Monday, May 20, 2024

वृत्त क्र. 433

कृषी विभागाची जिल्हास्तरीय खरीप पूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न

नांदेड दि. 20 :-  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यावतीने खरीप हंगाम 2024 पूर्व नियोजन करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण व जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. ही खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांच्या अध्यक्षस्थानी संपन्न झाली.

या बैठकीस मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील कीडरोग शास्त्रज्ञ प्रा. कृष्णा अंभोरे, शास्त्रज्ञ व्यंकट शिंदे, नांदेडचे उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, किनवटचे उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार रणवीर, देगलूरचे उपविभागीय कृषी अधिकारी एस.एस.गायकवाड, कृषी विकास अधिकारी विजय बेतीवार यांची उपस्थिती होती.

खरीप हंगामाच्या पूर्वनियोजनासाठी उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या खरीप हंगाम जनजागृती मोहीम-2024 कृषी मार्गदर्शिका या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यांनी केलेल्या खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये कृषी सहायक यांनी खरीप हंगामपूर्व तयारी आणि कृषी विषयक कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावनिहाय आराखड्याचे माध्यमातून नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या कार्यक्रमात गावनिहाय कृषी नियोजन आराखडे तयार करणे, प्रत्येक गावात सोयाबीन बियाण्याचे पेरणीपूर्व उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके घेणे, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून संपूर्ण क्षेत्रावर बियाण्याची बीज प्रक्रिया करूनच पेरणी होईल याची दक्षता घेणे, शंखी गोगलगाय आणि पैसा/वाणू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन इत्यादी कृषी विषयक कामांचा तसेच रुंद वरंबा सरी पद्धतीने व टोकण यंत्राद्वारे बेडवर खरीप पिकांची प्रति कृषी सहाय्यक किमान 100 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे आयोजन करणे, विहित कालावधीत माती नमुने गोळा करणे या कामांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज ऑनलाईन करून घेण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सर्व गावातील शेतकऱ्यांचे व्हाट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून त्यावर कृषी माहितीपर संदेश आणि तांत्रिक मार्गदर्शनाचे युट्युब व्हिडिओ पाठविणेविषयी त्यांनी सुचित केले. तसेच कृषी विषयक खरीप हंगाम पूर्व प्रचार प्रसिद्धीसाठी प्रत्येक उपविभागात प्रचार रथ आणि घडी पत्रिका वाटपाच्या माध्यमातून शेतकरी जागृती करण्याविषयी त्यांनी सूचित केले. तसेच ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा आदी भरडधान्य पिकांचे पेरणी क्षेत्र वाढवावे अशा सूचना दिल्या.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी पीक संरक्षण औषधीवरील खर्च कमी करण्यासाठी पहिल्या तीन फवारणी या 5 टक्के निंबोळी अर्काच्या करणे, ग्राम कृषी विकास समितीमध्ये गाव आराखड्यांना मान्यता घेणे, ऊस पिकाचे पाचट व्यवस्थापनात संबंधित साखर कारखान्यांचा सहभाग घेणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत, कृषी आराखड्यात पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतीचा समावेश करणे इत्यादी मुद्द्यावर मार्गदर्शन केले. तसेच येत्या खरीप हंगामामध्ये मुबलक बियाणे, खते यांची उपलब्धता असून शेतकऱ्यांनी कपाशीच्या विशिष्ट वाणांचा आग्रह टाळण्याविषयी प्रचार प्रसिद्धी करणेबाबत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सूचित केले. तसेच त्यांनी येत्या खरीप हंगामामध्ये गोगलगाय व्यवस्थापन, सोयाबीनवरील पिवळा मोझॅक, तूर पिकावरील मर रोग येवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद व हळद पिकांचे लागवड तंत्रज्ञानाविषयी आणि सुधारित वाणाविषयी माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञ कृष्णा अंभोरे यांनी खरीप हंगामातील प्रमुख पिकावरील कीडरोग व्यवस्थापन सोयाबीन पिकातील शंखी गोगलगाय, पिवळा मोझाक तसेच कापूस पिकातील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनाविषयी सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये मागील वर्षात उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या उपविभागनिहाय निवडक क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांचा विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व ग्रामगीता पुस्तक देवून गौरव करण्यात आला. यामध्ये गित्ते व्ही.बी, गुट्टे एम.एस, दिक्कतवार श्रीमती कदम, गजेवाड बी.बी, जाधव डी.व्ही, मिसाळ रामहरी बाळू, वानखेडे निलेश रामराव, श्रीमती सोनकांबळे सी.जी, गित्ते जे.एस, तिडके एस.एन, वरपडे एस.डी, कावटवाड एस. टी, चटलावार एम.जी. आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक वसंत जारीकोटे यांनी केले, तर आभार उपविभागीय कृषी अधिकारी किनवट राजकुमार रणवीर यांनी मानले.

