Friday, October 27, 2023

 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत

दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्याचे निर्देश


नांदेड (जिमाका) दि. 27 :- सोमवार 30 ऑक्टोंबर ते  रविवार 5 नोव्हेंबर 2023 या  कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाकरिता ‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा ; राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा’ या संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.

या सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यासंदर्भात 16 ऑक्टोबर 2023 रोजीच्या परिपत्रकान्वये विविध विभागांना निर्देशित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी परिपत्रकात नमूद केल्यानुसार कार्यवाही करुन अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळवण्यात आले आहे.

00000

 किनवट तालुक्यातील दुन्ड्रा येथील 27 जणांची

जात वैधता प्रमाणपत्राबाबत 3 नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणी


नांदेड (जिमाका) दि. 27 :- अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी किनवट तालुक्यातील दुन्ड्रा गावातील 27 जणांनी जात वैधतेसाठी अर्ज जात पडताळणी समितीकडे केले होते. संबंधित अर्जदाराना सन 2020 पासून ते आतापर्यत वारंवार नोटीस देवून समिती कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविले होते. परंतु अर्जदार संधी देवूनही सुनावणीस उपस्थित राहीले नाहीत. त्या 27 अर्जदारांसाठी समितीने 3 नोव्हेंबर 2023 रोजी अंतिम सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीस अर्जदारांनी उपस्थित राहावे याबाबत त्यांना समितीच्या वतीने लेखी कळविलेले आहे. तसेच सदर अर्जदार सुनावणीस गैरहजऱ राहिल्यास उपलब्ध कागदपत्राआधारे समिती योग्य तो निर्णय घेईल, असेही आवाहन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट (मुख्यालय औरंगाबादचे) उपसंचालक तथा सदस्य सचिव यांनी केले आहे.

 

किनवट तालुक्यातील दुन्ड्रा गावातील मन्नेरवारलू अनुसूचित जमातीच्या त्या 27 जणांना नैसर्गिक न्याय तत्वाच्या दृष्टीकोनातून श्री. पवन अशोक आईटवार व श्री. अशोक नारायण आईटवार यांच्या प्रकरणी या समिती कार्यालयाने पारीत केलेले निर्णय आदेश 1.2.2020 अन्वये व त्यानंतर 6 वेळेस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तसेच दिनांक 10 नोव्हेंबर 2020, 9 डिसेंबर 2020, 26 मे 2022, 5 सप्टेंबर 2023, 21 सप्टेंबर 2023  तसेच 11 ऑक्टोबर 2023 बाबत समिती कार्यालयात सुनावनीस उपस्थित राहणेबाबत कळविण्यात आले होते. संधी देवूनही अर्जदार समितीस सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे असे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती किनवट, मुख्यालय औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याबाबत

9 डिसेंबर पर्यंत नमुना 6,7,8 करता येईल दाखल

·         प्रारुप मतदार यादी प्रसिध्द

नांदेड (जिमाका) दि. 27 :-  नांदेड जिल्‍ह्यातील एकुण 9 विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी मतदान केंद्र, तहसील, उपविभागीय अधिकारी, जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे पाहणीसाठी उपलब्ध आहे. याचबरोबर सदर यादी  https://ceoelection.maharashtra.gov.in संकेतस्थळावर तपासणीसाठी उपलब्‍ध करुन देण्यात आली आहे. 

सदर मतदार यादी तयार करण्याची अर्हता 1 जानेवारी 2024 निश्चित केली आहे. सद्स्थितीत मतदार यादीतील मतदारांना जर काही बदल करावयाचे असतील, मतदार यादीमध्ये एखादे नाव समाविष्ट करायचे असेल अथवा एखाद्या नोंदीच्या तपशीलाबाबत आक्षेप असल्यास असे दावे वा आक्षेप प्रारूप मतदार यादी 9  डिसेंबर 2023 (शनिवार) पर्यंत यथास्थिती नमूना 6,7,8 मध्ये दाखल करता येतील असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.  

सन 2024 मधील नंतरच्या अर्हता दिनांकाना म्हणजेच 1 एप्रिल 2024,  1 जुलै 2024 किंवा 1 ऑक्टोबर 2024 या दिनांकास वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांनाही त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करता येईल. यासाठी नमुना 6 मध्ये त्यांचे दावे नोटीसच्या दिनांकापासून आगाऊ करता येईल व असे दावे त्या त्या तिमाहीच्या अर्हता दिनांकावर त्या त्या तिमाहीमध्ये विचारात घेऊन निकाली काढण्यात येतील. असे दावे किंवा आक्षेप उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी कार्यालय किंवा उ‍पविभागीय अधिकारी कार्यालय किंवा संबंधित तहसील कार्यालयात वर दिलेल्या दिनांकापूर्वी पोहोचेल अशा रीतीने सादर करावा किंवा पोस्टाने पाठवावे.

नांदेड जिल्ह्यात मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेमार्फत दिनांक 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत प्रत्‍यक्ष घरोघरी भेट देऊन मतदाराची पडताळणी करण्‍यात आली.   जिल्हयात एकूण मतदार 26 लाख 68 हजार 279 असून पडताळणी केल्यानंतर ही संख्या 26 लाख 46 हजार 611 एवढी आली. घरोघरी जावून खातरजमा केल्याचे हे प्रमाण 99.19 टक्के आहे. जिल्ह्यात 30 हजार 56 मतदार आढळून आले नाहीत. 17 हजार 241 मतदार स्थलांतरीत झाले आहे तर सुमारे 34 हजार 216 मतदार मयत झाले. सुमारे 11 हजार 558 मतदारांचे छायाचित्र सुस्पष्ट करुन घेण्यात आले. दुबार नोंद झालेले 2 हजार 615 मतदारांची संख्या कमी करण्यात आली.

