Wednesday, April 16, 2025

 महत्वाचे वृत्त क्रमांक 394

महिन्याभरात शेत पांदण रस्त्यांचे अर्ज निकाली काढा

विभागीय आयुक्तांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद  

नांदेड दि. 16  एप्रिल : कुणी शेतावर, कुणी बांधावर, कुणी दुकानात तर कुणी दुपारच्या उन्हात झाडाखाली खाटेवर पहुडलेला. मात्र तरीही विभागीय आयुक्त आपल्याशी बोलतात या उत्सुकतेपोटी शेकडो शेतकऱ्यांनी आज 'संवाद मराठवाड्याशी ' या कार्यक्रमात विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याशी संवाद साधला. यावेळी नांदेड जिल्ह्याने शेतरस्ते, शिव रस्ता, पांदण रस्ते व शेतीच्या रस्त्यासंदर्भात सुरू केलेल्या कार्यवाहीला महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नांदेड जिल्ह्याने यासंदर्भात यापूर्वीच घेतलेल्या पुढाकाराचे कौतुकही केले.  

छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी वेगवेगळ्या लाभांच्या व जिव्हाळ्यांच्या योजनासंदर्भात वेबिनारसत्र 'संवाद मराठवाड्याशी ' या उपक्रमांतर्गत सुरू केले आहे. विभागीय आयुक्त आपल्या मोबाईलवर थेट उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागात त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद असून आज 8 जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आपल्या प्रलंबित शेतमार्गांसाठी या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.

 अर्जदार ,संबंधित तहसिलदार तसेच विभागीय आयुक्त एकाचवेळी उपस्थित असल्याने अनेक प्रश्न त्याक्षणी त्यांनी सोडवले गेले.याशिवाय या रस्त्यासंदर्भात अर्ज करतांना घ्यावयाची काळजी यासंदर्भातील कायदे व विशिष्ट कालमर्यादेत हे कार्य पूर्ण करण्याबाबत यंत्रणेला विभागीय आयुक्तांनी दिलेली ताकिद यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.  

नांदेड जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनात शेती संदर्भातील सर्व रस्त्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी देखील यासंदर्भात बैठक घेऊन पांदण रस्ते व अन्य रस्त्यांचे प्रश्न मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत नांदेडमध्ये यासंदर्भात मोठ्याप्रमाणात कामे सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या 1 हजार 129 अर्जांपैकी 420 रस्ते मोकळे झाले आहेत तर 709 रस्ते प्रलंबित आहेत. या अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही आज या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली. 

आजच्या बैठकीला नांदेड येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी पूनर्वसन संजीव मोरे, तहसिलदार विपीन पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी रस्त्यासंदर्भातील एक दिवसाचा सेमिनार आयोजित करण्यात येईल. पावसाळ्याच्या आत सर्व रस्त्यांचे आदेश काढले जातील. यासाठी आयुक्त कार्यालयाने सुचविल्याप्रमाणे सस्ती अदालत आयोजित करण्यात येईल, असे स्पष्ट केले. विभागीय आयुक्तांनी महिनाभरात नांदेड मधील सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश यावेळी दिले.

00000











​ वृत्त क्रमांक 393

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  

नांदेड दि. 16 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यात 17 एप्रिलच्या सकाळी 6 वाजेपासून ते 1 मे 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 17 एप्रिल सकाळी 6 वाजेपासून ते 1 मे 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. 

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

​ वृत्त क्रमांक 392

पैनगंगा को-ऑपरेटीव्ह सोसायटीची निवडणूक जाहीर 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले निवडणूक अधिकारी 

नांदेड दि. 16  एप्रिल : पैनगंगा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., शेंदारकर, कॉम्पलेक्स आनंदनगर नांदेडची निवडणूक जाहीर करण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत आज यासंदर्भातील माहिती जारी करण्यात आली. 

ॲसीस्टंट रजिष्टार, को-ऑपरेशन, सी.ई.ए. (को-​ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथोरेटी) 9 वा मजला, टावर-ई, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नौरोजीनगर दिल्ली-110029 यांनी त्यांचे पत्र दिनांक 18 मार्च 2025 नुसार सदर संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी  निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची नियुक्ती केली आहे. 

संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार एकुण 9 संचालक निवडून द्यावयाचे असून त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातून 6, अनुसूचीत जाती-जमाती मतदारसंघातून एक आणि महिला राखीव मतदार संघातून दोन संचालकाची निवड करावयाची आहे. सदर संस्थेच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रमासह 21 एप्रिल 2025 संस्थेच्या पात्र मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. तर 22 ते 27 एप्रिल 2025 या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे, प्राप्त झालेल्या आक्षेपाची छाननी 28 एप्रिल ते 1 मे 2025 या कालावधीत करण्यात येऊन 1 मे 2025 रोजी संस्थेच्या सभासदांची अंतिम मतदार यादी दुपारी 3 वा. प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

दि. 2 ते 6 मे 2025 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. प्राप्त नामनिर्देशनपत्राची प्रसिद्धी 6 मे 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी 10 मे 2025 रोजी करुन वैध नामनिर्देशन पत्राची प्रसिध्दी 10 मे 2025 रोजी दु. 5.00 वा. करण्यात येणार आहे. तसेच  14 मे 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र परत घेता येतील. त्यानंतर निवडुन द्यावयाच्या उमेदवारांची यादी  14 मे 2025 रोजी दु. 5.00 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास 18 मे 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 या कालावधीत मतदान घेण्यात येणार आहे. तर मतमोजणी 19 मे 2025 रोजी सकाळी 8 वा. करण्यात येणार आहे. 

को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथॉरीटी नवी दिल्ली यांच्याकडून मंजूरी प्राप्त झाल्यानंतर 23 मे 2025 रोजी संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल घोषीत करण्यात येणार आहे. पैनगंगा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., शेंदारकर, कॉम्प्लेक्स आनंदनगर नांदेडच्या सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पैनगंगा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि., शेंदारकर कॉम्पलेक्स् आनंदनगर निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आवाहन केले आहे. संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम संस्थेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे शेंदारकर कॉम्पलेक्स्, आनंदनगर नांदेड येथील मुख्य कार्यालयात पहावयास मिळेल.

00000

 वृत्त क्रमांक 391

इस्त्रोच्या भूमीतून भरारीचे पंख घेऊन परता : महेश  वडदकर 

नांदेड समाज कल्याणचे 60 विद्यार्थी श्रीहरीकोटाला रवाना 

नांदेड दि. 16  एप्रिल : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्त्रो ही देशाची अंतराळ संशोधनातील महत्त्वाची संस्था असून या ठिकाणावरून आकाशात भरारी घ्यायचे पंख आणि त्यासाठी लागणारे बळ घेऊन परत या, अशा शब्दांमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी विद्यार्थ्यांना आज शुभेच्छा दिल्या. समाज कल्याण विभागातील 60 गुणी विद्यार्थ्यांची एक टीम शैक्षणिक सहलीसाठी श्रीहरिकोटा येथे आज रवाना झाली. 

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नांदेड कार्यालय अधिनस्त शासकिय निवासी शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी इस्त्रो येथे विमानाने रवाना झाले. त्यांना निरोप देताना श्रीहरीकोटा येथे आपण शैक्षणिक सहलीसाठी जातो आहे आणि त्या ठिकाणावरून नांदेडसाठी येतांना मोठ्या स्वप्नाची भरारी घेऊन येतो आहे, हे लक्षात ठेवावे असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.  

यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी या विद्यार्थ्यांपैकी काहींनी आंतराळशास्त्र सारख्या विभागात काम केल्यास मला आनंदच होईल. हा एक प्रशिक्षण दौरा असून विद्यार्थ्यांना नव्या क्षेत्रातील भरारी देण्यासाठी राज्य शासनाने आयोजित केला आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. श्री. मिनगिरे यांच्या मार्गदर्शनात हा कल्पक अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.   

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींची शासकीय निवासी शाळा, माहूर, हदगाव, उमरी, नायगाव येथील प्रत्येकी शाळा 15 विद्यार्थी-विद्यार्थीनी असे एकूण 60 विद्यार्थी व त्यांचे काळजीवाहक म्हणुन सोबत शिक्षक, कर्मचारी हे सदर शैक्षणिक सहलीसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) श्रीहरीकोटा येथे 16 ते 19 एप्रिल 2025 या कालावधी जात आहेत.    

यावेळी समाज कल्याण अधिकारी विलास केंद्रे, सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी बापू दासरी हे उपस्थित होते. हे विद्यार्थी हैद्राबाद येथून विमानाने जाणार आहेत. त्यांना आज हैद्राबादला बसने रवाना करण्यात आले. अधिकाऱ्यांनी  हिरवी झेंडी दाखवून सहलीस रवाना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांपटवार यांनी केले तर आभार रामदास पेंडकर यांनी मानले.

