Tuesday, September 29, 2026

वृत्त क्रमांक 

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - विभागीय आयुक्त जी.श्रीकांत

नोडल अधिकाऱ्यांची बैठक  

छत्रपती संभाजीनगर, दि. २९ सप्टेंबर : ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित पथकांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली नोडल अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी सहआयुक्त प्रताप काळे, मंजुषा मिसकर, रित्रा मेत्रेवार, देविदास टेकाळे, खुशालसिंह परदेशी तसेच विविध कक्षांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

श्रीकांत म्हणाले की, नामनिर्देशन, छाननी, मतदान व मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्याची तयारी वेळेत पूर्ण करावी. नामनिर्देशन अर्जांची काटेकोर तपासणी, मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा, मतदान साहित्य व मतपेट्यांची सुरक्षित वाहतूक तसेच मतमोजणी केंद्रावरील व्यवस्थेकडे विशेष लक्ष द्यावे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेत प्रशिक्षण देऊन त्यांची तयारी पूर्ण करावी.

नामनिर्देशन कक्षात अर्जांचे वाटप व स्वीकार तसेच उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची पुरेशी व्यवस्था ठेवावी. आवश्यक कागदपत्रे, चलन पावती, छायाचित्र व एबी फॉर्मची तपासणी करावी. उमेदवारांना शपथ देण्यासाठी अधिकारी नियुक्त करावेत. ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या छाननीसाठी तपासणी यादी तयार ठेवावी. अर्ज बाद झाल्यास कारणांसह आदेश देण्याची कार्यवाही करावी. नामनिर्देशनाची सूचना व संबंधित माहिती सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी.

मतदान व मतमोजणीसाठी वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे करावी. मतदानानंतर मतपेट्या सुरक्षितपणे मतमोजणी केंद्रावर आणण्याची व्यवस्था करावी. मतमोजणी केंद्रावर ५६ टेबल्सची व्यवस्था करण्यात येत असून, संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे. मतमोजणीच्या तीन दिवस आधी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यावा.

पहिले प्रशिक्षण १० ऑक्टोबर, दुसरे १७ ऑक्टोबर आणि मतदान साहित्य वाटपाच्या दिवशी २२ ऑक्टोबर रोजी अंतिम प्रशिक्षण घेण्याचे नियोजन करावे. केंद्राध्यक्ष, क्षेत्रीय अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक तसेच संबंधित पथकांना प्रशिक्षण द्यावे. मतमोजणीसाठी स्वतंत्र पथक तयार करून त्यांचे प्रशिक्षण १४ ऑक्टोबरच्या आसपास पूर्ण करावे. मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था करावी.

उमेदवारांची संख्या ५६ पेक्षा जास्त झाल्यास मतपत्रिका व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या उपलब्धतेनुसार नियोजन करावे. निवडणुकीसाठी सुमारे ३० हजार मतपत्रिकांची आवश्यकता लागू शकते, त्यानुसार छपाईचे नियोजन करावे. निवडणूक साहित्य व आवश्यक शिक्क्यांचा पुरेसा साठा ठेवावा.

मतदानाची पद्धत तसेच कोणत्या कारणांमुळे मत बाद होऊ शकते, याबाबत मतदारांमध्ये जनजागृती करावी. निवडणूक कामासाठी आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करून कामाचे वाटप करावे. दररोज नामनिर्देशन अर्जांचे वाटप व प्राप्त अर्जांची माहिती माध्यमांना द्यावी. आचारसंहितेच्या काळात सर्व शासकीय कामकाज करताना निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

**



वृत्त क्रमांक 

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्र बाळगण्यास व वाहून नेण्यास प्रतिबंध 

शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी व बँक सुरक्षा रक्षकांना सूट

नांदेड (जिमाका), दि. 29 : 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 ची घोषणा झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदेड जिल्ह्यात परवानाधारक शस्त्र बाळगण्यास व वाहून नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी शस्त्र अधिनियम, 1959 चे कलम 22 व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये आदेश जारी केला आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणुकीचा निकाल घोषित होईपर्यंत शस्त्रासाठी नवीन परवाना देण्यास तसेच परवानाधारकांना परवान्यातील शस्त्रास्त्रे बाळगण्यास व वाहून नेण्यास प्रतिबंध करण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुषंगाने नांदेड जिल्ह्यातही हा प्रतिबंध लागू करण्यात आला आहे.

जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, निवडणुकीच्या कालावधीत शासकीय कर्तव्य पार पाडणारे अधिकारी व कर्मचारी तसेच बँकांचे सुरक्षा रक्षक यांच्याव्यतिरिक्त इतर सर्व परवानाधारकांना त्यांच्या परवान्यातील शस्त्रास्त्रे बाळगण्यास व वाहून नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

**

वृत्त क्रमांक 

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 

शासकीय, निमशासकीय व सार्वजनिक मालमत्तेच्या विद्रुपीकरणास प्रतिबंध

नांदेड (जिमाका), दि. 29 : भारत निवडणूक आयोगाने 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 ची घोषणा 22 सप्टेंबर 2026 रोजी केली असून, त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी नांदेड जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय तसेच सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात विद्रुपीकरण करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये याबाबत आदेश जारी केला आहे. निवडणूक कालावधीत संबंधित मालमत्तेचे विद्रुपीकरण होऊ नये, तसेच निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने हा आदेश लागू करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत सर्व संबंधितांना स्वतंत्र नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे शक्य नसल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याचे जिल्हादंडाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

हा आदेश नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत आदेश निर्गमित झाल्याच्या तारखेपासून 31 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. संबंधितांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे प्रशासनाने कळविले आहे. 

**

वृत्त क्रमांक 

सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे, चिन्हांचे कापडी फलक व भाषणांवर निर्बंध

नांदेड (जिमाका), दि. 29 : 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 ची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अन्वये नांदेड जिल्हा हद्दीत काही निर्बंध लागू केले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2026 रोजी 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 ची घोषणा केली असून, घोषणेच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पक्षांची चित्रे अथवा चिन्हे असलेले कापडी फलक लावणे तसेच सार्वजनिक ठिकाणी भाषणे देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

या आदेशाची अंमलबजावणी निवडणूक कालावधीत नांदेड जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत करण्यात येणार आहे. संबंधितांना स्वतंत्र नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163(2) अन्वये हा एकतर्फी आदेश जारी करण्यात आला आहे.

हा आदेश 23 सप्टेंबर 2026 रोजी निर्गमित करण्यात आला असून, आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 31 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. नागरिक, राजकीय पक्ष, उमेदवार व संबंधितांनी या आदेशाचे पालन करून निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

***

वृत्त क्रमांक 

धार्मिक स्थळे, रुग्णालये व शैक्षणिक संस्थांजवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास प्रतिबंध

नांदेड (जिमाका), दि. 29 : भारत निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2026 रोजी 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 ची घोषणा केली असून, त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नांदेड जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अन्वये आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार, निवडणूक कालावधीत धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सर्व संबंधितांना स्वतंत्र नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 (2) अन्वये एकतर्फी आदेश काढण्यात आला आहे.

हा आदेश नांदेड जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत लागू असून, आदेश निर्गमित झाल्याच्या तारखेपासून 31 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

**

वृत्त क्रमांक 

निवडणूक प्रचाराच्या वाहनांवरील झेंडे व कापडी फलकांसाठी निर्बंध

नांदेड (जिमाका), दि. 29 : भारत निवडणूक आयोगाने 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 ची घोषणा 22 सप्टेंबर 2026 रोजी केली असून, त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी, यासाठी नांदेड जिल्ह्यात निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या फिरत्या वाहनांवरील पक्ष प्रचाराचे झेंडे व कापडी फलक लावण्याबाबत जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये निर्बंध घातले आहेत.

या आदेशानुसार, फिरत्या प्रचार वाहनावर पक्ष प्रचाराचा झेंडा वाहनाच्या डाव्या बाजूस, विंडस्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही, तसेच वाहनाच्या टपापासून दोन फुटांपेक्षा अधिक उंचीवर राहणार नाही.

प्रचाराच्या फिरत्या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे, वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूसच लावता येईल. वाहनाच्या इतर कोणत्याही बाजूस कापडी फलक लावता येणार नाही.

तसेच, फिरत्या वाहनावर पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार किंवा उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांच्या वाहनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही वाहनावर लावता येणार नाही.

सर्व संबंधितांना पूर्वसूचना देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 (2) अन्वये हा एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

हा आदेश नांदेड जिल्ह्यात निर्गमनाच्या तारखेपासून 31 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. 

**

वृत्त क्रमांक 

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांच्या ताफ्यात तीनपेक्षा अधिक वाहनांच्या वापरास प्रतिबंध

नांदेड (जिमाका), दि. 29 : 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 ची घोषणा झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी नांदेड जिल्ह्यात निवडणूक कालावधीत कोणत्याही वाहनांच्या ताफ्यात तीनपेक्षा अधिक मोटारगाड्या अथवा वाहनांचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार, कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटारगाड्या अथवा वाहनांच्या ताफ्यात तीनपेक्षा अधिक वाहने नसावीत, असे निर्देश आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यात निवडणूक कालावधीत तीनपेक्षा अधिक मोटारगाड्या अथवा वाहनांचा ताफा वापरण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये जारी केला आहे.

या आदेशानुसार, निवडणूक कालावधीत कोणत्याही वाहनांच्या ताफ्यात तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या अथवा वाहने वापरता येणार नाहीत. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी हा निर्बंध लागू करण्यात आला आहे.

हा आदेश 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 च्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत लागू राहणार आहे. आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 31 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत त्याची अंमलबजावणी राहणार आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी संबंधितांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

**

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...