Thursday, May 2, 2024

वृत्त क्र. 398

 

पुढचा दीड महिना जलसंधारणाच्या कामांची मोहीम राबवा : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


·         खरीप पूर्व हंगामासाठी प्रशासन सज्ज ; आवश्यक प्रमाणात बियाणे,खते उपलब्ध

·         यावर्षीही भरारी पथक बोगस बियाण्यांवर ठेवणार निगराणी

·         बियाण्यांची सर्व माहिती देणारे पत्रक दर्शनी लावण्याचे निर्देश

 

नांदेड दि. 2 मे :- नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी मान्सूनची सुरुवात दहा दिवस उशिरा होण्याची शक्यता आहे.खरीप पूर्व हंगामासाठी प्रशासन सज्ज झाले असून आवश्यक प्रमाणात खते बियाण्यांची उपलब्धता करण्यात येत आहे. तथापि, पुढील दीड महिना जलसंधारणाची कामे राबविण्यात यावी. यावर्षी मोठ्या प्रमाणात जलसाठे निर्माण होतील,यासाठी नियोजन करण्याचे, निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भावनांमध्ये आज खरीप हंगाम 2024 पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीषक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विकास अधिकारी विजय बेतिवार, यांच्यासह कृषी, जलसंधारण,पणन, खते, बियाणे, कृषी आधारित व पूरक उद्योग, पशुसंवर्धन, मत्स, दुग्ध व्यवसाय, रेशीम व अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

 

आजच्या बैठकीमध्ये खरीप हंगामा संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा आढावा सादर करण्यात आला.आचारसंहितेमुळे या बैठकीला लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते. तथापि, गेल्यावेळी लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाल्याचे सभेमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी स्पष्ट केले.

 

जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा राहणार आहे. जवळपास 7 लक्ष 74 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची लागवड होणार असून ऊस, हळद,केळी व इतर भाजीपाला फळपीके लक्षात घेता 8 लक्ष 38 हजार 5OO क्षेत्र लागवडीखाली येणार आहे. सोयाबीन पाठोपाठ कापूस,तूर,ज्वारी पिकाची लागवड केली जाणार आहे.हवामान खात्याने यावर्षी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.जून महिन्यात मध्यापर्यंत पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृगाच्या सुरुवातीला 7 जून पासून पेरणी न करता पंधरा दिवस उशिरा पेरणी करावी अशी सूचना कृषी विभागाने केली आहे.

 

या बैठकीला कृषी केंद्राच्या प्रतिनिधींनाही बोलवण्यात आले होते. कोणत्याही परिस्थितीत बोगस बियाणे शेतकऱ्यांपर्यंत जाणार नाही, याची काळजी घेण्याची ताकीद आज या बैठकीत देण्यात आली.जे बियाणे विकण्यात येणार आहेत, त्याबाबतची संपूर्ण माहिती दर्शनी भागात लावण्यात यावी. नफेखोरीसाठी कोणत्याही अनोळखी बियाण्याची विक्री जिल्ह्यात होणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच भरारी पथकांनी आकस्मिक तपासणी करावी, असे निर्देशही आजच्या बैठकीत देण्यात आले.

 

शेतकऱ्यांनी कोणत्याही कृषी केंद्राच्या अनोळखी वाणाच्या संदर्भात कृषी विभागाकडून खातरजमा केल्याशिवाय नवीन वाणाचे बियाणे घेऊ नये, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती ही आजच्या बैठकीत देण्यात आली.

जिल्ह्यात बियाण्यांसोबतच खतांची, कीटकनाशकांची उपलब्धता आवश्यक प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी खूप साठा करण्याची गरज नाही. यासंदर्भात ऐन वेळेवर अधिक खत पुरवठा लागल्यास रेल्वेच्या दळणवळणाच्या सर्व सुविधा उपलब्ध राहतील, याबाबतची तपासणी आजच्या बैठकीत करण्यात आली.