0000




Friday, May 17, 2024

 वृत्त क्र. 432 

नविन पाच इंटरसेप्टर वाहनांद्वारे रस्ता सुरक्षा विषयी प्रबोधन

 

·     रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मदत

 

नांदेड दि. 17 :- नांदेड जिल्ह्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नविन 5 इंटरसेप्टर वाहन दाखल झाली आहेत. यामुळे इंटरसेप्टर वाहनांची संख्या आता एकुण 7 झाली आहे. या वाहनामध्ये वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर व हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी स्पीडगन, दारूपिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी ब्रेथ अॅनलायझर, ब्लॅक फिल्म बसविलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी टिंट मीटर इत्यादी अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. याद्वारे प्रत्येक तालुक्यात ही कारवाई करण्यात येणार आहे.

 

जिल्ह्यातील नागरिकांनी वाहन चालवितांना रस्ता वाहतुकीच्या नियमांचे व मोटार वाहन कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे. आपले वाहन सुस्थितीत ठेवावे तसेच वाहनांचे कागदपत्रे जसे विमा प्रमाणपत्रे, पीयुसी, योग्यता प्रमाणपत्र, कर पावती इत्यादी अद्यावत ठेवावीत.

 

नांदेड जिल्हयात दळणवळणचा विचार करता रस्त्याद्वारे होणाऱ्या वाहतुकीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात दरवर्षी किमान 350 ते 400 नागरिक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. यामध्ये प्रामुख्याने वाहतूक नियमांचे पालन न करणे, हेल्मेट व सिटबेल्टचा वापर न करणे, दारुपिऊन वाहन चालविणे, लेनची शीस्त न पाळणे, वेगमर्यादचे उल्लंघन करणे आदी कारणे दिसून येतात.

 

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक-चालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व वाहनधारक-चालकांनी याची नोंद घेऊन परिवहन विभागास सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

0000

वृत्त क्र. 431

लालवंडी येथे विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर

·     लालवंडी गावात 3 आरोग्य पथके तैनात

·    50 जणांना उपचार करुन घरी सोडले तर 61 रुग्णांवर उपचार सुरु

नांदेड दि. 17 :- नायगाव तालुक्यातील मौजे लालवंडी येथे 15 मे रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजेदरम्यान दिगंबर टोपेवाड यांच्या शेतात महाप्रसाद खाल्यानंतर जवळपास 200 पैकी 111 भाविकांना 16 मे रोजीच्या पहाटे 3 वाजेच्या दरम्यान अन्न विषबाधा झाल्याचे प्राथमिक अहवालात आढळले. या विषबाधेमुळे सद्यस्थितीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे 48 रुग्ण उपचार घेत असून 50 रुग्णांना उपचार करुन घरी सोडले आहे. तसेच जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे संदर्भित करण्यात आलेल्या 13 रुग्णांवर उपचार सुरु असून सर्व रुग्णांची प्रकृती ही स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

