Friday, July 23, 2021

 

मागासवर्गीय विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्यातील ओबीसी प्रवर्गातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कृषी संलग्न, लघुउद्योग, सेवा उद्योग इत्यादी नवीन व्यवसाय किंवा व्यवसाय वाढीसाठी वित्त पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. इ.मा.व. प्रवर्गातील इच्छुक व्यक्तींनी अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयाचा दूरध्वनी 02462-220865 या क्रमांकावर किंवा www.msobefdc.org या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नांदेड यांनी केले आहे. 

बीज भांडवल कर्ज योजना

राष्ट्रीयकृत बँकेमार्फत बीज भांडवल कर्ज योजनातंर्गत कर्ज उपलब्ध करण्यात येईल. महामंडळाचा सहभाग 20 टक्के, लाभार्थी सहभाग 5 टक्के व बँकेचा सहभाग 75 टक्के राहील. महामंडळाच्या रक्कमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज दर असून परतफेडीचा कालावधी 5 वर्षे आहे. बँकेच्या रक्कमेवर बँक नियमानुसार व्याज दर आकारण्यात येईल. 

थेट कर्ज योजना थेट कर्ज योजना

महामंडळाकडून व्यवसायानुसार महत्तम एक लक्ष रुपयापर्यंत कर्ज देण्यात येते या योजनेत लाभार्थी सहभाग नाही. अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. नियमित 2 हजार 85 रुपये 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज द्यावे लागणार नाही परंतू थकीत झालेल्या हप्त्यांवर दसादशे 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. 

वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना

गरजू व कुशल व्यक्तींना व्यवसायाकरिता बँकेमार्फत वैयक्तिक कर्ज देण्यात येते. व्यवसायानुसार कर्ज रक्कम 1 ते 10 लाख रुपयापर्यंत बँकेमार्फत कर्ज देण्यात येते. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम महत्तम 12 टक्क्यांच्या मर्यादित व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रामाणिकरणानुसार लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. लाभार्थीने ऑनलाईन वेबपोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावे. 

गट कर्ज व्याज परतावा योजना

महामंडळाच्या निकषानुसार विहित केलेल्या निकषांनुसार वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचतगट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्था बँकेतर्फे स्वयंरोजगार, उद्योग उभारणीसाठी कर्ज दिले जाईल. त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळकडून अदा करण्याची ही योजना आहे.

*****

 

 

दहावीनंतर पुढे काय विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 23:- विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण अवगत व्हावे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन सुखकर, सफल व्हावे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची नांदेडला ये-जा पायपीट थांबावी यासाठी जिल्हा परिषद हायस्कूल मालेगाव येथे शासकीय तंत्रनिकेतनच्यावतीने दहावीनंतर पुढे काय या विषयावर मार्गदर्शन शिबीर नुकतेच संपन्न झाले. 

या मार्गदर्शन शिबिरात शासकीय तंत्रनिकेतन पॉलिटेक्निक येथील विज्ञान विभागाचे नियंत्रक एस. आर. मुधोळकर, पदार्थ विज्ञान विभागाचे के. एस. कळसकर आणि इंग्रजी विषयाचे अधिव्याख्याता ए. एन. यादव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांचे तंत्रनिकेतनची नोंदणी करण्यात आली. हा  कार्यक्रम  प्रशालेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. यावेळी प्रशालेतील शिक्षक जे. एम. तुपसौंदर, विनायक जमदाडे यांची उपस्थिती होती. प्रशालेच्यावतीने शिवा कांबळे यांनी आभार मानले.

0000

नांदेड जिल्ह्यात 5 व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 426 अहवालापैकी 5 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 142 एवढी झाली असून यातील 87 हजार 432 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 54 रुग्ण उपचार घेत असून यात 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 656 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, नायगाव 1, देगलूर 1, निझामाबाद 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकूण 5 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, खाजगी रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2,  मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 54 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 38, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 130, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 142 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 46 हजार 612

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 44 हजार 540

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 142

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 432

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 656

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.99 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-48

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-54

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

00000

 


 

जिल्ह्यातील 63 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 63 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शनिवार 24 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर,जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल,पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर  येथे एकूण 18 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तर स्त्री रुग्णालय येथे कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. तर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, खडकपुरा, अरबगल्ली, या 8 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तर शहरी दवाखाना हैदरबाग, सांगवी, विनायकनगर, करबला, पौर्णिमानगर या 5 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, धर्माबाद, हिमायतनगर, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 12 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, धर्माबाद, हिमायतनगर,मांडवी, माहूर,बारड, उमरी या 8 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100डोस उपलब्ध आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय लोहा या 3 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

जिल्ह्यात ग्रामीण भागातील 26 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर 5 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत एकुण 7 लाख 65 हजार 644 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 23 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 98 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 77हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

आयटीआयमध्ये 4 हजार 156 जागेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू 

ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 23 :-  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये सन 2021-22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील शासकीय आयटीआयत 2 हजार 616 तर खाजगी आयटीआयत  1 हजार 540 जागा अशा एकूण 4 हजार 156 जागेसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील युवक-युवतीनी या संधीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एम. एस. बिरादार यांनी केले आहे. 

