Tuesday, May 5, 2026

 वृत्त क्रमांक 

इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचे

आवेदन पत्र भरण्याचे आवाहन

नांदेड दि. 5 मे :- इयत्ता बारावीची परीक्षा फेब्रु-मार्च 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुरवणी परीक्षा जून-जुलै 2026 मध्ये घेण्यात येणार आहे. इयत्ता 12 वी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच (फेब्रु-मार्च 2026 परीक्षेस प्रविष्ठ न झालेले ) जून-जुलै 2026 नावनोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit  घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने इ. 12 वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावेत, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.

शुल्क प्रकार विद्यार्थ्यांनी उच्च माध्य.शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थी , यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ठ न झालेले) श्रेणी सुधार व तुरळक विषय घेवून प्रविष्ठ होणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit  घेणारे विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा, नियमित शुल्क मंगळवार 5 मे ते शुक्रवार 15 मे 2026  पर्यत आहेत. विलंब शुल्क शनिवार 16 मे ते बुधवार 20 मे 2026 असा आहे.

उच्च माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत आरटीजीएस व एनईएफटीद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा, गुरुवार 21 मे 2026, उच्च माध्य.शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी आरटीजीएस व एनईएफटी पावती, चलनासह प्रीलीस्ट विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख सोमवार 25 मे 2026 अशी आहे.

या परीक्षेचे आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांची त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाइन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. श्रेणीनुसार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या फेब्रु-मार्च 2026 परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी जून- जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027 व जून-जुलै 2027 अशा लगतच्या तीन संधी उपलब्ध राहतील यांची नोंद घ्यावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ शाळा महाविद्यालयांनी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट द्वारे प्राप्त ऑनलाइ्रन चलनावर नमूद केलेल्या आयसीआयसीआय बॅकेच्या र्व्हचुअल खात्यामध्ये कोणत्याही बँकेमधून आरटीजीएस व एनईएफटीद्वारे चलनाप्रमाणे अचूक शुल्क रकमेचा भरणा करण्यात यावा. यापूर्वी वापरात असणाऱ्या बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, ॲक्सीस बँक च्या जून्या चलनांचा वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोचा स्वरुपात शुल्क स्विकारले जाणार नाही. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या सर्व आवेदनपत्रांचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे उपलबध करुन दिली जाणार नाहीत. नियमित व विलंब शुल्काने आवेदनपत्रे ऑनलाइ्रन पध्दतीने सादर करावयाच्य तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. अति विलंब शुल्काने आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा यथावकाश कळविण्यात येतील. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

Monday, May 4, 2026

वृत्त क्रमांक 

मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा; आपत्ती टाळण्यासाठी सज्ज राहा — जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि. 4 मे — जिल्ह्यात संभाव्य पावसाळी आपत्ती टाळण्यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत आणि आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, अपर पोलिस अधिक्षक सूरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी उष्णतेमुळे अचानक मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाने सज्ज राहणे गरजेचे आहे.

विष्णुपूरी धरणात सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा असून त्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच धरणाचे गेट, नवीन पाईपलाईन कामे यांची स्थिती तपासण्याचे निर्देश देण्यात आले. मागील वर्षी मुखेड, नायगाव, बिलोली, कंधार यासह विविध तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला होता. यंदा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील नाल्यांची स्वच्छता करून सखल भागात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच पूल आणि रस्त्यांवरून पाणी वाहून जाऊन नागरिक अडकणार नाहीत यासाठी नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आरोग्य विभागाला ग्रामीण भागात औषधसाठा मुबलक ठेवण्याचे, तसेच सर्पदंशावरील औषधे सर्व आरोग्य केंद्रात उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. पशुसंवर्धन विभागाने नदीपात्रात पशुधन बांधू नये यासाठी जनजागृती करावी, असेही सांगण्यात आले.

बैठकीच्या शेवटी, सर्व विभागांनी तालुका पातळीवरील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तात्काळ जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.यावर उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन केले व सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

०००००








 वृत्त क्रमांक 

आपले सरकार पोर्टलसंबंधी प्रशिक्षणाचे आज आयोजन

नांदेड दि. 4 मे :- जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागासाठी आपले सरकार पोर्टलबाबतचे प्रशिक्षण मंगळवार 5 मे 2026 रोजी कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन प्रेक्षागृह जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे, सर्व संबंधितांनी या प्रशिक्षणास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

हे प्रशिक्षण नांदेड, लोहा, कंधार, अर्धापूर, मुदखेड, भोकर, हदगाव, नायगाव तालुक्यासाठी सकाळी 10 वा. तर देगलूर, बिलोली, मुखेड, धर्माबाद, उमरी, हिमायतनगर, किनवट, माहूर तालुक्यासाठी दुपारी 1 वा. हे प्रशिक्षण होणार आहे. 

ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय 28 जानेवारी 2025 नुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसूचित केलेल्या आपले सरकार पोर्टलवरुन नागरिकांना सेवा पुरविण्यासाठी युजर आयडी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

00000

Friday, May 1, 2026

वृत्त क्रमांक 

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय मशीनचे लोकार्पण 

नांदेड दि. 1 मे :- महाराष्ट्र दिनाचे औचित्यसाधून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, पी.पी.पी. पद्धतीने कृष्णा डायग्नोस्टिक्स बाह्यस्त्रोत एजन्सीद्वारे नव्याने बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक एमआरआय  (Magnetic Resonance Imaging) मशीनचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. या सुविधेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना महागड्या खाजगी रुग्णालयात न जाता, शासकीय रुग्णालयात उच्च दर्जाची सेवा मोफत उपलब्ध होणार आहे. 

या सुविधेचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबीटकर यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातील एमआरआय तपासणी सुविधेचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने  करण्यात आले. याप्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके पाटील बोंढारकर, माजी आमदार अमर राजुकर, संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले , अॅड. किशोर देशमुख इत्यादी प्रमुख लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती. 

या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळणे हा मुख्य उद्देश आहे. या नवीन MRI मशीनमुळे रुग्णांना आता मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही. आरोग्य सुविधांचे बळकटीकरण हे शासनाचे प्राधान्य आहे. तसेच आजपासून ही सेवा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. 

सदर एमआरआय हे मशीन उच्च क्षमतेचे असून यामुळे मेंदू, मणका, सांधे आणि शरीरातील इतर अंतर्गत भागांचे अत्यंत अचूक निदान (Imaging) करणे शक्य होईल. खाजगी लॅबमध्ये 5 ते 10 हजार रुपये खर्च येणारी ही तपासणी जिल्हा रुग्णालयात मोफत केली जाणार असून आपत्कालीन रुग्णांसाठी ही सेवा 24 तास उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, डॉ. राजाभाऊ बुट्टे, डॉ. पांडुरंग पावडे, डॉ. हनुमंत जाधव, डॉ. राष्ट्रपाल अवसरे आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000000







 वृत्त क्रमांक

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड दि. 1 मे :- NEET-UG-2026 प्रथम सामाईक प्रवेश परीक्षा रविवार 3 मे 2026 रोजी दुपारी 2 ते 5 या कालावधीत जिल्ह्यातील विविध 46 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या केंद्रापासून शंभर मिटरच्या परिसरात 3 मे रोजी सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यक्तीरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी याबाबतचा आदेश 1 मे रोजी निर्गमीत केला आहे.   

या परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी याव्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटर, ट्रॅन्झीस्टर, रेडिओ, लॅपटॉप आदी तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या 100 मिटर पर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास, परीक्षा केंद्रात नेण्यास त्याचप्रमाणे दर्शविलेल्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स,एस.टी.डी., आय.एस.डी., भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास याद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

वृत्त क्रमांक

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन कामे करा - पालकमंत्री अतुल सावे

खरीप हंगाम नियोजन बैठकीत विविध विषयांचा आढावा 

जलसंपदा, महावितरण यांनी समन्वयाने सुविधा द्याव्यात

खतसाठा, पाणी, वीज पुरवठाबाबत लोकप्रतिनिधी यांच्या सूचना

नांदेड, दिनांक १ मे:  खरीप हंगाम सर्वांनी समन्वय ठेऊन यशस्वी करावा. आगामी हवामान आधारित परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे. शेतकऱ्यांना पाणी, वीज, खतांचा मुबलक साठा उपलब्ध होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. कामात कसूर करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात 'खरीप हंगाम-२०२६' बैठक पार पडली. बैठकीस खासदार अशोक चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी पाटील कल्याणकर, आमदार आनंदराव तिडके (बोंढारकर),आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री सावे म्हणाले, बोगस बियाणे, खतांची साठेबाजी, पीक कर्ज देण्यात अडथळा आदी बाबत प्रशासनाने नियमानुसार कारवाई करावी. याबाबत कृषीशी संबंधित असलेल्या शासकीय, खासगी यंत्रणा यांच्याशी बैठक आयोजित करावी. तसेच महावितरण बाबत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत राज्यस्तरावर बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात यईल, असेही पालकमंत्री म्हणाले.

खतांची साठेबाजी रोखण्यासाठी भरारी पथके नेमून यावर आळा घालण्याच्या सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या. अल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांना सोलार पंप विहित वेळेत उपलब्ध करुन न देणाऱ्या कंपन्यावर कारवाई करण्यात येईल, असेही निर्देश त्यांनी दिली. 

