Wednesday, June 18, 2025

वृत्त क्र. 629 

वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या विविध योजना 

लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन   

नांदेड, दि. 18 जून :- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. नांदेड जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन नांदेड दूरध्वनी क्र. 02462-220244 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एस. नरवडे यांनी केले आहे. 

तसेच राज्य शासनाने वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) व रामोशी समाजासाठी उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) या दोन महामंडळाची स्थापना केली आहे. ही महामंडळे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत कार्यरत असुन त्यांना स्वतंत्र उद्दीष्ट देण्यात आले आहे. या तिन्ही महामंडळांअंतर्गत पुढीलप्रमाणे विविध योजना राबलिल्या जात आहेत. 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना या योजनेची मर्यादा 10 लाख रुपयापर्यंत असून अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षादरम्यान असावे. अर्जदाराचे बँक खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. सदर योजना ही ऑनलाईन असुन यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा संबंधीत व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल व इतर कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे. 

गट कर्ज व्याज परतावा योजना

गट कर्ज व्याज परतावा योजना या योजनेची मर्यादा 10 ते 50 लाख रुपयापर्यंत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा. गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावे. गटातील सदस्यांचे वय 18 ते 45 वर्ष पर्यत असावे. गटातील लाभार्थ्याचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. उत्पन्नाची मर्यादा नॉनक्रिमीनल करिता 8 लाखाच्या मर्यादीत असावी. सदर योजना ही ऑनलाईन असून याकरिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, वयाचा पुरावा संबंधीत व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल वेबसाईटवर मुळ कागदत्रासह अपलोड करणे आवश्यक आहे. 

थेट कर्ज योजना

एक लाख रुपये थेट कर्ज योजना या योजनेत महामंडळाकडुन 1 लाख रुपये थेट कर्ज दिले जाते. या योजनेसाठी दोन जामीनदार व गहाणखत तसेच बोझा नोंद करुन देणे आवश्यक आहे. या योजनेकरिता जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला ( रु.1 लाखापर्यंत) रेशनकार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा, व्यवसायाचा परवाना इत्यादी कागदपत्रांसह संबंधीत व्यवसायानुसार कागदपत्रे आवश्यक आहे. या योजनेचे अर्ज महामंडळाच्या कार्यालयातुन जातीचा मुळ दाखला व आधार कार्ड दाखवुन रितसर नोंद करुन अर्जदारास मिळतील. 

बीज भांडवल योजना

बीज भांडवल योजना ही योजना बँकेमार्फत राबविली जात आहे. अर्जदाराने महामंडळाकडे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला ( रु. 1 लाखापर्यंत) रेशनकार्ड, आधारकार्ड, वयाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र, संबंधीत व्यवसायानुसार आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून कार्यालयात दाखल करावी लागतील. यापूर्वी लाभार्थीने कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही. 

या योजनेचे सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचे 150,05,01 गट कर्ज व्याज परतावा योजना योजनेचे 01,01,01, बीज भांडवल कर्ज योजना 01,01,01, रुपये 1 लाख थेट कर्ज योजना 200,20,20 असे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे, असेही महामंडळाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   876   नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल :  आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन   नुकसानीचे तात्काळ प...