Saturday, July 1, 2023

 जिल्हा परिषदेत कृषि दिन साजरा

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषिक्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल 1 जुलै ही त्यांची जयंती राज्यात कृषिदिन म्हणून साजरी केली जाते. याअनुषंगाने जिल्हा परिषदेत कृषिदिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम कृषि विभाग, जिल्हा परिषद, प्रकल्प संचालक (आत्मा) व नांदेड पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले होते.

 

मुख्य मार्गदर्शक म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी डॉ. शिवाजी शिंदे, कृषि विकास अधिकारी विजय बेतीवार, सहाय्यक प्रकल्प संचालक (आत्मा) सौ. माधुरी सोनवणे, विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ देविकांत देशमुख, सौ. माधुरी रेवणवार, तालुका कृषि अधिकारी श्री मोळके, जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) सौ. भाग्यश्री भोसले, जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी सचिन कपाळे आदी उपस्थित होते.  

 

याप्रसंगी राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी डॉ. शिवाजी शिंदे, भगवान इंगोले, आर. पी. कदम, महिला शेतकरी श्रीमती सुषमा देव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी रामराव कदम, दत्तात्रय कदम, धोंडीबा सुपारे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कृषिनिष्ठ शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, रिसोर्स बँकेचे शेतकरी, पिक स्पर्धेतील बक्षीस पात्र शेतकरी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचे लाभार्थी, कृषिक्षेत्रात काम करणारे पत्रकार यांना निमंत्रीत करण्यात आले होते.

 

यावेळी विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे यांनी खरीप पिक लागवडबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कृषि विभाग जिल्हा परिषदेमार्फत गुलाबी बोंडअळी नियंत्रण व किटकनाशके विषबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरुपात दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे धनादेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी शिवा ग्लोबल फर्टीलायझर नांदेड यांनी आंबा वृक्षाचे, इफको कंपनीतर्फे नॅनो युरिया, धानुका कंपनीमार्फत सेफ्टी किटचे शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद कृषि विभागाअंतर्गत सर्व कृषि अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषि), सर्व कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राम कवडे यांनी केले तर आभार पी. आर. माने यांनी मानले.

00000 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...