Monday, August 18, 2025

दि. 17 ऑगस्ट 2025

 वृत्त क्रमांक 865

जिल्हाधिकाऱ्यांनी विष्णुपूरी प्रकल्पाला भेट देवून केली पाहणी 

• नदी काठच्या ग्रामस्थांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन

• पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा कार्यरत

 नांदेड दि. 17 ऑगस्ट:- जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सतत पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने आज सकाळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नांदेड येथील डॉ. शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाला भेट देवून प्रकल्पाची पाहणी केली.

प्रकल्पातील एकूण 18 दरवाजापैकी सध्या 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामधून सुमारे 48 हजार 478 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी अधिक करण्यात होईल. प्रकल्पातील पाण्याची सध्याची पातळी 353.25 मीटर आहे. या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी (SCADA) एससीएडीए रूममध्ये गोदावरी नदीवरील सर्व बंधाऱ्यांच्या पाणी पातळी संबंधांत तसेच उपसा सिंचन योजने संदर्भात सविस्तर माहिती घेतली.

पूरस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व यंत्रणा कार्यरत असून आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले. तसेच गोदावरी नदीकाठी असलेल्या गावातील ग्रामस्थांनी विशेष काळजी घ्यावी. सतर्क राहावे जेणेकरून जीवित हानी होणार नाही. आपले जनावरे मोकळे सोडू नये जेणेकरून पुराच्या पाण्यात वाहून जाणार नाहीत, इत्यादी खबरदारी सर्वांनी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विष्णुपुरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सावंत, डॉक्टर उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, सहाय्यक अभियंता व इतर महसूल अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.

00000




दि. 17 ऑगस्ट 2025

 


दि. 16 ऑगस्ट 2025










 

दि. 16 ऑगस्ट 2025

 ⭕ ALERT⭕

🛑 विसर्ग वाढ🛑

उर्ध्व पेनगंगा प्रकल्प प्रकल्प

ईसापुर धरण

धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने

आज दि. 16/08/2025 रोजी 22.00 वाजता आणखी 2 गेट  50 सेंटीमीटर ने ऊघडण्यात आले आहेत. 

सद्यस्थितीत

इसापूर धरणाच्या सांडव्याची  एकूण 13 वक्रद्वारे   50 सेंटिमीटर ने चालू असून  पेनगंगा नदीपात्रात 22062 क्युसेक्स (624.709 क्युमेक्स) इतका विसर्ग  सूरू आहे.

धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.

तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी.

ईसापुर धरण पुरनियंत्रण कक्ष

दि. 16 ऑगस्ट 2025

 विशेष लेख 

न्यायाच्या कोल्हापूर पर्वाला 17 ऑगस्टपासून सुरुवात 

कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात 17 ऑगस्ट 2025 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन होत असून, सहा जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवी सोय उपलब्ध होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश व महाराष्ट्राचे सुपुत्र माननीय श्री. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या शुभहस्ते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या बेंचचा शुभारंभ होणार असून, हा सोहळा न्यायदानाच्या विकेंद्रीकरणातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.

यानिमित्ताने कोल्हापूर नगरी या ऐतिहासिक घटनाक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली असून 17ऑगस्टला होणाऱ्या या सोहळ्याची सर्व स्तरातील जनतेला प्रतीक्षा आहे.

 50 वर्षांच्या लढ्याचे यश 

कोल्हापूरसाठी सर्किट बेंचची मागणी मागील पाच दशकांपासून सुरू होती. विविध वकील संघटनांनी, सामाजिक संघटनांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, माध्यमांनी आणि स्थानिक नेत्यांनी या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न केले. 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही ही मागणी कायम ठेवली. त्यांच्या कार्यकाळात ही मागणी पूर्ण होत असल्याने विशेष आनंद त्यांनी व्यक्त केला आहे. ते उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या विद्यमान नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा खंडपीठासोबत आता कोल्हापूरचे सर्किट बेंच न्यायव्यवस्थेत नवे स्थान घेणार आहे.

 उद्घाटन सोहळा, मान्यवरांची उपस्थिती 

17 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता सी.पी.आर.हॉस्पिटल समोरील जुन्या न्यायालय इमारतीमध्ये या सर्किट बेंचचे उद्घाटन होणार आहे.

हा सोहळा भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या शुभहस्ते होईल.

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे, सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर,तसेच न्यायमूर्ती मकरंद कर्णिक हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 सहा जिल्ह्यांचा लाभ 

या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार आहे. याआधी या जिल्ह्यांतील नागरिकांना आपली प्रकरणे मुंबईत नेऊन लढावी लागत होती, ज्यासाठी वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा खर्च होत असे.आता मात्र ही प्रकरणे कोल्हापुरातच चालवली जाणार असल्याने सर्वांसाठी मोठी सोय होणार आहे.

