Friday, March 27, 2020


अत्यावश्यक वस्तूची वाहतूक :  
नियंत्रण कक्ष स्थापन ; वाहतूक प्रमाणपत्राचे वितरण   
नांदेड दि. 27 :- कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळीच उपाययोजना केल्या आहेत. अत्यावश्यक सेवा व वस्तू यांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनांना कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा क्रमांक 842 180 0099 असा आहे.
अत्यावश्यक वस्तुची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिमा तपासणी नाके देगलूर, बिलोली आणि सिमा तपासणी केंद्र भोकर यांच्याकडून वाहतूक प्रमाणपत्र दिले जात आहे. जिल्ह्यातील सर्व मालवाहूकदारांनी संबंधित ठिकाणी संपर्क साधावा. त्यांच्या वाहनातून अत्यावश्यक वस्तुची वाहतूक करणार असल्याबाबत पुरावा सादर करुन प्रत्येक वाहनासाठी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.
संचारबंदीमुळे ज्या वाहनधारकांना परिवहन कार्यालयात येणे शक्य नाही त्यांनी कार्यालयाच्या mh26@mahatranscom.in या ई-मेलवर वाहन क्रमांक नमूद करुन अर्ज केल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्रमाणपत्र दिले जाईल. याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000



नागरिकांच्या मदतीसाठी :
नियंत्रण कक्षाची स्थापन
नांदेड दि. 27 :-संचारबंदी व लोकडाऊनच्या अनुषंगाने नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात एक सुसज्ज नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आला आहे. येथील दूरध्वनी क्रमांक 02462- 234720 व हेल्पलाइन क्रमांक 1091 व 100 क्रमांकाच्या पाच लाईन सुरु करण्यात आल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यात व शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून राज्यभर कलम 144 फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे पोलिसांसोबत सुसंवाद साधण्यासाठी व त्यांच्या समस्या, तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुविधा व्हावी. यासाठी नांदेड जिल्हा पोलिस दलातर्फे व्हाट्सअप मेसेज सेवा सुरु करण्यात आली आहे. ही सेवा 24 तास उपलब्ध असते त्याचा क्रमांक 88888 89255 हा आहे. त्यावर देखील नागरिकांना माहिती दयावी, असे आवाहन नांदेडचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.  
00000


अत्यावश्यक वस्तु पुरवठा करणाऱ्या
वाहनांना वाहतूक प्रमाणपत्राचे वितरण
नांदेड दि. 27 :- कोरोना विषाणू संदर्भात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थिती संदर्भात अत्यावश्यक सेवा, वस्तु यांचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना वाहतूक प्रमाणपत्र देण्यासाठी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शनिवार 28 मार्च 2020 पासून कक्ष स्थापन करण्यात येत असून कक्ष सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कार्यान्वित राहील.
या कक्षाचा ई-मेल आयडी  collectoroffice09@gmail.com असून जिल्ह्यातील वाहनधारकांना प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा ईमेलवर अर्ज करता येईल. सोबत वाहनाचे आरसीबुक, फिटनेस प्रमाणपत्र, करपावती, वाहनांचा विमा, परमिट आदी वैध कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांच्या वाहनासाठी वाहतूक प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तालुका स्तरावरसुद्धा तहसिल कार्यालयात वाहनधारकांना वाहतूक परवानगीसाठी अर्ज करु शकतील. याची नोंद जिल्ह्यातील वाहतूक संघटना व वाहनधारकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


