Monday, December 4, 2023

 लिंबगाव ते नाळेश्वर मार्गावरील वाहतूकीस प्रतिबंध

·         पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना निर्गमीत 

 

नांदेड, (जिमाका) दि. 4 :-  लिंबगाव ते नाळेश्वर या रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम करावयाचे असल्यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध केला आहे.  प्रतिबंध  करण्यात आलेल्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे.  

लिंबगाव ते नाळेश्वर रस्ता प्रजिमा 22 या प्रतिबंध करण्यात आलेल्या मार्गाऐवजी वाहने नाळेश्वर-वाघी-सायाळ रस्ता (प्रजिमा-25) या पर्यायी मार्गाने ये-जा करतील. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित विभागाने उपाययोजना करुन 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2023 पर्यत नमूद केलेल्या नाळेश्वर-वाघी-सायाळ रस्ता (प्रजिमा-25) या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता दिली आहे.

00000

 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांनी

मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घ्यावा 

नांदेड (जिमाका), दि. 4 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनाचा पुरवठा करणे ही योजना सुरू केली. नांदेड जिल्ह्यातील इच्छुक पात्र बचतगटांनी http://mini.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. त्याची सत्यप्रत 15 डिसेंबर 2023 पर्यंत समाज कल्याण नांदेड यांच्याकडे सादर करावीअसे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

एमएसएमई क्षेत्र व शासनाची धोरणे व उपक्रम

याबाबत 6 डिसेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 4 :- गुंतवणूक वृध्दीव्यवसाय सुलभीकरणनिर्यातएक जिल्हा एक उत्पादन व एमएसएमई क्षेत्राबाबत उद्योजकांना माहिती व्हावी. तसेच राज्य व केंद्र सरकारची धोरणे व उपक्रमाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत डिसेंबर 2023 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे अध्यक्षतेखाली हॉटेल चंद्रलोकमहाराणा प्रताप चौकनांदेड येथे सकाळी 9.30 वा. आयोजित करण्यात आलेली आहे.

या कार्यशाळेसाठी जिल्हयातील सर्व औद्योगिक संघटनानामांकित उद्योजकउद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभाग व संस्था यांनी उपस्थित राहावेअसे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या कार्यशाळेचा उद्देश हा नांदेड जिल्हयातील उद्योजकांचे उत्पादन जागतिक बाजारात नेणे हा आहे. तसेच स्थानिक उत्पादनांची गुणवत्ता वाढविणेनिर्यात प्रक्रियाखरेदीदार आणि विक्रेते शोधणेनिर्यात कर्ज आणि अनुदान योजनापॅकिंग व ब्रॅडींगआवश्यक चाचण्या इ. विषयांवर या कार्यशाळेत चर्चा होणार आहे.

या कार्यशाळेचे सीडीबीआयआयडीबीआयकॅपिटल हे मुख्य प्रायोजक आहेत. याशिवाय उद्योग संचालनालयमुंबई अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र नांदेड व इतर निगडीत विभागाचे संबंधित अधिकारीतज्ञ मान्यवर कार्यशाळेत उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील औद्योगिक संघटनानिर्यातदारनामांकित उद्योजकउद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभागमहिला स्वयं सहाय्यता बचत गटाचे सदस्य निर्यातीशी संबंधीत अधिकारी व केंद्र व राज्य शासनाचा अनुदान योजनेचा लाभ घेतलेल्या यशस्वी उद्योजक यांचा सहभाग राहणार आहेअसे जिल्हा उद्योग केंद्राने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

दिनांक 3 डिसेंबर 2023

हक्काच्या लाभासाठी विश्वासाने पुढे या

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·   जिल्हा परिषदेत जागतिक दिव्यांग दिन संपन्न


नांदेड (जिमाका) दि. 3 :- दिव्यांगावर मात करुन आत्मविश्वासाने उभे राहण्याची जिद्द सर्वच दिव्यांग व्यक्ती करतात. दिव्यांगांनाही विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र विभाग निर्माण केला असून त्यांनाही समान संधी, संरक्षण आणि हक्क देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध आहे. दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या हक्काच्या योजनांसाठी आत्मविश्वासाने पुढे यावे. आपल्याशी संपर्क साधण्यासाठी शासन दिव्यांगाच्या दारी ही अभिनव योजना आपण हाती घेतल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.  

