Thursday, December 17, 2020

 

उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कारासाठी

सुक्ष्म, लघू उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यातील लघु उद्योजकांकडून सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सन 2020 या वर्षासाठी रविवार 31 जानेवारी 2020 अखेर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळवले आहे. 

उद्योग संचालनालयाच्यावतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर दोन उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योगांना पुरस्कार दिले जातात. सन 2006 पासून प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे 15 हजार व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते. 

जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाच्या वेळी, उद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी पासून उद्योग आधार व एमएसएमई डेटा बँक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कमीतकमी मागील सतत दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी. थकबाकीदार असू नये. उद्योग घटकास यापुर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे. 

नांदेड जिल्हयातील लघु उद्योजकांनी रविवार 31 जानेवारी 2021 पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांच्याकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.

000000

 

 

जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी

प्रवेश परिक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 17 :- बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वीची प्रवेश परिक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यास मंगळवार 29 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर करता येईल.

 

ही प्रवेश परिक्षा शनिवार 10 एप्रिल 2020 रोजी घेण्यात येणार आहे. संबंधित शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांनी याची नोंद घ्यावी. तालुक्यातील जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना या प्रवेश परिक्षेचे ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन शंकरनगर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. व्ही. एच.व्ही प्रसाद यांनी केले आहे.

00000

Wednesday, December 16, 2020

 

कौडगाव शिवारात गोदावरी नदी पात्रातील

अवैध रेती उपसा करणाऱ्या 13 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल

गुन्हेगारामध्ये 12 व्यक्ती उत्तरप्रदेशातील   

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- उमरी तालुक्यातील कौडगाव शिवारात बाबुराव येताळे यांच्या शेतामध्ये गोदावरी नदी पात्राच्या काठावर काही व्यक्ती तराफे घेऊन गोदावरी पात्रातील अवैध रेती उपसा करण्यासाठी जमा झाले होते. याची माहिती मिळाल्यानुसार भोकर व धर्माबादच्या उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला. या छाप्यामध्ये 12 व्यक्तींना थर्माकोलच्या दोन तराफ्यासह पकडण्यात आले. या आरोपी विरुद्ध कलम महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 क्र. 48 सह कलम 188, 379, 511, 34 भादवी प्रमाणे कायदेशीर फिर्यादीनुसार उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.   

 

कौडगा येथील माधव येताळे, उत्तर प्रदेश राज्यातील केदार वर्मा, अजितसहा फागुसाहा, शंभु महतो, सुनिल बबन प्रसाद, केदार सतन यादव, रविंद्र कुमार रघुवर यादव, सुंदर कुमार यादव, जोगिंद्र यादव, रुदल श्यामलालसाह, विश्वनाथ कन्हैया साह, जीतन राजावशी साह, राजेश कन्हैया गौर यांना ताब्यात घेऊन पोलीस पुढील तपास करीत आहेत. यात माधव येताळे या व्यक्तीचा पोलीस तपास करीत आहेत.

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध कठोर पाऊले उचले असून प्रत्येक मंडळ अधिकाऱ्यांना दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोळेगाव येथील मंडळ अधिकारी मयुर शेळके यांच्या पथकात अशोक गंगासागरे, संतोष मंगरुळे, प्रकाश तायवाडे, हनमंत गायकवाड, मलुकमळे यांनी छापा टाकून करवाई केली.

*****

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे

मानवी हक्क दिवस साजरा 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सर्वसामान्य किमान कार्यक्रमांतर्गत प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष श्रीराम आर. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त चर्चासत्र व परिसंवाद, कायदेविषयक शिबिराचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड येथे गुरुवारी 10 डिसेंबरला करण्यात आले होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश-1  एस. एस. खरात व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेद्र रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

मानवी हक्क दिनाबाबत जिल्हा न्यायाधीश-1 एस. एस. खरात यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल कल्याण कक्ष नांदेड, स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ नांदेड, नेहरु युवा केंद्र नांदेड, एसबीसी सेंटर फॉर सोशल बिहेवियर चेंज कम्यूनिकेशन चाईल्ड लाईन 1098 नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र, परिसंवाद कार्यक्रम व कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी सामाजिकदृष्ट्या जनजागृतीपर विविध विषयांचे पोस्टर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात लावण्यात आले होते. बाल-विवाह सारख्या समाज विघातक प्रथावर जनजागृतीपर कविता सादर केल्या.  

