Wednesday, May 8, 2024

  वृत्त क्र. 411

अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार  

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते 60 वर्षापर्यंत निवाऱ्याची आवश्यकता असणाऱ्या निराधार, विधवा, कुमारी माता, परित्यक्ता, अत्याचारीत महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुर्नवसनाची व्यवस्था केली जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. येथे आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व मदत दिली जाते.  

तसेच नियमित आरोग्य तपासणी केली जाते. 18 वर्षापुढील महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी, पुनर्वसनाच्यादृष्टिने त्यांच्या विवाहकरीता संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. येथे शिक्षण व प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जातो. समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी संकटकाळी चुकीच्या मार्गाने न जाता समस्येचे निराकरण होईपर्यंत अल्प कालावधीसाठी या संस्थेत दाखल होण्याचा लाभ घ्यावा. प्रवेशाकरीता फोटोसह ओळखपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कामकाजाच्या दिवशी दुपारी 1 ते 3 यावेळेत अधिक्षक माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) हॉटेल भाईजी पॅलेसच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डाणपुल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 02462-233044 येथे संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय महिला राज्यगृहचे अधीक्षक वर्ग-2 एस. एम. पुजलवार यांनी केले आहे.

00000

Tuesday, May 7, 2024

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

 वृत्त क्र. 410

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

नांदेड दि. 7 :- सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप्त रेती साठ्याचा सहाशे रुपये दराने लिलाव 8 मे 2024 रोजी सकाळी 11 तहसिल कार्यालय, नायगाव येथे करण्यात येणार आहे.

जप्त रेती साठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. लिलावाच्या अटी व शर्ती तहसिल कार्यालय, नायगाव (खै.) च्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेल्या आहेत. तरी इच्छूकांनी लिलावात सहभाग घ्यावा, असे तहसिलदार नायगांव (खै.) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

Monday, May 6, 2024

 वृत्त क्र. 409 

वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह,

ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

 

नांदेड दि. 6 मे :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिनांक 6 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 6 व 7 मे 2024 हे दोन दिवस येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 6 व 7 मे 2024 ह्या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

 

या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 

या गोष्टी करु नका : आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

000

 वृत्त क्र. 408

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत  


नांदेड दि. 6 मे :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी मे 2024 महिन्याच्या दुसऱ्या मंगळवार 7 मे 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

 






 लातूर लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या सात मे रोजी होत आहे. लातूर लोकसभा क्षेत्रामध्ये नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा क्षेत्र समाविष्ट आहे.आज पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रांवर सकाळी रवाना झाल्या. या संदर्भातील काही छायाचित्र व चित्रफिती माध्यम प्रतिनिधींच्या संदर्भासाठी..



















 लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 - निवडणुकीच्या कर्तव्यावर, मतदान पथकातील अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा संदेश...



केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...