Tuesday, September 24, 2024

 वृत्त क्र. 858 

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्याचे

उमरी येथे दोन दिवस आयोजन

 

नांदेड दि. 24 सप्टेंबर : उमरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन दिनांक 25 व 30 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वा. करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने बारावी पास, आयटीआय उत्तीर्ण, पदवीधर, पदवीत्तर शिक्षण झालेल्या उमेदवारांनी या मेळाव्यात नोंदणी करावी, असे आवाहन उमरी येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जे. एल. गायकवाड  यांनी केले आहे. 

 

याबाबतचे नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. महाराष्ट्रातील रहिवाशी असावा. वयाची अट 18 वर्ष ते 35 वर्ष असावे. बारावी पास 6 हजार व आयटीआय उत्तीर्ण, पदवीका 8 हजार, पदवीधर व  पदवीत्तर 10 हजार असे मानधन राहील. शिक्षण चालू असलेले उमेदवार पात्र असणार नाहीत. उमेदवाराचे आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बँक खाते आधार सलग्न असावे. अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईटचा वापर करावा. www.rojgar.mahaswayam.gov.in, www.cmykpy.mahaswayam.gov.in, तसेच सदर कार्यक्रमास वरील दर्शविलेले नियम व अटीच्या उमेदवारांनी नोंदणी करून सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे, असेही आवाहन केले आहे.

00000

Monday, September 23, 2024

 वृत्त क्र. 857 

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्याचे

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजन

 

नांदेड दि. 23 सप्टेंबर : कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्र बनवण्यासाठी तसेच राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांना नौकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळावा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 26 व 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी केले आहे.

 

शैक्षणिक संस्था, माध्यमिक शाळा, उमावि / कमवि यांना शिक्षक व शिक्षकेत्तर कामाचा अनुभव घेण्यासाठी या योजनेंतर्गत कार्यप्रशिक्षणासाठी उमेदवार घेता येणार आहेत. या मेळाव्यात सहभाग नोंदवण्यासाठी गटनिदेशक जी. जी. शेख 9860958403 व कनिष्ठ प्रशि. सल्लागार एन. एन.सामाले 8830479675 यांच्याशी संपर्क साधावा. या मेळाव्यात एमएसईबी, एस. टी. महामंडळ, बाफना शोरूम, तुलसी पेंटस इत्यादी आस्थापना सहभाग घेणार आहेत. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त उमेदवार जे इयत्ता 12 वी, पदवी, पदविका उत्तीर्ण आहेत व ज्यांचे वय 18 ते 35 वर्ष आहे अशा उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 856 दि. २२ सप्टेंबर 2024

बारूळ येथे “स्वच्छता हि  सेवा” आणि‍ “राष्ट्रीय पोषण अभि‍यान”  विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन 

नांदेड दि. २२ सप्टेंबर : केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो व महिला व बालकल्यारण विभाग जि‍. प. नांदेडच्या  वतीने  कंधार तालुक्याहतील बारूळ येथे दिनांक 23 व 24 सप्टें बर 2024 रोजी स्वच्छता हि‍ सेवा आणि‍ राष्ट्रीय पोषण अभि‍यानावर आधारित वि‍शेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

देशभरात दि‍नांक 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2024 दरम्यान स्वच्‍छता हि  सेवा अभि‍यान राबवि‍ण्यात येत आहे.तसेच सप्टेंबर महिना हा राष्ट्रींय पोषण माह म्हणून साजरा करण्यात येत आहे. या दोन्ही वि‍षयांचे महत्व लक्षात घेऊन केंद्रीय संचार ब्यूरो, नांदेड कार्यालयाच्यावतीने दोन दिवसीय प्रसि‍ध्दी अभि‍यानाचे आयोजन करण्यात येत आहे.

बारूळ येथे राबवि‍ण्यात येणा-या दोन दिवसीय अभि‍यानात दि. 23 रोजी स्वच्छतेचे महत्व आणि‍ पोषण आहाराचे महत्व या विषयावर बारूळ येथील श्री. शिवाजी विदयालयाच्या  सहभागाने पोस्टर  स्पर्धेचे आयोजन करण्याछत आले आहे. तसेच राजभाषा  हिंदी पंधरवाडा अनुषंगाने निबंध स्पर्धा देखील  घेण्यात येणार आहे.

स्वच्छ्ता हि सेवा अभि‍यानाच्या माध्यंमातून श्री. शिवाजी विदयालयाचे विदयार्थी, ग्रामस्थांच्या व सभागातून स्वच्छ्ता फेरीचे आयोजन करण्‍यात आले असून ग्रामस्वच्छवता अभियान राबविण्यात येणार आहे.

