Wednesday, June 18, 2025

 वृत्त क्र. 628   

शासकीय आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी 

पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतूनही प्रवेश 

नांदेड, दि. 18 जून :-  अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी किनवट प्रकल्पाअंतर्गत मुलींचे 6 व मुलांचे 9 असे एकुण 15 शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. शैक्षणिक सत्र 2025-26 या शैक्षणिक सत्रासाठी आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आली आहेत, असे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

किनवट प्रकल्पातील जिल्हास्तर वसतीगृहामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवी, पदवीत्तर, डिप्लोमा व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आणि तालुकास्तर वसतीगृहामध्ये इयत्ता 8 वी ते कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवी, पदवीत्तर, डिप्लोमा व व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता विद्यार्थ्यांनी निकाल जाहिर झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत ऑनलाईन परिपूर्ण कागदपत्रासह http://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. 

प्रवेशाची प्रक्रिया गुणवत्ता तथा शासन नियमानुसार करण्यात येईल. वसतीगृहात रिक्त जागेच्या अधिन राहुनच प्रवेश देण्यात येईल ज्या विद्यार्थ्याचा वसतीगृहात प्रवेश होणार नाही. अशा विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अर्ज पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वंयम योजनेत वसतीगृह प्रवेश संपल्यावर वळती करण्यात येणार आहे. परंतु त्याकरिता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वसतीगृहाचा अर्ज करतानांच पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना (चेक बॉक्स क्लिक करुन) निवड करणे अनिवार्य आहे. 

विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशाकरीता मुदतीत आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन ऑनलाईन अर्ज भरण्यात यावा. विद्यार्थ्याचे आधार प्रमाणिकरण असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे आधार नंबर व बँक खाते नंबरचे सिंडिग असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्याचे आधार सिंडिग नसल्यास त्या विद्यार्थ्यांनी संबधित बँकेशी संपर्क करुन आधार सिंडिंग करुन घेणे आवश्यक आहे. तरच डीबीटीचा लाभ मिळेल अन्यथा DBT चा लाभ मिळणार नाही असे आवाहन करण्यात आले आहे.   

वसतीगृहातील मंजुर क्षमता व रिक्त जागेची माहिती पुढीलप्रमाणे आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वसतीगृहाचे गृहपाल किंवा प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा. शैक्षणिक सत्र 2025-26 शासकीय आदिवासी मुलां-मुलींचे वसतिगृह निहाय रिक्त जागेचे विवरण जिल्हास्तर व तालुकास्तर पुढीलप्रमाणे आहे. 

मंजूर क्षमता 125 असलेल्या वसतीगृहातील सन 2024-25 मधील रिक्त जागा शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह नांदेड क्र. 1 येथे 55 आहेत त्यानुसार  शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह नांदेड क्र. 2 रिक्त जागा 48, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह नांदेड रिक्त जागा 29, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह भोकर रिक्त जागा 61, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह भोकर 44, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह हिमायतनगर 64, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह हिमायतनगर 56, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह किनवट 26, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह किनवट (पुर्व) 68 तर मंजूर क्षमता 75 असलेल्या वसतीगृहात शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह हदगाव 19, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह हदगाव 21, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह माहुर 21, शासकीय आदिवासी मुलीचे वसतीगृह माहुर 27, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह किनवट (पश्चिम) 20 तर शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह किनवट येथे 13 रिक्त जागा आहेत. 

सर्व नवीन विद्यार्थ्यांनी परीक्षेचा निकाल जाहिरात झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांपर्यंत  htt://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आपली नोंदणी करुन युजर आयडी आणि पासवर्ड तयार करुन जाहिर झाल्याच्या दिनांकापासुन 30 दिवसापर्यंत ऑनलाईन अर्ज न्यू हा पर्याय निवडावा. तसेच अर्जासोबत विद्यार्थ्यानी पुढील प्रमाणे शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावेत. 

शैक्षणिक कागदपत्रे

शाळा सोडल्याचा दाखला टिसी झेराक्स, शेवटच्या वर्षाची गुणपत्रीका, अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र, उत्पनाचा दाखला चालुवर्ष, महाविद्यालय प्रवेश घेतल्याची पावती किवा बोनाफोईड, आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, बॅक पासबुक झेरॉक्स, दहावी व बारावी गुणपत्रक, कॅपरॉऊडमध्ये निवड झाल्याची छायाकिंत प्रत. इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत ऑनलाईन अपलोड करुन सदर अर्जाची हॉर्डकॉपी संबंधित वसतीगृहाच्या गृहपाल यांच्याकडे सादर करुन सादर केलेल्या अर्जाची पोच घ्यावी. 

सर्व जुने विद्यार्थ्यानी आपले परीक्षेचे निकाल अद्याप जाहिर झाले नसेल अशा विद्यार्थ्यानी निकाल जाहिर झाल्यापासून 15 दिवसाच्या आत ऑनलाईन अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. सदर जुन्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज Renew हा पर्याय निवडावा जुन्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेवुन वसतीगृहाचाऑनलाईन अर्ज वसतीगृह गृहपाल यांचे कडे सादर करावा तेव्हाच प्रवेश निच्छित होईल असे न केल्यास सदर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे. असे समजुन त्यांचे जागी नवीन विद्यार्थ्यास प्रवेश दिल्या जाईल यांची संबधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 

पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेची सुवर्ण संधी

अनुसूचित जमातीच्या मुलां-मुलींना शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्याना 12 वी नंतर उच्च शिक्षण जिल्हास्तरावर शिक्षण घेणारे व 10 वी नंतरच्या दोन वर्ष किवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाला तालुकास्तरावर शिक्षण घेणारे विद्यार्थी पंरतु शासकीय व अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रित प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेऊन शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता आधार संलग्न बँक खात्यात थेट रक्कम पात्र विद्यार्थ्यांना पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयम योजनेचा लाभ दिला जातो. विद्यार्थ्याना शैक्षणिक सत्र 2025-26 करीता या योजनेत प्रवेश दिला जातो. 

पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वंयम योजनेकरीता संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे मुळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. शाळा सोडल्याचा दाखला टिसी झेराक्स, शेवटच्या वर्षाची गुणपत्रीका, अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र, उत्पनाचा दाखला चालु वर्ष, महाविद्यालय प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफोईड, आधार कार्ड, बँक पासबुक झेराक्स, एसएससी व एचएससी  गुणपत्रक, वडिलांचे स्वंयम घोषणापत्र, विद्यार्थ्यांचे स्वयम घोषणापत्र, कॅपरॉऊडमध्ये निवड झाल्याची छायाकिंत प्रत इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत ऑनलाईन अपलोड करुन सदर अर्जाची हॉड कॉपी संबधित महाविद्यालयाच्या प्राचार्यकडे सादर करुन सादर केलेल्या अर्जाची पोच घेण्यात यावी. पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयम योजनेकरीता विद्यार्थ्यांनी http://swayam.mahaonline.gov.in या संकेस्थळाचा वापर करुन Swayam च्या टॅबवर क्लिक करुन ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.

0000

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   876   नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल :  आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन   नुकसानीचे तात्काळ प...