Thursday, May 21, 2020


खरेदी केंद्रावर सामाजिक अंतर, स्वच्छतेचे पालन    
शासकीय हमी भावाने कापसाच्या विक्रीसाठी
शेतकऱ्यांनी 25 मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी    
नांदेड, दि. 21 (जिमाका) :-  जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शिल्लक असलेला कापूस शासकीय हमीभावाने विक्रीसाठी पुढे दिलेल्या ऑनलाईन लिंकवर सोमवार 25 मे 2020 पर्यंत शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी करावी. त्यानंतर संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना लघु संदेश पाठविण्यात येणार असून लघु संदेशामध्ये नमूद दिनांकाला शेतकऱ्यांनी सातबारावरील पीक पेरा व उत्पादकता विचारात घेऊन फक्त एफएक्यु दर्जाचा कापूस संबंधित खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावयाचा आहे. शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर सामाजिक अंतर (Social distance) व स्वच्छतेचे पालन करून खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडावे, असे आवाहन नांदेडचे सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.  
नांदेड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शिल्लक असलेला कापूस शासकीय हमीभावाने खरेदी होणेसाठी भारतीय कापूस निगम (सीसीआय)  व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित (MSCCGMF) मुंबई यांच्यामार्फत हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. शनिवार 25 एप्रिल 2020 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाकडून देण्यात आलेल्या ऑनलाईन लिंकवर प्राथमिक नोंदणी केलेली आहे अशाच शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात येत आहे. परंतू जिल्ह्यात अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन लिंकवर प्राथमिक नोंदणी केली नसल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे कापूस शेतकऱ्यांना नोंदणीसाठी लिंक सुरू करण्याची मागणी नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी ही ऑनलाईन लिंक पुन्हा सुरू करण्यात येत असून सदर लिंक तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे.
तालुका
ऑनलाईन लिंक
माहूर
किनवट
कंधार व लोहा
नायगाव व बिलोली
मुखेड
धर्माबाद
उमरी
हदगाव व हिमायतनगर
भोकर
देगलूर
https://drive.google.com/open?id=19v5BUv4Mu6LKZaZbTmQLMa7KUd6xnFZgZyinbrr7PlQ
नांदेड, अर्धापूर व मुदखेड
महसूल प्रशासनाने दिलेल्या या ऑनलाईन लिंकवर शेतकऱ्यांनी त्यांच्या कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी सोमवार 25 मे 2020 पर्यंत प्राथमिक नोंदणी करावी. एखाद्या शेतकऱ्यांच्या नावावर यापुर्वी कापूस विक्री झालेली असल्यास त्यांचे नावावर पुन्हा कापूस खरेदी केली जाणार नाही. नॉन एफएक्यु (Non FAQ) दर्जाचा कापसाच्या खरेदीसाठी बाजार समितीचे परवानाधारक व्यापारी तसेच खाजगी बाजार समित्यांना परवानगी देण्यात आली आहे. कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीने पणन संचालक, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तालुका स्तरावर उप / सहायक निबंधक, सहकारी संस्था, कापूस पणन महासंघाचे प्रतिनिधी व बाजार समितीचा सचिव यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे, अशी माहिती सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिली आहे.  
00000


