Wednesday, May 28, 2025

  वृत्त 

तुळजापूरच्या श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी

नियोजन विभागाकडून 1 हजार 865  कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता

--अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाचा शासननिर्णय जारी

मुंबई, दि.२८ : - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील  नियोजन विभागाने तुळजापूर येथील श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी १ हजार ८६५ कोटी रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली असून त्या संदर्भातील शासननिर्णय आज जारी करण्यात आला आहे. या आराखड्याच्या संनियंत्रण व अंमलबजावणीची जबाबदारी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सातत्याने यासंबंधीच्या बैठका घेऊन पाठपुरावा केला होता. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून श्रीतुळजाभवानी देवीला महत्वं आहे. देवीच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान तुळजापूर येथे आहे. देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक मोठ्या संख्येने येत असतात. नवरात्रीच्या काळात मंदिरात मोठा उत्सव, भक्तांची गर्दी असते. ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या तुळजाभवानी देवस्थानच्या विकासाच्या दृष्टीने आजचा हा शासन निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलेल्या राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय दर्जाची महत्त्वाची स्थळे, तीर्थक्षेत्र परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरूप लक्षात घेऊन संबंधित आराखडे नियोजन विभागामार्फत राबवण्यात येतात.

 स्थानिक पातळीवरील सर्व संबंधितांशी चर्चा करून श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा व लागणारा निधी याचा आराखडा धाराशिवचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने तयार केला आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून ६ मे २०२५ रोजी चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता धेण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यातच या आराखड्यास प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय नियोजन विभागाने जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार विकास आराखड्यातील कामे करताना ऐतिहासिक वास्तूंची मूळ शैली जपण्याचे तसेच पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थांकडून ही कामे करून घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. नियोजन विभागाने तत्परतेने जारी केलेल्या या शासननिर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देवीभक्तांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

---000000----

 वृत्त क्रमांक 549

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातर्गंत तुर, मुग, उडीद व सोयाबीन पिकांच्या अनुदानावरील बियाणे व पिक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 28 मे :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानअंतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्व विचारात घेता सुधारित, संकरीत वाणांचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रमाणित बियाणे वितरण याघटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान 0.20 हे. ते कमाल 1 हेक्टर पर्यंत मर्यादित आहे. शेतकऱ्यास महाबीज या बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत सातबारा उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) तत्त्वावर प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येणार आहे. तुर, मुग, उडीद 10 वर्षाच्या आतील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 50 रु. किलोप्रमाणे अनुदान आहे. 10 वर्षाच्या वरील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 25 रु. किलोप्रमाणे अनुदान देय राहील.

तुर, मुग, उडीद यापिकांच्या अनुदानावरील बियाणांसाठी अर्जकरण्याची आवश्यकता नाही. तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत सोयाबीन बियाणे 5 वर्षाच्या आतील वाण (फुले किमया) 100 टक्के अनुदानावर उपलब्ध केले जाणार आहे. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर 29 मे 2025 पर्यंत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश जातील व यादी प्रसिध्द होईल. अनुदानावरील बियाणेसाठी निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांने त्याच्या मोबाईलवरील निवड झालेला संदेश व स्वतःआधारकार्ड घेवून आपल्या तालुक्यातील महाबीजच्या वितरकामार्फत बियाणे उचल करावे. तालुकानिहाय महाबीजच्या वितरकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

त्याचप्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानअंतर्गत पिक प्रात्यक्षिक बाब राबविण्यात येणार आहे.  पिक प्रात्यक्षिक ही बाब शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इ.व्दारे राबविण्यात येणार आहे. शेतकरी गट हा 31 मार्च 2024 पुर्वी नोंदणीकृत असावा. पिक प्रात्यक्षिकासाठी महाडिबीटी पोर्टलव्दारे नोंदणीकृत शेतकरी गट / कंपनी / संस्था निवडही प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस ) या तत्वावर निवड करण्यात येणार आहे. एका गावातून फक्त एकाच शेतकरी गटाची निवड करण्यात येणार असून गटातील शेतकऱ्याच्या संख्या जास्त असल्यास त्यापैकी फक्त 25 शेतकऱ्यांची या लाभासाठी निवड करावयाची आहे. तथापि शेतकरी गटातील एका कुटुंबातील एकच शेतकऱ्यास लाभ देण्यात येणार आहे. शेतकरीगट/कंपनी/ संस्था यामधील शेतकऱ्यांना पिक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना ॲग्रिस्टॅक वर नोंदणी असणे व फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे.

तरी वरील सर्व बाबींचा लाभ घेणेसाठी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकरी/ शेतकरीगट/ कंपनी आणि संस्था यांनी mahadbt.maharashtra.gov.in संकेतस्थळावर 29 मे 2025 पर्यत  अर्ज सादर करावेत व अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले.

