Monday, July 3, 2023

 पाण्याचे भक्कम स्त्रोत असल्याशिवाय

जलजीवनची इतर कामे न केलेली बरे

-    खासदार प्रताप पाटील चिखलीकर

 

·  दिशा  समितीच्या बैठकीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कामांबाबत

  खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सूचना

· शालेय तपासणीमध्ये पोषण आहाराची होणार तपासणी   

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर प्रतिदिन प्रती व्यक्तीप्रमाणे नियमित व गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा व्हावा हा उदात्त हेतू जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत शासनाने निश्चित केला आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळजोडणी करून मोठे परीवर्तन करणारी ही योजना आहे. ज्या गांभीर्याने ही योजना शासनाने हाती घेतली आहे, ती राबवितांना पाण्याचे स्त्रोत भक्कम असणे हे अत्यावश्यक आहे. ज्या पाण्याच्या स्त्रोतावरून गावाला नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे ते स्त्रोतच कमकुवत व कमी पाण्याचे असेल तर पाईपलाईन व इतर कामे करण्यात कोणाताही अर्थ नाही. पाण्याचे भक्कम स्त्रोत असल्याशिवाय जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ जोडणीची, पाईपलाईनची इतर कामे अगोदर करणे व्यर्थ ठरेल, असे स्पष्ट प्रतिपादन दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.

 

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा)  समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले तसेच अशासकीय सदस्य यावेळी उपस्थित होते. ग्रामीण पेयजलच्या कामाबाबत आमदार भिमराव केराम व आमदार राम पाटील रातोळीकर यांनी प्रश्न उपस्थित करून पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताबाबत अधिक आग्रह धरला होता.

 

यावर्षी अद्यापही पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोरच्या चिंता वाढलेल्या आहेत. पेरणी करावी का नाही, करावयाची झाल्यास केंव्हा करावी, कोणते पीक घ्यावे याबाबत सर्व शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत कृषी विभागाने ग्राम पातळीपर्यंत व्यापक जनजागृतीवर भर देऊन शेतकऱ्यांच्या मनातल्या शंका दूर कराव्यात, असे खासदार चिखलीकर यांनी कृषि विभागाला निर्देश दिले.

 

ग्रामीण भागातील सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक बालविकास योजना, मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना व इतर विभागाच्या योजना या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यात पोषण आहारातील दिल्या जाणारा साहित्यांची गुणवत्ता ही चांगलीच असली पाहिजे, याबाबत काही ठिकाणाहून आलेल्या तक्रारी लक्षात घेता शालेय तपासणी समवेत पोषण आहाराची तपासणी करण्याचे निर्देश खासदार चिखलीकर यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला दिले. या बैठकीत ग्रामीण विद्युत पुरवठा याबाबत चर्चा करण्यात आली. महावितरणची सेवा व ग्राहकांच्या तक्रारी यांच्याबाबत एक स्वतंत्र बैठक घेणे आवश्यक असून यासंदर्भात महावितरण विभागाने तयारी सुरू करावी, असा सूचना त्यांनी दिल्या.

00000   

Saturday, July 1, 2023

 जिल्हा परिषदेत कृषि दिन साजरा

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषिक्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल 1 जुलै ही त्यांची जयंती राज्यात कृषिदिन म्हणून साजरी केली जाते. याअनुषंगाने जिल्हा परिषदेत कृषिदिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम कृषि विभाग, जिल्हा परिषद, प्रकल्प संचालक (आत्मा) व नांदेड पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले होते.

 

मुख्य मार्गदर्शक म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी डॉ. शिवाजी शिंदे, कृषि विकास अधिकारी विजय बेतीवार, सहाय्यक प्रकल्प संचालक (आत्मा) सौ. माधुरी सोनवणे, विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ देविकांत देशमुख, सौ. माधुरी रेवणवार, तालुका कृषि अधिकारी श्री मोळके, जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) सौ. भाग्यश्री भोसले, जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी सचिन कपाळे आदी उपस्थित होते.  

