Wednesday, January 19, 2022

 *लसीकरणाची मोहीम जेव्हा नोकरीचा भाग न राहता उत्तरदायीत्वाची जागा घेते*

▪️भाजी विक्रेत्यांच्या लसीकरण मोहिमेत 1 हजार 800 विक्रेते लसवंत
नांदेड (जिमाका) दि. 19 :- त्यांचा दिवस सकाळी 9 वाजता बरोबर सुरू होतो. आवश्यक असलेले लसीकरणाचे सर्व किट, शीतपेटी, इंजेक्शन, व्हिटॅमीन डी सह पॅरासीटेमॉलच्या टॅबलेट व इतर आवश्यक साहित्य घेण्याबाबतच्या सूचना त्यांना डॉक्टर्स देतात. पाच-पाच जणांचे हे पथक वैद्यकीय अधिकाऱ्यासह तयार होते. लसीकरण केवळ शासकीय ड्युटीचा भाग नाही तर यासाठी लोकांना साक्षर करून, त्यांच्या मनातली भिती दूर करून, त्यांच्यात मिसळून लसीकरणाला गती देण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या सूचना घेऊन हे पथक कर्तव्याला निघते. आज यांच्या वाट्याला नांदेड येथील शेतकरी चौक ते छत्रपती चौक या रस्त्याच्या दुतर्फा बसलेले भाजीवाले, गाडीवाले यांची तपासणी करुन त्यांना लसीकरण करण्याची जबाबदारी आहे.
“दादा लस घेतली का ? तुमचे प्रमाणपत्र दाखवा, नाही घेतली तर खरे सांगा, याचा त्रास अजिबात होत नाही” असा विनवणीचा सूर लावत पथकातील नेमलेल्या अधिसेविका मोहिमेची सुरूवात करतात. सोबत डॉक्टर आवश्यक त्या ठिकाणी भाजीपाला विक्रेते मोबाईल मधील प्रमाणपत्र दाखवतात. ज्यांनी लस घेतली नाही ते प्रमाणिकपणे लस घेतली नसल्याचे सांगून तयारी दर्शवतात. पथकातील एक अधिसेविका शीतपेटीतून लसीची मात्रा नव्या इंजेक्शन मध्ये भरते. “दादा हात पुढे करा, काही त्रास होत नाही” असे सांगून त्या विक्रेत्याला लसवंत करते.
लसीकरणाचे हे काम कर्तव्याचा जरी भाग असला तरी मनालाही खूप सारा आनंद देणारा आहे. काही प्रसंगी लोक हुज्जत घालतात. तर अधिकांश लोक हे लसीकरण झाले नसेल याची कबुली देऊन पुढे सरसावतात. विशेष म्हणजे आहे फळ भाजीपाला विक्रेत्यांकडे मोबाईल असून त्यात त्यांनी प्रमाणपत्र सेव्ह करून ठेवले आहे, ते प्रमाणिकपणे दाखवून सहकार्य करतात, अशी प्रतिक्रिया या लसीकरणाच्या पथकाचे नेतृत्व करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंग बिसेन यांनी दिली. जिल्हा प्रशासनातर्फे रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी या 2 दिवसात विशेष मोहिम घेतली असून आज सकाळ पर्यंत 1 हजार 800 भाजीपाला व इतर विक्रेत्यांचे लसीकरण केल्याची माहिती त्यांनी दिली. जनतेनेही आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचा व राष्ट्रसेवेचा हा एक भाग समजून लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.
000000

 एकल कलाकारांनी अर्थसहायासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :-कोविड- 19 च्या पार्श्वभममिवर एकल कलाकरांना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी एकल कलावंत यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे सादर करावेत लाभार्थ्यांनी 10 दिवसाच्या आत म्हणजे 30 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करावेत असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एच एडके यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.


त्यानुसार पात्र  असलेल्या प्रती कलाकारास पाच हजार रुपये अर्थसहाय देण्यात येणार असून यामध्ये एकुण 1500 कलावंताची निवड करण्यात येणार आहे. एकल कलाकारांनी अर्जासाठी जोडायची कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. नमुन्यातील अर्ज, रहिवाशी प्रमाणपत, महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तवाचा दाखला,स्थानिक स्वराज्यसंस्थेचा दाखलाही ग्राहय असेल . तहसीलदाराकडून प्राप्त उत्पनाचा दाखला, कलेचा क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याचा पुरावा, आधार कार्ड व बँक खाते तपशिल, शिधा पत्रिका सत्यप्रत, केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलावंत मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुदेय राहणार नाही. जिल्ह्यातील एकल कलाकारांनी आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे.

