Monday, April 13, 2026

वृत्त क्रमांक  

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून समाजाने लेखणी हातात घेतली - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले 

•  समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी

•  जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न 

नांदेड दि. 13 एप्रिल :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून समाजातील नागरिकांनी लेखणी हातात घेतली आहे. त्यामुळे शिक्षणातून समाजाची मोठी प्रगती झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांचे विचार समाजात गेले पाहिजे. त्यासाठी आपण निरंतर वाचन केले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या अनुषंगाने समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले, महापौर श्रीमती कविता मुळे, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्यासह जिल्हास्तरीय शांतता समितीचे विविध स्थायी- अस्थायी सदस्य, निमंत्रीत सदस्य, विविध धर्मगुरू, नागरिक, पत्रकार आदींची उपस्थिती होती. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाने विविध चांगली व्यवस्था केली आहे. नांदेड जिल्हा हा चळवळीचा जिल्हा असून विविध सामाजिक कार्यक्रमात, प्रशासनात समाजाचा एकत्रीत सहभाग मोठा असतो. मोठ्या आवाजातील डिजे ऐवजी लेझीम सारखे उपक्रम हाती घेऊन तणाव कमी करुन आनंदात आपण जयंती उत्सव साजरे करू या, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.    

जिल्ह्यात सीसीटीव्ही प्रणाली आवश्यक असून यासाठी प्रयत्न चालू आहेत. शांतता समितीच्या बैठकीत महिलांचा अधिक सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. नांदेड जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेबाबत बैठक काही दिवसात घेतली जाईल. यात विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाचा सहभाग असेल. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यात सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शुभेच्छा दिल्या.  

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर समाजाने चालावे. यासाठी समता, बंधुत्व, एकोप्यातून जयंती आपण साजरी करू या. जयंती काळात युवकांवर योग्य जबाबदारी दिली पाहिजे. उन्हापासून नागरिकांची काळजी घेतली पाहिजे. यासाठी मनपाचे सर्व सहकार्य राहील, असे महापौर कविता मुळे यांनी सांगितले.  

सर्वांच्या चांगल्या चर्चेतून योग्य नियोजन पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. मिरवणूक मार्गात, परिसरात संपूर्ण व्यवस्था चांगली राहील. मार्गात कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता पोलीस विभागाकडून घेतली जाते. यासाठी पोलीस प्रशासन तत्‍पर असल्याचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्याची चांगली प्रतिमा कायम आहे. यासाठी आपल्या सर्वांचे योगदान मोलाचे आहे. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण उत्साहात साजरी करू या. यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ 112 या टोलफ्री नंबरवर संपर्क साधावा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त युवक-विद्यार्थ्यांसाठी 18 तास अभ्यासाचा उपक्रम पोलीस प्रशासनाच्यावतीने साजरा केला जाणार आहे. यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या विविध सूचनेसह नागरिकांना जयंती काळात कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता मनपाकडून घेतली जाईल, असे मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितले. यावेळी बैठकीत विविध सदस्यांनी उपयुक्त सूचना दिल्या. मिरवणुकीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनेक नागरिक बाहेर पडतात. त्यांची सुरक्षा, आरोग्य, पाणी व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरा, स्वच्छता आदी विषयांबाबत सदस्यांनी मनोगत व्यक्त केले. विविध विभागांने करावयाच्या व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली.

निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रास्ताविकात बैठकी विषयी माहिती दिली तर सदस्य सचिव तथा अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी नांदेड जिल्ह्यात शांतता कायम राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने शांतता समितीची बैठक शांततेत पार पडली असून उपस्थित सर्व सदस्यांचे शेवटी त्यांनी आभार मानले. 

00000









 वृत्त क्रमांक  

भोकर येथे बुधवारी पंडीत दीनदयाळ रोजगार मेळाव्याचे आयोजन 

नांदेड दि. 13 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व दिगांबरराव बिंदु महाविद्यालय, भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वा.  दिगांबरराव बिंदु महाविद्यालय, भोकर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा/प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक, शाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10  वा. दिगांबरराव बिंदु महाविद्यालय, भोकर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त     डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar०१@gmail.com वर किंवा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