सोशल डिस्‍टन्‍ससिंगचे पालन करुन धान्‍य घ्‍यावे ;
प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेतून
तूरदाळ, चना दाळीचे मोफत वितरण सुरु
नांदेड, दि. 21 :-  प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील पात्र लाभार्थ्‍यांना एप्रील, मे व जून 2020 साठी अन्‍नधान्‍याचे दिलेल्‍या नियमित नियतनानंतर अंत्‍योदय  आणि प्राधान्‍य कुटुंब योजनेतील कार्डधारकांना प्रतिमाह 1 किलो डाळ या परिमानात (तूरडाळ व चनाडाळ या दोन्‍हीपैकी एक डाळ 1 किलो या कमाल मर्यादेत) पॅाश मशीनद्वारे मोफत वाटप होणार आहे. शिधापत्रिकाधारकांनी स्वस्‍तधान्‍य दुकानात गर्दी न करता सोशल डिस्‍टन्‍ससिंगचे पालन करुन धान्‍य प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्‍हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक यांनी केले आहे.  
नांदेड जिल्‍हयातील 16 तालुक्यांना अंत्‍योदय अन्‍न योजनेतील  80 हजार 124 शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्‍य कुटुंब येाजनेतील 4 लाख 10 हजार 201 शिधापत्रिकाधारकांना या येाजनेंतर्गत मोफत डाळीचे वितरण करण्यासाठी प्रतिमाह 528 मे. टन डाळ मंजुर करण्‍यात आले आहे. मोफत डाळ एपीएल शेतकरी व एपीएल केशरी लाभार्थ्यांना मिळणार नाही. याबाबत संबंधित तहसिलदार तसेच स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांना नमूद जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्‍यांना डाळ वाटप करण्‍याबाबत सूचना देण्‍यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्‍यातील विशिष्‍ट आपत्‍कालीन परिस्थिती विचारात घेता  लक्ष्‍य निर्धारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील लाभार्थ्‍यांना  एप्रील, मे व जून 2020 या तीन महिन्‍याचे नियमित अन्‍नधान्‍याचे वाटप झाल्‍यानंतर त्‍या-त्‍या महिन्‍यात  या दाळीचे मोफत वितरण सुरु होणार आहे. सध्‍या नांदेड जिल्‍हयातील नायगाव, मुदखेड तालुक्‍यात मोफत डाळीचे वितरण सुरु झाले असुन उर्वरित तालुक्‍यात चालु आठवड्यामध्‍ये मोफत डाळीचे वितरण सुरु होणार आहे.
एप्रील 2020 साठीच्‍या एका महिन्‍याची डाळ वाटप मे 2020 महिन्‍यामध्‍ये करण्‍यात येणार असून मे व जून 2020 च्‍या डाळीच्या वाटपाबाबत नंतर स्‍वतंत्ररित्‍या कळविण्‍यात येईल.  नांदेड जिल्‍हयात एकूण 1 हजार 993 रास्‍त भाव दुकानदार असुन या सर्व रास्‍त भाव दुकानदारांना सर्व योजनेचे मे 2020 साठी 27 हजार 226 मेट्रीक टन धान्‍य सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेंतर्गत लाभार्थ्‍यांना वितरणासाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे .
        नांदेड जिल्‍हयातील बुधवार 20 मे 2020 पर्यंत  मे 2020 चे नियमीत अन्‍न धान्‍य वितरण 1 हजार 993 रास्‍त भाव दुकानदाराकडुन अंत्‍योदय योजनेत 2 हजार 661, प्रा.कू.योजनेचे 8 हजार 182, एपीएल केशरी (शेतकरी) योजनेचे 1 हजार 821 आणि एपीएल केशरी (एनपीएच) 606 असे एकुण  13 हजार 270 मेट्रीक टन सर्व योजनेतील पात्र लाभार्थ्यांना नियमित धान्‍य वाटप झाले असून प्रधानमंत्री गरीब कल्‍याण योजनेंतर्गत अंत्‍योदय अन्‍न योजना व प्राधान्‍य कुटुंब योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना 4 हजार 592 मेट्रीक टन मोफत तांदुळ वितरण करण्‍यात आला आहे.
राज्य अन्‍न व नागरी पुरवठा ग्राहक सरक्षण विभागाचा शासन निर्णय 9 एप्रिल 2020 मध्‍ये शासनाने असे निर्देश दिले आहेत की, नोव्‍हेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या तसेच ज्‍या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सीडींग झाले नसेल अशा शिधापत्रिकाधारकांना एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना ज्‍यांचे वार्षीक कौटुंबीक उत्‍पन्‍न 1 लाखाच्‍या आत आहे. अशा लाभार्थ्‍यांसाठी  माहे मे व जून 2020 या 2 महिन्यांच्‍या कालावधीसाठी प्रति महिना प्रति व्‍यक्‍ती 3 किलो गहु  (8 रु प्रति किलो प्रमाणे ), व तांदुळ 2 किलो ( 12 रु प्रति किलो प्रमाणे)  दराने अन्‍नधान्‍याचा लाभ देण्‍यात येणार असल्याची माहिती जिल्‍हाधिकारी नांदेड व जिल्‍हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
000000