0000





Tuesday, April 15, 2025

वृत्त क्रमांक 390

नांदेडमध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याला थाटात सुरूवात 

* जिल्हाधिकाऱ्यांच्या जलपूजनाने पंधरवाड्याची सुरूवात

* जलसंपदा विभागामार्फत 15 दिवस विविध उपक्रम राबवणार 

नांदेड, दि. 15 एप्रिल :- गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर, नांदेड पाटबंधारे मंडळामार्फत आज जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याची सुरूवात करण्यात आली. पाण्याचा थेंब अन् थेंब हा जीवनदायी असून येणाऱ्या पिढ्यांसाठी जलसंवर्धन किती आवश्यक आहे हे पटून देण्याचे कार्य पुढील 15 दिवसात विभागामार्फत राबविले जाणार असल्याचे यावेळी विविध वक्त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील पाच नद्यांच्या जलकलशाचे जलपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.  

राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत संपूर्ण राज्यात 15 ते 30 एप्रिल या काळामध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये आज करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राहूल कर्डिले उपस्थित होते. अधिक्षक अभियंता तथा पालक अभियंता नांदेड जिल्हा अजय दाभाडे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील सर्व कार्यकारी अभियंता, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जिल्हा जलसंवर्धन अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी, जलतज्ज्ञ, महिला शेतकरी तसेच जलसंधारण क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते. 

कलश  पुजनाने व जलप्रतिज्ञेने सुरूवात झालेल्या भरगच्छ उपस्थितीच्या या सोहळ्यामध्ये कार्यकारी अभियंता अशिष चौगुले यांनी पाणी व्यवस्थापन, जलसंधारण व विभागात सुरू असलेल्या कामांची मांडणी केली. जलसंपदा विभाग जिल्ह्यात राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती अशिष चौगुले यांनी यावेळी दिली. त्यानंतर अधिक्षक अभियंता तथा पालक अभियंता अजय दाभाडे यांनी कार्यक्रमाच्या पुढील पंधरा दिवसाच्या तपशीलाची मांडणी केली. 16 एप्रिलला जलसंपदा अधिकारी यांचे प्रशिक्षण, 17 एप्रिलला स्वच्छ व सुंदर कार्यालय, जलपूर्नभरण, 18 व 19 एप्रिलला शेतकरी संवाद, 20 एप्रिलला भुसंपादन व पूर्नवसन, 21 एप्रिल कालवा स्वच्छता अभियान, 22 एप्रिल उपसा सिंचनाचे पाणी परवानगी निरसन, 23 एप्रिल रोजी जलसंपदा व कृषि विभागामार्फत कार्यशाळा, 24 एप्रिल सिंचन ई-प्रणाली पाणीपट्टी याबद्दल तक्रार निवारण,25 एप्रिलला विद्यापिठ व सेवाभावी संस्थांसोबत संवाद, 26 एप्रिल महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, यांच्या पाणी वापराचे जललेखा परिक्षण, 27 एप्रिलला आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 28 एप्रिलला महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे जमिनीचा सात/बारा उतारा कजा करणे व अतिक्रमण हाटविणे, 29 एप्रिल पाणी वापर संस्था सक्षमिकरण कार्यशाळेचे आयोजन, 30 एप्रिल रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महिला मेळावा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अभियंत्यांचे सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

पूर्ण 15 दिवस विभागामार्फत विविध उपक्रम राबवून पाणी वापरासंदर्भात जनजागृती करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय नदीसंवर्धन, कालवा स्वच्छता अभियान, कालवा व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचनाची वाढ, सांडपाणी व्यवस्थापन, पाण्याचे ऑडिट यासंदर्भात विविध उपक्रम याकाळामध्ये राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामाला राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार टप्पा क्रमांक दोन व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या अभियानाला जोडण्याचे आवाहन केले. येणारा काळ हा पाण्याचे महत्त्व वाढवणारा असून आपल्या स्वत:च्या संपत्तीप्रमाणे पाणी वापराचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्व संस्थांनी मिळून या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सोबतच प्रत्येक तालुक्याचे पाणी ऑडिट करण्याचे आवाहनही त्यांनी केले. जलसंपदा विभागाला भूसंपादन, अतिक्रमण अशा विषयांमध्ये संपूर्ण महसूल यंत्रणा मदत करेल तसेच या सूचना उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उद्यापासून होणाऱ्या कृति आराखड्याच्या अंमलबजावणीत सर्वांनी सहभागी व्हावे, अशी सूचना त्यांनी केली.  

या कार्यक्रमाला जिल्हाभरातील मान्यवर शेतकरी तसेच कार्यकारी अभियंता श्री. मुदगल, श्री. चौगुले, श्री. जगताप, श्री.बिराजदार श्री. तिडके, श्री. कुरुंदकर, श्री. खेडकर, सहाय्यक अधीक्षक अभियंता श्री. पारसेवार यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व अभियंते सहभागी झाले होते. सूत्रसंचालन एम. जी. शेख यांनी केले.