जागतिक दिव्यांग दिन सोहळा व दिव्यांग मतदार नोंदणी उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात केले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जजमनोविकार तज्ञ डॉ. दि.भा. जोशीवाचा उपचार तज्ञ डॉ. क्षितीज निर्मलजिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवारजिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार व जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.  

 

आपल्या हक्कासमवेत मतदानाचे पवित्र कर्तव्य प्रत्येक पात्र व्यक्तीला बजावता यावे यासाठी व्यापक प्रमाणात मतदार नोंदणी अभियान सर्वत्र सुरु आहे. यासाठी ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांच्यापर्यत पोहोचून त्यांना मतदान ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नरत आहे. शासकीय योजना व इतर बाबींचे संनियंत्रण अधिक सुकर व्हावे, पारदर्शकता वाढावी यादृष्टीने दिव्यांग ॲपची निर्मिती केली आहे. यात ऑनलाईन माहिती भरण्यासाठी दिव्यांग संघटनानी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

 दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रत्येकाजवळ युडीआयडी कार्ड हे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीसमवेत मानसिक आजार असलेल्या व्यक्तींनाही समान न्यायाची हमी, त्यांच्या अधिकाराचे संरक्षण हे कायद्याने बहाल केले आहे. एखाद्या दिव्यांग व्यक्तीवर जर कुठे अन्याय होत असेल तर त्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण योग्य ते सहाय्य करण्यासाठी तत्पर आहे. आपल्या अधिकारांना ओळखून शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींनी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज यांनी केले.

 

दिव्यांगत्वाची अनेक कारणे आहेत. बरीचशी कारणे ही विज्ञानानी स्पष्ट केली आहेत. एका गोत्रात (जवळच्या नातेसंबंधात) लग्न न करणे हा त्यावरचा पर्याय आहे. अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. याही पलिकडे जे दिव्यांग बालक आहेत त्यांच्यावर वेळीच उपचार करण्याऐवजी अंधश्रध्दा ना खतपाणी घालतात. यातून समाजाने अधिक जागरूक होवून निर्णय घेण्याचे आवाहन मनोविकार तज्ञ डॉ. दि.भा. जोशी यांनी केले. अलिकडच्या जीवन शैलीमुळे प्रत्येक गरोदर स्त्री बाळाला नैसर्गिकरित्या जन्म देईलच असे होत नाही. बरेचजण दवाखान्यात न जाता बाळांतपणासाठी इतर पर्याय निवडतात. यामुळे मेंदू अथवा इतर अवयवावर विपरीत परिणाम होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे डॉ. दि.भा. जोशी यांनी सांगितले.

 

दिव्यांग व्यक्तींना कुणाच्या सहानुभुतीची गरज नसते. त्यांच्या हक्काचे त्यांच्यापर्यत पोहचावे यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सुध्दा कर्तव्य भावनेतून पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले.  कर्णदोषाची लक्षणे व त्यावर करण्यात येणारे उपचार याबाबत डॉ. निर्मल दिक्षित यांनी मार्गदर्शन केले.

 

इतर नागरिकाप्रमाणे दिव्यांग व्यक्तीना आपले अधिकार व हक्क आहेत. त्याच्या हक्क  व अधिकारासाठी अनेक कायद्याची तरतूद आहे. दिव्यांगासाठी असलेल्या कायद्याबाबत मार्गदर्शन ॲड . मनिषा गायकवाड केले.

