Thursday, June 13, 2024

 वृत्त क्र. 475 

सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे प्रलंबित आहेत का ?

सुप्रीम कोर्टाच्या विशेष लोक अदालतीत सहभागी व्हा

 

नांदेड दि. 13 :- नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या खटल्यांना निकाली काढण्याची एक संधी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना मिळत आहे. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे 29 जुलै ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन विधी विभागाने केले आहे.

 

तडजोडीची तयारी हवी

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडच्या सचिवांकडून प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकात या संदर्भातील आवाहन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात 29 ते 30 ऑगस्ट या दरम्यान ही विशेष लोक अदालत होत आहे. या लोक अदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आणि ही प्रकरणे तडजोडीने मिटविण्याची ज्यांची इच्छा आहे, अशाच प्रकरणाचा या ठिकाणी निपटारा होणार आहे.

 

ऑनलाईन सहभागही शक्य

या लोक अदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने ( ऑनलाईन ) सहभागी होऊ शकतात. नांदेड जिल्ह्यातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोक अदालती मध्ये ठेवण्यासाठी संबंधित वकिलांना कल्पना देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ज्या पक्षकारांना किंवा ज्यांच्या केसेस पेंडिंग आहेत अशा नागरिकांना या संदर्भात अधिक माहिती व मदत हवी असल्यास नांदेड येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सुरेखा कोसमकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे.

 

वेळ व पैशाची बचत

नागरिकांनी 29 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या लोकदालतीचा लाभ घ्यावा, यामुळे साध्या सोप्या पद्धतीने वाद मिटवता येतो. झालेल्या तडजोडीचा निवाडा अंतिम अंमलबजावणी होऊ शकणारा असतो. तसेच यामध्ये वेळेची व पैशाची बचत होते. तडजोड झाल्यास न्यायालयीन शुल्क परत मिळते. त्यामुळे या लोक अदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे.

00000

Tuesday, June 11, 2024

 वृत्त क्र. 474

शासकीय तंत्रनिकेतन येथे पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेस सुरुवात
 
नांदेड, दि. 11 : तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई अंतर्गत राज्यातील पॉलिटेक्निक संस्थामध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. याबाबत सविस्तर माहिती https://poly24.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करणे, अर्ज सादर करणे, अभ्यासक्रमाची निवड करणे इत्यादी बाबीसंबंधी सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील सुविधा केंद्रास भेट द्यावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी केले आहे.
 
प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांद्वारे ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांची पडताळणी व अर्ज भरल्याची निश्चिती करणे यासाठी 25 जुन 2024 ही अंतिम तारीख आहे. इयत्ता दहावीनंतर पॉलिटेक्निकचा डिप्लोमा हा एक उत्तम पर्याय असुन या क्षेत्रातील करीयर व उपलब्ध संधी विषयी संस्थेतील तज्ज्ञ अधिव्याख्यात्यांकडुन विनामुल्य समुपदेशनाचा लाभ घेण्यासाठी संस्थेतील सुविधा केंद्रास भेट द्यावी, असे संस्थेच्या प्राचार्यांनी कळवले आहे.
00000

 वृत्त क्र. 473

मागासवर्गीय कुटुंबाच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे : मिनगिरे
आवश्यकतेनुसार विविध योजनांचा लाभ देणार

नांदेड, दि. 11 : २७ मे रोजी मोरेगाव खालचे येथे झालेल्या दुर्दैवी घटनाक्रमातील क्षतिग्रस्त  कुटुंबाला दुःखाच्या काळात सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला. विविध योजनांचा लाभ देण्यास यापुढेही शासन वचनबद्ध असल्याचे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मीनगिरे यांनी स्पष्ट केले आहे.

