Wednesday, June 18, 2025

 वृत्त क्र. 631 

दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात

शिक्षण मंडळाची हेल्पलाईन   

नांदेड दि. 18 जून :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने जून-जुलै 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लेखी परीक्षेच्या 8 दिवस अगोदरपासुन विभागीय मंडळस्तरावर सकाळी 8 ते सायं. 8 वाजेपर्यंत इयत्ता 10 वी साठी 02382-251633 व इ. 12 वी साठी 02382-251733 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. 

इ. 12 वी लेखी परीक्षा व ऑनलाईन परीक्षा 24 जून ते  16 जुलै 2025 व  इ. 10 वी लेखी परीक्षा 24 जून ते 8 जुलै 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. श्रीमती भंडारी ए.आर. (सहसचिव) मो.नं. 9422886101, चवरे ए. पी. (प्र. सहा.सचिव) मो.नं. 9421765683. उच्च माध्यमिकसाठी कारसेकर जे.एस. (व.अ.) च मो.नं. 9822823780, डाळींबे एम. यु. (प.लि.) मो.नं. 9423777789 3. जानकर एच. एस. (व.लि.) मो.नं. 9764409318. माध्यमिकसाठी जेवळीकर सी. व्ही. (व.अ.) मो.नं. 9420436482, घटे एस. एच. (प.लि.) मो.नं. 9405486455, सुर्यवंशी ए. एल. (क.लि.) मो.नं.7620166354 हे नंबर देण्यात आले आहेत. विद्यार्थी, पालक, शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी वरील दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांकावर सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत संपर्क साधावा. 

माध्यमिक व उच्च माध्यमिक प्र. परीक्षा फेब्रु- मार्च 2025 या भयमुक्त व तणावमुक्त होवून परीक्षेस सामोरे जाणे आवश्यक आहे. या संदर्भात विद्यार्थी, पालक यांच्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून आवश्यकतेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशक कच्छवे बी. एम. भ्रमणध्वनी क्र. 9371261500, कारखेडे बी. एम. 9860912898, सोळंके पी. जी. 9860286857, पाटील बी. एच. 9767722071 यांच्याशी संपर्क करता येईल, असे आवाहन लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव अनुपमा भंडारी यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 630 

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी शिष्यवृत्ती योजना 

नांदेड दि. 18 जून :- सन  2025-26 वर्षासाठी केंद्रीय  शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या 'राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती' योजनेसाठी (एनएमएमएस) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (एनएसपी) www.scholarships.gov.in वर नवीन आणि नूतनीकरण अर्जांच्या ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्यास 2 जून 2025 पासून सुरुवात झाली आहे. नवीन आणि नूतनीकरण नोंदणीची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2025 आहे. या योजनांसाठी पात्र लाभार्थानी विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज भरणे बाबत आपल्या अधिनिस्त शाळांना अवगत करून पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे  यांनी केले आहे. 

जिल्ह्यामध्ये  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद  पुणे मार्फत एनएमएमएस परीक्षेत शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये निवड  झालेल्या जिल्ह्यातील  सर्व  विद्यार्थ्यांनी 2025-26 शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन अर्जदार म्हणून आणि 9 वी, 10 वी, 11 वी उत्तीर्ण झालेल्या शिष्यवृत्तीधारकांनी नुतनीकरण अर्ज भरावे. शिष्यवृत्ती धारकांनी स्वतःची नोंदणी आधारानुसार करावी लागेल. यापूर्वी शिष्यवृत्ती घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दहावी, अकरावी आणि बारावीसाठी नूतनीकरण अर्जदार म्हणून स्वतःचे नूतनीकरण करावे लागेल. 

एनएमएमएससाठी पात्रतेचे निकष

पालकाचे उत्पन्न 3 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे. शासकीय , स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित (टप्पा अनुदानसह) शाळेतील विद्यार्थांना  सदर योजना लागू आहे. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच केंद्र / राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील, खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत. 