 

नांदेड जिल्ह्यात दिव्यांग ॲपवर 20 हजार दिव्यांगाची नोंदणी झाली असून राज्यात नांदेड मध्ये सर्वात जास्त नोंदणी झाली असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

 

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मान्यवरांच्या हस्ते नितीन रोडेकृष्णा दिडशेरेनागेंद्र बलीकोंडावारविजय सोनकांबळेकाळबा सातपुतेचंद्रकांत इबितदार यांना स्मार्ट केन तर गौरी रासरकर यांना सीपी चेअरचे वितरण करण्यात आले. तर कैलास सोनवणेसम्यक कदमशे. निहाल अहेमदमोहन इरपेफैजल खान पठाणशे. सोहलज्ञानेश्वर भरकडेप्रतीक केकाटेसय्यद जुबेरशेख बुरहानरुपेश मेकलवाडपंकज सोनटक्केसंस्कार पतंगे या नवनिर्वाचित दिव्यांग मतदार नोंदणीकृत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निर्मल सर तर आभार मुरलीधर गोडबोले यांनी मानले.

00000   











      


Friday, December 1, 2023

 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिवस होणार साजरा    

नांदेड (जिमाका), दि. १ : सधन कृषि पद्धतीत रासायनिक खतांचा त्याचबरोबर पाण्याचा अर्निबंधीत  वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. याचाच विपरीत परिणाम पीक उत्पादनावर होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना पीक उत्पादन व मृदाबाबत माहिती होण्यासाठी मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण 5 डिसेंबर जागतिक मृदा दिवसाच्या निमित्ताने करण्याचे नियोजन आहे. पुणे कृषि आयुक्तालयाने दिलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यात 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील संबंधित विभागाना दिले आहेत.

00000

 निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची

हॉर्टीनेट प्रणालीवर शेत नोंदणी करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका), दि. १ :  द्राक्ष व आंबा पिकाची शेत नोंदणी सन 2023-24 मध्ये सुरू झाली असून इतर पिकाची नोंदणी वर्षेभर सुरू असते. सन 2023-24 मध्ये निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची ट्रेसेबिलिटी नेटद्वारे नोंदणी करण्यासाठी 1.25 लाख लक्षांक सर्व संबंधित जिल्ह्यांना वितरीत करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या स्थितीत शेत नोंदणी अत्यंत अल्प झाली असून जास्तीतजास्त शेत नोंदणी करण्यासाठी व निर्धारीत लक्षांक वेळेत पूर्ण करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी निर्यातक्षम पिकांची शेत नोंदणी संबंधित प्रणालीवर करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

 

 

महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादन पिकांचे क्षेत्र उत्पादन व निर्यातीमध्ये अग्रेसर असून राज्यातून मोठ्या प्रमाणात विशेषत: द्राक्ष्, केळी, आंबा, डाळींब, संत्रा व इतर फळ पिकांची तसेच कांदा, हिरवी मिरची, भेंडी व इतर भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात निर्यात युरोपियन युनियन, सार्क देश व इतर देशांना केली जाते.

 

राज्यातून फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी व आयातदार देशांच्या किडनाशक उर्वरित अंश व किड रोग मुक्तची हमी देण्यासाठी सन 2004-05 पासून ग्रेपनेट या ऑनलाईन कार्यप्रणालीची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. सन 2022-23 मध्ये द्राक्षाची ग्रेपनेट प्रणालीवर 46 हजार 97, आंब्यासाठी मॅगोनेट प्रणालीवर 9 हजार 991, भाजीपाल्यासाठी व्हेजनेट प्रणालीवर 8 हजार 25 प्लॉटची नोंदणी केलेली झाली होती. राज्यात सन 2022-23 मध्ये हॉर्टीनेट प्रणालीवर एकुण 73 हजार 565 शेतकऱ्यांची शेत नोंदणी झाली होती. ती देशाच्या तुलनेत 92 टक्के असून राज्य निर्यातक्षम शेत नोंदणीत प्रथम स्थानी आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी नमूद केले आहे.