सोलापूर वगळता इतर जिल्ह्यांना तीन-चार तासांत कोल्हापूर गाठता येते, तर सोलापूरलाही साधारण पाच तासांचा प्रवास करून कोल्हापुरात पोहोचता येईल.

सर्किट बेंच आणि खंडपीठ – काय फरक? 

सर्किट बेंच म्हणजे न्यायालयाचे एक तात्पुरते ठिकाण,जेथे उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ठरावीक कालावधीत येऊन प्रकरणे चालवतात. याची स्थापना करण्याचा अधिकार राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना असतो आणि त्याचे नोटिफिकेशन राज्यपाल प्रसिद्ध करतात.

खंडपीठ मात्र कायमस्वरूपी स्वरूपाचे असते. यासाठी घटनात्मक प्रक्रिया आवश्यक असून, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रस्ताव तयार करून सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवतात. त्यास मंजुरी मिळाल्यावर राष्ट्रपती नोटिफिकेशन काढतात.

दोन्ही ठिकाणी न्यायदानाची पद्धत आणि प्रक्रिया सारखीच असते.मात्र सर्किट बेंचमध्ये न्यायमूर्तींची नियुक्ती तात्पुरती असते,तर खंडपीठात ती कायमस्वरूपी असते.कोल्हापूरचे सध्याचे सर्किट बेंचही भविष्यात खंडपीठात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.

 न्यायदानाची कार्यपद्धती 

या सर्किट बेंचमध्ये नागरी, फौजदारी, कामगार, मालमत्ता, सार्वजनिक हक्क अशा विविध प्रकारचे खटले चालणार आहेत. मात्र कंपनी ॲक्ट, करसंबंधी प्रकरणे आणि एनआयए न्यायालयाशी संबंधित खटले मुंबईतील मुख्य न्यायालयातच चालतील.मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील न्यायमूर्ती तात्पुरत्या स्वरूपात कोल्हापूर येथे नियुक्त होऊन प्रकरणे चालवतील.

 कोल्हापूर – न्यायदानासाठी आदर्श केंद्र 

कोल्हापूर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे केंद्र असून, येथे उत्तम लॉजिस्टिक सुविधा, हॉटेल्स, धर्मशाळा, शासकीय विश्रामगृहे यांचा उत्तम ताळमेळ आहे. त्यामुळे वकिलांना, पक्षकारांना आणि साक्षीदारांना मुक्काम व प्रवास सोयीस्कर होणार आहे. शिवाय कोल्हापूर हे सहा जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने हे स्थान न्यायदानासाठी आदर्श आहे.

 शेंडा पार्क येथे 25 एकर जमीन राखीव 

कोल्हापूर खंडपीठासाठी शेंडा पार्क येथे स्वतंत्रपणे 25 एकर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे. याशिवाय खंडपीठ इमारत बांधकाम व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूदही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच केली आहे.यामुळे आता या कामालाही गती येणार आहे. एक अद्यावत इमारत या ठिकाणी उभी येत्या काळात राहणार आहे.

 कोल्हापुराततील न्यायदानाची परंपरा 

न्याय,नीती, समता, न्यायदान यासाठी कोल्हापूर शहराचे दायित्व मोठे असून या शहराने 1867 पासून न्यायव्यवस्थेला आपलेसे केले आहे.या शहरात पूर्वी 'राजा ऑफ कोल्हापूर ' या सहीने न्यायदान होत होते.महादेव गोविंद रानडे हे कोल्हापूरला पहिले न्यायाधीश होते.ब्रिटिश राजवटीतील काही ऐतिहासिक नोंदीनुसार 1893 मध्ये 'कोल्हापूर स्टेट रूल्स ' म्हणून स्वतंत्र कायद्याचे पुस्तक होते.राजाराम महाराजांच्या काळात 1931 मध्ये कोल्हापुरात स्वतंत्र हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट स्थापन झाले होते.

 शाहू महाराजांच्या आदर्शाला सलाम 

भारतामध्ये न्यायदान भेदाशिवाय, निकोप, समानतेच्या तत्त्वावर असावे हा संदेश राजर्षी शाहू महाराजांनी दिला होता. कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा शुभारंभ हा त्यांच्या विचारांना खरी आदरांजली आहे.

हे बेंच सुरू झाल्यामुळे न्यायाच्या दारी सर्वसामान्य माणसाला सहज पोहोचता येईल, न्यायासाठी होणारा खर्च आणि वेळ कमी होईल, आणि न्यायदानाची गती वाढेल.