दि‍नांक 24 रोजी बारूळ येथील श्री. शिवाजी विदयालयाच्याध प्रांगणात आयोजि‍त होणा-या मुख्य  कार्यक्रमात स्वच्छता हि सेवा आणि‍ पोषण आहाराचे महत्व. या विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून बालविकास प्रकल्प  कार्यालय, कंधार यांच्याण अंगणवाडींच्याष माध्यमातून पोषण आहार पाककृतींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. 

स्वसरसंगम सेवाभावी संस्थाय, माळाकोळी यांच्‍या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यापत आले आहे. 

या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रेखा काळम, उपविभागीय पोलिस अधि‍कारी श्रीमती  जगताप, बालविकास प्रकल्प अधि‍कारी लिंगुराम राजुरे, सरपंच श्रीमती जनाबाई वाघमारे, जि.प. नांदेडचे स्वच्छता तज्ञ मि‍लींद व्यिवहारे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

या कार्यक्रमाला मोठया संख्येयने सहभागी होण्यामचे आवाहन केंद्रीय संचार ब्यूखरोचे प्रसिध्दीा अधि‍कारी सुमि‍त दोडल, बालविकास प्रकल्प अधि‍कारी लिंगुराम राजुरे,  ग्रामविकास अधि‍कारी व्याकंट आदमपुरकर, मुख्यड अध्या पक अनि‍ल वटटमवार यांनी केले आहे.


                                                                                    ***

Friday, September 20, 2024

 वृत्त क्र. 855 

जिल्ह्यात "हरित ऊर्जा सौर क्रांती" मोहीम  

 

·  5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येचे गाव मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून होणार विकसित 

 

नांदेड दि. 20 सप्टेंबर : "हरित ऊर्जा सौर क्रांती" अंतर्गत जिल्ह्यात 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून विकसित केले जाणार आहे. अशा गावाला केंद्रीय आर्थिक सहाय्य म्हणून 1 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यात "हरित ऊर्जा सौर क्रांती" मोहीम सुरु करून ही चळवळ यशस्वी करण्यासाठी MNRE ने OM दिनांक 9 ऑगस्ट 2024 नुसार "मॉडेल सोलर व्हिलेज" मार्गदर्शक तत्त्वे निर्गमीत केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वानुसार मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून गाव विकसित केले जाणार आहे.

 

एक गाव मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून विकसित करण्याबाबत एमएसईडीसीसीएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकश चंद्रा यांनी सूचित केले आहे. या योजनेबद्दल जिल्ह्यात 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावामध्ये माहिती देऊन अधिकाधिक गावांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. मॉडेल सोलर व्हिलेजसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील गावांना ओळखून सदर गावे पीएम-सूर्य: मुफ्त बिजली योजनेसाठी हरित आणि स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणकडे पाठविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात सदर मोहीम सुरू करून "हरित ऊर्जा सौर क्रांती" चळवळ यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्हा परिषदेला निर्देश दिले आहेत. 

0000

 वृत्त क्र. 854

ई-पीक नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक

नांदेड दि. 20 सप्टेंबर :-  खरीप हंगाम 2024 मध्ये  शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या  पिकांची नोंद ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्तरावरुन नोंदविण्यांसाठी यापूर्वीच कळविले होते. परंतु अद्यापपर्यत काही शेतकऱ्यांनी पिकांची नोंद केलेली नाही. अशा शेतकऱ्यांनी २३ सप्टेंबर 2024 पर्यत ई-पिक नोंदणी करुन घ्यावी. ई-पिक नोंदणीसाठी अंतिम मुदत 23 सप्टेंबर 2024 आहे. तरी ज्या् शेतकऱ्यांनी अद्यापपर्यत पिकांची नोंद केलेली नाही त्यांनी शिल्लक शेवटच्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण करुन घ्यावी . जेणेकरुन  सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
00000

 पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

· वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात
· अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन
· राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्गाटन
· पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ
· ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनास प्रारंभ
वर्धा, दि.20 (जिमाका) : पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागिदारी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजसमुहाची आहे. या समुहातील कारागिर उद्योजक व्हावेत असा आमचा प्रयत्न असून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या बहुआयामी प्रगतीचा नायक शेतकरीच राहणार असून त्याच्या समृध्दीसाठी सरकार सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी येथे दिली.
पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्धा येथील स्वावलंबी मैदानात आज पार पडला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. राज्यपाल डॉ.सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.
अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला.
आजच्याच दिवशी 1932 मध्ये महात्मा गांधी यांनी अस्पृश्यता निर्मूलनसाठी सुरू केलेल्या अभियानाची आठवण करुन देतानांच बापूजींची कर्मभूमी आणि विनोबांची साधनाभूमी असलेल्या वर्ध्यातून विकसित भारताची निर्मिती करण्याच्या आमच्या संकल्पास ऊर्जा मिळते, असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले, विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या सोहळ्यासाठी आम्ही यामुळेच वर्ध्याची निवड केली. ही योजना केवळ एक सरकारी कार्यक्रम नसून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशात हजारो वर्षापासून असलेल्या कौशल्याचा वापर करण्याचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. इतिहासात आपल्या देशातील समृध्दीचा मोठा आधार पारंपरिक कौशल्य हाच होता. येथील वस्त्रोद्योग, शिल्पकला, धातूविज्ञान, अभियांत्रिकी अशा साऱ्याच बाबी जगात वैशिष्टपूर्ण होत्या. जगातील सर्वात मोठा वस्त्रनिर्माता भारतच होता. मात्र पारतंत्र्याच्या कालखंडात इंग्रजांनी स्वदेशी कौशल्य नष्ट केले. या पार्श्वभूमीवर गांधीजींनी वर्ध्यातूनच ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात बलुतेदारी समुहाची सातत्याने उपेक्षा झाली. त्यामुळेच प्रगती आणि आधुनिकतेत देशाची पिछेहाट झाल्याची खंत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.
कारागिरांच्या पारंपरिक कौशल्याचा सन्मान, सामर्थ्य आणि या समाजसमूहाची समृध्दी ही या योजनेमागची मूळ भूमिका असल्याचे स्पष्ट करुन श्री. मोदी म्हणाले, देशातील सातशेहून अधिक जिल्हे, अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायती तसेच हजारो स्थानिक नागरी संस्था या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहेत. दहा लाखांहून अधिक लोक या योजनेशी जोडले गेले असून आठ लाख शिल्पकारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यात केवळ महाराष्ट्रातीलच साठ हजारांहून कारागिर समाविष्ट आहेत. त्यांच्या कामाला आधुनिक आणि डिजिटल तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. साडेसहा लाख बलुतेदारांना आधुनिक साधने दिली गेली आहेत. या योजनेचा सर्वाधिक फायदा याच समाजसमूहांना होत आहे. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासोबतच ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात मोठ्या औद्योगिक विकासाची क्षमता असून त्यात वस्त्रोद्योग हा अग्रणी आहे. विदर्भात कापसाचे क्षेत्र मोठे असुनही येथील शेतकऱ्यांची यापूर्वी उपेक्षा झाल्याची खंत व्यक्त करुन प्रधानमंत्री मोदी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर नांदगाव खंडेश्वर येथे टेक्सटाइल पार्कची निर्मिती झाली. आता अमरावती येथे होत असलेले पीएम मित्रा पार्क हे वस्त्रोद्योगास नवी झळाळी प्राप्त करुन देण्याच्या प्रयत्नातील पुढचे पाऊल आहे. फार्म टू फायबर, फायबर टू फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन अशा सुत्रातून आमचे प्रयत्न सुरू असून विदर्भातील उच्च दर्जाच्या सूतापासून तयार होणारे कपडे परदेशात निर्यात होऊन येथील शेतकरी समृध्द होतील. अमरावतीच्या पार्कमध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून 1 लाखाचा रोजगार उपलब्ध होईल. औद्योगिक विकासासाठी पुरक असणाऱ्या विविध पायाभूत सुविधांचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. विदर्भातील सिंचन विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या वैनगंगा-नळगंगा योजनेच्या अंमलबजावणीतून 10 लाख एकर क्षेत्र सिंचित होणार आहे. याशिवाय कांदा, सोयाबीन उत्पादकांनाही विविध निर्णयाच्या माध्यमातून सरकार मदत करत आहे, असे प्रधानमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.
कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा योजना महत्वाची - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशातील गरीब, वंचित तसेच परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा ही योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून कारागिरांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अमरावती येथे पीएम मित्रा पार्क हा देशातील वस्त्रोद्योगाच्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसावर प्रक्रिया करून कापड निर्यातीला चालना मिळणार आहे. या पार्कमध्ये 10 हजार कोटीची गुंतवणूक होणार असून सुमारे 1 लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांमुळे राज्यातील महिला व इतर घटकांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला पोषक ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी यावेळी म्हणाले की, पीएम विश्वकर्मा ही योजना पारंपरिक कारागीर व शिल्पकारांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडविणारी आहे. त्यांना उच्च गुणवत्ता व प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेला माल जागतिक बाजारपेठेत पाठवण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात 1 लाख 46 हजार कारागिरांची नोंदणी झाली आहे. कारागिरांना अत्याधुनिक साधनांसाठी 5 टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून त्यांच्या उत्पादीत वस्तुंना मोठी बाजारपेठ निर्माण करण्यात आली आहे. भारतातील कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तुंच्या उत्पादनांचे प्रदर्शन वर्धा येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामिण कारागिरांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे श्री.मांझी यांनी यावेळी सांगितले.
देशातील सात पीएम मित्रा पार्कपैकी अमरावती येथे होत असलेल्या पार्कच्या माध्यमातून कापसापासून कापडापर्यंत व कापडापासून फॅशनपर्यंतच्या सर्व प्रकारच्या एकत्र सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे मोठ्या गुंतवणुकीसह रोजगार उपलब्ध होईल. पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदारांच्या विकासाचा विचार अद्यापपर्यंत कोणीही केला नाही, परंतू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा सारख्या योजनेच्या माध्यमातून बाजारपेठेला अनुकूल असलेल्या वस्तुंची निर्मिती करण्यासाठी प्रशिक्षणासह आर्थिक सहाय्य कारागिरांना उपलब्ध करून दिले आहे. याचा लाभ समाजातील शेवटच्या कारागिरापर्यंत पोहोचत आहे. बलुतेदार समाजसमुहाच्या जीवनात परिवर्तन घडविण्याची मोठी संधी या योजनेमधून उपलब्ध झाले असल्याचे सांगून शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.
पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून विदर्भासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या पार्कमुळे पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार असून येथे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये मोठे प्रकल्प गतिमानतेने पूर्ण केल्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा विक्रम केला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. गडचिरोली येथे स्टील उद्योग तसेच महापे येथे सेमी कंडक्टर या उद्योगांचा यामध्ये समावेश आहे. प्रधानमंत्र्यांच्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आमचे सरकार संपुर्ण योगदान देईल, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
कारागिरांना प्रमाणपत्र, धनादेशाचे वितरण
प्रधानमंत्र्यांनी कळ दाबून अमरावती येथील पीएम मित्र पार्क, राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्रांचे उद्घाटन केले तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा शुभारंभ केला. पीएम विश्वकर्मा योजनेच्या 1 लाख कारागिरांना ओळखपत्र व प्रमाणपत्र तसेच 1 लाख कारागिरांना डिजिटल कौशल्य प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. देशभरातील 75 हजार कारागिरांना कर्जाचे वितरण देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय डाक विभागाने काढलेल्या विशेष डाक तिकिटाचे अनावरण प्रधानमंत्र्यांनी केले.
सुरुवातीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चरख्याची प्रतिकृती तर केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनी ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृती भेट देऊन प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले. लघु, सुक्ष्म व मध्यम विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या परंपरागत ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या विविध आकर्षक कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ.पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुणावार, माजी खासदार रामदास तडस, प्रभारी विभागीय आयुक्त डॅा.विपीन ईटनकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आदींची उपस्थिती होती.
0000









