Monday, June 19, 2023

 आयटीआय शिकाऊ उमेदवारासाठी

मंगळवारी भरती मेळाव्याचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :-औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने मंगळवार 20 जून रोजी आयटीआय उमेदवारासाठी शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यानी या औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 20 जून रोजी सकाळी 11 वा. उपस्थित राहावे, असे आवाहन अंशकालीन प्राचार्य पी.के. अन्नपुर्णे यांनी केले आहे.

 

या मेळाव्यासाठी पुढील व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. इलेक्ट्रीशियन/वायरमन 4, प्लंबर 3, कारपेंटर- 2, वातानुकुलित तंत्रज्ञ (एसी टेक्नीशियन)-2, संगणक चालक (ऑपरेटर)-2, टेलिफोन चालक 1, कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड नेटवर्किंग टेक्निशियन 3 असे एकूण 17 उमेवारांची भरती करण्यात येणार आहे.

0000

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या

पात्र परिसरात कलम 144 लागू 

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :-  मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 जून 2023 ते 19 जुलै 2023 पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत. 

 

याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जुलै 2023 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 विशेष वृत्त

 

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात

वाडी-वसतीवर शासन आपल्या दारीची उत्सुकता

 

· ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनातर्फे शासकिय योजनाच्या मेळाव्यावर भर

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जनसामान्यांना त्यांच्या शंका समाधानासह शासकीय योजनांचा लाभ पोहचविणाऱ्या शासन आपल्या दारी या अभिनव उपक्रमाबाबत व्यापक जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून मंडळाच्या ठिकाणी असलेल्या गावांमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे मेळावे आयोजित केले जात आहेत. यासाठी गावपातळीवरील दवंडी पासून ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सहाय्यक, कृषि सहाय्यक, अंगणवाडी सेविका या सर्वांचा समन्वय साधला जात असल्याने लाभार्थ्यांच्या विविध प्रकरणांना तात्काळ मंजुरीचे प्रमाण जलदगतीने वाढल्याचे तहसिलदार डॉ. व्यंकटेश मुंडे यांनी सांगितले.

 

लोहा तालुक्यातील किवळा व इतर मंडळांच्या ठिकाणी जवळ असलेल्या गावांमध्ये आम्ही शासन आपल्या दारी उपक्रमाच्या प्राथमिक फेरीस आयोजित करत आहोत. या मेळाव्यास सर्वसामान्यांचा मिळणारा प्रतिसाद व शासकीय योजनांकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा प्रशासनापर्यंत व्यवस्थीत पोहचल्या जात आहेत. जवळपास सर्वच योजना या ऑनलाईन पद्धतीने आता राबविल्या जात आहेत. यामुळे पारदर्शकतेसह दिलेल्या कालावधीत सदर अर्ज निकाली काढण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

लोहा तालुक्यात गत 3 महिन्यात एकुण 176 लाभार्थ्यांना तात्काळ लाभ या योजनेतून पोहचविला गेला आहे. यात श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना, इंदिरा योजना यासाठी जिल्ह्यात एकुण 140 प्रस्ताव आले होते. यापैकी 100 लोकांना लाभ पोहचला आहे. इतर प्रकरणाबाबत लवकरच निर्णय दिला जात आहे. केंद्र शासन राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेसाठी 36 प्रस्ताव प्राप्त झाले असून यापैकी 28 प्रस्तावांना लाभ देण्यास सुरू झाला असून उर्वरीत प्रकरणातील त्रुट्या पूर्ण करून त्यांनाही विकासाच्या प्रवाहात सामावून घेत जात असल्याचे माहिती तहसिलदार डॉ. व्यंकटेश मुंडे यांनी दिली.

00000





Friday, June 16, 2023

 मरणोपरांत देहदान जीवनातील सर्वश्रेष्ठ दान 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत शरीररचना शास्त्र विभागात असलेले ओमप्रकाश रामचंद्रराव सावंत रा. आंबेकरनगर तरोडा (बु) नांदेड यांनी त्यांच्या वडीलांचा देहदान करण्याचा संकल्प केला. त्यांचे वडील कै. रामचंद्र ग्यानबाराव सावंत यांच्या मरणोपरांत त्यांचा देह 8 जून 2023 रोजी शरीररचनाशास्त्र विभागास सुपुर्द केला.

 

कै. रामचंद्र ग्यानबाराव सावंत यांनी शरीररचनाशास्त्र विभागात 11 जुलै 2012 रोजी मरणोत्तर देहदान संकल्पपत्र स्वेच्छेने सादर केले होते. मरणोपरांत आपला देह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यास उपयोगी येण्यासाठी कै. रामचंद्र ग्यानबाराव सावंत यांची इच्छा मरणोपरांत त्यांच्या मुलांनी व कुटुंबियानी पूर्ण केली आहे. या कार्यात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, शरीररचनाशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अनुजा देशमुख, डॉ. एम. ए. रहेमान यांनी ओमप्रकाश रामचंद्रराव सावंत यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून देहदान संबधी मार्गदर्शन केले.

 

अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी ओमप्रकाश रामचंद्रराव सावंत यांना 13 जून 2023 रोजी देहदान प्रमाणपत्र देऊन आभार व्यक्त केले. यावेळी शरीररचनाशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अनुजा देशमुख, डॉ. एम. ए. रहेमान व डॉ. विशाल टेकाळे तसेच शरीरविकृतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. एम. ए .समीर व डॉ. सुवर्णकार उपस्थित होते. देहदान केलेल्या व्यक्तींचा आदर्श समोर ठेऊन देहदानाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी केले.

