Thursday, December 26, 2019

किसान क्रेडीट कार्डचा लाभ
मत्स्यकास्तकार, मच्छिमारांनी घ्यावा
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचे आवाहन
            नांदेड, दि. 26 :- मच्छिमार, मत्स्यव्यवसायीक, मत्स्यकास्तकार आणि मत्स्यव्यवसायाशी निगडीत व्यक्तिंनी आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नांदेड यांनी केले आहे.
बॅंकेशी संपर्क साधुन किसान क्रेडीट कार्डसाठी अर्ज करावा. बॅंक खात्याच्या त्याचप्रमाणे आधारकार्डच्या तपशिलासह किसान क्रेडीट कार्ड योजनेच्या अर्जाची एक प्रत आणि मच्छिमार सहकारी संस्थेमार्फत विहीत नमुन्यातील विवरणपत्रात सभासदांची तपशिलवार माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, देवाशीष कॉम्प्लेक्स, डॉक्टर लेन, स्टेट बॅक ऑफ इडिया समोर, घामोडीया फॅक्टरी कंपाउड, नांदेड येथे सादर करावा. जेणेकरुन मत्स्यव्यवसाय विभागामार्फत ही संबंधित बॅकेला आपणास किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ देण्याविषयी शिफारस करता येईल. 
किसान क्रेडीट कार्ड ही योजना राष्ट्रीय कृषी व ग्रामिण विकास बॅक (नाबार्ड) यांच्यामार्फत कार्यान्वीत झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी मुदतीची कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. जेणेकरुन शेतकऱ्यांना वेळेत सहज व सोप्या पध्दतीने अर्थसहाय्य कर्जस्वरुपात प्राप्त होईल त्यांना त्यांच्या सवडी व निवडीप्रमाणे शेती विषयक कामे पुर्ण करता येतील.  
पीक काढणी पश्चात विपणन व्यवस्था करण्यासाठी किसान क्रेडीट कार्ड (KCC) योजनेअंतर्गत लाभ मिळु शकतो. या सर्व बाबींचा विचार करुन तसेच किसान क्रेडीट कार्ड योजनेची सकारात्मक व उत्साहवर्धक फलनिष्पत्ती पाहुन सन 2018-19 च्या अर्थसंकल्पामध्ये किसान क्रेडीट कार्डचा लाभ शेतकऱ्यांव्यतिरिक्त मच्छिमार, मत्स्यकास्तकार, पशुसंवर्धक इत्यादींनाही मिळणार असल्याची घोषणा केंद्र सरकार मार्फत करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या घोषणेच्या अनुषंगाने भारतीय रिझर्व बॅकेने 4 फेब्रुवारी 2019 रोजीच्या पत्रान्वये किसान क्रेडीट कार्डची व्याप्ती वाढवुन मत्स्यकास्तकार, मच्छिमार, मत्स्यव्यवसायीक, पशुसंवर्धक, दुग्धव्यवसायीक, कुकुटपालक इत्यादींनाही सामावुन घेऊन लाभ देण्याविषयी मार्गदर्शन सुचना निगर्मित केलेल्या आहेत.
            राज्यातील मत्स्यकास्तकार, मत्स्यव्यावसायीक, मत्स्यसंवर्धक व मच्छिमारांना मत्स्यव्यवसाय संबंधित दैनंदिन कामे करण्यासाठी आर्थीक मदतीची गरज असते. सागरी भागात नौका मासेमारीसाठी समुद्रात जाण्याआधी त्याकरीता लागणारे डिझेल, किराणा, बर्फ यासाठी मच्छिमारांस किमान एक ते दोन लाख इतक्या रक्कमेची आवश्यकता असते. त्याकरीता मच्छिमारास सावकार अथवा खाजगी आर्थिक सहाय्य करणा-या संस्था यांचेकडुन कर्जरुपाने मदत घ्यावी लागते. मच्छिमारांस यापोटी मोठया प्रमाणात व्याज भरणा करावे लागते. त्याचप्रमाणे मत्स्यव्यवसायाशी निगडीत इतर कामे पुर्ण करण्यासाठी जसे कोळंबी, मत्स्यबीज, खाद्य, औषधे, खते, तलावांचे नुतनीकरण, मत्स्यबीज / कोळंबी बीज उत्पादन केंद्रासाठी आवर्ती खर्च मासळी विक्रीसाठी खेळते भांडवल, मच्छिमार नौकेवरील साहित्य, जाळेखरेदी, तलाव ठेक्याने घेताना भाडेपटटीच्या पुर्ततेसाठी, शितपेटी खरेदी, इत्यादी करीता प्राथमिक भांडवलाची गरज भागविण्यासाठी मच्छिमारांस अर्थसहाय्याची आवश्यकता असते. जर मच्छिमारांस वरील भांडवल उभे करण्यासाठी सहज, सोपे व लवचिकतेप्रमाणे अर्थसहाय्य उपलब्ध झाल्यास त्यास खुप मदत होऊ शकते.
            यासर्व बाबींचा सकारात्मक विचार करुन शासनाने मच्छिमारांची प्राथमिक भांडवलाची गरज भागविण्यासाठी किसान क्रेडीट कार्ड योजनेत मच्छिमारांचाही समावेश केला आहे. किसान क्रेडीट कार्ड मुळे मच्छिमारांस पुढीलप्रमाणे लाभ मिळु शकतो. सहज, सोप्या व लवचिक पध्दतीने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. प्रत्येक कामाच्या कर्जाकरीता स्वतंत्र अर्ज, प्रस्ताव सादर करण्याची गरज पडणार नाही. मच्छिमारांना खाजगी सावकार/खाजगी पत पुरवठा संस्थेच्या तुलनेत व्याजाचा भार कमी होईल. कोणत्याही वेळी खात्रीलायक कर्ज मिळण्याची हमी. मच्छिमारांच्या सवडी आणि निवडीप्रमाणे मत्स्यबीज, मत्स्यखादय, इतर साहित्य खरेदी करण्यास मदत होईल.कर्ज सुविधेसाठी हंगामी मुल्यांकनाची गरज नाही. जास्तीत जास्त कर्जाची मर्यादा (सिमा) मत्स्योत्पादनावर आधारीत. कितीही वेळा बॅक रक्कम काढु शकता. परतफेड बॅकेच्या विहीत नियमावली नुसार मत्स्यव्यवसायासाठी घेतलेल्या आगावु रकमेवरच व्याज आकारणी. किसान क्रेडीट कार्डची वैधता पाच वर्षाची राहील.
किसान क्रेडीट कार्ड योजनेसाठी पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. लाभार्थी हा मत्स्यव्यवसायाशी निगडीत क्षेत्रातील असावा उदा.मच्छिमार, मत्स्यविक्रेता, मत्स्यसंवर्धक इत्यादी. मच्छिमार/ मच्छिमार संस्थेकडे तलाव ठेक्याने घेतलेला असावा. मच्छिमारांची संस्था, मच्छिमारांचे स्वयं सहाय्यता गट, अथवा महिला मच्छिमार/मत्स्यविक्रेते यांचे स्वयं सहाय्यता गट.
किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे - विहीत नमुन्यातील अर्ज. छायाचित्र असलेले ओळखपत्र जसे आधार कार्ड, पॅनकार्ड, निवडणुक आयोगाने दिलेले मतदान ओळखपत्र, वाहन परवाना इत्यादी पैकी एकाची स्वसाक्षांकित छायाप्रत. रहिवासी पुरावा आधारकार्ड, निवडणुक आयोगाने दिलेले मतदान ओळखपत्र, वाहन परवाना इत्यादी पैकी एकाची छायाप्रत. मत्स्यव्यवसायाशी निगडीत क्षेत्रात असल्याचा पुरावा उदा. मत्स्यविक्रेत्यासाठी शॉप ॲक्ट परवाना, तलाव ठेका आदेश, खाजगी मत्स्यसंवर्धकासाठी तलाव खोदकाम केलेल्या जमीनीचा मालकी, भाडे करार पुरावा, क्रियाशील मच्छिमारांसाठी संस्थेचे ओळखपत्र व शिफारसपत्र. पासपोर्ट साईज छायाचित्र, पुर्व दिनांकित धनादेश आवश्यक आहे, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नांदेड यांनी केले आहे.
000000