तीन मुलींच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी कायदेशीर चौकशी सुरू आहे . तथापि, आवश्यकतेनुसार यापुढेही या कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जाईल. अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांमध्ये शासन भक्कमपणे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहील, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

किनवट तालुक्यातील मौजे मारेगाव खालचे येथे पैनगंगा नदीच्या पात्रात  स्वाती देविदास कांबळे ,पायल देविदास कांबळे तसेच ममता या 3 मुलींचा मृत्यू 27 मे 2024 रोजी झाला. अनुसूचित जाती  जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम-1989, अंतर्गत मयत पिडीतांच्या कुटुंबास देय असलेली अर्थसहाय्याची रक्कम अदा करण्यासाठी समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी 8 जून 2024 रोजी त्यांच्या परीवारातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
 
 तसेच अर्थसहाय्याची रक्कम अदा करण्यासाठी दस्ताऐवज प्राप्त करुन तात्काळ त्यांचे खाती देय रक्कम जमा करण्याचे आश्वासित केले. त्याव्यतिरीक्त दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन उपलब्ध असल्यास शासन निर्णयाप्रमाणे मदत करण्याचे आश्वासित केले. त्यामुळे त्यांच्या परिवारास मोठा दिलासा मिळाला आहे.
0000

Monday, June 10, 2024

वृत्त क्र. 472

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात

शिकाऊ उमेदवारांची नेमणूक 

            नांदेड, दि. 10 :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभाग नांदेड मध्ये सन 2024-25 सत्रासाठी व्यवसायनिहाय वाढीव प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार म्हणुन मेकॅनिक मोटार व्हेईकल 50, डिझेल मेकॅनिक 28, शिट मेटल वर्क्स 10, ॲटो इलेक्ट्रीशियन 8, मेकॅनिक (रेफ्रिजरेशन ॲन्ड एअर कंडीशनर) 4, पेन्टर (जनरल) 2, वेल्डर (गॅस अॅन्ड इलेक्ट्रीक) 2 अशी एकुण 104 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत.

(अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग करीता शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार जागा आरक्षीत आहेत.) त्यासाठी आय.टी.आय. उत्तीर्ण किंवा शिकाऊ उमेदवार नेमणुक करण्यात येणाऱ्या विहीत केलेल्या व्यवसायाचे व्होकेशन अभासक्रम पुर्ण केलेल्या व ॲटो इंजीनिअरिंग टेक्निशियन कोर्स उत्तीर्ण उमेदवारांना www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करावयाचे आहे व नंतर MSRTC DIVISION NANDED या आस्थापनेकरीता ऑनलाईन अप्लाय करुन रा.प. महामंडळाचे विहीत नमुण्यातील छापील अर्ज भरुन सादर करणे आवश्यक आहे.

सदर छापील अर्ज दिनांक 11 ते 20 जून 2024 वेळ 15.00 वाजेपर्यंत शनिवार, रविवार व सुट्टीचा दिवस वगळुन विभाग नियंत्रक यांचे कार्यालय रा.प.नांदेड येथे स्विकारले जातील. सदर अर्जाची किंमत खुल्या प्रवर्गाकरीता 590 रुपये व मागासवर्गीयांसाठी 295 रुपये आहे. सदर शिकाऊ उमेदवार नेमणुक ही नांदेड जिल्ह्याकरीता असुन फक्त नांदेड जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांचीच शिकाऊ उमेदवार म्हणुन नेमणुक करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांचा अर्ज व मागील 3 वर्षापुर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असे विभाग नियंत्रक राज्य परिवहन नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

 वृत्त क्र. 471

खरीप हंगामात शेतकरी, विक्रेत्यांना येणाऱ्या 

अडचणींचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापित

 

            नांदेड, दि. 10 : महाराष्ट्र राज्यात शेती क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामाचे महत्व अनन्यसाधारण आहे. राज्यातील शेतकरी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशावेळी बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत गुणवत्तापुर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी खरिप हंगाम-2024 च्या आढावा सभेत बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्तापुर्ण उपलब्धतेबाबत राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी केलेल्या सुचनेनुसार आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.

सदर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी संपर्काचा व्हॉट्सॲप क्रमांक (केवळ संदेश पाठविण्याकरिता ) 9822446655 उपलब्ध करुन देण्यात आला आहे तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक (तोंडी तक्रार नोंदविण्याकरिता) 18002334000 क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. या सोबतच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेल वर सुद्धा पाठवता, नोंदवता येईल.