0000









वृत्त क्रमांक 389

 जिल्ह्यातील 60 विद्यार्थ्यांना घेऊन आज

श्रीहरीकोटा येथे शैक्षणिक सहल होणार रवाना

नांदेड दि. 15 एप्रिल :- सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नांदेड यांच्या अधिनस्त कार्यरत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलां-मुलींची शासकीय निवासी शाळा, माहूर , हदगाव, उमरी, नायगाव येथील 60 विद्यार्थ्यांना घेवून श्रीहरीकोटा येथे शैक्षणिक सहल उद्या सकाळी 9 वाजता होणार रवाना.

ही शैक्षणिक सहल सामाजिक न्याय भवन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड येथून उद्या 16 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून भारतीय संशोधन संस्था श्रीहरीकोटासाठी रवाना होत आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. 

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलां-मुलींची शासकीय निवासी शाळा, माहूर , हदगाव, उमरी, नायगाव येथील प्रत्येक शाळा 15 विद्यार्थी , विद्यार्थीनी असे एकूण 60 विद्यार्थी व त्यांचे काळजीवाहक म्हणून सोबत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक हे शैक्षणिक सहलीसाठी भारतीय अंतराळ संशोधक संस्था श्रीहरी कोटा येथे 16 ते 19 एप्रिल 2025 या कालावधीत जात आहेत.

00000

वृत्त क्रमांक 388

 समाज कल्याण कार्यालयात  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी 

नांदेड, दि. 14 एप्रिल :-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे मोठया उत्साहात साजरी करण्यता आली. सदर कार्यक्रामाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहूल कर्डीले हे होते. तर प्रमुख पाहुणे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार व डॉ. सान्वी जेठवाणी होत्या. तसेच कार्यक्रमास परमपुज्य पैय्याबोधी भंत्तेजी व भिक्खू संघ श्रामणेर खुरगांव यांची  उपस्थिती होती.  

जिल्हाधिकारी राहूल कर्डीले व पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार तसेच सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अपर्ण करुन अभिवादन करण्यात आले. 

तदृनंतर परमपुज्य पैय्याबोधी भंत्तेजी यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशिल ग्रहण करुन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्तावीक सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी करुन उपस्थितांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134वी जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या . तद्नंतर डॉ.सान्वि जेठवाणी यांनी उपस्थितांना मागर्दशन केले.   

जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी अध्यक्षीय भाषण करुन उपस्थितांना   भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवन कार्यावर प्रकाश टाकून त्यांचे विचार आम्हाला प्रेरणादायी ठरतात असे मत व्यक्त केले. तृतीयपंथीय यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तृतीय पंथर्यासाठी किनरभवन लवकरात लवकर उभारण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करेन असे आश्वासन त्यानी दिले.

यावेळी तृतीय पंथयांचे गुरु शेख फरीद मॅडम व सीवायडीए पुणे संस्थेचे मिलन लांबा तसेच डॉक्टर प्रशासकीय अधिकारी यशदा बबन जोगदंड  उपस्थित होते. सदर कार्याक्रमात  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलिस  अधिक्षक अबिनाश कुमार व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांचे  हस्ते 40 ते 45 तृतीयपंथीयांना ओळख पत्र व  प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले .

 समाज कल्याण विभागा मार्फत आयोजित सामाजिक सप्ताह अंतर्गत भारतीय संविधानाच्या प्रास्तावीकेचे नियमीत सामुहिक वाचन करण्यात आले.  तसेच  सहाय्यक आयुक्त्, समाज कल्याण नांदेड कार्यालया अधिनस्त शासकीय वसतिगृह व शासकिय निवासी शाळा येथे ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत वक्तृत्व स्पर्धा , निबंध स्पर्धा , लघुनाटय , पथनाटय  चित्रकला तसेच वाचन-प्रेरणा उपक्रम घेवून इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

तसेच श्रीमती सुजाता पोहरे , समतादूत जिल्हा प्रकल्प अधिकारी नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली समातादूता मार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाटयाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती  करण्यात आली. सदरील कार्यक्रमात  सामाजिक समता सप्ताहाची सांगता करण्यात आली. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त् समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी /कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले .सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गजानन पांपटवार यांनी केले तर अभार प्रदर्शन रामदास पेंडकर यांनी केले. सदर कार्यक्रमास  कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच विविध महामंडळाचे अधिकारी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

000








वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...