अत्यावश्यक सेवांच्या वाहतूकीस बंदी नाही  
-          जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 
नांदेड,दि. 27: शासनाच्‍या अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या वाहूतकीस बंदी नाही, असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात ट्रान्‍सपोर्टर्सच्‍या बैठकीत आज ते बोलत होते.  
यावेळी ट्रान्‍सपोट्रर्सचे जिल्‍हाध्‍यक्ष जाहेद भाई, जिल्‍हा मालक असोसिएशनचे अध्‍यक्ष सुखासिंग हुंडा, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन विभागाचे राहूल जाधव, जिल्‍हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक आदींची उपस्थिती होती.
डॉ. विपीन म्‍हणाले, अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या वाहतूकीच्‍या अनुषंगाने वाहनांसाठी पासेस उपलब्‍ध करून देण्‍यासाठी, जिल्‍हाधिकारी कार्यालयातील कक्षात महसूल, पोलीस‍ विभाग, परिवहन विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.
अत्‍यावश्‍यक सुविधेसाठी पासेस‍ मिळण्‍याबाबत मागणी प्राप्‍त होताच पासेस निर्गमित करण्‍यात येतील. पासेसची प्रत वाहनाच्‍या समोरील भागात काचेच्‍या मधल्‍या बाजूने लावणे बंधनकारक राहील.
तालुक्‍याच्‍या ठिकाणी महसूल व पोलीस विभाग यांचे नियंत्रण कक्ष उघडण्‍यात येत आहे. त्‍यांच्‍याकडून अर्ज आल्‍यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ई-मेलद्वारे कार्यालयाची मान्‍यता आल्‍यानंतर परवाना निर्गमित करावा. वाहतूकदारांनी collectoroffice09@gmail.com या ईमेलवर मागणी करावी. अत्‍यावश्‍यक वाहनांची ने-आण करावी. इतर बाबींची ने-आण केल्‍याचे आढळल्‍यास कडक कारवाई करण्‍यात येईल, असेही जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी बैठकीत सांगितले.
अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या वाहनांमध्‍ये माल चढविणे व उतरविणे या कामी माथाडी कामगार व हमालांची मोठया प्रमाणात गरज आहे. संचारबंदी काळात या सेवेत व्‍यत्‍यय करू नये, म्‍हणून सहाययक आयुक्‍त कामगार व अध्‍यक्ष माथाडी कामगार युनियन यांना जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी सूचना दिल्‍या.
या कामगारांना ते ज्‍या ठिकाणी सेवा देणार आहेत ते ठिकाण नमूद करण्‍यात यावे. जिल्‍हयातील अत्‍यावश्‍यक सेवा घ्‍यावयाच्‍या सर्व ठिकाणी माथाडी कामगार यूनियन, हमाल यूनियन यांनी हमाल उपलब्‍ध करून दयावेत. अडचण आल्‍यास जिल्‍हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक यांचेशी संपर्क साधावा.
सदयपरिस्थितीमध्‍ये संचार बंदीच्‍या काळात कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये धान्‍यांची उलाढाल बंद असल्‍यामुळे ठोक विक्रेते यांच्‍याकडे मालाची कमतरता जाणवू नये, म्‍हणून नोंदणीकृत आडती यांनी ग्रामीण भागात गाळे आपसात घेवून धान्‍यांचे अंतर राखून (सोशल डिस्‍टंन्‍स) खरेदी करावी. त्‍यानूसार ठोक विक्रेते अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या कृषी प्रक्रिया उद्योग याठिकाणी मालाच्या उपलब्‍धतेसाठी सहकार्य करावे. जिल्‍हयातील बेघर, अतिशय गरीब व गरजू व्‍यक्‍तींना मदत करण्‍यासाठी एमआयडीसी असोसिएशन व्‍यापारी व उत्‍पादक यांना मदतीचे आवाहन यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले. या कामात मदत देण्‍यासाठी सुसाहय व्‍हावे म्‍हणून जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत पासेसचे वितरण करण्‍यात येणार आहे, असेही जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले.
यावेळी संचारबंदीच्‍या काळात माथाडी कामगार उपलब्‍ध होण्‍याच्‍या अनुषंगाने एमआयडीसी असोसिएशन, उपनिबंधक अध्‍यक्ष, माथाडी असोसिएशन यांची बैठक घेण्‍यात आली.
000

Wednesday, March 25, 2020

कोरोनाचा प्रतिबंध आणि उपाय योजना संदर्भात नांदेड जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा  दिवसरात्र काम करीत आहे ,करोना चाचणी चे सँपल आणि स्वाब यासंदर्भातलं काम  शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील संतोष बेटकर,प्रयोगशाळा तंत्रज्ञ  करीत आहेत . नांदेड जिल्ह्यातील परदेश प्रवास करून आलेल्या नागरिकांचे पुणे  NIV येथें  हे सँपल आणि स्वाब घेऊन जाण्याचे काम बेटकर करत असून त्याचे  परत पुण्याहून अहवाल  आणण्याचे काम करीत आहेत ,आत्ता पर्यन्त एक ही व्यक्ती चा report positive  आला नाही ही आपल्या सर्वासाठी सकारात्मक बाब आहे, त्याच्या या कार्याला आपण दाद दिली पाहिजे,