 

जिल्ह्यामध्ये गुण नियंत्रक निरीक्षकांची एकूण संख्या 44 आहे. जिल्हास्तरावर एक भरारी पथक, तर तालुकास्तरावर 16 भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यावर १६ तालुका कृषी अधिकारी, तसेच १६ पंचायत समिती कार्यालयातून निगराणी असणार आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यामध्ये धडक कारवाई करण्यात आली होती 12 बियाणे विक्रेते, 16 रासायनिक खते विक्रेते, पाच कीटकनाशक विक्रेते अशा एकूण 33 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले होते. दहा जणांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. 51 लोकांवर विक्री बंद आदेश बजावण्यात आला, तर दोन लोकांवर पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी विभागामार्फत येणाऱ्या वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा सादर केला.

 

जलसंधारणाची कामे राबवा...

मराठवाड्याच्या अन्य जिल्ह्याप्रमाणे यावर्षी देखील नांदेडमध्ये काही गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पावसाचे पाणी न अडविणे यामुळे आपले जलस्त्रोत उन्हाळ्यात कोरडे होतात. त्यामुळे पुढील दीड महिन्यात लोकसहभागातून गावतलाव खोलीकरण करण्यावर भर द्यावा.  तसेच आचारसंहितेपूर्वी सुरू झालेली नाला रुंदीकरण, खोलीकरण ही सर्व कामे पूर्ण करावी. लोकसहभागाच्या कामाला आचारसंहितेची अडचण नाही. लोकसहभागातून जास्तीत जास्त कामे 15 जून पूर्वी पूर्ण करावीत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

00000





Tuesday, April 30, 2024

 वृत्त क्र. 397

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65 वा दिन उत्साहात साजरा

·         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण

·         उत्कृष्ठ कामगिरी बाबत कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव 

नांदेड दि. 1 :- महाराष्ट्र राष्ट्र स्थापनेच्या 65 व्या दिनाचा मुख्य शासकीय समारोह मोठ्या उत्साहात वजीराबाद येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर सकाळी 8 वाजता साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी समस्त जिल्हावाशियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,  अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, श्रीमती किर्तीका अन्य वरिष्ठ अधिकारी आणि जेष्ठ सन्माननीय नागरिक तसेच स्वातंत्र सैनिक व त्यांचे कुटुंबियाची उपस्थिती होती. 

 

ध्वजारोहण व ध्वजवंदनानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवड झालेला आदर्श तलाठी पुरस्कार उमाकांत दत्तराम भांगे यांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व 5 हजार रुपयाचा धनादेश आणि प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे जिल्हा अग्निशामक दलाचे अधिकारी, कर्मचारी  ज्ञानेश्वर सुर्यवंशी व निलेश निवृत्ती काबंळे यांना उत्कृष्ठ कामगिरी केल्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. 

 

जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह राज्यगीत सादर केले.  यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना व राष्ट्रगीतानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संचलन करणाऱ्या पथकाचे पोलीस वाहनातून निरीक्षक केले. परेड कमांडर संकेत सतीश गोसावी व सेकंड परेड कमांडर विजयकुमार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनात केंद्रीय राखीव पोलीस दल, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, दंगा नियंत्रण पथक, गृहरक्षक दलाचे पुरूष व महिला पथक, राष्ट्रीय छात्रसेना,  पोलीस बॅन्ड पथक, डॉग स्काड,  मार्क्स मॅन वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वज्र वाहन, बुलेट रायडर, मिनी रेस्क्यू फायर टेंडर, अग्नीशामक वाहन, 108 रुग्णवहिका यांचा पथसंचलनात सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले. तत्पूर्वी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय व मनपा आयुक्त कार्यालयात आज ध्वजारोहण संपन्न झाले.

