Sunday, October 16, 2016

“आमचा गाव, आमचा विकास” योजनेतून
खैरगावला मिळाला शुद्ध पेयजल प्रकल्प
चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून “आमचा गाव, आमचा विकास” कार्यक्रमांतंर्गत गावात यंदा उद्भवलेला पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावून गावातील लोकांना शुध्द पाणी उपलब्ध करुन दिल्याचे सरपंच सौ. कल्पना दत्ता नादरे सांगत होत्या.
नांदेड जिल्हयाच्या अर्धापूर तालुक्यातील खैरगावमध्ये आत्तापर्यंत कधीच पाणी प्रश्न उद्भवला नव्हता. पण यंदाच्या उन्हाळयात मात्र पाणीपातळीने तळ गाठला. गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. यावेळी माहिती मिळाली ती चौदाव्या वित्त आयोगाबाबतच्या निधीची, या आयोगातून राज्य शासनाला 1 हजार 500 कोटी रुपये सन 2015-20 या कालावधीतच उपलब्ध होणार आहेत. यामध्ये 5 वर्षासाठी गावाची लोकसंख्या, क्षेत्रफळानुसार निवड करण्यात येणार आहे. देण्यात येणारा निधी टप्याटप्याने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणी, रस्ते, अदी बाबींवर खर्च करण्यात येणार आहे आणि यंदा त्याच आयोगाचा  उपयोग  गावातील  पाणी टंचाईसाठी कामी आला असे सरपंच सौ. नादरे म्हणाल्या.
गावात दोन ठिकाणी बोअरवेल घेण्यात आल्या. त्यातील एक बोअरवेलला भरपूर पाणी लागले मग संकल्पना सूचली की, आपण पाणी शुध्द स्वरूपात उपलब्ध करून दिलं तर आणि आरओ प्लॅान्ट (शुध्द पेयजल) बद्दल माहिती मिळवली साधारण या प्रकल्पासाठी अडीच लाखापर्यंत खर्च येणार होता आणि तो 14 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून करायचा ठरवलं. संबंधित कंपनीला थेट संपर्क साधला आणि जागेची पाहणी करून लगेच सर्व यंत्रणा बसवून देण्याच्या हालचाली चालू केल्या आणि अवघ्या 15 दिवसांत सर्व यंत्रणा तयार झाली. पाणी टंचाई दरम्यान गावातील लोक खाजगी RO Plant मधून ज्यादा दाराने पिण्याचे पाणी खरेदी करत होते तेच शुध्द पाणी आता गावकऱ्यांना अत्यंत माफक दरात म्हणजेच 5 रुपयात 20 लिटर पाणी एटीएम मशिनच्या माध्यमातून देण्यात येत आहे, असेही सरपंच सौ. नादरे यांनी सांगितले.
या शुध्द पेयजल प्रकल्पामुळे लोकांना पाण्याचे महत्त्व कळाले आणि दुसरे म्हणजे पाण्यातून होणाऱ्या रोगांमुळे आरोग्याचा प्रश्न मार्गी लागला. याबद्दल गावातील ललिताबाई मुंगल या महिलेची प्रतिक्रिया खूप बोलकी होती त्या म्हणाल्या की , “आम्हाला पुर्वी पिण्याचे शुध्द पाणी घेण्यासाठी जास्तीचे पैसे लागत होते. पण आता गावातच शुध्द पाणी मिळत असल्यामुळे चांगले झाले आहे. आनंदा लोखंडे म्हणाले की , खरं तर आमच्यासाठी हे सगळं स्वप्नासारखं आहे कारण एवढया स्वस्तात पाणी तेही आमच्याच गावात आम्हाला मिळत असल्यामुळे बाहेरच्या RO Plant शुध्द पेयजलवाल्यांची मनधरणी करावी लागत नाही. हे सर्व पाणी आम्हाला पाहिजे तेंव्हा मिळत आहे.
सध्या या शुध्द पेयजल केंद्राची क्षमता 1 हजार लिटर असून पुढील काळात ही क्षमता वाढविण्यात येवून उन्हाळयात थंड पाणी सुध्दा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा मानस सरपंच सौ. नादरे यांनी बोलून दाखवला. या सर्व वाटचालीत त्यांना सर्व ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच गावातील नागरिकांनी पण मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.
-         राष्ट्रपाल साहेबराव सरोदे
     मो.  9860233964
 (लेखक जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे आंतरवासिता करीत आहेत)
0000000