इयत्ता 10 वी नंतर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल. इयत्ता 10 वी मध्ये सर्वसाधारण (जनरल) विद्यार्थ्यास 60 टक्केपेक्षा अधिक गुण आवश्यक (अनुसूचित जाती/ जमातीच्या विद्यार्थ्यास 5 टक्के सुट) इयत्ता 9 वी मधून 10 वी मध्ये गेलेले विद्यार्थी व 10 वी मधून 12 वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्याच्या नावाचेच खाते असावे ते संयुक्त खाते नसावे. शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे, त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती रक्कम, NMMSS साठी वार्षिक 12 हजार रुपये आहे.

वेळापत्रक

NMMSS व प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुरवात 2 जून 2025 पासून झाली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2025 आहे. शाळास्तर अर्ज पडताळणी अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2025 आहे. तर जिल्हास्तर अर्ज पडताळणी अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 अशी आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे  यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

 

वृत्त क्र. 629 

वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या विविध योजना 

लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन   

नांदेड, दि. 18 जून :- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. नांदेड जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन नांदेड दूरध्वनी क्र. 02462-220244 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एस. नरवडे यांनी केले आहे. 

तसेच राज्य शासनाने वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) व रामोशी समाजासाठी उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) या दोन महामंडळाची स्थापना केली आहे. ही महामंडळे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत कार्यरत असुन त्यांना स्वतंत्र उद्दीष्ट देण्यात आले आहे. या तिन्ही महामंडळांअंतर्गत पुढीलप्रमाणे विविध योजना राबलिल्या जात आहेत. 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना या योजनेची मर्यादा 10 लाख रुपयापर्यंत असून अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षादरम्यान असावे. अर्जदाराचे बँक खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. सदर योजना ही ऑनलाईन असुन यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा संबंधीत व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल व इतर कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे. 

गट कर्ज व्याज परतावा योजना

गट कर्ज व्याज परतावा योजना या योजनेची मर्यादा 10 ते 50 लाख रुपयापर्यंत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा. गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावे. गटातील सदस्यांचे वय 18 ते 45 वर्ष पर्यत असावे. गटातील लाभार्थ्याचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. उत्पन्नाची मर्यादा नॉनक्रिमीनल करिता 8 लाखाच्या मर्यादीत असावी. सदर योजना ही ऑनलाईन असून याकरिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, वयाचा पुरावा संबंधीत व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल वेबसाईटवर मुळ कागदत्रासह अपलोड करणे आवश्यक आहे. 

थेट कर्ज योजना

एक लाख रुपये थेट कर्ज योजना या योजनेत महामंडळाकडुन 1 लाख रुपये थेट कर्ज दिले जाते. या योजनेसाठी दोन जामीनदार व गहाणखत तसेच बोझा नोंद करुन देणे आवश्यक आहे. या योजनेकरिता जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला ( रु.1 लाखापर्यंत) रेशनकार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा, व्यवसायाचा परवाना इत्यादी कागदपत्रांसह संबंधीत व्यवसायानुसार कागदपत्रे आवश्यक आहे. या योजनेचे अर्ज महामंडळाच्या कार्यालयातुन जातीचा मुळ दाखला व आधार कार्ड दाखवुन रितसर नोंद करुन अर्जदारास मिळतील. 

बीज भांडवल योजना

बीज भांडवल योजना ही योजना बँकेमार्फत राबविली जात आहे. अर्जदाराने महामंडळाकडे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला ( रु. 1 लाखापर्यंत) रेशनकार्ड, आधारकार्ड, वयाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र, संबंधीत व्यवसायानुसार आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून कार्यालयात दाखल करावी लागतील. यापूर्वी लाभार्थीने कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही. 