 

तसेच पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडून जाहिर केलेले पुरस्कार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आज सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. दिलीप पुनमचंद जाधव, दहशतवाद विरोधी पथक नांदेड, पंढरीनाथ मुदीराज, वाचक शाखा, विक्रम बालाजीराव वाकडे, ग्रामीण पोलीस स्टेशन, संतोष विश्वनाथ सोनसळे, पोलीस मुख्यालय नांदेड, मो. असलम मो. हनिफ, एटीबी नांदेड, सिद्धार्थ पुरभाजी हटकर, नागरी हक्क संरक्षण नांदेड, दिनेश पारप्पा वसमतकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ  देवून सन्मानित करण्यात आले.

000000












वृत्त क्र. 396

 जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता,

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

नांदेड दि. 30 :- जिल्ह्यात आज ३० एप्रिल  व उद्या 1 मे 2024 रोजी काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.  

उन्हाचा कडाका वाढल्याने प्रादेशिक हवामान विभागाकडून जिल्ह्यात आज ३० एप्रिल व उद्या 1 मे 2024 रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उष्माघातासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी व उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

उष्णतेच्या लाटेदरम्यान लहान मुलं व वृद्ध यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घेताना या काळात सैल, हलके, फिक्या रंगाचे आणि सुती कपडे परिधान करावेत. हलका आहार घ्यावा, फळे आणि सलाद सारखे पचायला हलके असणारे अन्न खावे.  पुरेसे पाणी प्या. उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल/छत्री/टोपी/बूट/चप्पल घालूनच घराबाहेर पडावे. प्रवास करताना पिण्याच्या पाण्याची बाटली आपल्याजवळ बाळगावी. शक्य असल्यास थंड पाण्याने आंघोळ करावी.  घराबाहेरील उपक्रम/मैदानी उपक्रमा दरम्यान थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घेत चला व विश्रांतीची वारंवारता वाढवावी.

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उष्माघाताची पुढील प्रमाणे लक्षणे आढळल्यास काळजी घ्यावी. डोकेदुखी, ताप, उलट्या, जास्त घाम येणे आणि बेशुध्द पडणे, अशक्तपणा जाणवणे, शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी झोपवा, व्यक्तीचे कपडे सैल करा. त्याला द्रव पदार्थ जसे पाणी, ओ.आर.एस., फळांचा रस यापैकी एक पाजा. चहा किंवा कॉफी देण्याचे टाळा. तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवा. बाधित व्यक्तीला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा आणि वैद्यकीय सल्ला घ्या. अतिकष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर नसेल तेव्हाच अशी कामे करा. नागरिकांनी वरील काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

0000

वृत्त क्र. 395

 वाढत्या तापमानात उष्माघातापासून

बचावासाठी आरोग्याकडे लक्ष द्या : जिल्हा आरोग्य अधिकारी

नांदेड दि. 29 :- मागील काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. राष्ट्रीय हवामान विभागाकडे ३ एप्रिल 2024 रोजी देशातील पश्चिम राजस्थान, उत्तर पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तर गुजरात व मराठवाड्यात सर्वाधिक तापमानाची ४१ ते ४३°C नोंद झाल्याचे आढळून आले आहे. तसेच अकोला येथे ४४°C ही देशातील सर्वाधिक तापमाणाची नोंद करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या पुढच्या पाच दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये सुध्दा तापमान वाढ कायम राहण्याचे संकेत आहेत. नागरिकांमध्ये तापमानवाढ, उष्णतेची लाट याबाबत जागरुकता निर्माण होणे गरजेचे असून, यासाठी सर्वसामान्य लोकांना संभाव्य तापमानवाढीचे संकेत लक्षात यावेत यासाठी कलर कोडींगचा वापर हवामान विभागाकडून केला जातो.