00000

 प्रासंगिक लेख / आंबेडकर जयंती / 14 एप्रिल 2026 

बाबासाहेबांचे संविधान म्हणजे...एकसंघ भारताची पोलादी चौकट

14 एप्रिल हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील प्रेरणादायी पर्व आहे. या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्र शासन तसेच देशातील विविध संस्थांकडून त्यांच्या कार्याचा गौरव करणारे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. 'विश्वरत्न', 'भारतरत्न', 'घटनाकार” आणि 'भारत भाग्यविधाता' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ राष्ट्र म्हणून बांधून ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य केले.त्यामुळेच त्यांच्या जयंती दिनी संपूर्ण देशात त्यांना आदरांजली व्यक्त केली जाते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतची जनता आजच्या दिवशी महामानवापुढे नतमस्तक होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान व त्यावर आधारित लोकशाही जोपर्यंत भारतात आहे, एकसंघ भारतासाठी कायद्याची पोलादी चौकट कायम आहे.त्यांना आदरांजली व्यक्त करताना संविधानाच्या स्वरुपात बाबासाहेबांनी दिलेल्या समानतेच्या,न्यायाच्या आणि बंधुतेच्या धाग्यात सर्व भारतीयांना गुंफण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे.

राष्ट्र प्रथम – बाबासाहेबांचा दृष्टिकोन 

बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका स्पष्ट होती. संविधान सभेत बोलताना ते म्हणाले होते,  “राष्ट्र प्रथम, समाज नंतर आणि व्यक्ती त्यानंतर.” स्वतः आयुष्यभर सामाजिक अन्याय सहन करूनही त्यांनी कधीही कोणाबद्दल सूडाची भावना बाळगली नाही. उलट, त्यांनी अशी राज्यघटना निर्माण केली ज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला समान न्याय मिळेल. 

आचार्य प्र. के. अत्रे यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर लिहिलेल्या आपल्या आदरांजलीत आंबेडकरांना “जुलूमाविरुद्ध उगारलेली वज्राची मुठ” असे संबोधले आहे. ही उपमा त्यांच्या संघर्षशील वृत्तीचे आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्याचे अचूक चित्रण करते.

भारताच्या अखंडतेची शाश्वती 

स्वातंत्र्यानंतर भारत एकसंघ राहील का याबाबत अनेक पाश्चिमात्य नेत्यांना शंका होती. विविध धर्म, भाषा, जाती यामुळे भारताचे विभाजन होईल, असे भाकीत केले जात होते. विस्टन चर्चिल  यांसारख्या नेत्यांनी भारताच्या एकात्मतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.जगातील अनेक नेत्यांनी हा खंडप्राय देश एकत्र राहणार नाही,असे भाकीत केले होते.पाकिस्तानच्या फाळणीनंतर पश्चिम आशिया खंडात धर्माच्या नावावर झालेली अमानुष मानवी कत्तल जगाच्या पुढे होती. भारतातील विविधता, विविध धर्मांचे लोक,धर्मावरून झालेली विभागणी हे मोठे उदाहरण पुढे होते. त्यामुळे भारताचे भविष्य अंधकारमय वाटणे तत्कालीन परिस्थितीला धरून होते.मात्र बाबासाहेबांनी अभ्यासाअंती यावर रामबाण उपाय शोधून काढला. ते म्हणजे संविधान, आपली राज्यघटना.  संविधान सभेपुढील भाषणात ते म्हणाले होते,स्वातंत्र्य आणि समानता ही मूल्ये बंधूतेशिवाय टिकू शकत नाही.राजकीय लोकशाही यशस्वी तेव्हाच होईल जेव्हा सामाजिक लोकशाही अस्तित्वात असेल.त्यामुळे आजचा दिवस सामाजिक लोकशाही बळकट करण्याचा देखील आहे.भारतीय संविधान सामाजिक आर्थिक, राजकीय,समानता देण्याच्या दृष्टीने अतिशय श्रेष्ठ दर्जाचे दस्तावैज आहे.