इतर अभ्यासक्रमाच्या तुलनेत आयटीआयच्या विविध ट्रेडला मागणी अधिक आहे. जिल्ह्यातील प्रवेशासाठी विविध तालुकास्तरावर असलेल्या संस्थेत विविध ट्रेडसाठी जागा उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली असून यासाठी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येतो.

 

इयत्ता दहावी उत्तीर्ण, अनुर्तीण विद्यार्थी मोठया प्रमाणात आयटीआयमध्ये प्रवेश घेतात. राज्यातील शासकीय व खाजगी आयटीआयत प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. गेल्या काही वर्षापासून आयटीआयच्या प्रवेशासाठी विद्यार्थी पुढे येत आहेत.  गेल्या वर्षी राज्यात उपलब्ध जागेच्या तिपटीहून अधिक अर्ज आले होते. यावर्षी हा आकडा कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील आयटीआमधील ट्रेडमध्ये बेसिक कॉस्मेटोलॉजी, सुतारकाम, स्युईंग टेक्नोलॉजी, ड्राफ्टसमन सिव्हील, ड्राफ्टसमन मेकॅनिक, फिटर, फॉन्ड्रीमैन, आयसीटीएसएम, मशीनीस्ट, मशीनीस्ट ग्राईंडर, मेसन मेकॅनिक मोटार व्हीकल, फॅशन टेक्नोलॉजी, मेकॅनिक ट्रॅक्टर, पेंटर जनरल, शीट मेटल वर्कर, टुल अँड डायमेकर, टर्नर, वेल्डर, तारतंत्री, यांत्रिकी डिझेल, आरेखक यांत्रिकी इत्यादीचा समावेश आहे.

जिल्ह्यात शासकीय आयटीआय संस्थेची प्रवेश क्षमता पुढीलप्रमाणे आहे. नांदेड- 820, धर्माबाद- 232, किनवट- 128, हदगाव- 228, भोकर- 84, देगलूर- 164, कंधार- 92, लोहा- 104, उमरी- 188, मुखेड- 84, बिलोली- 88, माहूर- 104, अर्धापूर- 64, नायगाव- 40, मुदखेड- 152, हिमायतनगर- 24, पाटोदा- 20 असे एकूण 2 हजार 616 जागा उपलब्ध आहेत. तर जिल्ह्यातील खाजगी आयटीआयत हुजूर साहेब नांदेड- 240, नॅशनल नांदेड- 124, ग्रामीण नेहरुनगर नागलगाव कंधार- 456, माळाकोळी लोहा- 272, विष्णुपुरी नांदेड- 252, कलावतीबाई चव्हाण नायगाव- 88, ग्रामीण कंधार- 108 अशा एकुण 1 हजार 540 जागा उपलब्ध आहेत.

0000


जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 29.2 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 23:- जिल्ह्यात शुक्रवार 23 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 29.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 360.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात शुक्रवार 23 जूलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 29.6 (361.7), बिलोली- 60.3 (437.4), मुखेड- 14.4 (318.6), कंधार-17.1 (324.6), लोहा-25.7 (362.3), हदगाव-15.9 (311.4), भोकर- 20.3 (370.8), देगलूर-31 (330.7), किनवट- 21.9 (438), मुदखेड- 37.9 (397), हिमायतनगर-55.4 (373), माहूर- 3 (284), धर्माबाद- 87.7 (427.4), उमरी- 32.3 (398.7), अर्धापूर- 10.2 (378.9), नायगाव- 42.2 (352.5) मिलीमीटर आहे.

0000


 

नांदेड पाटबंधारे मंडळातील धरणात 62 टक्के पाणीसाठा


नांदेड (जिमाका) दि. 23 :- पाटबंधारे मंडळातर्गंत निम्न मानार प्रकल्पात 83 टक्के, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात (इसापूर धरण) 63.32 टक्के, येलदरी धरणात 69.57 टक्के, विष्णुपुरी प्रकल्पात 75 टक्के इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. तर मंडळातर्गंत मध्यम प्रकल्पात 60.59 टक्के, नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात 71.65 टक्के जिल्ह्यातील 88 लघु प्रकल्पात 57.59 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. बाभळी उच्च पातळी बंधाऱ्यातून तेलंगणा राज्यात 1 हजार 291 दलघमी पाणी वाहून गेले आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता स. कों. सब्बीनवार यांनी दिली.

0000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...