Monday, August 21, 2023

 वृत्त 

अंगणवाडी मदतनीस पदभरती यादीत

आक्षेप असल्यास 1 सप्टेंबरपर्यंत कळविण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येत आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून 10 जुलै 2023 पर्यत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले होते.

 

त्या अनुषंगाने पात्र अपात्र उमेदवारांची यादी http://nanded.gov.in या संकेतस्थळावर 21 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी प्रसिध्द यादीबाबत काही आक्षेप असल्यास 1 सप्टेंबर 2023 पर्यत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर कार्यालयात लेखी पुराव्यासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर वि.सि. बोराटे यांनी केले आहे.

00000

 पशुपालकांनी लम्पी पासून सुरक्षिततेसाठी

आजारी पशू विलगीकरणासह लसीकरण आवश्यक

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

लम्पी चर्मरोग सनियंत्रण समितीच्या बैठकीत आढावा

20 टक्के सुश्रृषा व 80 टक्के काळजी हा लंम्पीवर प्रभावी उपचार

 

नांदेड (जिमाका), दि. 21 :- जिल्ह्यात पशुमध्ये लम्पी चर्मरोगाच्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. याला नियंत्रणात ठेवण्यासाठी पशुपालकांसह ग्रामपंचायत पातळीपर्यंत पशु संवर्धन विभागाने योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे. शंभर टक्के लसीकरण व आजारी जनावरे वेगळी काढून त्यांच्या सुश्रृषेसह लसीकरण व काळजी घेण्यासाठी अधिक दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

लम्पी चर्मरोग सनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

जिल्ह्यात आजच्या घडीला 512 पशुंमध्ये लम्पी आजार आढळून आला आहे. यात वासरांचे प्रमाण अधिक आहे. पशुपालकांमध्ये लम्पी बाबत अधिक जागृती करण्यावर पशुसंवर्धन विभागाने भर देण्यासमवेत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर त्यांच्या सहभागातून जनावरांचे गोठे व जनावरांची फवारणी करणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. मृत जनावरांची विल्हेवाट ही दिलेल्या निर्देशाप्रमाणे केली पाहिजे. याचबरोबर आपला जिल्हा दोन राज्यांच्या सीमांवर असल्यामुळे जिल्ह्यात अन्यत्र ठिकाणावरून आजारी जनावरे येणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घेतील पाहिजे. आठवडी बाजाराच्या ठिकाणी लसीकरणाचे कॅम्प लावून पशुपालकांना जनावरांच्या निगा व सुश्रृषेबाबत व्यापक मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 

जिल्ह्यात आजवर एकुण 75 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यातील लम्पी चर्मरोग बाधित गावांची संख्या 197 असून बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 643 एवढी आहे. एकुण बाधित गावे 480 एवढे असून 3 हजार 618 बाधित पशुधनापैकी 2 हजार 638 पशुधन आजारातून बरे झाले आहेत. 513 पशुधनावर औषोधोपचार सुरू असून 10 पशुधन अत्यवस्थ रुग्णामध्ये गणले आहेत. 466 पशुधन मृत पावले आहेत. आजवर सुमारे 1 कोटी 95 लाख 5 हजार एवढ्या रक्कमेचे अर्थसहाय्य मृत झालेल्या पशुधनाच्या पशुपालकास वितरीत करण्यात आले आहे.