या योजनेचे सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचे 150,05,01 गट कर्ज व्याज परतावा योजना योजनेचे 01,01,01, बीज भांडवल कर्ज योजना 01,01,01, रुपये 1 लाख थेट कर्ज योजना 200,20,20 असे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे, असेही महामंडळाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

00000

 

 वृत्त क्र. 628   

​शासकीय आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी 

पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतूनही प्रवेश 

नांदेड, दि. 18 जून :-  अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी किनवट प्रकल्पाअंतर्गत मुलींचे 6 व मुलांचे 9 असे एकुण 15 शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. शैक्षणिक सत्र 2025-26 या शैक्षणिक सत्रासाठी आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आली आहेत, असे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

किनवट प्रकल्पातील जिल्हास्तर वसतीगृहामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवी, पदवीत्तर, डिप्लोमा व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आणि तालुकास्तर वसतीगृहामध्ये इयत्ता 8 वी ते कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवी, पदवीत्तर, डिप्लोमा व व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता विद्यार्थ्यांनी निकाल जाहिर झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत ऑनलाईन परिपूर्ण कागदपत्रासह http://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. 

प्रवेशाची प्रक्रिया गुणवत्ता तथा शासन नियमानुसार करण्यात येईल. वसतीगृहात रिक्त जागेच्या अधिन राहुनच प्रवेश देण्यात येईल ज्या विद्यार्थ्याचा वसतीगृहात प्रवेश होणार नाही. अशा विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अर्ज पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वंयम योजनेत वसतीगृह प्रवेश संपल्यावर वळती करण्यात येणार आहे. परंतु त्याकरिता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वसतीगृहाचा अर्ज करतानांच पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना (चेक बॉक्स क्लिक करुन) निवड करणे अनिवार्य आहे. 

विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशाकरीता मुदतीत आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन अर्ज भरण्यात यावा. विद्यार्थ्याचे आधार प्रमाणिकरण असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे आधार नंबर व बँक खाते नंबरचे सिंडिग असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्याचे आधार सिंडिग नसल्यास त्या विद्यार्थ्यांनी संबधित बँकेशी संपर्क करुन आधार सिंडिंग करुन घेणे आवश्यक आहे. तरच डीबीटीचा लाभ मिळेल अन्यथा DBT चा लाभ मिळणार नाही असे आवाहन करण्यात आले आहे.   

वसतीगृहातील मंजुर क्षमता व रिक्त जागेची माहिती पुढीलप्रमाणे आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वसतीगृहाचे गृहपाल किंवा प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा. शैक्षणिक सत्र 2025-26 शासकीय आदिवासी मुलां-मुलींचे वसतिगृह निहाय रिक्त जागेचे विवरण जिल्हास्तर व तालुकास्तर पुढीलप्रमाणे आहे. 

मंजूर क्षमता 125 असलेल्या वसतीगृहातील सन 2024-25 मधील रिक्त जागा शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह नांदेड क्र. 1 येथे 55 आहेत त्यानुसार  शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह नांदेड क्र. 2 रिक्त जागा 48, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह नांदेड रिक्त जागा 29, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह भोकर रिक्त जागा 61, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह भोकर 44, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह हिमायतनगर 64, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह हिमायतनगर 56, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह किनवट 26, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह किनवट (पुर्व) 68 तर मंजूर क्षमता 75 असलेल्या वसतीगृहात शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह हदगाव 19, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह हदगाव 21, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह माहुर 21, शासकीय आदिवासी मुलीचे वसतीगृह माहुर 27, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह किनवट (पश्चिम) 20 तर शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह किनवट येथे 13 रिक्त जागा आहेत. 

सर्व नवीन विद्यार्थ्यांनी परीक्षेचा निकाल जाहिरात झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांपर्यंत  htt://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आपली नोंदणी करुन युजर आयडी आणि पासवर्ड तयार करुन जाहिर झाल्याच्या दिनांकापासुन 30 दिवसापर्यंत ऑनलाईन अर्ज न्यू हा पर्याय निवडावा. तसेच अर्जासोबत विद्यार्थ्यानी पुढील प्रमाणे शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावेत. 