17 ऑगस्टपासून सुरू होणारे हे सर्किट बेंच केवळ न्यायदानाची नवी सुविधा नाही, तर "न्याय विकेंद्रीकरणाचा आणि न्याय सुलभतेचा" एक भक्कम पाया आहे. पन्नास वर्षांच्या अथक प्रयत्नांना मिळालेलं हे यश, कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी न्यायदानाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे.

प्रवीण टाके

उपसंचालक, कोल्हापूर विभागीय कार्यालय

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,मुंबई

9702858777






दि. 16 ऑगस्ट 2025

 वृत्त क्रमांक 864

नांदेडमध्ये आज ‘इंद्रधनू २०२५’ तृतीयपंथी सांस्कृतिक महोत्सव

नांदेड १६ ऑगस्ट : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व सप्तरंग सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इंद्रधनू २०२५’ हा तृतीयपंथी विशेष सांस्कृतिक महोत्सव रविवार १७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता कुसुम सभागृह, नांदेड येथे पार पडणार आहे.

तृतीयपंथी समाजातील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून महोत्सवाचे उद्घाटन  विविध शासकीय व प्रशासकीय मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांत पुण्याचे जगदीश भोसलेंचे वर्ध्याचे समीर मेश्रार यांचे कथ्थक नृत्य, अमरावतीच्या शुभम सोनुनेचे घडा लोकनृत्य, मुंबईच्या विद्यासागर व अक्षया पुणेकर यांचे रंगतदार लावणी सादरीकरण, नागपूरच्या मिशन विश्व ममत फाउंडेशनकडून मंगलमुखींचे देवी स्तोत्र, बुलढाण्याच्या नटराज लोककला संचाचे भारुड तसेच गौरव हजारिक लिखित व दिग्दर्शित ‘निर्वाण’ हे नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन प्रगती हाटे (गंगा), मुंबई करतील.

तृतीयपंथी समाजातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलागुणांना योग्य प्रोत्साहन मिळावे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या पुढाकारातून साकारलेला हा उपक्रम नांदेडकरांसाठी एक आगळावेगळा सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे.

०००००



Sunday, August 17, 2025

दि. 16 ऑगस्ट 2025 वृत्त क्रमांक 863

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मुदखेड येथील 

केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

नांदेड, दि. १६ --- केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मुदखेड येथील केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता, संस्थेचे महानिरीक्षक आणि प्राचार्य  ख्वाजा सजनुद्दीन यांनी क्वार्टर गार्ड येथे मानवंदना घेतली आणि नंतर ध्वजारोहण केले.

प्राचार्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना त्याचे महत्त्व अधोरेखित केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य लढ्यातील शूर स्वातंत्र्यसैनिकांना त्यांनी आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, आपण स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणास्त्रोत मानले पाहिजे आणि आपल्या जीवनाच्या, समाजाच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी समर्पितपणे काम केले पाहिजे, जेणेकरून आपण स्वतःचा, समाजाचा आणि राष्ट्राचा समग्र विकास करू शकू आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर पुढे नेऊ शकू.  आपला देश विकसित राष्ट्र बनण्यासाठी आपण जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रामाणिकपणा आणि समर्पणाने काम केले पाहिजे.

याप्रसंगी, प्राचार्यांनी राष्ट्राच्या माननीय राष्ट्रपतींकडून विविध पदके प्राप्त केलेल्या अधिकाऱ्यांची/कर्मचाऱ्यांची नावे जाहीर केली आणि त्यांना त्यांच्या शौर्यासाठी राष्ट्रपतींच्या शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात आल्याची माहिती दिली.

स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधीनस्थ अधिकाऱ्यांनी 'अॅट होम' पार्टीसाठी आमंत्रित करणे, कर्मचाऱ्यांमध्ये व्हॉलीबॉल स्पर्धा, मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, संयुक्त दुपारचे जेवण आणि सर्व इमारतींवर भव्य रोषणाई सजावट यांचा समावेश होता.

याप्रसंगी कमांडंट  व्ही.पी. त्रिपाठी, डेप्युटी कमांडंट  अरुण कुमार, डेप्युटी कमांडंट  मोहम्मद शाहनेवाज, डेप्युटी कमांडंट  करणजीत सिंग, असिस्टंट कमांडंट  यू.टी. साखरे, सहाय्यक कमांडंट (मंत्रालयीन), डॉ. सी. संजीवन, वैद्यकीय अधिकारी, इतर अधीनस्थ अधिकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

0000







केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...