Wednesday, May 20, 2020


व्यवसायिकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्याने दोन दिवसात
नांदेड शहरातील 13 दुकानदारांकडून 65 हजार रुपयांचा दंड वसूल  
नांदेड, दि. 20 :-कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात कोरोना विषयक नियम लागू केले आहेत. नांदेड वाघाळा शहर महापालिका क्षेत्रात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आज दुसऱ्या दिवशी सहा दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 19 व 20 मे या दोन दिवसात नांदेड शहरातील 13 दुकानदारांकडून 65 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. व्यवसायिकांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शहरातील दुकाने सुरु करण्याची सशर्त परवानगी दिली. तर काही दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व निश्चित केलेल्या नियम व अटी न पाळणाऱ्या दुकानावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपआयुक्त विलास भोसीकर व सुधिर इंगोले यांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवार 20 मे रोजी दुसऱ्या दिवशी या पथकाने गुरुकृपा कलेक्शन रविनगर चौक कौठा, अपना ड्रेसेस वजिराबाद, लक्ष्मी कापड श्रीनगर नांदेड, मयुर मेन्स वेअर आनंदनगर नांदेड या दुकानांना परवानगी नसताना दुकाने उघडल्याबद्दल तसेच आर.सी.एफ शॉपर्स मार्ट श्रीनगर नांदेड, महालक्ष्मी ऑईल शोरुम आनंदनगर नांदेड यांनी दुकानामध्ये पाचपेक्षा जास्त लोक जमविल्यामुळे तर बालाजी किराणा ॲन्ड जनरल स्टोअर्स सिडको यांनी निर्धारित वेळेवर दुकाने बंद न केल्याने या सात दुकानांना पथकाच्यावतीने प्रत्येकी 5 हजार रुपये असे कएुण 35 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
तसेच मंगळवार 19 मे रोजी या पथकाने नांदेड शहरातील सहा व्यवसायिकांनी सुरक्षित अंतर न ठेवणे, दुकाने उघडण्याची परवानगी नसताना दुकाने उघडणे, ठरवून दिलेल्या वेळेत दुकाने बंद न करणे यासाठी प्रत्येकी 5 हजार रुपये याप्रमाणे 30 हजार रुपये दंड वसुल केला आहे. दोन दिवसात एकुण 13 दुकानदारांकडून 65 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
नांदेड मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विलास भोसीकर, सुधीर इंगोले यांच्या पथकाने रमेश चवरे, औकार स्वामी, अशोक भांगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.
00000


कोरोनाचे नवीन चार रुग्ण
64 स्वॅबची तपासणी चालू
नांदेड, दि. 20 :- कोरोना विषाणु संदर्भात बुधवार 20 मे 2020 रोजी सायं. 7 वा. नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिलेल्या माहिती नुसार बुधवार 20 मे रोजी प्राप्त एकुण 13 अहवालापैकी 4 रुग्ण पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 110 वर पोहचली असून उर्वरीत 31 नवीन व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले तर 33 स्वॅब प्रलंबित असून एकुण 64 स्वॅबची तपासणी चालू आहे.  
नवीन 4 पॉझिटिव्ह रुग्ण पुरुष असून त्यांचे वय अनुक्रमे 24, 32, 33, 54 आहे. स्नेहनगर पोलीस कॉलनी, सांगवी नांदेड, तालुका मुखेड, भोकर येथील प्रत्येक एक याप्रमाणे 4 रुग्ण असून त्यांच्यापैकी 2 रुग्ण शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे, एक रुग्ण उपजिल्हा रुग्णालय मुखेड व एक रुग्ण ग्रामीण रुग्णालय भोकर येथे औषधोपचार घेत आहेत. सद्य:स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे.  एकुण 110 रुग्णांपैकी 5 रुग्णांचा मृत्यू झाला तर 36 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोनाचे 67 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 51 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटरमध्ये 2 रुग्ण, तर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे 2 रुग्ण, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे एक रुग्ण, भोकर ग्रामीण रुग्णालय येथे 1 रुग्ण असून या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.
 सर्व जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