जिल्ह्यात सध्या खताचा मुबलक साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील खताचा साठा इतर राज्यात जावू नये यासाठी भरारी पथके नेमली आहेत. खत उपलब्धतेसाठी क्युआर कोड केले आहेत. क्युआर कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खताची उपलब्धतेची माहिती मिळेल. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा नियमित होण्यासाठी  लवकरच शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. 

जिल्ह्यात अल निनोच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्हा चारा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही बाबीची अडचणी येणार नाहीत याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापक यंत्र लावण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मिर्ची संशोधन केंद्र, सोयाबीन, केळी संशोधन केंद्राचे प्रस्ताव लवकरच शासनास सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नांदेड शहरात कृषी भवनासाठी जागा उपलब्ध करुन याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली 

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या निधनानंतर कृषी विभागाची ही पहिलीच बैठक होत असल्याने, बैठकीच्या सुरुवातीला पालकमंत्री सावे यांच्या उपस्थितीत दिवंगत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जिल्हाधिकारी व कृषी अधिकाऱ्यांचा गौरव

खरीप हंगाम सन २०२५ मधील 'प्रधानमंत्री पीक विमा योजने'अंतर्गत जिल्ह्यात ८१३ कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर झाल्याबद्दल, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांचा पालकमंत्री सावे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. याबाबतचा अभिनंदनाचा ठराव आमदार चिखलीकर यांनी मांडला आणि पालकमंत्री सावे यांनीही प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले. 

खासदार अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी मांडल्या. त्यांच्यासह खासदार रवींद्र चव्हाण, आमदार चिखलीकर, आमदार कल्याणकर, आमदार तिडके, आमदार पवार, आमदार श्रीजया चव्हाण यांनीही विविध सूचना मांडल्या. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी प्रशासनाकडून करण्यात आलेली कार्यवाही आणि आगामी नियोजन याबाबत माहिती सादर केली. प्रास्ताविक कळसाईत यांनी केले. 

बैठकीतील प्रमुख आढावा आणि कामकाज: 

या बैठकीत 'खरीप हंगाम २०२५' मधील कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच मागील बैठकीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. याव्यतिरिक्त खालील महत्त्वपूर्ण कृषी विषयक बाबींचा व योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला:

कृषी सांख्यिकी व पर्जन्यमान: नांदेड जिल्ह्याची कृषी विषयक सर्वसाधारण माहिती, ११ व्या कृषी गणनेनुसार जिल्ह्यातील सीमांत, अत्यल्प, अल्प व इतर खातेदार आणि त्यांची जमीन धारणा, तसेच सन २०२५ मधील महिनानिहाय पर्जन्यमान.

नैसर्गिक आपत्ती व पीक नुकसान: नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले पीक नुकसान आणि २०२६ च्या मोसमी पावसाचे दीर्घावधी पूर्वानुमान.

शेतकरी कल्याण व विमा योजना: खरीप हंगाम सन २०२५ मधील 'प्रधानमंत्री पीक विमा योजने'त सहभागी शेतकरी व त्यांना मिळालेली नुकसान भरपाई, 'पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना' (आंबिया बहार), 'गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान' आणि 'पीएम किसान' योजना.

कर्ज, निविष्ठा व खरेदी नियोजन: यंत्रणानिहाय शेतमाल खरेदी, २०२६-२७ या वर्षासाठी पीकनिहाय प्रति हेक्टरी पीक कर्ज दर आणि पीक कर्ज वितरण.

इतर योजना व वितरण कार्यवाही: सौर-कृषीपंप जोडणी, बियाणे नियोजन, रासायनिक खतांची मागणी, पुरवठा व विक्री आणि वितरण कार्यवाही आदींसह विविध कृषी योजनांचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला.

00000









वृत्त क्रमांक

#जनगणना उपक्रमाच्या सेल्फी पॉईंटचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

जनगणना-२०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ
#नांदेड , दि. 1 मे : देशात सुरू झालेल्या जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत आजपासून जनगणना स्व-गणना प्रक्रिया सुरू झाली आहे. या उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सेल्फी पॉइंट तयार केला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सेल्फी मोहिमेचे उद्घाटन झाले. तसेच त्यांनी स्वतः स्वगणना केली.
या मोहिमेद्वारे नागरिकांनी स्व-गणना करताना सेल्फी काढून सहभाग नोंदवावा आणि इतरांनाही या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
भारत सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यात 1 ते 15 मे 2026 कालावधीत स्व-गणना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याद्वारे सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन पद्धतीने अधिकृत se.census.gov.in या संकेतस्थळावर भरता येणार आहे. तर 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान घरनोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या महत्त्वपूर्ण अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून आपली जबाबदारी पार पाडावी, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...