जिल्हास्तरीय फळे, भाजीपाला,
 मसाला पिके स्पर्धा प्रदर्शन संपन्न    
नांदेड, दि. 26 :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत जिल्हा परिषद कृषि विभागाच्यावतीने फळे, भाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन घेण्यात आले. यात जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी उत्सपुर्तपणे सहभाग नोंदविला. यामध्ये 447 नमुने प्राप्त झाले असून 224 भाजीपाला, 175 फळे व मसाला पिके 48 नमुन्याचा समावेश होता.
तज्ज्ञ समिती मार्फत 25 डिसेंबरला निकषाप्रमाणे पात्र ठरलेल्या नमुन्यामध्ये पिकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले. यावेळी समितीचे प्रमुख गजानन हुंडेकर मोहीम अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी तेलंग, तालुका कृषि अधिकारी श्री घुमनवाड, तंत्र अधिकारी श्री अंबूलगेकर व पंचायत समितीचे कृषि अधिकारी शैलेश वाव्हळे यांचा समावेश होता.
या प्रदर्शनास शेतकऱ्यांनी, भाविकांनी उत्सपुर्तपणे सहभाग नोंदविला आहे. अशा प्रकारच्या स्पर्धामुळे शेतकऱ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध होते. यावेळी शेतकरी व भाविक मोठया प्रमाणात भेट देत आहे. अशी माहिती कृषि विकास अधिकारी संतोष नादरे यांनी दिली.
00000