संविधानातील कलम;एकात्मतेचा कणा 

आपण बघतो, भाषा, प्रांत,जाती,अस्मिता यावरून देशात आजही अनेक आंदोलने सुरू असतात, विविध संघटना आणि राजकीय पक्ष आपापल्या भूमिका मांडत असतात.संविधानाचे वैशिष्ट्य म्हणजे संविधान भाषा,प्रांत,जाती,अस्मिता यांचे अस्तित्व मान्य करते.मात्र सोबतच राष्ट्रापुढे सर्व बाबी गौण ठरवते.विधिमंडळ,कार्यपालिका, न्यायपालिका,माध्यमे अशा सर्व स्तंभांना त्यांनी परस्पर पूरक उभे केले आहे.त्यामुळे भारतीय राज्यघटनेला पुढे ठेवूनच सर्व घटकांना आपली वाटचाल करावी लागते.“भारतीय संसद, न्यायपालिका आणि कार्यपालिका या एकमेकांवर नियंत्रण व संतुलन (checks and balances) ठेवतात. कार्यपालिका राज्यघटनेनुसार प्रशासन करते, आणि या सर्वांवर माध्यमे व जनतेचे लक्ष राहते. जबाबदारीची,कार्यवाहनाची,जाणिवांची आणि दायित्वाची अशी मजबूत पोलादी साखळी घटनेच्या माध्यमातून निर्माण झाली आहे.त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार. या मूलभूत अधिकारांनी स्पष्ट बजावले आहे की या मूलभूत अधिकारांनी स्पष्ट केले, ‘हा देश हा अस्मितेवर नव्हे,भावनेवर नव्हे तर सर्वसंमतीवर चालेल.’

शोषित,वंचित,गरीब मागास सर्व घटकांना समतोल विकासाची संधी मिळणे व त्यांच्या न्याय्य  हक्काचे रक्षण होणे किती आवश्यक आहे हे बाबासाहेबांना माहिती होते. त्यामुळेच त्यांनी घटनेमध्ये मूलभूत अधिकार सुस्पष्टपणे अंतर्भूत केले.या अधिकारामुळे कायद्यापुढे सर्व समान आणि सर्वांना कायद्याचे संरक्षण मिळाले आहे. 

 समानतेचा अधिकार (कलम 14 ते 18) 

बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत अधिकारांमध्ये 14 ते 18 या कलमांमध्ये सर्व नागरिक कायद्यापुढे समान असतील,

जात, धर्म, वंश,लिंग किंवा जन्मस्थानावरून भेदभावास मनाई,अस्पृश्यता अमान्य,आणि नियुक्तीची समान संधी,तसेच देशाप्रतीची  बांधीलकी या बाबी नमूद केल्या. एका सामान्य स्त्री-पुरुषाला देशाचा प्रधानमंत्री, राष्ट्रपती बनण्याचा अधिकार देतानाच  भेदभावाला त्यांनी या समानतेच्या अधिकाराने कायदेशीर बंधन घातले आहे.

स्वातंत्र्याचा अधिकार (कलम 19 ते 22) 

ज्यांना हजारो वर्ष शिक्षण, वाणी, अधिकार आणि सहभागांपासून जाती धर्माच्या आधारावर संधी नाकारली गेली. त्या सर्वांना स्वतंत्र भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याचे कार्य बाबासाहेबांमुळे झाले. राज्यघटनेतील कलम 19 प्रत्येक भारतीयाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देते.भारताचा नागरिक कोणत्याही राज्यामध्ये मुक्त संचार करू शकतो. भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार त्याला मिळालेला आहे.जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण,शिक्षणाचा हक्क,न्यायालयात दाद मागण्याचा हक्क,विनाकारण स्थानबद्ध न करण्याचा हक्क अशा अनेक मूलभूत हक्कांची तरतूद करण्यात आली आहे.

शोषणाविरुद्ध संरक्षण (कलम 23-24) 

हजारो वर्षाची वेठबिगारी, सालदारी, बिनपगारी शोषणाला बळी पडलेल्या शोषितांना थेट घटनेच्या माध्यमातूनच बाबासाहेबांनी न्याय दिला. भारतीय राज्यघटनेच्या कलम 23 आणि 24 मध्ये शोषणाविरुद्ध संरक्षण दिले आहे.या कायद्यामुळे स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात माणसांना गुलाम ठेवणे, वेठबिगारी सारखे काम करुन घेणे, बिनपगारी सालदारी करणे, सक्तीने सेवा करायला सांगणे, धर्म, वंश, जात यावरुन काम करुन घेणे, बळजबरीची मजुरी करुन घेणे, 14 वर्षाखालील कोणत्याही बालकाकडून काम करुन घेणे, अर्थात बालमजुरीवर बंदी घालण्यात आली.ही फार मोठी क्रांती होती आणि याचा कायदा बनल्यामुळे हजारो सालाच्या गुलामगिरीतून मागासवर्गीयांची, शोषितांची मुक्तता झाली.

