Tuesday, June 22, 2021

 

परिवहन कार्यालयाच्या ऑनलाईन प्रणालीचा

गैरवापर केल्यास होणार कारवाई 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व परवाना ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहे. या लोकभिमुख सोयी-सुविधांचा गैरवापर होऊ नये यासाठी या प्रणालीत आवश्यक त्या सुधारणा करण्यात येत आहेत. या ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करणारा अर्जदार, संबंधित मध्यस्थ, अनधिकृत व्यक्तींवर आवश्यक ती पोलीस कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यावतीने केली जाणार आहे. या प्रकरणी दोषी ठरलेला अर्जदार हा मोटार वाहन कायदा कलम 19 (इ) अन्वये अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरुपी अपात्र ठरेल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिली आहे. 

नागरिकांच्या सोयीसाठी  तसेच कोव्हिड -19 पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पध्दतीने देण्याची प्रणाली राज्य शासनाने नुकतीच सुरू केली आहे. या कार्यप्रणालीद्वारे राज्यातील काही ठिकाणी अनुज्ञप्ती चाचणी ही उमेदवाराऐवजी इतर अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 

वास्तविक केंद्रीय मोटार वाहन नियम 11 अन्वये, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहित केलेली परिक्षा देणे अनिवार्य आहे. या मागचा उद्देश संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे चिन्हांचे व वाहन चालकाच्या जबाबदाऱ्यांचे महत्व ही माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे जबाबदार वाहन चालक निर्माण होण्यास मदत होते. या प्रणालीचा वापर करतांना पालकांनी त्यांच्या पाल्यास या परिक्षेचे महत्त्व पटवून दयावे तसेच प्रणालीचा गैरवापर होणार नाही यांची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. 

नव्याने सुरु झालेल्या प्रणालीवर राज्यात जवळपास 16 हजार 920 शिकाऊ अनुज्ञप्ती तर सुमारे 400 नवीन वाहन नोंदणी करण्यात आली आहे. 

त्याचबरोबर जी महा ई-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, व इंटरनेट कॅफे या सुविधेचा गैरवापर करतील अशा संस्थे विरुद्ध पोलीस कारवाई करुन महा ई-सेवा केंद्राबाबत जिल्हाधिकारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलबाबत संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व इंटरनेट कॅफेविरुध्द पोलीस विभाग (सायबर सेल) यांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. नागरिकांनी असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत स्थानिक प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. या प्रणालीमध्ये नागरिकांना येणाऱ्या काही अडचणी जसे आधारकार्ड क्रमांक व त्यावरील माहिती, फोटोग्राफ हे सारथी प्रणालीवर चुकीच्या पद्धतीने दिसत असल्यास अथवा प्रदर्शित होत नसल्यास इत्यादी बाबी या राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र (एनआयसी) दिल्ली व पुणे यांच्याशी समन्वय साधुन त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

00000

 

नांदेड जिल्ह्यात 15 व्यक्ती कोरोना बाधित

दोघांचा मृत्यू तर  28 कोरोना बाधित झाले बरे   

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 249 अहवालापैकी  15 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 7 तर अँटिजेन तपासणीद्वारे 8 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 161 एवढी झाली असून यातील 88 हजार 453 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 224 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

आजच्या अहवालानुसार 21 जून 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील 64 वर्षाच्या महिलेचा तर अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील 90 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 903 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, हिंगोली 1, लोहा 1, राजस्थान 1, मुदखेड 1, मुखेड 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, अर्धापूर 2, बिलोली 3, मुखेड 1 असे एकूण 15 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 28 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 1,  मुखेड कोविड रुग्णालय 1,  जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, बिलोली तालुक्यातर्गत 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 18, खाजगी रुग्णालय 6 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 224 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 24,  मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  1, किनवट कोविड रुग्णालय 5,देगलूर कोविड रुग्णालय 4,  हदगाव कोविड रुग्णालय 1,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 119, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 49, खाजगी रुग्णालय 12 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 123, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 127 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 92 हजार 309

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 89 हजार 642

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 161

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 453

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 903

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-138

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 224

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2                       

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...