिल्ह्यात कापूस व तूर पिकासाठी किड, रोग सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पिकावरील किडीच्या संरक्षणासाठी उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी संदेश दिला आहे.
कापसावरील फुले येणाच्या व बोंडे निर्मितीच्या अवस्थेत जर पाने लाल पडत असतील तर मॅग्नेशिअम सल्फेट 0.2 टक्के @ 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीवरील पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरीता डायफेनथुरिऑन 50 डब्लु. पी. 1.2 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुलोरामधील तुरीसाठी लिंबोळी अर्क 5 टक्के किंवा एचएएनपीव्ही 500 मिली प्रती हेक्टर याप्रमाणे फवारणी करावी. शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी प्रती हेक्टर 5 कामगंध सापळे लावावेत, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

00000
आरोग्य शिबीरात 118 रुग्णांची तपासणी 
नांदेड, दि. 28 :-राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयाच्यातीने आज हनुमानगड नांदेड येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात 118 रुग्णांचे मधुमेह, उच्च रक्तदाब, मौखिक आरोग्य व नेत्र इत्यादी आजारांची मोफत तपासणी करण्यात आली.
तपासणीत मधुमेहाचे 10, उच्चरक्तदाब 8, मौखिक आरोग्याची 25 व मोतीबिंदुचे 55 रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी 50 रुग्णांत दृष्टीदोष असल्याचे आढळून आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. जी. सी.घोडके, डॉ. ए. आय. शेख, एनसीडी अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता.

0000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...