याकामी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन, वैद्यकीय महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग हे समन्वयाने व तत्परतेने कार्यरत आहेत. महाप्रसादामध्ये शेतात तयार करण्यात आलेल्या भात, वरण , खीर हे अन्न पदार्थासमवेत वेगवेगळ्या 8 कुटुंबाने तयार करून एकत्रित करण्यात आलेले अंबील हे पदार्थ सेवन केल्याचे समजते. महाप्रसादात हे अन्नपदार्थ खाल्याने रुग्णांना मळमळ, उलटी, संडास व पोटदुखी अशी लक्षणे दिसून आली. सुरुवातीस पहाटे 3.30 पासून कालपर्यंत एकूण 111 रुग्ण ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी 29 रुग्णांना स्थानिक पातळीवर औषधोपचार करण्यात आलेला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. 

ग्रामीण रुग्णालय नायगाव येथून एकूण 13 रुग्ण हे श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे औषधोपचारासाठी संदर्भित करण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीमध्ये ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे 48 रुग्ण उपचार घेत असून 50 रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे. सदर रुग्णांना नायगाव तालुक्याच्या मौजे लालवंडी या गावातून रुग्णालयात उपचारासाठी आणण्यासाठी टोल फ्री 108 क्रमांकाच्या 4 रुग्णवाहिका व इतर प्रवासी वाहतूक वाहनांचा वापर करण्यात आला. रुग्णांच्या औषधोपचारासाठी मुबलक औषधींचा साठा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा रुग्णालय औषधी भांडार, जिल्हा परिषद नांदेड औषधी भांडार येथून ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे तात्काळ औषधी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच रुग्णांच्या पुढील तपासण्यासाठी अन्न, पाणी आणि उलटीचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत या गावामध्ये 03 आरोग्य पथके हे औषधोपचार, सर्वेक्षण यासाठी कार्यरत करण्यात आलेली आहेत. या बाबीची सखोल चौकशी करण्यासाठी प्रशासनाकडून रॅपीड रिस्पॉन्स (Rapid response) पथक गठीत करण्यात आलेले आहे.

0000

वृत्त क्र. 430

 सारथी प्रणाली 18 मेपर्यंत बंद

नांदेड दि. 17 :- अनुज्ञप्ती (लायसन्स) व अनुज्ञप्ती विषयक सर्व कामकाजासाठी परिवहन विभागाच्या सारथी 4. 0 या प्रणालीद्वारे केले जाते. या प्रणालीवर अर्ज व शासकीय शुल्क भरण्याची कार्यवाही केली जाते. 

परंतु सद्या सारथी प्रणालीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या सर्व्हरच्या देखभाल/दुरुस्तीचे काम राष्ट्रीय सूचना केंद्राद्वारे सुरु आहे. सदर दुरुस्तीचे कामकाज सुरु असल्यामुळे 18 मे 2024 च्या सकाळी 10 वाजेपर्यत सारथी प्रणाली बंद राहील, यांची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

0000 

वृत्त क्र. 429

शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा उत्कृष्ट व रास्त भावात

मिळण्यासाठी जिल्ह्यात 17 भरारी पथकांची नियुक्ती

नांदेड दि. 17 :- खरीप हंगाम लवकरच सुरु होत असुन, शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे, खते व किटकनाशके मिळण्याकरीता विक्रेते व उत्पादक यांच्या नियमित तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हयात जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुकास्तरावर एक असे एकुण 17 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही निविष्ठा विक्रेत्यांनी गैरव्यवहार, साठेबाजी, ज्यादा दराने विक्री, बोगस खते बियाणे विक्री करु नये, असे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एस. बऱ्हाटे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदी करताना काही अडचणी येत असतील किंवा विक्रेत्यांकडुन अडवणुक होत असेल तर तात्काळ संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

खरीप हंगामामध्ये कृषिसेवा केंद्र चालक किंवा खाजगी एजंन्ट मार्फत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे खते / बियाणे व किटकनाशके विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी कृषि विभागाकडुन कृषि सेवा केंद्राची नियमित तपासणी करण्यात येते. सर्व निविष्ठांचे व्यवस्थीत वाटप व चांगल्या प्रतीच्या निविष्ठा शेतकऱ्यांना मिळतील, त्यांची निविष्ठासाठी अडवणुक होणार नाही यासाठी भरारी पथक काम करणार आहे.