0000

 किनवट जवळील आदिवासी सावरगावने

अनुभवली शासन आपल्या दारीची प्रचिती

 

·    शासन सोबत असल्याची निर्माण झाली भावना

-  आदिवासी ग्रामस्थ सुरज कदम 

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- नांदेड जिल्ह्यातील शासन आपल्या दारी या उपक्रमानिमित्त तेलंगणाच्या काठावर असलेल्या किनवट पासून कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या देगलूर तालुक्यापर्यंत अनेक महसूल मंडळातील गावे शासन आपल्या दारी उपक्रमाची अनुभुती घेत आहेत. आज किनवट तालुक्यातील जलधारा मंडळातील सावरगाव येथे हा उपक्रम पार पडला. सर्व घरे आदिवासी असलेले हे सावरगाव आज तालुक्यातील शासकीय विभागाच्या प्रतिनिधींनी गजबजून गेले. “ज्या निष्ठेने लोककल्याणकारी भूमिका घेऊन शासन शेवटच्या टोकावर असलेल्या माणसाच्या भल्यासाठी योजना राबविते त्याची खरी प्रचिती शासन आपल्या दारी योजनेतून आली” अशी प्रतिक्रिया आदिवासी बांधव सुरज कदम यांनी दिली.

 

किनवट तालुक्यात 9 मंडळे असून प्रत्येक भागात शासन आपल्या दारीचा विश्वासार्ह दुवा पोहचावा यासाठी आम्ही नियोजन केले आहे. यातील 5 मंडळाच्या ठिकाणी प्राथमिक स्तरावरील शासन आपल्या दारीचे उपक्रम पार पडले आहेत. यातून पात्र लाभार्थ्यांचीही निवड झाली आहे. या उपक्रमामुळे प्रशासनालाही एक दिशा मिळाली असून आदिवासी भागातील लाभधारकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच या अभिनव उपक्रमाचे मोठे यश असल्याची प्रतिक्रिया किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी दिली.

 

येथील ग्रामीण भागात पांदण रस्ते, शेतासाठी जाणारे रस्ते, जमीन विषयक फेरफार, निराधार योजना, पीएम किसान योजना याबाबत या भागातील लोकांना अधिक उत्सुकता आहे. याचबरोबर केंद्र शासनासह राज्य शासनाच्या योजना त्या-त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात यासाठी महसूल, कृषि विभाग, पंचायत समितीमधील संबंधित कर्मचारी तत्पर झाले आहेत.

00000











शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक क्लबफुट दिवस संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 16 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातर्फे 14 जून रोजी जागतिक क्लबफुट (जन्मजात वाकडे पाय असलेले व्यंग) दिनानिमित्त बाहयरुग्ण विभागात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांच्या हस्ते झाले.

यावेळी क्लबफुट (जन्मजात वाकडे पाय असलेले व्यंग) असलेल्या 350 बालकांवर उपचार करण्यात आलेल्या बालकांना शैक्षणिक साहित्य देवून अधिष्ठाता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्लबफुट आजारामध्ये जन्म:तच बाळाचे पाय वाकडे असतील तर हा एक जन्मदोष असतो. याला क्लब फुट असे देखील म्हणतात. हा दोष असल्याने बाळाचे पाय आत किंवा बाहेरच्या बाजूस वळत नाहीत. काही बाळांमध्ये ही समस्या केवळ एकाच पायात दिसते तर अनेक बाळांमध्ये ही समस्या दोन्ही पायांत दिसू शकते. जर वेळीच हा दोष दूर करण्यासाठी प्रयत्न केले गेले नाही तर मुल मोठे झाल्यावर त्याला खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याला चालताना सुध्दा समस्या सुध्दा निर्माण होऊ शकते. सर्जरीच्या सहाय्याने हा जन्मदोष दूर करता येऊ शकतो. या आजारासंबंधी समस्या व उपचाराबाबत यावेळी मार्गदर्शन केले.

सन 2014 पासून क्लब फुट असलेल्या बालकांसाठी हा कार्यक्रम अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातर्फे राबविल्या जात आहे. आतापर्यंत शेकडो बालकांवर या कार्यक्रमांतर्गत उपचार व शस्त्रक्रिया करुन त्यांचे अपंगत्व दूर करण्यात आले आहे. या कार्यक्रमास डॉ.जी.एस. मनुरकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अंबुलगेकर, प्राध्यापक व विभाग प्रमुख, अस्थिरोग विभाग, नियोजन अधिकारी डोळे व क्लबफुटचे प्रतिनिधी मार्टिना मॅडम, अफ्रेड व बालकांचे पालक उपस्थित होते.
00000

Thursday, June 15, 2023

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी नामांकित निवासी शाळेत

प्रवेशासाठी 30 जून पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 15 :-  धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षे सन 2023-24  मध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याबाबत योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.  या योजनेअंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या शाळेत प्रवेशासाठी इच्छुक पालकांनी 30 जून 2023 पर्यत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बापू दासरी यांनी केले आहे.

धनगर व त्यांच्या उपजाती समाजातील विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली ते 5 वी मध्ये परीपूर्ण अर्ज भरून प्रवेश द्यावा. यासाठी नामांकित शाळेचे नाव पुढीलप्रमाणे आहेत. राजश्री पब्लिक स्कूल, वसरणी, लातूर रोड नांदेड येथे 100 मान्य विद्यार्थी संख्या, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, मालेगाव ता. अर्धापूर जि. नांदेड 100 मान्य विद्यार्थी संख्या, लिटील स्टेप इंग्लिश मेडीयम स्कूल, नायगाव (खै,) जि. नांदेड 100 विद्यार्थी संख्या, शंकरराव चव्हाण इं.स्कूल, दत्तनगर, नांदेड 100 विद्यार्थी संख्या या शाळेचा समावेश आहे. या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बापू दासरी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...