00000

 वृत्त क्रमांक 548

शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापूस बियाणे खरेदी व पेरणी करु नये

नांदेड, दि. 28 मे :- शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापसाचे बियाणे विकत घेवू नये किंवा पेरणी करू नये. अधिकृत व प्रमाणित कंपन्यांचेच बी.टी. बियाणे खरेदी करावे. शंकास्पद बियाणे विक्रेत्यांची माहिती तात्काळ नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास कळवावी व शासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

सध्या खरीप हंगाम 2025 ची लगबग सुरु आहे.  ग्रामीण भागात कपाशी लागवडीसाठी बियाणे खरेदीची लगबग सुरु आहे. एचटीबीटी ही एक अनधिकृत जैवतंत्रज्ञान आधारित कापसाची जात आहे. जी अद्याप भारत सरकारकडून अधिकृतपणे मान्यता प्राप्त नाही. एचटीबीटी बियाण्यांचे उत्पादन, विक्री व पेरणी ही अनधिकृत व बेकायदेशीर आहे, असे केल्यास बी.टी. बीज कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा, व अन्य संबंधित कायद्यानुसार गुन्हा ठरतो.

एचटीबीटी बियाण्यांची उत्पत्ती, कार्यक्षमता व परिणाम याबाबत कोणतीही खात्री नाही. रोगप्रतिकारक शक्ती, उत्पादन क्षमता आणि बाजारातील मागणी यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. बोगस व बनावट बियाणे मिळण्याची शक्यता वाढते. राज्य शासन व कृषी विभाग यांच्याकडून याबाबत सातत्याने कारवाई सुरू आहे. अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यां विरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत, अशी माहिती कृषी विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

0000

 वृत्त क्रमांक 547

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त

 सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सांस्कृतिक कार्य विभागाचा मानाचा मुजरा

31 मे 2025 रोजी सायं. 5 वाजता, कुसुम सभागृह, नांदेड या ठिकाणी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

नांदेड, दि. 28 मे :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त  शनिवार 31 मे 2025 रोजी सायं. 5 वा. कुसुम सभागृह, नांदेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी नागरिकांनी या  सांस्कृतिक कार्यक्रमासाठी  मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंतीवर्षा निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतीक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांचे लाभले आहे. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या केवळ राज्यकर्त्या नव्हत्या तर प्रजाहित दक्ष होत्या. त्यांनी अनेक घाट, मंदिरे जीर्णोद्धार, पाणपोई, धर्मशाळा इ. कामे केली आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 31 मे रोजी नांदेड येथील कुसूम सभागृहात करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लोककलाकार आपली कला सादर करणार आहेत. तसेच या सांस्कृतिक  कार्यक्रमात विविध लोककलाकार असतील. 

००००००



Tuesday, May 27, 2025


हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन नियंत्रण कक्ष सक्रिय केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत. संबंधित सर्व यंत्रणांना २४ तास अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.




राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.


यावेळी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री भरत गोगावले, मंत्री नितेश राणे यांनी भाग घेतला.


बैठकीच्या सुरवातीलाच राज्यातील अतिवृष्टी, धरणातील पाणी साठे, पिक-परिस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला. विविध विभागांच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सज्जतेची माहिती सादर केली.

#मंत्रिमंडळबैठक
#अतिवृष्टी
 

  वृत्त क्रमांक 546

विकसित कृषी संकल्प अभियान : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी  

नांदेड दि. 27 मे :- कृषि मंत्रालय भारत सरकार व भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत विकसित कृषी संकल्प अभियान 29 मे ते 12 जून 2025 दरम्यान देशभरात राबवले जात आहे. या अभियानाचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारित पिके, पशुपालन, मत्स्यपालन तसेच विविध सरकारी योजना आणि धोरणांची माहिती देणे हा आहे. 

जिल्ह्यातील विशेष उपक्रम

नांदेड जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र सगरोळी हे या अभियानाचा भाग म्हणून 8 तालुक्यांतील (बिलोली, देगलूर, नायगाव, उमरी, धर्माबाद, मुखेड, लोहा व कंधार) 90 गावांमध्ये विशेष उपक्रम राबविणार आहे. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना सुधारित कृषी तंत्रज्ञान, बाजारपेठ नियोजन, शासकीय योजनांचे फायदे, नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. 

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे लाभ

·  तज्ज्ञांशी थेट संवाद आणि मार्गदर्शन

· सुधारित तंत्रज्ञान आणि नव्या जातींबाबत सविस्तर माहिती

·  सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि लाभांविषयी संपूर्ण माहिती

·  प्रगतशील शेतकऱ्यांच्या नवकल्पना व नव्या प्रयोगांचे दस्तऐवजीकरण अभियानाचा नियंत्रण आणि समन्वय 

अभियान प्रभावीपणे पार पाडण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र सगरोळी विशेष समिती स्थापन करणार असून राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अधिकारी, संशोधक आणि प्रगतशील शेतकरी यात सहभागी होतील. व्हॉटसॲप WhatsApp गट आणि दैनिक अहवाल संप्रेषणाच्या माध्यमातून नियंत्रण कक्ष कार्यरत राहील. 

शेतकऱ्यांना आवाहन

या अभियानाद्वारे नांदेड जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचा विकास निश्चितच होणार आहे. शेतकऱ्यांनी या अभियानात जास्तीतजास्त सहभाग घेऊन नवे ज्ञान मिळवावे आणि आपल्या उत्पादनक्षमतेत वाढ करावी, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र सगरोळी तर्फे करण्यात आले आहे.

00000

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना


प्रधानमंत्री पीक विमा योजना


मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 


 

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...