 

याप्रसंगी राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी डॉ. शिवाजी शिंदे, भगवान इंगोले, आर. पी. कदम, महिला शेतकरी श्रीमती सुषमा देव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी रामराव कदम, दत्तात्रय कदम, धोंडीबा सुपारे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कृषिनिष्ठ शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, रिसोर्स बँकेचे शेतकरी, पिक स्पर्धेतील बक्षीस पात्र शेतकरी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचे लाभार्थी, कृषिक्षेत्रात काम करणारे पत्रकार यांना निमंत्रीत करण्यात आले होते.

 

यावेळी विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे यांनी खरीप पिक लागवडबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कृषि विभाग जिल्हा परिषदेमार्फत गुलाबी बोंडअळी नियंत्रण व किटकनाशके विषबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरुपात दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे धनादेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी शिवा ग्लोबल फर्टीलायझर नांदेड यांनी आंबा वृक्षाचे, इफको कंपनीतर्फे नॅनो युरिया, धानुका कंपनीमार्फत सेफ्टी किटचे शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद कृषि विभागाअंतर्गत सर्व कृषि अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषि), सर्व कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राम कवडे यांनी केले तर आभार पी. आर. माने यांनी मानले.

00000 

Friday, June 30, 2023

 जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 30 :- शेतकऱ्यांनी युरिया खताचा अति वापर टाळून पर्यायी नॅनो युरियाचा वापर पिकाच्या वाढीच्या अवस्थेत करावा. किटकनाशक फवारणी करतांना विषबाधा न होण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरक्षा किटचा वापर करुन फवारणी करावी. कापूस पिकावर गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव न होण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन प्रणालीचा वापर करावा. याबाबत कृषि विभागाने शेतकऱ्यामध्ये जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.

 

जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय कृषिनिविष्ठा सनियंत्रण समिती आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपविभागीय कृषि अधिकारी रणवीर, तालुका कृषि अधिकारी बालाजी मुंडे, कृषि अधिकारी जी.एन. हुंडेकर, जिल्हा व्यवस्थापक एम.आय.डी.सी. फड, जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके, पोलिस निरिक्षक सातपुते, बियाणे व रा.खते कंपनीचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.

 

या बैठकीत प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सर्व कंपनी प्रतिनिधी प्रयत्न करावे असे सुचित केले. तसेच कृषि विकास अधिकारी विजय राजेश बेतीवार यांनी रासायनिक खत व बियाणे उपलब्धता बाबत माहितीचे सादरीकरण केले. सर्व कंपनी प्रतिनिधी यांना जिल्हयाच्या पुरवठा नियोजनानुसार रासायनिक खताचा पुरवठा करण्याबाबत सूचना दिल्या. सर्व कंपनी प्रतिनिधी यांनी त्यांच्या रा.खत व बियाणे उपलब्धता बाबत माहिती दिली. आभार मोहीम अधिकारी सचिन कपाळे यांनी मानले.

00000

 कृषि दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 30 :- माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल 1 जुलै हा त्यांचा वाढदिवस राज्यात कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातर्फे कृषि दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

कृषि दिनाच्या दिवशी शेतीक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा वृक्ष देवून गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना किटकनाशक फवारणी करतांना वापरावयाची सेफ्टी किटचे वितरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात खरीप पिकावरील कीड व रोग तसेच हवामान बदल आधारित शेती पध्दती याबाबत शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील शेतीक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन होणार आहे. तालुकास्तरावर पंचायत समिती व कृषि विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर वृक्ष लागवड, विहीरीचे जलपुजन, विहिर पुर्नभरण, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करण्यात येणार आहे असे कृषि विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 ​प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने

शिकाऊ, पक्के अनुज्ञप्ती साठी मासिक शिबिराचे आयोजन 


नांदेड (जिमाका) दि. 30 :- प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी जुलै 2023 महिन्यात तालुक्याच्या ठिकाणी शिबिर कार्यालय आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या अधिन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट महिना सुरु होण्यापूर्वी 5 दिवसा आधी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येईल. अपॉइटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी याबाबची नोंद घेऊन शिबिर कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.