यावेळी सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे सामाजिक शास्त्र संकुलचे प्रा. उषा सरोदे, नेहरु युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर, जिल्हा बाल संरक्षण आधिकारी श्रीमती विद्या आळने, चाईल्ड लाईनचे डॉ. पी. डी. जोशी, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी कल्पना राठोड, रिटेनर लॉयरचे अॅड. नय्युमखान पठाण, अॅड.  सुभाष बंडे, अॅड. आर. जी. कोनोटे, विधीज्ञ उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. उषा सरोदे यांनी तर सुत्रसंचालन अॅड. नय्युमखान पठाण केले. शेवटी आभार श्रीमती राठोड यांनी मानले.     

00000

Tuesday, December 15, 2020

 

अवैध रेतीचा उपसा करणाऱ्यांविरुद्ध

कठोर कारवाईसाठी कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, लेंडी या नदीपात्राच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा होत असल्याचे आढळून येत आहे. हा उपसा परराज्यातून स्थलांतरीत झालेल्या मजुरांच्या सहाय्याने काही स्थानिक करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अवैधरित्या वाळुचा होणारा उपसा रोखण्यासाठी व हा उपसा मोठी अवजड वाहने जसे ट्रक (टिपर), हायवा, ट्रॅक्टर आदी मार्फत केला जात आहे. 

या अवैध रेती उत्खननाला आळा बसावा व जे लोक या अवैध व्यवसायात गुंतले आहेत त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करता यावी यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 नुसार कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत. 

हा अवैध उपसा नदीपात्रातून तराफे / बोट इत्यादीच्या सहाय्याने होऊ नये, त्याची साठवणूक व वाहतूक करु नये यादृष्टिने हे कलम 14 डिसेंबर 2020 पासून 13 जानेवारी 2021 या कालावधीपर्यंत सद्यस्थितीत लागू करण्यात आले आहे. नदीलगत असलेल्या शेतकऱ्यांनी व इतरांनी रेतीचा अवैधरित्या साठा करु नये. याचबरोबर याच्या वाहतुकीसाठी कोणत्याही वाहनाचा उपयोग करु नये. सद्यपरिस्थितीत यातील संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकुण घेणे शक्य नसल्याने व तशी खात्री झाली असल्याने 1973 चे कलम 144 (2) नुसार एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली असल्याचेही जिल्हादंडाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. 

सदर बाब लक्षात घेता नदीलगत असलेल्या शेतकऱ्यांनी, परराज्यातील अथवा स्थानिक अथवा कोणत्याही व्यक्तींनी अवैधरेती उपसा, त्याची साठवणूक, त्यांची वाहतूक करण्यास दिनांक 14 डिसेंबर 2020 पासून 13 जानेवारी 2021 पर्यंत ट्रॅक्टर मालक, त्यांची नोकर, ट्रॅक्टर चालक यांना उक्त ठिकाणी रेती उत्खनन, वाहतूक, साठा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

00000

 

11 कोरोना बाधितांची भर तर

28 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 15 :-  मंगळवार 15 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 11 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 7 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 28 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या 683 अहवालापैकी 671 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 871 एवढी झाली असून यातील 19 हजार 838 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 276 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 561 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 12, खाजगी रुग्णालय 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 4, मुखेड कोविड रुग्णालय 4 असे एकूण 28 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.05 टक्के आहे.  

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 4 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 2, नायगाव तालुक्यात 1, देगलूर 1, कंधार 1, मुखेड 1, नागपूर 1 असे एकुण 7 बाधित आढळले.  

जिल्ह्यात 276 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 20, मुखेड कोविड रुग्णालय 6, देगलूर कोविड रुग्णालय 5, हदगाव कोविड रुग्णालय 6, किनवट कोविड रुग्णालय 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 127, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 32, हैदरबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 22 आहेत.  

मंगळवार 15 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 166, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 68 एवढी आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 65 हजार 203

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 40 हजार 312

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 871

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 838

एकुण मृत्यू संख्या-561

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.05 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-01

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-445

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-276

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14.          

000000

Monday, December 14, 2020

 ग्रामपंचायत निवडणूक

जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या

अर्जाची पोचपावती आवश्यक

 

          मुंबई, दि. 14 (रा.नि.आ.): राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

          श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 11 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 30 डिसेंबर 2020 पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. राखीव जागांवर निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशपत्र दाखल करताना जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणे आवश्यक राहील. विजयी झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले जाईल, असे या हमीपत्रात नमूद करावे लागेल.

०-०-०

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...