Wednesday, November 29, 2023

 वृत्त 

नागपूर येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय

नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 29 :- राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नागपूर येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जमनालाल बजाज भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे दिनांक 9 व 10 डिसेंबर 2023 रोजी राज्यस्तरीय पंडित दिनदयाळ उपाध्याय नमो महारोजगार मेळावा संपन्न होईल. या मेळाव्यासाठी उद्योजकांना आवश्यक ते कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नामांकित उद्योजक / इंडस्ट्रीज यांना निमंत्रीत केले आहे.

 

या महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार प्राप्त व्हावा हा प्रमुख उद्देश आहे. जिल्हयातील खाजगी आस्थापना, उद्योग, व्यवसाय, कंपनी, फायनान्स, पतसंस्था, खाजगी बँक व उद्योजकांनी आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त होण्यासाठी आपल्या आस्थापनांवरील रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचीत करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 

दहावी/बारावी/आयटीआय/डिप्लोमा/पदवी/पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचीत केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करुन स्वत: मूळ कागदपत्रासह जमनालाल बजाज भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे 9 व 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण असल्यास दूरध्वनी क्रमांक 02462-251674 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

00000

 सुधारित वृत्त 

पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा पूर्व परीक्षा

2 डिसेंबर ऐवजी 10 डिसेंबरला होणार

 

नांदेड, (जिमाका) दि. 29 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ही शनिवार 2 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. उपसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे शुध्दीपत्रक क्रमांक एलटीडी-3417/सीआर-14/2017/जाहिरात दिनांक 29 नोव्हेंबर 2023 नुसार ही नियोजीत परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. सदर पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ही रविवार 10 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000   

Tuesday, November 28, 2023

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून

परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध

     लातूर, दि. 28 (विमाका):-  महाराष्ट्र   लोकसेवा आयोगाकडून 2024 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे  आयोगाचे उपसचिव दे. वि. तावडे यांनी कळविले आहे.

        शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. तरी सर्व संबंधित संस्थांनी  परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याची विनंती  संस्थांना आयोगाने केल्याचेही त्यांनी कळविले आहे.

इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच आयोगाकडून वेळोवेळी जाहिर करण्यात येणाऱ्या सुचनांसाठी आयोगाच्या वरील संकेतस्थळास उमेदवारांनी वेळोवेळी भेट द्यावी, असे आवाहनही आयोगाव्दारे करण्यात आले आहे.

***

 जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय कौठा मार्गावरील वाहतूकीस प्रतिबंध

·         पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना निर्गमीत 

 

नांदेड, (जिमाका) दि. 28 :-  नांदेड शहरातील जूना मोंढा गोदावरी नदीवरील पुल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रा.मा.256 (कि.मी 42/200 ते 75/700) व (2) नांदेड लातूर रस्ता भगतसिंह चौक गोदावरी नदीवरील नवीन पुल (पश्चिम वळण रस्ता) रा.मा.247 (कि.मी.0/00 ते 4/500) रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटकरण, नाली बांधकाम, रस्ता दुभाजकासह संगमस्थळाची सुधारणा करण्यात येत असल्यामुळे जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय (कौठा) या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद करुन इतर मार्गाने वळविण्यात आली आहे.  प्रतिबंध  करण्यात आलेल्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे.  

जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय कौठा या रस्त्याच्या काम सुरु करावयाचे असल्यामुळे वाहतुकीस जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय कौठा या प्रतिबंधित मार्गाऐवजी जुना मोंढा –वजीराबाद –कौठा-रवीनगर-शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय (कौठा) या पर्यायी मार्गाने ये-जा करतील.

मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी संबंधित विभागाने उपाययोजना करुन 25 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 2023 पर्यत नमूद केलेल्या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता दिली आहे.