Saturday, October 15, 2016

जलयुक्त शिवार पत्रकार पुरस्कारासाठी
अर्ज करण्याची मुदत 20 ऑक्टोबर
नांदेड, दि. 15 :- जलयुक्त शिवार अभियानात वृत्तपत्रातून तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जलसंधारणाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींना शासनातर्फे राज्य, विभाग तसेच जिल्हास्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागविण्याच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला असून आता इच्छुक पत्रकारांनी 20 ऑक्टोबर 2016 पर्यंत प्रवेशिका विहित नमुन्यात तीन प्रतीत संबंधित स्तरावरील निवड समितीकडे सादर करावी. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शासन निर्णय यामधील ग्रामविकास व जलसंधारण विभागाचा दि. 28 सप्टेंबर 2016 रोजीचा शासन निर्णय आणि दि. 10 ऑक्टोबर 2016 रोजीचे  शासन  परिपत्रक पहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000
वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन,
 ई-बुकचे सामुहिक वाचन संपन्न
            नांदेड, दि. 15 :- वाचनाचा हेतू ज्ञान मिळविण्यासाठी, अभ्यासासाठी, विरंगुळयासाठी, मनोरंजनासाठी असा असला तरी खरे वाचन स्वत:ला ओळखण्यासाठी करावयाचे असून वाचन ही एक तपश्चर्या,साधना असायला हवी अशा वाचनातून स्वत:ची ओळख निर्माण होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांनी केले.
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शन व ई-बुक्सचे सामू‍हिक वाचन कार्यक्रमाचे उदघाटन तहसिलदार अर‍विंद नरसीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह निर्मलकुमार सूर्यवंशी,संभाजी शिंदे,बसवराज कडगे,कुबेर राठोड,विठठल काळे, शिवाजी पवार,‍दिनकर कोलते,श्रीनिवास शेजूळे यांची उपस्थिती होती.
            ‍जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी प्रास्ताविकातून ग्रंथ प्रदर्शन व ई-बुक्स सामूहिक वाचन या विषयी माहिती ‍दिली. तहसिलदार अरविंद नरसीकर यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या विचारसरणी विषयी माहिती देऊन डॉ.कलामांचे चरित्र सदैव सर्वांना प्रेरणादायी राहील असा विश्वास व्यक्त केला. निर्मलकुमार सुर्यवंशी,कुबेर राठोड यांनीही मनेागत व्यक्त केले.
            कार्यक्रमात वसंत बारडकर यांनी 75 ग्रंथ व दिनकर कोलते यांनी 1 ग्रं‍थ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास भेट दिला. विद्यार्थ्यांनी ग्रंथप्रदर्शन व ई-बुक्स साहित्याचे मोठया प्रमाणावर वाचन करुन डॉ.कलामांना आदराजंली वाहिली. विद्यार्थीनींनी वाचन प्रेरणा दिनाची काढलेली सुबक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती कोकुलवार यांनी केले. संजय कर्वे,अजय वटटमवार,कोंडिबा गाडेवाड,मयूर कल्याणकर,ओंकार कुरुडे, सोपान यनगुलवाड, विठठल यनगुलवाड, आर.डी.मुंजाळ, सोनाली देशमुख,सुजाता वाघमारे,सुप्रिया करले यांनी संयोजन केले.

0000000

वृत्त   निवडणूक तयारीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - विभागीय आयुक्त जी. श्रीकांत नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा छत्रपती ...