तालुक्याच्या ठिकाणी पुढीलप्रमाणे कॅम्पचे आयोजन केले आहे. कंधार येथे 3 जुलै, धर्माबाद येथे 5 व 21 जुलै, किनवट येथे 7 व 28 जुलै, मुदखेड येथे 10 जुलै, माहूर 12 जुलै, हदगांव 17 जुलै, हिमायतनगर 25 जुलै रोजी कॅम्पचे आयोजन केले आहे, असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 राज्य  उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने हातभट्टी मुक्त गाव

अभियानाअंतर्गत मार्गदर्शन सत्र संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- आयुक्त राज्य  उत्पादन शुल्क मुंबई डॉ. विजयकुमार  सुर्यवंशी व विभागीय  उपआयुक्त  राज्य उत्पादन शुल्क नांदेड श्रीमती  उषा वर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनात राज्‍य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक  अ.अ.कानडे यांनी दिलेल्या  निर्देशाप्रमाणे  निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क  किनवट विभागाचे निरीक्षक  ए.एम.शेख यांनी  किनवट तालुक्यातील शनिवारपेठ  गावात हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्रावर  मागील मे महिन्यात वारंवार गुन्हे  उघडकीस आणले व आरोपीं  विरूध्द  कायदेशिर कार्यवाही  केली आहे. या  कालावधीत एकुण 7 गुन्हे  नोंदविण्यात आले आहेत. हातभट्टी दारू,  गुळ मिश्रीत रसायण व इतर साहित्य  असा एकुण 40 हजार  किंमतीचा मुददेमाल  जप्त करण्यात आला आहे.

 

शनिवारपेठ येथील प्रतिष्ठित नागरिक,  सरपंच, सदस्य,  तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या समवेत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क किनवट व पोलीस निरीक्षक डी.ए.बोरसे यांनी  बैठक घेवून हातभट्टी मुक्त गाव हि संकल्पना  मांडली. महाराष्ट्र  दारूबंदी  अधिनियम  मधील तरतुदी   सांगितल्या. यानुसार गावकरी  आणि सरपंच श्रीमती वत्सलाबाई खंडू किरवले, ग्रामविकास अधिकारी आर.जी. कागणे यांनी  हातभट्टी मुक्त गाव करण्याबाबत  व सहकार्य करण्याबाबत आश्वासन दिले. 

 

त्यानुसार नुकतेच किनवट तालुक्यातील शनिवारपेठ  येथे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. या मार्गदर्शन सत्रास  गावकरी,  ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच,  तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड हे हजर होते. निरीक्षक  राज्य उत्पादन शुल्क किनवट ए.एम. शेख  यांनी हातभट्टी मुक्त गाव  ही  संकल्पना मांडली. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम  मधील तरतुदी  सांगितल्या यानुसार  गावकरी व  सरपंच, उपसरपंच यांनी हातभट्टी मुक्त गाव करण्याबाबत  व सहकार्य करण्याबाबत आश्वासन दिले. मार्गदर्शन सत्रास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे  दुय्यम निरीक्षक आर.पी.पवार, तसेच स.दु.नि. मो.रफि, जवान ए.आर. जाधव, एन.पी.भोकरे  व वाहनचालक डी.के.जाधव हे उपस्थित होते.

0000

Thursday, June 29, 2023

 महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता

अंबादास दानवे यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शुक्रवार 30 जून 2023 रोजी हिंगोली येथून दुपारी 2.30 वा. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 4 वा. नांदेड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी बैठक स्थळ शासकीय विश्रामगृह नांदेड. सायं. 5.30 वा. पत्रकारांशी संवाद. सायं. 6.50 वा. देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...