00000

Tuesday, January 18, 2022

 अर्धापूर, नायगाव, माहूर मतदान शांततेत

·         अर्धापूर 81.65 टक्के, नायगाव 78.44 तर माहूर येथे 78.18 टक्के मतदान

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- अर्धापूर, नायगाव, माहूर  नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021-22 साठी आज 18 जानेवारी रोजी संपूर्ण मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली.  या सर्व केंद्रावर आज सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरूवात झाली. या निवडणूकीत मतदारांनी उर्त्स्फूत सहभाग घेतला. मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

 

अर्धापूर येथील 8 मतदान केंद्रावर 81.65 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये एकुण 2 हजार 238  स्त्री तर 2 हजार 448 पुरूष मतदारापैकी 1 हजार 874 स्त्री व 2 हजार 34 पुरुष मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. नायगाव येथील 4 मतदान केंद्रावर 78.44 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये एकुण 1 हजार 175  स्त्री तर 1 हजार 195 पुरूष मतदारापैकी 935 स्त्री व 924 पुरुष मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. माहूर येथील 5 मतदान केंद्रावर 78.18 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये एकुण 1 हजार 301  स्त्री तर 1 हजार 374 पुरूष मतदारापैकी 1 हजार 20 स्त्री व 1 हजार 71  पुरुष मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

 

अर्धापूर, नायगाव, माहूर या तीन नगरपंचायतीसाठी एकत्र एकुण मतदानाची टक्केवारी 79.93 एवढी आहे. यामध्ये एकुण 4 हजार 714  स्त्री तर 5 हजार 17 पुरूष मतदारांपैकी 3 हजार 829 स्त्री व 4 हजार 29  पुरुष मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

000000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- नांदेड जिल्ह्यात दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 19 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 2 फेब्रुवारी 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 महारोजगार मेळाव्याचे 26 जानेवारीपासून आयोजन 

·         स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विशेष उपक्रम 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता,मार्गदर्शन केंद्राच्यावतीने 26 ते 29 जानेवारी 2022 या कालावधीत महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या रोजगार मेळाव्यामध्ये नांदेड जिल्हृयातील नियोक्तांनी सहभाग नोंदवा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.याबाबत काही अडचण असल्यास 02462-251674 या दुरध्वनी क्रमाकांशी  किंवा nandedrojgar@gmail.com वर संपर्क साधावा असे पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

000000

 सण-उत्सवात ध्वनी वापराची अधिसूचना निर्गमीत 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक आदीच्या वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार सन 2022 साठी पुढील सण, उत्सव काळात 15 दिवस ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केली आहे.  

या अधिसूचनेत म्हटले आहे की, मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. 173 / 2010 दि. 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेला आदेश / निकालपत्रामध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन 1 मे, दिवाळी (लक्ष्मीपूजन), ईद-ए-मिलाद, ख्रिसमस, 31 डिसेंबर, माळेगाव यात्रा (लोककला महोत्सवासाठी) एक दिवस. तर गणपती उत्सव 2 दिवस (पहिला दिवस व अनंत चर्तुदशी), नवरात्री उत्सव 3 दिवस (पहिला दिवस, अष्टमी व नवमी ), उर्वरित 2 दिवस ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या शिफारशी नुसार जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यक्रमासाठी गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने दिले जाईल.

 

या सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतची सूट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधीत महानगरपालिका आयुक्त, स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील. ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांनी ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत प्राप्त तक्रारीवर मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात विहित पद्धतीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सदर सण उत्सव समाप्तीनंतर लगेच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. ही अधिसूचना आदेश 17 जानेवारी 2022 रोजीपासून नांदेड जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे, असेही अधिसूचनेत नमुद केले आहे.

0000

सुधारीत वृत्त –

 

नांदेड जिल्ह्यात 451 व्यक्ती कोरोना बाधित

तर 316 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 566 अहवालापैकी 451 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 374 तर अँटिजेन तपासणीद्वारे 77 अहवाल बाधित आले आहेत.  जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 94 हजार 655 एवढी झाली असून यातील 88 हजार 900 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 100  रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 229, नांदेड ग्रामीण 34, भोकर 2, देगलूर 7, धर्माबाद 1, हिमायतनगर 1, हदगाव 2, किनवट 1, लोहा 11, मुदखेड 1, मुखेड 11, नायगाव 8, उमरी 18, बिलोली 4, हिंगोली 6, परभणी 15, औरंगाबाद 2, दिल्ली 1, हैदराबाद 8, वाशीम 1, लातूर 2, अमरावती 2, निझामबाद 2, कोल्हापूर 1, जालना 3, नागपूर 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 32, नांदेड ग्रामीण 2, अर्धापूर 2, बिलोली 19, धर्माबाद 6, हदगाव 2, मुखेड 10, नायगाव 4 असे एकूण 451 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 292, खाजगी रुग्णालय 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 17 असे एकुण 316  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.  

 

आज 3 हजार 100 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 32, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 610, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 433,  खाजगी रुग्णालय 15, हदगाव कोविड रुग्णालय 1, बिलोली कोविड रुग्णालय 2 अशा एकुण 3 हजार 100 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 21 हजार 383

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 12 हजार 333

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 94 हजार 655

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 900

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.92 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-09

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-46

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3 हजार 100

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

वृत्त   निवडणूक तयारीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - विभागीय आयुक्त जी. श्रीकांत नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा छत्रपती ...