धर्मस्वातंत्र्य (कलम 25 ते 28) 

धार्मिक चालीरीती व रुढीपरंपरांच्या नावावर शतकानुशतके चाललेल्या शोषणाला घटना लागू झाल्यानंतर कायद्याच्या चौकटीने कायमचा पायबंद बसला. सोबतच सर्वांना आपापला धर्म पाळण्याची मुभा देण्यात आली. मात्र सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्याला घातक नसेल अशा वर्तनाची हमी कायद्याने घेण्यात आली. प्रत्येक धर्माला धार्मिक विधी, धार्मिक व्यवहाराची व्यवस्था, सांस्कृतिक शैक्षणिक हक्क प्रदान करण्यात आले.धार्मिक शिक्षण, धार्मिक उपासनेचे स्वातंत्र्य मिळाले. भारतातील विविध जातीधर्मांच्या लोकांना राज्यघटनेने हे स्वातंत्र्य सार्वजनिक सुव्यवस्थेच्या अधीन राहून पाळण्याचे अधिकार या कलमाने दिले. भारतीय समाजावर असणारा धर्माचा,धार्मिक चालीरीतींचा पगडा, याचा अभ्यास करून बाबासाहेबांनी मूलभूत हक्कांमध्ये हे स्वातंत्र्य बहाल केले आहे. यासोबतच त्यांनी कलम 29,30 अन्वये अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार  आपली भाषा व संस्कृती जपण्याचा अधिकार दिला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातला कोणताही नागरिक त्याच्यावरील अन्यायासाठी कलम 32 अन्वये हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.

सर्वांसाठी न्याय – व्यापक दृष्टी 

बाबासाहेब स्वतः वंचित समाजातून आले होते, पण त्यांनी फक्त मागासवर्गीयांसाठी नव्हे तर सर्व समाजासाठी न्याय  व्यवस्था उभी केली.

अनुसूचित जाती-जमातींसाठी आरक्षण, समान संधी,सामाजिक न्यायासाठी कायदेशीर संरक्षण त्यांनी दिले. सोबतच कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली.

संविधान सभेला दिलेले तीन इशारे 

संविधान सभेच्या निर्मितीत अनेक महान नेत्यांचे, मान्यवरांचा हातभार होता. मात्र तरीही बाबासाहेबांनाच घटनेचे शिल्पकार संबोधले जाते. कारण, त्यांनी घटनेच्या अंमलबजावणीची दिशा आणि सूत्रे स्पष्टपणे अधोरेखित केली.त्यांची संविधान सभेतील भाषणेही तेवढी बोलकी आहेत. भारतीय संविधान सामाजिक, आर्थिक, राजकीय, समानता देण्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम अशी घटना आहे मात्र या घटनेचा वापर कोण करणार ? कसा करणार ? आणि किती प्रामाणिकपणे करणार ?  यावरच घटनेच्या अंमलबजावणीचे फलित अवलंबून असेल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी घटना निर्माण करणाऱ्या संविधान सभेपुढे बोलताना तीन महत्त्वाचे इशारे दिले होते...

ते म्हणाले होते,देशातील सामाजिक असमानता दूर होणे आवश्यक आहे.आम्ही सर्वप्रथम भारतीय होणे आवश्यक आहे.त्यांनी परस्पर बंधुतेवर भर दिला.बंधुता म्हणजे राष्ट्रातील सर्व लोकांमध्ये बंधूभाव आणि एकतेची भावना निर्माण करणे होय.

त्यांनी दुसरा इशारा दिला होता आर्थिक विषमतेचा. देशातील सर्व नागरिकांचा समतोल आर्थिक विकास होणे आवश्यक आहे, कारण आर्थिक विषमता श्रीमंत-गरीब दरी वाढवते. ही दरी वाढली तर असंतोष वाढेल.  

त्यांचा तिसरा इशारा होता.सांप्रदायिकता वाढायला नको. सांप्रदायिकता म्हणजे विशिष्ट धर्माला अधिक महत्त्व देणे. भारत हा विविध धर्मांचा देश आहे.कोणत्याही धर्माचा द्वेष, वाढायला नको. धर्माधारित द्वेष राष्ट्राच्या एकात्मतेला तडा देईल. हे इशारे आजही तितकेच महत्त्वाचे आहेत.

घटना निर्मिती – राष्ट्रनिर्मितीचा पाया 

भारतीय राज्यघटना ही केवळ कायद्यांचा संच नाही, तर त्‍यात राष्ट्रनिर्मितीचा स्वयंस्पष्ट आराखडा आहे. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून संघराज्य व्यवस्था मजबूत केली केंद्र आणि राज्य यांच्यात संतुलन ठेवले.  न्यायव्यवस्थेला स्वातंत्र्य दिले.यामुळे भारत एक अखंड आणि सक्षम राष्ट्र बनला.  