000000   







Friday, August 18, 2023

सकारात्मक विचार व कृतीतच

सन्मानाने जगण्याचा मार्ग

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड, (जिमाका) दि. 18 :- कोणतीही कायदेशीर शिक्षा ही जीवनाला सन्मानाचा मार्ग देण्याकरिता सहाय्यभूत ठरते. बंदिवास ही यादृष्टिनेच न्यायाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत असताना बंदीजनांनी नकारात्मक विचारांना जवळ करण्यापेक्षा अधिक सकारात्मक असले पाहिजे. यातच सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग दडलेला आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण जेंव्हा केंव्हा बाहेर पडाल तेंव्हा सेवाक्षेत्रातील दडलेल्या विविध लहान व्यवसायाच्या संधी निवडून सन्मानाचा मार्ग निवडा, असे भावपूर्ण आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा कारागृह नांदेड येथे कृषि उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सत्रात ते बंदीजनांशी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे, शासकीय अभियोक्ता तळेगावकर, प्रकल्प अधिकारी शंकर पवार आदी मान्यवर उपस्थित होते. नांदेड जिल्हा कारागृहात हे प्रशिक्षण 6 सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
चांगल्या कामातून, चांगल्या मार्गातून आपल्या जीवनाचा मार्ग अधिक उजळ होतो. उद्या कारागृहाच्या बाहेर जेंव्हा पडाल तेंव्हा चांगला मार्ग निवडण्यासाठी, चांगल्या मार्गावर चालण्यासाठी बाहेर पडा. तुम्ही चांगले उद्योग करू शकता याबाबत विश्वास ठेवा. यातच तुमची चांगली ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. जिल्हा कारागृहाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांसह या प्रशिक्षण वर्गाचे मान्यवरांनी कौतूक केले.
नवीन बॅरेकचे उद्घाटन
जिल्हा कारागृहात नवी बॅरेकचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी जिल्हा कारागृहात दिल्या जाणाऱ्या मुलभूत सुविधांची स्वत: फिरून पाहणी केली. काही बंदीजनांची विचारपूस करून समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्याचे संबंधितांना निर्देश दिले. याचबरोबर कारागृहाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये अभिवेक्षा मंडळाची व त्रैमासिक बैठक संपन्न झाली. प्रारंभी तुरूंग अधिकारी रविंद्र रावे यांनी बैठकीची सांगता केली.
00000








 वेतन देयकासाठी कर्मचाऱ्यांची माहिती  

ऑनलाईन आज्ञावलीत नोंदविणे आवश्यक

      

नांदेड (जिमाका) दि. 18 :- शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष 2023 तयार करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालय नांदेड मार्फत सुरू करण्यात आले आहे. नियोजन विभागाचे शासन परिपत्रक क्र. असांसं-1323/प्र.क्र.71/का.1417 दि. 8 ऑगस्ट 2023 नुसार जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातील व त्यांच्या आस्थापनेवरील नियमित, नियमितेतर, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी व तदर्थ तत्वावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची दिनांक 1 जुलै 2023 या संदर्भ दिनांकाची माहिती ऑनलाईन आज्ञावलीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे.

 

ही माहिती ऑनलाईन नोंदवून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र-1 जोडल्याशिवाय वेतन देयके कोषागार कार्यालयाकडून स्विकारण्यात येणार नाहीत. याची सर्व राज्य शासकीय आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या शासकीय कार्यालयांची वेतन देयके कोषागारात सादर होत नाहीत, अशा सर्व कार्यालयांनी सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेड 02462-252775 ई-मेल dso.nanded88@gmail.com येथे संपर्क साधावा. कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2023 बाबत ऑनलाईन आज्ञावलीमध्ये माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक निखील बासटवार यांनी केले आहे.

000000

 

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

      

नांदेड (जिमाका) दि. 18 :- महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून “प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार 2024” हा शिक्षण, कला सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज प्राप्त करण्याची  प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रत्येक वर्षाच्या दिनांक 31 ऑगस्ट 2023 पर्यंत www.awards.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.

 

नांदेड जिल्ह्यातील वर नमूद क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेल्या बालकांनी या पुरस्काराकरीता मुलांच्या विकास,  संरक्षण व कल्याण या क्षेत्रात विनावेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्ती तसेच  बाल कल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्था यांनी  दिनांक 31 ऑगस्ट 2023 पर्यंत www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने केले आहे.  

00000

 समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी

21 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिन 

 

नांदेड, (जिमाका) दि. 18:-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 21 ऑगस्ट 2023 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  


दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 21 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र, एसबीआय एटीएमच्या मागे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

