सकारात्मक विचार व कृतीतच
सन्मानाने जगण्याचा मार्ग
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड, (जिमाका) दि. 18 :- कोणतीही कायदेशीर शिक्षा ही जीवनाला सन्मानाचा मार्ग देण्याकरिता सहाय्यभूत ठरते. बंदिवास ही यादृष्टिनेच न्यायाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत असताना बंदीजनांनी नकारात्मक विचारांना जवळ करण्यापेक्षा अधिक सकारात्मक असले पाहिजे. यातच सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग दडलेला आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण जेंव्हा केंव्हा बाहेर पडाल तेंव्हा सेवाक्षेत्रातील दडलेल्या विविध लहान व्यवसायाच्या संधी निवडून सन्मानाचा मार्ग निवडा, असे भावपूर्ण आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा कारागृह नांदेड येथे कृषि उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सत्रात ते बंदीजनांशी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे, शासकीय अभियोक्ता तळेगावकर, प्रकल्प अधिकारी शंकर पवार आदी मान्यवर उपस्थित होते. नांदेड जिल्हा कारागृहात हे प्रशिक्षण 6 सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
चांगल्या कामातून, चांगल्या मार्गातून आपल्या जीवनाचा मार्ग अधिक उजळ होतो. उद्या कारागृहाच्या बाहेर जेंव्हा पडाल तेंव्हा चांगला मार्ग निवडण्यासाठी, चांगल्या मार्गावर चालण्यासाठी बाहेर पडा. तुम्ही चांगले उद्योग करू शकता याबाबत विश्वास ठेवा. यातच तुमची चांगली ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. जिल्हा कारागृहाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांसह या प्रशिक्षण वर्गाचे मान्यवरांनी कौतूक केले.
नवीन बॅरेकचे उद्घाटन
जिल्हा कारागृहात नवी बॅरेकचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी जिल्हा कारागृहात दिल्या जाणाऱ्या मुलभूत सुविधांची स्वत: फिरून पाहणी केली. काही बंदीजनांची विचारपूस करून समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्याचे संबंधितांना निर्देश दिले. याचबरोबर कारागृहाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये अभिवेक्षा मंडळाची व त्रैमासिक बैठक संपन्न झाली. प्रारंभी तुरूंग अधिकारी रविंद्र रावे यांनी बैठकीची सांगता केली.
00000
No comments:
Post a Comment