अनुदानावर मिनि ट्रॅक्टर योजना 153 बचतगट पात्र
ईश्वर चिठ्ठीने (लकी ड्रॉ) बचतगटांची निवड होणार ;
सोडतीचा दिनांक लवकर कळविला जाणार  
नांदेड, दि. 20 :- अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर  9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर, त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याच्या योजनेंतर्गत एकूण 153 बचतगट पात्र झाले असून ईश्वर चिठ्ठीने (लकी ड्रॉ) पात्र बचत गटांपैकीच निवड होणार असून सोडतीची वेळ आणि दिनांक यथावकाश लवकर कळविण्यात येणार आहे, असे आवाहन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर  9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. शासन निर्णय 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या  स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सन 2018-19 या वर्षात ज्या बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी अर्ज केला  होता. त्या सर्व अर्जांची तपासणी केली असता अर्जात त्रुटी आढळून आल्या असून एकुण 153 बचत गटांनी त्रुटीची पूर्तता केली आहे. पात्र व अपात्र बचतगटांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर दर्शनी ठिकाणी लावण्यात आली आहे. अर्ज केलेल्या सर्व बचत गटांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी यापूर्वीच चार वेळा संधी देण्यात आली होती. पहिली संधी 10 जुलै 2019 पर्यंत तर दुसरी 12 डिसेंबर 2019 पर्यंत व तिसरी संधी 30 डिसेंबर 2019 पर्यंत आणि चौथी संधी 14 फेब्रुवारी 2020 पर्यंत देण्यात आली होती.
000000

Tuesday, May 19, 2020


अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेसाठी
ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन
नांदेड, दि. 19 :- शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत मे 2020 व त्यापुढे होणाऱ्या सर्व अखिल भारतीय परीक्षेचे प्रात्यक्षिक परीक्षा आस्थापनेने घ्यावे, असे सुचित केले आहे.
देशात कोविड 19 मुळे 110 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा झाली नसल्याने ती पुढे होणार आहे. सर्व आस्थापना मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड अंतर्गत आस्थापनावरील ज्या उमेदवाराचे प्रशिक्षण 15 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण झाले आहे. अशा सर्व उमेदवारांची परीक्षा एकत्रित होणार असल्याने आपल्या आस्थापनेतील ज्या उमेदवाराचे प्रशिक्षण 15 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण झाले आहे. अशा सर्व उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षा अर्ज हे www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळावर भरण्यात यावे. त्या अर्जाची प्रिंट व परीक्षा शुल्क प्रस्तूत आस्थापनेत जमा करण्यात यावे, असे एम. बी. कुलकर्णी, अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांनी कळविले आहे.  
000000



करबला भागात नवीन एक कोरोना रुग्ण
आतापर्यंत 2 हजार 441 अहवाल निगेटिव्ह ;
एकुण 130 स्वॅबची तपासणी चालू    
नांदेड, दि. 19 :- शहरातील करबला भागात एक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण पुरुष (वय 60 वर्षे) आढळला असून या रुग्णावर यात्री निवास एनआरआय भवन येथे औषधोपचार सुरु आहेत. सद्य:स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे.
आतापर्यंत एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 22 हजार 57 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकुण 2 हजार 730 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहे. त्यापैकी 2 हजार 441 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून एकुण 130 स्वॅबची तपासणी चालू आहे. या घेतलेल्या एकुण स्वॅब पैकी 98 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
आतापर्यंत एकुण 98 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 5 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर 30 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 61 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 49 रुग्ण आणि बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये 2 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच आपल्या मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असेही आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...