Wednesday, June 18, 2025

 वृत्त क्र. 630 

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी शिष्यवृत्ती योजना 

नांदेड दि. 18 जून :- सन  2025-26 वर्षासाठी केंद्रीय  शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या 'राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती' योजनेसाठी (एनएमएमएस) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (एनएसपी) www.scholarships.gov.in वर नवीन आणि नूतनीकरण अर्जांच्या ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्यास 2 जून 2025 पासून सुरुवात झाली आहे. नवीन आणि नूतनीकरण नोंदणीची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2025 आहे. या योजनांसाठी पात्र लाभार्थानी विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज भरणे बाबत आपल्या अधिनिस्त शाळांना अवगत करून पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे  यांनी केले आहे. 

जिल्ह्यामध्ये  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद  पुणे मार्फत एनएमएमएस परीक्षेत शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये निवड  झालेल्या जिल्ह्यातील  सर्व  विद्यार्थ्यांनी 2025-26 शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन अर्जदार म्हणून आणि 9 वी, 10 वी, 11 वी उत्तीर्ण झालेल्या शिष्यवृत्तीधारकांनी नुतनीकरण अर्ज भरावे. शिष्यवृत्ती धारकांनी स्वतःची नोंदणी आधारानुसार करावी लागेल. यापूर्वी शिष्यवृत्ती घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दहावी, अकरावी आणि बारावीसाठी नूतनीकरण अर्जदार म्हणून स्वतःचे नूतनीकरण करावे लागेल. 

एनएमएमएससाठी पात्रतेचे निकष

पालकाचे उत्पन्न 3 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे. शासकीय , स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित (टप्पा अनुदानसह) शाळेतील विद्यार्थांना  सदर योजना लागू आहे. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच केंद्र / राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील, खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत. 

इयत्ता 10 वी नंतर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल. इयत्ता 10 वी मध्ये सर्वसाधारण (जनरल) विद्यार्थ्यास 60 टक्केपेक्षा अधिक गुण आवश्यक (अनुसूचित जाती/ जमातीच्या विद्यार्थ्यास 5 टक्के सुट) इयत्ता 9 वी मधून 10 वी मध्ये गेलेले विद्यार्थी व 10 वी मधून 12 वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्याच्या नावाचेच खाते असावे ते संयुक्त खाते नसावे. शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे, त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती रक्कम, NMMSS साठी वार्षिक 12 हजार रुपये आहे.

वेळापत्रक

NMMSS व प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुरवात 2 जून 2025 पासून झाली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2025 आहे. शाळास्तर अर्ज पडताळणी अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2025 आहे. तर जिल्हास्तर अर्ज पडताळणी अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 अशी आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे  यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

 

No comments:

Post a Comment