संविधान टिकले तर लोकशाही टिकेल 

महामानवाला अभिवादन करताना प्रत्येक भारतीयाने ही शपथ घेणे गरजेचे आहे की, संविधान टिकले तर लोकशाही टिकेल. आणि राजकीय लोकशाही तेव्हाच टिकेल जेव्हा सामाजिक लोकशाही अस्तित्वात असेल. आपण संविधानाच्या अमृत महोत्सवी काळात आहोत.

या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयाने संविधान समजून घेणे आवश्यक आहे.संविधानाचे पालन करणे आवश्यक आहे.आपल्या अधिकारांसोबत  भारताचा नागरिक म्हणून आपली कर्तव्येही ओळखणे आवश्यक आहे. 

बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून एकसंघ, न्याय्य आणि प्रगत भारत उभा केला. जगाला वाटत होते की भारत टिकणार नाही, पण आज भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे,जगातील महाशक्ती म्हणून उदयास येत आहे. हे त्यांच्या दूरदृष्टीचे फलित आहे.

14 एप्रिलच्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्यापुढे नतमस्तक होताना... चला भारतीय म्हणून आपण एकच संकल्प करुया...संविधानाचा सन्मान करुया, समानतेचे,बंधुत्वाचे मूल्य जपूया सर्वप्रथम एक भारतीय बनूया आणि एकसंघ भारत अधिक मजबूत करुया... हीच महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल.

प्रवीण टाके

उपसंचालक (माहिती)

 विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर 

9702858777.

0000000





 वृत्त क्रमांक  

नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंश : महाराष्ट्राचा अभिमान

डॉ. पंडित नांदेडकर यांना राष्ट्रीय स्तरावर तृतीय पारितोषिक

नांदेड, दि. 13 एप्रिल : नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंशाच्या संवर्धन व संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत असून, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तज्ज्ञांचा गौरव करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा नुकताच NBAGR मार्फत आयोजित SOCDAB-2026 परिषदेत स्मृतिचिन्ह देऊन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालय, परभणी येथील पशु अनुवंश व पैदास विभागाचे प्राध्यापक डॉ. पंडित नांदेडकर यांना दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी करनाल येथील ICAR-राष्ट्रीय प्राणी आनुवंशिक संसाधन ब्युरो येथे आयोजित राष्ट्रीय परिषद व पाळीव पशु संवर्धन सोसायटीच्या XXIII व्या वार्षिक अधिवेशनात ‘मथुरा लभान गोवंश - महाराष्ट्राचा अभिमान’ या विषयावरील मौखिक सादरीकरणासाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या यशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी डॉ. पंडित नांदेडकर यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, डॉ. प्रवीणकुमार घुले, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. मकरंद खरवडकर, डॉ. श्याम पवळे तसेच मथुरा-लभान पशुपालक उपस्थित होते.

यावेळी डॉ. सखाराम खुणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ‘मथुरा-लभान’ गोवंशास राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाची माहिती सादर केली. तसेच किनवट तालुक्यात सुरू असलेल्या कार्याचा आढावाही मांडण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मथुरा-लभान पशुपालक बालसिंग नानगू खचकड, रा. नागसवाडी, ता. किनवट यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या पशुसंवर्धन कार्याचे कौतुक केले तसेच मथुरा-लभान गोवंशाच्या संशोधन व संवर्धनासाठी शुभेच्छा दिल्या.

०००००




विशेष वृत्त

संकटात महिलांना सावरणारं ‘सखी वन स्टॉप सेंटर’ पीडित व गरजू महिलांना देत आहे आधार; तात्पुरत्या निवाऱ्याचीही सुविधा

नांदेड, दि. 13 एप्रिल : केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय तसेच महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नांदेड अंतर्गत चालविण्यात येणारे सखी वन स्टॉप सेंटर हे संकटग्रस्त महिलांसाठी एक सुरक्षित व आधारदायी केंद्र ठरत आहे.