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी
कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा घेतला आढावा

नांदेड दि. 25 :- करोना प्रतिबंध व नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर,आमदार अमर राजूरकर उपस्थित होते. यावेळी करोना प्रतिबंध व नियंत्रणा संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी  दिली.
0000


भाजीपाला अत्यावश्यक सुविधेत येत असल्याने
भाजीपाल्यांचे दुकाने अंतरावर मार्कींग करुन सुरु करावेत
--- जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे निर्देश
नांदेड दि.  25 :- भाजीपाला अत्यावश्यक सुविधेत येत असल्याने भाजीपालाचे दूर-दूर अंतरावर मार्कींग करुन दुकाने ठेवण्यात यावेत. त्या-त्या ठिकाणावरील पोलीस विभागामार्फत सुरक्षा व्यवस्थेची मदत घेण्यात यावी.  सकाळपासून 24 तास भाजीपाला दुकानावर विक्री करता येतील,  परंतु ग्रामीण भागात 8 ते 11 यावेळेतच भाजीपाला विक्री करण्यात यावी. यावर तलाठी, ग्रामसेवक यांनी नियंत्रण ठेवावे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्देश दिले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निजी कक्षात आढावा बैठक घेण्यात आला. 
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्यचिकित्सक                    डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे, डॉ. वाय. आर. पाटील, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वाय. आर. पाटील, सहायक आयुक्त अजितपाल संधू, विलास भोसीकर, मिर्झा फरनुला बेग, गुलाम महमंद आदी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानदारांना तीन महिन्यांचे अन्न धान्य देण्याचे नियोजन करण्यात यावे. अन्न-धान्याची अनियमितपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच वार्डनिहाय नियोजन करुन धान्य वाटप करण्यात यावे. गर्दी होणार नाही याचीही दक्षता घेण्यात यावी. तीन फुटाचे अंतरावर नागरिकांना उभे राहण्यासाठी मार्कींग करुन देण्यात यावे. स्वस्त-धान्य दुकानदारांना सॅनिटाझर व मास्क ठेवण्याचे सांगण्यात यावे. वार्डासाठी वेळा ठरवून देण्यात यावेत. अत्यावश्यक सुविधा असलेली अन्न-धान्य, औषधीची ने-आण करणाऱ्या वाहनांची माहिती जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक यांच्याशी मो. 9423255890 क्रमांकावर संपर्क साधावा. 
किरणा दुकानदारांनी स्वयंसेवी व इच्छूक मुले त्यांच्यामार्फत घरपोच धान्य देण्यात यावे. दुकानासममोर त्यांनी फलक लावण्यात यावेत. किराणा दुकाने 24 तास चालू ठेवता येतील. ग्राहकांची यादी असेल, तर त्यांना फोनद्वारे सामानाची यादी मागवून घेवून त्यांना वेळ ठरवून देऊन सामान घेवून जाण्यास सांगण्यात यावे.
आरबीसी तपासणी पथक विमानतळ, रेल्वेस्टेशन, बसस्थानक याठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या पथकांची पुणे-मुंबई येथून आलेल्या व्यक्तींना तपासणी करण्याबाबत समज देण्यात यावी. एम.एस. आणि टीएचओ यांनी याबाबतचे लेखी आदेश काढावीत. कोणतेही जिल्हा व तालुका स्तरावरील मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थ्यांची मदत घेण्यात यावी. यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसिलदारांनी कार्यवाही करावी. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी लक्ष ठेवावे. खाजगी दवाखाण्यांची सुविधा बंद करण्यात आलेली ओपीडी सेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी. ओपीडी चालू असल्याचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांनी लेखी कळवावे. तालुकास्तरावर 50 बेड उपलब्ध करण्यात आली होती. परंतु आणखी अधिक 50 बेडची उपलब्धता करुन ठेवण्यात यावी. तालुकास्तरावरील खाजगी दवाखाने व व्हेंटिलेटर उपलब्ध असल्यास दवाखानानिहाय यादी तयार करावी. नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास मास्कची किंमत रुपये दहा, तर सॅनिटाझरची रुपये शंभर अशी आहे. तेंव्हा तालुका आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध निधीतून खरेदी करुन देण्यात यावेत, उपलब्ध झाली नाही, तर जिल्हास्तरावर याबाबत माहिती कळविण्यात यावी.