00000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड (जिमाका) दि. 28 :- नांदेड जिल्ह्यात 9 डिसेंबर 2023 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 9 डिसेंबर 2023 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

दि. 26.11.2023

 संविधान दिनानिमित्त आयोजित रॅलीला उत्स्फूर्त सहभाग

·         संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन

नांदेड (जिमाका) दि. 26 :- संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे नांदेड येथे महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत संविधान दिनाचे औचित्य साधून भव्य रॅली काढण्यात आली. सुरवातीला जिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर यांनी महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  त्यानंतर त्यांनी  संविधान रॅलीला  हिरवी झेंडी दाखवली.

 

यावेळी सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांची उपस्थिती होती. या संविधान रॅलीचा मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते शिवाजी नगर, कलामंदिर, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात येवून राष्ट्रगीताने संविधान रॅलीची सांगता करण्यात आली.

 

भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना असून सर्व नागरिकांनी त्याचा अभ्यास करावा. सर्वानी घटनेने दिलेल्या अधिकार व कर्तव्ये त्यांचे पालन करावे असे जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर यांनी सांगितले. या कार्यक्रमास समाज कल्याण कार्यालयील अधिकारी कर्मचारी, जाती पडताळणी कार्यालयील अधिकारी कर्मचारी, बार्टीचे प्रकल्प अधिकारी व समतादूत तसेच विविध महामंडळाचे कर्मचारी यांची उपस्थिती होते.

 

या संविधान रॅली मध्ये पोलिस अधिक्षक कार्यालीयातील पोलिस बँड पथक कर्मचारी सुनिल पारधे यांच्या अधिपत्याखालील बँड पथक संच यांनी गीत सादर केले. या रॅलीमध्ये महात्मा फुले हायस्कुल येथील स्काऊट गाईड व एन.सी.सी. विद्यार्थी सहभागी झाले होते. वसंतराव नाईक महाविद्यालय, जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, नोबल हास्कुल, पंचशिल विद्यालय, सायन्स कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.  शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळेतील कर्मचारी हे रॅलीत सहभागी झाले होते तसेच जिल्हयातील नागरीकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

00000




Saturday, November 25, 2023

यशकथा : 

वेटरच्या नोकरीपासून ते

मालकीच्या धाब्यापर्यंतची अनोखी यशोगाथा 

अवघ्या पाच एकरच्या आतली वडिलोपार्जित शेती. त्यात भावा-भावातील हिस्से. यात भागत नाही म्हणून सुरुवातीला व्यवसायाकडे वळण्याचे धाडस करणारे धनेगाव येथील मुळ रहिवासी असलेले बाळु शिंदे ! काय करायचे याचा कोणताही आराखडा त्यांना बांधला नाही. शिक्षण कमी म्हणजे नसल्यागतच. बँकेतल्या खात्यावर व्यवहारासाठी तीन-तीनवेळा त्यांच्याकडून सही करून घेतल्यावरही सारखी न आल्याने बँकेतील कर्मचारी त्यांच्या प्रत्येक व्यवहारासाठी दचकून राहतात. “सहीपुरते कसेबसे अक्षरे जवळ करणाऱ्यांपैकी मी एक आहे” अशी प्रांजळ कबुली देण्याइतपत निर्मळपणा बाळु शिंदेनी जपला आहे. या निर्मळपणातच त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो. हा आत्मविश्वास त्यांचे मुख्य भांडवल.    

काही तरी काम करायचे आहे, हे डोक्यात घेऊन शिंदेनी अगोदर नांदेडला राहण्याचा निर्णय घेतला. महानगरपालिकेअंतर्गत काही करता येईल का याची चाचपणी त्यांनी केली. ही चाचपणी करतांना आपला रोजचा उदरनिर्वाह सुरू रहावा यासाठी ॲटोरिक्षा जवळ करायला त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. महानगरपालिकेतील तत्कालीन वरिष्ठ अधिकारी डॉ. निपुण विनायक यांनी शिंदेला घरकुलची कामे करण्याबाबत जी कौशल्य लागतात ती शिक्षणासाठी संधी दिली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर घरकुलच्या कामात हळूहळू शिंदेनी जम बसविला. घरांसाठी विट्टांचे एक-एक थर जसे वाढू लागले त्याप्रमाणात शिंदेला स्वत:ची ओळख निर्माण करायला उशीर लागला नाही. कष्टातील मिळकतीवर स्वत:चे एक घरकुल त्यांनी कॅनलरोडला बांधून घेतले.   