Thursday, August 17, 2023

 सांस्कृतिक महोत्सवात लोकशाही मूल्यांसाठी विविध उपक्रम हीच भविष्याची आश्वासकता

- अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
▪️किन्नरांवरील “मिशन गौरी” डॉक्युमेंट्रीने दिल्या नव्या संवेदना
नांदेड (जिमाका) दि. 17 :- लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी, साक्षरतेसाठी लोककला, लोकसाहित्य, विविध सांस्कृतिक महोत्सव यांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. अलिकडच्या काळात साहित्य संमेलनापासून ते विविध जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित होत असलेल्या सांस्कृतिक कला महोत्सवात लोकशाही, मतदान जागृती या महत्त्वाच्या विषयावर विचारमंथन केले जात आहे. अशा उपक्रमातूनच वरचेवर लोकशाही अधिक प्रगल्भ व भक्कम होत जाईल, असा विश्वास अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केला.
नांदेड येथे तीन दिवसीय सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, परलिंगी समाजाच्या सलमा खान, गौरी सावंत, दिशा पिंकी शेख, शमीबा पाटील, राणी ढवळे, गुरू अहमद बकस आदी किन्नर पदाधिकारी उपस्थित होते.
या सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाच्या सांगता समारोपासाठी संयोजक डॉ. सान्वी जेठवाणी यांनी अतिशय कल्पकतेने मतदार जागृती व तृतीयपंथी मतदार जनजागृतीच्या उद्देशाने भर देऊन या महोत्सवाला जबाबदारीचे भान दिल्याचे गौरोद्गार मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी काढले. आपल्या न्याय हक्कासाठी संघर्षाची पार्श्वभूमी आपल्याला त्या हक्काची व कर्तव्याची जाणिव करून देते. तुम्ही सर्व किन्नर आपल्या अधिकारासाठी कायद्याच्या दृष्टिनेही सतर्क आहात याचे मला कौतूक वाटते. तृतीयपंथीयात एक विधायक रचनात्मकता दडलेली आहे. तुमच्या अस्तित्वाचा स्विकार हा लोकशाहीचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
किन्नरांना विविध शासकीय योजनांचे लाभ विनासायास व तात्काळ मिळाले पाहिजे. एक नागरिक म्हणून प्रत्येकाला मतदानाचा जो अधिकार मिळालेला आहे तो किन्नरांना बजावता यावा यासाठी आम्ही युद्धपातळीवर मतदान ओळखपत्र किन्नरांपर्यंत पोहचवित आहोत. अनेक किन्नरांजवळ ओळखपत्र / आधार नसल्याने त्यांची गैरसोय होते. शासनाने ही बाब अतिशय गांभीर्याने घेऊन त्यांना ज्या सुविधा देता येतात त्या सर्व लाभ सामाजिक न्याय विभागाकडून पोहोचविले जात आहेत. यापुढे त्यांच्या हक्काचे मतदान कार्ड प्रत्येक किन्नरांना मिळावेत यादृष्टीने स्वयंघोषणा पत्राच्या आधारावर मतदानाचा अधिकार पोहोचविण्याचा प्रयत्न करून असे सुतोवाचही राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शन केले. तर पुरस्काराने सन्मानित किन्नरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी परलिंगी समाजाच्या किन्नरांना अस्मिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात किन्नरमा ट्रस्टच्या अध्यक्षा सलमा खान, श्रीगौरी सावंत, दिशा पिंकी शेख, शमीभा पाटील, राणी ढवळे, मयुरी आळवेकर, रंजिता बकस, कादंबरी, गौरी बकस, फरिदा बकस, जया, अर्चना, बिजली, समाजसेवक अमरदीप गोधने यांचा सन्मान करण्यात आला. या समारोप समारंभात स्कॉच अवार्ड सन्मानित सेजल हिचा विशेष सन्मान करण्यात आला.
किन्नरांवरील “मिशन गौरी” डॉक्युमेंट्रीने दिल्या नव्या संवेदना
या महोत्सवाच्या निमित्ताने विशेषत: किन्नर मतदान व अधिकार साक्षरतेच्यादृष्टिने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याला वेगळी जोड दिली. किन्नरांच्या प्रश्नांवर चर्चा होण्यासमवेत त्यांच्यासाठी ज्या शासकीय योजना आहेत याबाबत विचारमंथन व्हावे यावर भर देण्याबाबत संयोजकांना सूचित केले होते. त्यानुसार युवा मतदार साक्षरतेसह तृतीयपंथीयांना माणूस म्हणून जगण्याचा असलेला हक्क व त्यांच्या भावभावनांवर आधारीत “मिशन गौरी” ही डॉक्युमेंट्री समारोप समारंभात आवर्जून दाखविण्यात आले. किन्नरांना विकास व सामाजिक समतेच्या प्रवाहात आणण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सेतू केंद्र देण्याच्या उपक्रमावर व त्यांना मतदान ओळखपत्रासह रेशनकार्ड व इतर विकास उपक्रमांवर आधारीत ही डाक्युमेंट्री नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आली. या डाक्युमेंट्रीचे राज्याचे अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले व मान्यवरांनी विशेष कौतूक केले.
000000









वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...