तालुका स्तरावरील बचत गटामार्फत कापडी मास्क तयार करण्यात यावेत. मास्क दिवसा वापरून संध्याकाळी धुवून परत वापरता येतील. तसेच पोलीस, महसूल कर्मचारी यांना उपलब्ध करुन देण्यात यावे. आरबीसी तपासणी पथक विमानतळ, रेल्वेस्थानक, बसस्थानक या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या पथकांनी पुणे-मुंबई येथून आलेल्या व्यक्तींची तपासणी करावी.
दिवसातून एक वेळेस दुपारी फवारणी करण्यात यावी. स्वयंसेवी संस्थेच्या  पुढाकाराने आवश्यक मदत घेता येईल त्याची माहिती घ्यावी. मॉलच्या ठिकाणी बाहेर फलक लावण्यात यावा. तसेच त्या ठिकाणी साबण किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करुनच प्रवेश देण्यात यावा. घरपोच आवश्यक साहित्य देण्यात यावे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत अंतर्गत रोजंदारांची जेवणाची व्यवस्था स्वंयेवी संस्थेमार्फत करण्यात यावी. स्वयंसेवी संस्था, आमदार, नगरसेवक यांच्या मदतीने गरजू नागरिकांना जेवणाची व्यवस्था करावी.
किराणा दुकानातील कामगारांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून ओळखपत्रे देण्यात येतील. यासंदर्भात नोडल अधिकारी म्हणून श्री. पी. जी. देशपांडे मो. 9923258261 यांच्याकडे संपर्क साधावा. वैद्यकीय औषधीचा जास्तीचा अनावश्यक साठा ग्राहकांना देण्यात येवू नये. शहरामध्ये स्वच्छता निरीक्षक यांच्यावतीने गरजूंना यांना आयडेंटीफाय (ओळखून)  करुन त्यांना अन्न घरपोच देण्यात यावे. सुरक्षिततेसाठी आवश्यकता भासल्यास पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी.
मुंबई-पुणे येथून आलेल्या नागरिकांना त्यांचे घरी येण्यास मज्जाव करीत असलेल्या नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांची आरोग्य तपासणी करुन घरी क्वारंटाईसाठी ठेवण्यासाठी सांगून समज काढण्यात यावी.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव दूर करण्यासाठी कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी,  घरमालकांनी समजून घेण्याची गरज आहे. यासाठी सहकार्य कार्य करावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी बैठकीत सांगितले.
जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था काही मदत घेवून अन्नदान व इतर मदत करु इच्छिणाऱ्या व्यक्तींना जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. यासाठी नोडल अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9822426849 व 02462-235303 क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले. हायपो क्लोराईडची फवारणी सर्व शहरी भागात मनपाने करावी. तर ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत गर्दीच्या ठिकाणी बसस्थानक, रेल्वे स्थानक च अन्य गर्दीच्या ठिकाणी फवारणी करण्यात यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिले.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मगर म्हणाले की, भाजीपाला बाजार, किराणा दुकान या ठिकाणी गर्दी न करता आवश्यक अंतर ठेवण्यासाठी महसूल व पोलीस अधिकारी यांना मदत करावी. तालुकास्तरावर सॅनिटाझर व मास्क यांचा तुटवडा भासत असल्यास औषधी दुकानावर तहसिलदारांनी छापे टाकावेत.
सर्व तालुकास्तरीय अधिकारी तसेच तलाठी, ग्रामसेवक यांनी मुख्यालयी रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात कामचुकारपणा केला तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी निर्देश देण्यात आले.  
0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...