नांदेड जिल्‍ह्यात 18 ते 19 या वयोगटात नवीन 11 हजार 412 युवक मतदार आहेत. यात 3 हजार 887 मुली, 7523 मुले तर 2 तृतीयपंथीयाचा समावेश आहे. एकूण मतदार संख्येत 18 ते 80 वयोगटातील मतदारामध्ये 13 लाख 82 हजार 214 पुरुष, तर 12 लाख 85 हजार 912 स्त्री मतदार संख्या आहे. तर 153 तृतीयपंथीयाची संख्या आहे असे एकूण 26 लाख 68 हजार 279 मतदारांची संख्या आहे.   

मतदार यादीमध्ये एखादे नाव समाविष्ट करण्याबाबतचा दावा किंवा एखादे नाव समाविष्ट करण्यास अथवा एखाद्या नोंदीच्या तपशीलाबाबत आक्षेप असल्यास असे दावे वा आक्षेप 9 डिसेंबर 2023 (शनिवार) रोजी किंवा पर्यंत, यथास्थिती नुमना 6,7,8 मध्ये दाखल केल्‍यानंतर सदरील दावे व हरकती 26 डिसेंबर 2023 (रविवार) पर्यंत निकालात काढण्‍यात येतील. अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे व डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई 1 जानेवारी 2024 (सोमवार) पर्यंत करून मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी 2024 (शुक्रवार) रोजी करण्‍यात येईल.

00000

 केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सुधारित दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे शनिवार 28 ऑक्टोबर 2023 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

शनिवार 28 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई येथून ओखा एक्सप्रेसने सकाळी 6 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6.20 वा. रेल्वे स्टेशनहून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 6.40 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह येथून नियोजन भवनकडे वाहनाने प्रयाण. सकाळी 9.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन मुख्य सभागृह येथे आगमन व सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रोजगार मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 2 वा. नियोजन भवन मुख्य सभागृह येथून नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण.  दुपारी 3 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन. दुपारी 3.30 वा. पुणे एक्सप्रेसने छत्रपती संभाजीनगर कडे प्रयाण करतील.

0000 

 हस्तशिल्प सेवा केंद्रातर्फे सौभद्र मंगल कार्यालयात

31 ऑक्टोबर पर्यंत विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- भारत सरकारच्या हस्तशिल्प, वस्त्र मंत्रालय विकास आयुक्त कार्यालयाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर हस्तशिल्प सेवा केंद्राच्या माध्यमातून चैतन्यनगर येथील सौभद्र मंगल कार्यालयात 31 ऑक्टोबर पर्यंत विविध खादी ड्रेस, साडी, बांगड्या व इतर वस्तुंचे प्रदर्शन व विक्री ठेवण्यात आली आहे.  संपूर्ण देशात 2 ते 31 ऑक्टोबर या कालावधी खादी महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. स्थानिक कारागीर, विणकर यांना चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम शासनाने घेतला आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून कारागिरांना इथे निमंत्रीत करण्यात आले आहे.

 

या प्रदर्शनात बंजारा उत्पादने, ज्यूटशिल्प, सोलापूर कॉटनवॉल हँगिंग, लाकडाची खेळणी, लाखेच्या बांगड्या व इतर साहित्य याचा समावेश आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते नुकतेच या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी एमसीईडी नांदेडचे शंकर पवार, छत्रपती संभाजीनगर हस्तशिल्प सेवा केंद्राचे सहाय्यक व्यवस्थापक अमन कुमार जैन, हस्तशिल्प संवर्धन अधिकारी शैलेंद्र सिंह हे विशेष परिश्रम घेत आहेत.

000000









Thursday, October 26, 2023

 तात्पुरता फटाका परवाना अर्ज विक्रीस मुदतवाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- दिपावली सण 2023 अनुषंगाने तात्‍पुरता फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्‍याच्‍या कालावधीस दिनांक  3 नोव्‍हेंबर 2023 पर्यत मुदतवाढ देण्‍यात आली आहे. या व्‍यतीरिक्‍त दिनांक 6 ऑक्‍टोबर 2023 रोजी दिलेल्या अटी  व शर्ती कायम राहतील, असे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले आहे.  

 

वर्ष-2023 मध्‍ये दिपावली उत्‍सव हा दिनांक 9  ते 15  नोव्‍हेंबर 2023 या कालावधीत साजरा होत आहे. त्‍यानुषंगाने नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्‍या मार्फत व जिल्‍हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विस्‍फोटक अधिनिमय 2008 नुसार दिनांक 9 ते  23 ऑक्‍टोबर 2023 या कालावधीत विक्री व स्विकारले जाणार होते. तथापी सदर तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्‍याच्‍या कालावधीची मुदतवाढ 3 नोव्‍हेंबर 2023 पर्यंत देण्‍यात आली आहे, असेही जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

00000

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे शनिवार 28 ऑक्टोबर 2023 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

शनिवार 28 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.50 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 9 वा. रेल्वे स्टेशन येथून नियोजन भवनकडे वाहनाने प्रयाण. सकाळी 9.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन मुख्य सभागृह येथे आगमन व सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत रोजगार मेळाव्यास उपस्थिती. सायं 5 वा. नियोजन भवन मुख्य सभागृह येथून वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

0000 

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...