 विशेष वृत्त क्र. 853 

कौशल्यातून करिअर घडविण्यासाठी

विद्यार्थ्यांनी केंद्राचा उपयोग घ्यावा : अभिजीत राऊत

 

·   नांदेडमध्ये 28 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ

 

नांदेड दि 20 सप्टेंबर : देशातील पारंपारिक कौशल्याला विकसित करण्यासाठी केंद्र शासन विश्वकर्मा योजनेद्वारे प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात 28 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ होत असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य आणखी प्रभावी व आधुनिक करण्यासाठी करावा, असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले.


वर्धा येथील राष्ट्रीय कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये याचवेळी स्थानिक स्तरावर शुभारंभ करण्यात आला. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश होता.

 

सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, नाविन्यता उपक्रम विभाग व नांदेड येथील एमजीएम इंजीनियरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला एमजीएम इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. देशात कौशल्य विकास संदर्भात अधिक लक्ष घातले जात असून तातडीच्या रोजगाराची उपलब्धता या मार्फत होणार आहे. त्यामुळे रोजगार निर्माण करणारे कौशल्य हस्तगत करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह एमजीएम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या संचालक गीता लाटकर, एमजीएम कॉलेज ऑफ कॉम्पुटर अँड आयटीचे प्राचार्य डॉ. एस. एल. कोटगिरे, प्रशिक्षण अधिकारी प्रसाद तीतरे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी रेणुका तम्मलवार आदींची उपस्थिती होती.

00000








वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...