 उदा. पांढरा रंग सर्वसामान्य दिवस (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा कमी तापमान), पिवळा अलर्ट उष्ण दिवस (जवळपास नेहमीच्या कमाल तापमानाएवढे तापमान), केशरी अलर्ट उष्णतेची मध्यम स्वरुपाची लाट (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा 4 ते 5 डिग्री सेल्सियस जास्त तापमान), लाल अलर्ट अत्यंत उष्ण दिवस (नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा 6 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान) उष्माघात होऊ नये यासाठी प्रत्येकाने जागरूक राहीले पाहीजे. उन्हाळयामध्ये उष्माघाताने रुग्णांवर उपाययोजना करण्यासाठी व मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, आरोग्य संस्थांमध्ये उष्माघात उपचार कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेऊन उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एम. शिंदे यांनी केले आहे.

उष्माघात होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत :-

उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजूरीची कामे फार वेळ करणे, कारखान्याच्या वॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपडयांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उप्ततेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबध येण्याने उष्माघात होतो.

उष्माघातामध्ये पुढील लक्षणे दिसून येतात :-

थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भुक न लागणे, चक्कर, येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना येणे अथवा पेटके येणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बैचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी.

उष्माघातामध्ये अतिजोखमीचे घटक खालील प्रमाणे आहेत :-

65 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती, 1 वर्षाखालील व 1 ते 5 वयोगटातील मुले, गरोदर माता, मधुमेह व हृदयविकार तसेच अल्कोहोलीक व्यक्ती, अतिउष्ण वात्तावरणामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती. 

उष्माघात होऊ नये या करीता काय करावे –

तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/टोपी, बुट व चपलांचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा, शरीरातील पाण्याचे प्रमाणे कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबूपाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसल्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात, पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे, कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, सुर्य प्रकाशाचा थेट सबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे, पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा, गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घ्यावी, रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरीता शेड उभारावेत, जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.

उष्माघात होऊ नये या करीता काय करु नये

लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.

प्रतिबंधक उपाय-

वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्णता शोषुन घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे) वापरु नयेत, सैल पांढ-या रंगांचे कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे. सरबत प्यावे. अधुन मधुन उन्हामध्ये काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी. वरील लक्षणे सुरु होताच ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरु करावा. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपकरणे, यांचा वापर करावा.

तालुकास्तरावरील व प्रा.आ.केंद्रावरील उष्माघात नियंत्रण कक्ष:

जिल्हयात एकुण 14 ग्रामीण रुग्णालये व 6 उपजिल्हा रुग्णालय व तसेच जिल्हयात एकुण 68 प्राथमिक आरोग्य केंद्र असुन एकुण 379 उपकेंद्र आहेत. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्रा.आ.केंद्र स्तरावर उष्माघात नियत्रंण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

उपचार-

रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावे अथवा वातानुकूलित खोलीत ठेवावे. रुग्णांच्या शरीराचे तापमानात खाली आणण्याचा दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी. रुग्णांच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात.

0000

Monday, April 29, 2024

 वृत्त क्र. 394

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई 

·  ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 29 :- राष्ट्रीय कार्यक्रम,  महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

 

दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. 

 

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

00000

 वृत्त क्र. 393

पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनाचा 1 मे रोजी सकाळी शासकीय समारंभ

नांदेड दि. 29 :- महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिवस समारंभ बुधवार 1 मे 2024 रोजी वजीराबाद पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सकाळी 8 वाजता राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 पुर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित करावेत. सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कृपया बँग सोबत आणू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही केले आहे.

महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिवस समारंभ 1 मे 2024 रोजी साजरा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे 25 एप्रिल 2024 रोजी परिपत्रक निर्गमित झाले आहे. या परिपत्रकात नमूद केल्यानुसार सर्व विभाग प्रमुखांनी कार्यक्रमाचे आयोजन करावे. तसेच ध्वजारोहण व्यवस्थीतरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला रंगीत तालीम घ्यावी. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या 2 जानेवारी 2024 रोजीच्या पत्रान्वये महत्वाचे दिवस साजरा करण्यासंदर्भात आदर्श आचारसंहिते बाबत दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविले आहे.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...