0000

 जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन  

 

युवकांनी आपली प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका), दि. १ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड तथा जिल्हा कृषि अधिकारी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023-24 चे आयोजन दिनांक 6 ते 7 डिसेंबर 2023 या कालावधीत डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडीयम परीसर नांदेड,  जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल नांदेड व जिल्हा क्रीडा संकुल बास्केटबॉल मैदान नांदेड या ठिकाणी करण्यात येत आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील पुढील कला प्रकारांमध्ये इच्छुक असणाऱ्या युवक-युवतींनी आपली नावे /  प्रवेशिका सोमवार 4 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय स्टेडीयम परीसर नांदेड येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यासन प्रमुख बालाजी शिरसीकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक) संपर्क क्र. 9850522141, 7517536227 यांच्याशी संपर्क साधवाअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

हा युवा महोत्सव म्हणजे युवकांना आपल्या मधील कलागुण दाखविण्याचे एक खुले व्यासपीठ आहे.  यामध्ये युवकांचा सर्वांगिण विकास करणे, देशाची संस्कृती व परपंरा जतन करणे, राष्ट्रीय एकात्मता वाढिस लावणे, युवकाना तृणधान्याचे महत्त्व पटवुन देणे, शिक्षण, उद्योग व्यवसाय, यासोबतच शेती या व्यवसायाशी युवकाची ओळख करून देणे, सामाजिक विकासात विज्ञानाचे महत्त्व युवकांना पटवुन देणे इत्यादी बाबींवर युवा महोत्सव साजरा करण्यात येत आहे.

 

या युवा महोत्सवामध्ये नांदेड जिल्हातील 15 ते 29 वयोगटातील युवक व युवती सहभाग घेऊ शकतात.  त्यांचे वय दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी परिगणना करण्यात येईल. यात सहभागी होण्यासाठी जिल्हातील कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय, महिला मंडळ, महिला बचतगट, युवकांसाठी कार्य करणाऱ्या स्वंयसेवी संस्था, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) इत्यादी संस्थेतील युवक-युवती यांना सहभागासाठी आमंत्रीत करण्यात येत आहे. युवा महोत्सवामध्ये प्रत्येक कलाप्रकाराकरीता विजय स्पर्धकांना आकर्षक रोख बक्षीस, ट्राफीज देवुन गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर विजयी युवकांना विभागस्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याचा मान मिळणार आहे.

 

संयुक्त राष्ट्र संघाने (आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023) असे घोषित केले असल्याने युवकांना तृणधान्याचे महत्त्व पटवून देवून विज्ञानाच्या आधारे तृणधान्य उत्पादन वाढीसाठी करावायाच्या उपाययोजना यावर निबंध स्पर्धा सुद्धा घेण्यात येणार आहे.  तसेच तृणधान्य उत्पादनवाढ या संकल्पनेवर विविध प्रदर्शन युवांसाठी रोजगार व व्यवसाय संधी, यशोगाधा, पर्यावरण संरक्षण, भौगोलिक परिस्थीतीवर आधारीत उत्पादन वाढीसाठी उपाययोजना, समस्यांचे निराकरण, संशोधने, देश-विदेशात तृणधान्य आयात निर्यात बाबत माहिती, विविध योजनाची माहिती, पाककला, इत्यादी बाबत युवकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

युवकामार्फत तयार करण्यात आलेले हस्तकला, वस्त्रोद्योग, ॲग्रो प्रोडक्ट, इत्यादी वस्तुचे प्रदर्शन सुध्दा ठेवण्यात येणार आहे. युवा महोत्सवात पुढील कला प्रकार अंतर्भुत आहेत.

 

सांस्कृतिक कला प्रकार: समुह लोकनृत्य (सहभाग संख्या-10), वैयक्तिक सोलो लोकनृत्य (सहभाग संख्या-5), लोकगीत (सहभाग संख्या-10), वैयक्तिक सोलो लोकगीत (सहभाग संख्या-5).

 

कौशल्य विकास: कथा लेखन (सहभाग संख्या-3), पोस्टर स्पर्धा (सहभाग संख्या-2), वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी) (सहभाग संख्या-2), फोटोग्राफी (सहभाग संख्या-2).

 

संकल्पना आधारीत स्पर्धेत: महाराष्ट्र राज्यासाठी 1.तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर (सहभाग संख्या-35), सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान (सहभाग संख्या-5).

 

युवा कृती: हस्तकला (सहभाग संख्या-7), वस्त्रोद्योग (सहभाग संख्या-7), ॲग्रो प्रोडक्ट (सहभाग संख्या-7) इत्यादी कलाकृतीचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी  स्पष्ट केले आहे.

000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...