“घरकुलच्या कामातून माझे घर सावरल्या गेले. मात्र कालांतराने आणखी किती काळ याच कामात अडकून पडायचे” हा माझ्यापुढे मोठा प्रश्न होता. या विंवचनेत मी इतर व्यवसाय करता येतील का याची चाचपणी सुरू केली, असे आपल्या प्रवासाबद्दल शिंदे सांगतात. पुन्हा वेगळा व्यवसाय निवडायचा ही खुणगाठ मनाशी बाळगून सुरुवातीला चंद्रलोक व नंतर सिटी प्राईट या हॉटेलमध्ये त्यांनी काम करायला सुरूवात केली. हॉटेलमधील इतर कामे करतांना स्वयंपाकाची आवड शिंदे यांना निर्माण झाली. सुरुवातीला दाल फ्राय पासून छोटी-मोठे बारकावे त्यांनी शिकून घेतले. हा प्रवास पुढे  तंदूर, व्हेज हंडी, नॉनव्हेज हंडी करीत ज्वारीच्या रोटी पर्यंत पोहचला. यातच त्यांच्या हाताला चव लागली. “सारेकाही मी इथेच शिकलो” असे शिंदे सांगतात. यात आत्मविश्वास आल्याने मीही माझ्या स्वत:च्या मालकीचे छोटे का असेना पण स्वत:चे हॉटेल असावे हे स्वप्न उराशी बाळगले.   

अनुभवाची शिदोरी सोबत असल्यामुळे आपल्याला जे काही सुरू करायचे आहे, त्या व्यवसायाचे कौशल्य अंगी असल्याने मी स्वत:चे हॉटेल सुरू करण्यासाठी कुठून अर्थसहाय्य मिळेल का याचा विचार सुरू केला. यातूनच मला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे संपर्क करण्याचा मित्रांनी सल्ला दिला. त्यानुसार मी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेतली. त्यांनी माझ्यातला आत्मविश्वास पाहून व पडेल ते काम करण्याची माझी तयारी पाहून साडेनऊ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. यातूनच नांदेडमध्ये स्वत:चे एक हॉटेल (धाबा) सुरू करू शकलो यावर माझा मलाच कधीकधी विश्वास बसत नाही, असे शिंदेनी सांगतात. दर महिन्याला 23 हजार 300 एवढा हप्ता आजवर मी नित्यनियमाने फेडत आलो आहे. येत्या काही महिन्यात माझे हे संपूर्ण कर्ज पूर्णपणे फिटलेले असेल. नंतर ते हॉटेल विनाकर्जाचे असेल, हे त्यांचे स्वप्न साकार होणार आहे.   

नांदेड येथील महाराणा प्रतापसिंह चौक येथे बाळु शिंदे यांनी भाड्याचे जागा घेऊन हॉटेल तुळजाई अर्थात धाबा सुरू केला आहे. हॉटेल तुळजाईसाठी त्यांनी घरातील सर्व मनुष्यबळ उपयोगात घेतले हे विशेष ! कामाची लाज बाळगुन चालणार नाही, मला हे जमणार नाही, आपले हे काम नाही असा भेदभाव मनात कधीच येऊ दिला नाही. त्याच श्रद्धेने माझे मुले त्यांचे शिक्षण पूर्ण करत हॉटेलमध्ये किचनचे काम करतात हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे, असे शिंदे सांगतात. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने माझ्या स्वयंरोजगाराच्या कल्पनेला उचलून घेत जे कर्ज दिले आहे, जी योजना दिली आहे त्यामुळे मला पुढे येता आले, असे स्पष्ट सांगण्याचा निर्मळपणा बाळु शिंदे यांनी जपला आहे. 

विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी नांदेड.   

 






केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...