त्याचबरोबर कृषि निविष्ठा विक्रीमध्ये गैरव्यवहार, साठेबाजी, ज्यादा दराने विक्री, असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास उत्पादक, विक्रेत्यांचे परवाने निलंबित किंवा रद्य करण्यात येतील. गैरव्यवहाराचे स्वरुप गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा बोगस बियाणे, खते व किटकनाशकांची विक्री केल्यास संबंधिताविरुध्द भरारी पथकामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर भरारी पथकामध्ये तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती, निरीक्षक वजन व मापे व मंडळ कृषि अधिकारी यांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकात कृषि विकास अधिकारी, मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, वजन मापे निरीक्षक यांचा समावेश आहे.

मागील वर्षात कृषि विभागामार्फत नांदेड जिल्हयात बोगस खते विक्री केल्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बियाण्यांची अनधिकृत विक्री केल्यामुळे एका बियाणे उत्पादकावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच अप्रमाणीत बियाण्यांची विक्री केल्यामुळे उत्पादक व कृषि सेवा केंद्र चालक यांच्या विरुध्द 68 न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. येणाऱ्या खरीप हंगामामध्ये मोहिम राबवुन कृषि निविष्ठा विक्रेते व उत्पादकांच्या तपासण्या करण्यात येणार असुन त्यामध्ये अनियमितता आढळुन आल्यास संबंधितांचा परवाना निलंबित अथवा रद्य करण्यात येईल असेही कृषि विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वृत्त क्र. 428

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या  पात्र परिसरात कलम 144  

नांदेड दि. 17 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 मे 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जून 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 मे 2024  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जून 2024 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

Thursday, May 16, 2024

वृत्त क्र. 427

मान्‍सुन पूर्व कालावधीत दुर्घटना टाळण्यासाठी

जाहिरात फलकाची तपासणी करण्याचे आदेश

नांदेड दि. 17 :- घाटकोपर, मुंबई येथे 13 मे रोजी जाहिरात फलक कोसळल्‍याची दुर्घटना घडलेली आहे. यात जीवीत व वित्तहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जाहिरात फलकामुळे अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शहरी व ग्रामीण भागातील यंत्रणाना दिले आहेत.

शहरी भागातील व महामार्गावरील लावण्‍यात आलेल्‍या जाहिरात फलकांचे (होर्डींग) रचनात्‍मक (स्ट्रक्चरल ऑडीट) तपासणी करावेत. तपासणीअंती आढळून आलेले अवैध जाहिरात फलक निष्कासनाची कार्यवाही तात्काळ करुन संबंधीतावर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्‍यासाठी व दक्षतेची बाब म्‍हणून नैसर्गिक आपत्‍ती समयी जाहि‍रात फलकाच्‍या आजू-बाजूला न थांबण्‍याबाबत सुचनाही नागरीकांना दिल्या आहेत. घाटकोपर, मुंबई येथे मोठी दुर्घटना घडल्‍यामुळे जीवीत व वित्तहानी झाली असून या अगोदरही पुणे शहरामध्‍ये 6 ऑक्टोबर 2018 रोजी अशीच दुर्घटना घडलेली होती. त्‍यामध्‍येही जीवीत व वित्तहानी झालेली होती. अशा स्‍वरुपाची घटना मान्‍सून काळात वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसामुळे होऊ शकतात. अशा दुर्घटना घडू नये यासाठी शासनाच्‍या सुचनेनुसार शहरी भागातील व महामार्गावरील लावण्‍यात आलेल्‍या जाहिरात फलकांचे  रचनात्‍मक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 0000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...