महिलांवरील कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये पीडित महिलांना एकाच छताखाली सर्व प्रकारची मदत मिळावी, या उद्देशाने केंद्र शासनाने या केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्रामार्फत महिलांना कायदेविषयक मदत, वैद्यकीय सेवा, मानसिक, सामाजिक व कौटुंबिक समुपदेशन तसेच तात्पुरता निवारा अशा सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले हे केंद्र महिला व बालविकास भवन, महात्मा फुले मार्केट शेजारी, गणेश नगर रोड, नांदेड येथे २४ तास सुरू असून, अनेक पीडित व गरजू महिलांना याचा लाभ मिळत आहे. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना संकटातून सावरण्यासाठी आणि आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी प्रभावी मदत मिळत आहे.

सखी वन स्टॉप सेंटर मध्ये शारीरिक, मानसिक, लैंगिक किंवा आर्थिक अत्याचार ग्रस्त महिलांना मदत मिळू शकते. याशिवाय कौटुंबिक हिंसाचार, मानवी तस्करी, बलात्कार, लैंगिक शोषण यांसारख्या गंभीर घटनांतील पीडित महिलांना तातडीने आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे महिलांना निर्भयपणे परिस्थितीचा सामना करण्यास मदत होते.

तसेच, १८१ महिला हेल्पलाईन ही सेवा देखील या केंद्रामार्फत २४ तास कार्यरत आहे. कोणत्याही संकटात असलेल्या महिलांनी किंवा अशा प्रकारची घटना आढळल्यास नागरिकांनी त्वरित १८१ या क्रमांकावर संपर्क साधून मदत मागावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

00000



Sunday, April 12, 2026

 वृत्त क्रमांक  

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 22 एप्रिलपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 13 एप्रिल : जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल 2026 असून, अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवती व संस्थांनी या पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांच्याशी संपर्क साधावा असेही कळविले आहे.

राष्ट्र व राज्याच्या उभारणीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून राज्यातील युवक व विविध संस्था सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. युवांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे व त्यांचा गौरव करणे आवश्यक आहे. राज्याच्या युवा धोरणांतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 12 नोव्हेंबर 2013 च्या शासन निर्णयानुसार राज्य युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

सन 2025-26 या वर्षासाठी जिल्हा युवा पुरस्कारांतर्गत जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 1 युवक, 1 युवती आणि 1 नोंदणीकृत संस्था यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्जदारांनी सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक कार्य, स्वच्छता, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, तसेच राज्य व देशाच्या साधनसंपत्तीचे जतन आणि दुर्बल घटकांसाठी स्वयंप्रेरणेने केलेले कार्य यामध्ये योगदान दिलेले असणे अपेक्षित आहे. अर्जासोबत संबंधित कार्याचे पेपर कात्रणे, छायाचित्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच मागील तीन वर्षांच्या कार्याचा आढावा, पुढील दोन वर्षे सातत्याने सामाजिक कार्य करण्याचे हमीपत्र व चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे :

युवक व युवती यांना प्रत्येकी रु. 10 हजार रुपये रोख, संस्थेस 50 हजार रुपये, याशिवाय गौरवपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

00000

वृत्त क्रमांक  

सामाजिक समता सप्ताहांतर्गत संविधान जागर व महिला मेळावा संपन्न

नांदेड, दि. 12 एप्रिल :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह-2026 अंतर्गत आज 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता समाज कल्याण कार्यालय येथील सांस्कृतिक सभागृहात “संविधान जागर व महिला मेळावा” उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त शिवानंद मीनगिरे हे होते. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून महिला व मुलांकरिता सहाय्यक कक्ष, पोलीस मुख्यालय, नांदेड येथील समुपदेशक मोनिका वामन बिरादार उपस्थित होत्या. तसेच समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे व वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक लक्ष्मी गायके यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यानंतर मान्यवरांचा भारतीय संविधान उद्देशिकेची प्रत व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या मेळाव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच संविधान जागर अंतर्गत भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया, समित्या, अनुच्छेद, मूलभूत अधिकार व कर्तव्ये याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले.

प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांनी केले. त्यांनी महिलांना दैनंदिन जीवनातील समस्या, बालविवाह प्रतिबंधक कायदा, हुंडाबळी प्रतिबंधक कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 याबाबत माहिती दिली.

समुपदेशक मोनिका बिरादार यांनी महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन करताना महिलांनी आपल्या हक्कांविषयी सजग राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप शिवानंद मीनगिरे यांनी केला. सूत्रसंचालन गजानन पापटवार यांनी तर आभार प्रदर्शन लक्ष्मी गायके यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

हा कार्यक्रम सहायक आयुक्त शिवानंद मीनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

0000





केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...