संबंधीतांनी, उपरोक्त नमुद व्हॉट्सॲप क्रमांक (9822446655), टोल फ्री भ्रमणध्वनी क्रमांक (18002334000) तसेच ई-मेलवर (controlroom.qc.maharashtra@gmail.com) येणाऱ्या अडचणी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत. साठेबाजी व लिंकींगबाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील द्यावा. सदर माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर पाठवल्यास सुध्दा आपल्या तक्रारींचे निराकरण करणे सोईस्कर होईल. ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी उपरोक्त क्रमांकावर संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात.

शेतक-यांच्या सुविधेसाठी एक भ्रमणध्वणी, एक टोल फ्री क्रमांक व एक ईमेल तक्रार निवारणासाठी समर्पीत केलेले असुन त्यावर शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी 1 जुन ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत नोंदवण्याबाबत आवाहन कृषि आयुक्तालय पुणे  यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 470 

 

अनु.जाती व अनु.जमातीच्या शेतकऱ्यांसाठी

फलोत्पादन योजनांच्या माहितीचा विशेष मेळावा

            नांदेड, दि. 10 : नांदेड येथे कृषि विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत अनु. जाती व अनु. जमाती संवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरावर दिनांक 6 ते 20 जून 2024 या पंधरवाड्यात विशेष मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.

या मेळाव्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या विविध घटकांची माहिती देण्यात येणार आहे. प्रामुख्याने सामूहिक शेततळे, वैयक्तीक शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ, पॅक हाऊस, 20 एचपीच्या आतील छोटे ट्रॅक्टर, पावर टीलर, प्लास्टिक मल्चींग, हरितगृह, शेडनेट हाऊस, शितगृह, रायपनिंग चेंबर इत्यादी घटकांची तसेच ठीबक व तुषार सिंचन बाबत माहिती देण्यात येणार आहे.

जिल्ह्यास अनु. जाती व अनु. जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी लक्षांक उपलब्ध असून लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झालेले आहे. करीता जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

००००

Thursday, June 6, 2024

वृत्त क्र. 468

बियाणे, खते व किटकनाशकांची अनधिकृत विक्री व साठा केल्यास सक्त कारवाई : जिल्हाधिकारी

· खरीप हंगामासाठी कृषी विभागाची तयारी पूर्ण

· शेतकऱ्यांनी एकाच प्रतीच्या बियाणांचा आग्रह धरु नये

· जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या शुभेच्छा

नांदेड दि 6 जून : जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्व तयारी सुरु झाली असून पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे.  जिल्ह्यात खते, बियाणे, किटकनाशके मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने तयारी पूर्ण केली आहे. या अनुषंगाने बाजारात जर बियाणे, खते व किटकनाशके बोगस किंवा अनधिकृत विक्री व साठा केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. 

खरीप हंगाम पूर्व तयारीबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय बेत्तीवार,  तहसिलदार, गटविकास अधिकारी, मोहिम अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती , रासायनिक खत पुरवठा कंपनी प्रतिनिधी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, बियाणे पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

सर्व कृषी केंद्रावर कृषी सहाय्यकांची नेमणूक करावी. जिल्ह्यात कुठेही बियांणाची साठेबाजी व अनधिकृत बियाणाची विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कृषी विभागाला दिल्या. याबाबत जिल्ह्यात भरारी पथकाची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास तात्काळ कारवाई करण्याचे, निर्देश त्यांनी यावेळी दिले.

तसेच शेतकऱ्यांनी एकाच प्रतीच्या वाणाचा आग्रह धरु नये. रासायनिक खतांचा वापर मर्यादित स्वरुपात करावा. तसेच सोयाबीनचे बियाणे घरघुती वापरताना त्यांची उगवण क्षमता तपासून घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.  शेवटी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या शुभेच्छा दिल्या.

सुरवातीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील उपलब्ध निविष्ठा बाबत माहिती सांगितली. सर्वानी सोयाबिन पेरणीबाबत बीबीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी विकास अधिकारी  विजय बेत्तीवार यांनी जिल्ह्यातील उपलब्ध खतसाठा, कंपनीनिहाय कापूस बियाणांची उपलब्धता याबाबत माहिती दिली. जिल्ह्याच्या एकूण मागणीच्या ८० टक्के कापूस बियाणे उपलब्ध असल्याबाबत माहिती दिली.

०००००



इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी चित्रफीत




वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...