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यात गुरुवार 9 जानेवारी 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 27 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 9 जानेवारी 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार
मेळाव्यात 71 उमेदवारांची प्राथमिक निवड
नांदेड दि. 26 :-  जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी कंपनीत भरावयाच्या पदांसाठी 71 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरुन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक संचालक प्रशांत खंदारे म्हणाले, सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी आपला आत्मविश्वास व कौशल्य ओळखून कष्टातून स्वयंरोजगार मिळवला पाहिजे. स्थानिक नोकरीच्या मागे न लागता बाहेर गावी जावून नोकरी करावी. खाजगी उद्योगात काम करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याने बेरोजगारांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी खाजगी क्षेत्राकडे वळले पाहिजे.  
मेळाव्यात उपस्थित कंपनीचे अधिकाऱ्यांनी भरावयाच्या पदासंबंधी तसेच कंपनी विषयी माहिती दिली. ट्रेनि ऑपरेटर, कस्टमर रिलेशनशिप, डाटा इन्ट्री ऑपरेटर, सेल्स उक्झीकेटीव मॅनेजर या पदाची भरती करण्यात आली असून 70 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती सुप्रिया पाटील यांनी केले. यावेळी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
0000

Wednesday, December 25, 2019

पंचायत समिती सभापती, उपसभापती
पदाची निवडणूक 6 जानेवारीला
नांदेड दि. 25 :-  नांदेड जिल्‍ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणुक सोमवार  6 जानेवारी 2020  रोजी दुपारी 2 वा. संबंधीत त्या-त्या पंचायत समितीच्या सभागृहात अधिसूचनेप्रमाणे घेण्यात येणार आहे.
ग्रामविकास विभाग मुंबई यांचेकडील 10 डिसेंबर 2019 तसेच सन 2019 चा महाराष्‍ट्र अध्‍यादेश क्र.22 दि. 23 ऑगस्‍ट 2019 अन्‍वये नांदेड जिल्‍हा परिषद अंतर्गत सभापती व उपसभापती पंचायत समिती पदाची मुदत 20 डिसेंबर 2019 रोजी संपत आहे.
महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 चे  कलम 67 व 68 खाली पंचायत समितीच्‍या सभापती व उपसभापती पदाची निवडणुक 20 डिसेंबर 2019 पासुन उर्वरित पुढील कालावधीसाठी घेण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नांदेड जिल्‍ह्यातील सर्व पंचायत समितीच्‍या सभापती व उपसभापती पदाच्‍या निवडणूका सोमवार 6 जानेवारी 2020 रोजी दुपारी 2 वाजता त्‍या-त्‍या पंचायत समितीच्‍या सभागृहात उक्‍त बैठक बोलावून त्‍यादिनांकास अधिसूचनेप्रमाणे सभापती पदाच्‍या आरक्षणाप्रमाणे पंचायत समितीच्‍या सभापती व उपसभापती पदाची निवडणुक घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी अध्‍यासी अधिकारी म्‍हणुन नियुक्‍ती केली आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील जिपपंस निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
00000

  वृत्त   नांदेड जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे-पालकमंत्री अतुल सावे यांचे निर्देश  मुंबई, दि. १३, नांदेड जिल्हा प...