शैक्षणिक कागदपत्रे

शाळा सोडल्याचा दाखला टिसी झेराक्स, शेवटच्या वर्षाची गुणपत्रीका, अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र, उत्पनाचा दाखला चालुवर्ष, महाविद्यालय प्रवेश घेतल्याची पावती किवा बोनाफोईड, आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, बॅक पासबुक झेरॉक्स, दहावी व बारावी गुणपत्रक, कॅपरॉऊडमध्ये निवड झाल्याची छायाकिंत प्रत. इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत ऑनलाईन अपलोड करुन सदर अर्जाची हॉर्डकॉपी संबंधित वसतीगृहाच्या गृहपाल यांच्याकडे सादर करुन सादर केलेल्या अर्जाची पोच घ्यावी. 

सर्व जुने विद्यार्थ्यानी आपले परीक्षेचे निकाल अद्याप जाहिर झाले नसेल अशा विद्यार्थ्यानी निकाल जाहिर झाल्यापासून 15 दिवसाच्या आत ऑनलाईन अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. सदर जुन्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज Renew हा पर्याय निवडावा जुन्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेवुन वसतीगृहाचाऑनलाईन अर्ज वसतीगृह गृहपाल यांचे कडे सादर करावा तेव्हाच प्रवेश निच्छित होईल असे न केल्यास सदर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे. असे समजुन त्यांचे जागी नवीन विद्यार्थ्यास प्रवेश दिल्या जाईल यांची संबधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 

पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेची सुवर्ण संधी

अनुसूचित जमातीच्या मुलां-मुलींना शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्याना 12 वी नंतर उच्च शिक्षण जिल्हास्तरावर शिक्षण घेणारे व 10 वी नंतरच्या दोन वर्ष किवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाला तालुकास्तरावर शिक्षण घेणारे विद्यार्थी पंरतु शासकीय व अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रित प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेऊन शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता आधार संलग्न बँक खात्यात थेट रक्कम पात्र विद्यार्थ्यांना पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयम योजनेचा लाभ दिला जातो. विद्यार्थ्याना शैक्षणिक सत्र 2025-26 करीता या योजनेत प्रवेश दिला जातो. 

पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वंयम योजनेकरीता संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे मुळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. शाळा सोडल्याचा दाखला टिसी झेराक्स, शेवटच्या वर्षाची गुणपत्रीका, अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र, उत्पनाचा दाखला चालु वर्ष, महाविद्यालय प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफोईड, आधार कार्ड, बँक पासबुक झेराक्स, एसएससी व एचएससी  गुणपत्रक, वडिलांचे स्वंयम घोषणापत्र, विद्यार्थ्यांचे स्वयम घोषणापत्र, कॅपरॉऊडमध्ये निवड झाल्याची छायाकिंत प्रत इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत ऑनलाईन अपलोड करुन सदर अर्जाची हॉड कॉपी संबधित महाविद्यालयाच्या प्राचार्यकडे सादर करुन सादर केलेल्या अर्जाची पोच घेण्यात यावी. पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयम योजनेकरीता विद्यार्थ्यांनी http://swayam.mahaonline.gov.in या​ संकेस्थळाचा वाप​र करुन Swayam च्या टॅबवर क्लिक करुन ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.

0000

 

17.6.2025

 वृत्त क्र. 627 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

 

नांदेड, दि. 17 जून :- नांदेड जिल्ह्यात 30 जून 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात दि. 16 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 30 जून 2025 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

17.6.2025

 वृत्त क्र. 626

 

अनु.जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी

सूक्ष्म सिंचन योजना : तालुकास्तरावर विशेष मेळावा

 

नांदेड, दि. 17 जून : नांदेड येथे कृषि विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अनु.जाती व अनु.जमाती संवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर 15 ते 30 जून 2025 या पंधरवाड्यात विशेष मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या ठीबक व तुषार सिंचनाबाबत तालुका, मंडळस्तरावर व तसेच गावोगावी माहिती देण्यात येणार आहे.

 

नांदेड जिल्ह्यास अनु. जाती व अनु. जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी लक्षांक उपलब्ध असून लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...