Thursday, November 14, 2019


तलाठी पदासाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध;
27 नोव्हेंबरला मुळ कागदपत्रांची तपासणी
नांदेड दि. 14 :- नांदेड जिल्‍हाअंतर्गत तलाठी पदभरती 2019 च्या परीक्षेतील त्‍या-त्‍या प्रवर्गातील गुणवत्‍तेनुसार निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्‍याकरिता मुळ कागदपत्र तपासणीसाठी त्‍या-त्‍या प्रवर्गातील पात्र उमेदवारांची यादी निश्‍चीत करण्‍यात आली आहे. ही यादी व त्‍याबाबत आवश्‍यक सुचना नांदेड जिल्‍हयाच्‍या http://nanded.nic.com  या संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे.
महापरीक्षा पोर्टल मार्फत नांदेड जिल्‍ह्यातील तलाठी पदभरती 2019 साठी उपलब्‍ध रिक्‍त पदाची जाहीरात प्रसिध्‍द करुन 2 ते 26 जुलै 2019 या कालावधीत परीक्षा घेण्‍यात आली होती. या परीक्षेच्या यादीतील संबंधीत उमेदवारांनी मुळ कागदपत्रे तपासणीसाठी बुधवार 27 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11 वा. बचत भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय परीसर नांदेड येथे उपस्थित रहावे. या यादीवर आक्षेप असल्‍यास सोमवार 25 नोव्हेंबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत हे आक्षेप लेखी स्‍वरुपात पुरावानिशी प्रत्‍यक्ष उमेदवारांनी उपस्थित राहुन सादर करावे. त्यानंतर प्राप्‍त होणारे आक्षेपांचा विचार करण्‍यात येणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
00000


मधुमेह, मानसिक आजार
रोखण्यासाठी व्यायाम महत्वाचा
-         जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर
नांदेड दि. 14 :- मधुमेह व इतर मानसिक आजार रोखण्यासाठी प्रत्येक व्यक्तींने दिवसातून कमीत कमी तीस मिनिट चालणे किंवा व्यायाम करणे महत्वाचे आहे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. वाय. भोसीकर यांनी केले आहे.   
“जागतिक मधुमेह दिन” दिनानिमित्त नांदेड जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली “जागतिक मधुमेह दिन” जनजागृती कार्यक्रम आज 14 नोव्हेंबर रोजी घेण्यात आला. त्यावेळी डॉ. भोसीकर बोलत होते.  
डॉ. भोसीकर पुढे म्हणाले, एकविसाव्या शतकात व्यक्तीने इंटरनेटच्या माध्यमातून कामे करणे ही विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असले तरी यापुढील परिस्थिती बघितली तर व्हाटस्अप्प, फेसबुक, विविध प्रकारचे गेम्स याचा अतिवापर हा मधुमेह व इतर मानसिक अजारचे मोठे कारण असल्याचे दिसून आले आहे.
या कार्यक्रमास निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.स.) डॉ. ये.पी. वाघमारे, डॉ.एच.के.साखरे, डॉ. लोकडे डॉ. दीपक गोरे, डॉ. पवार, डॉ. खान, डॉ. कांतीलाल इंगळे, डॉ. साईप्रसाद शिंदे, अधिपरिसेविका राठोड तसेच रुग्ण व त्यांची नातेवाईक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी यांनी केले तर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर यांनी उपस्थित रुग्णांना मधुमेह म्हणजे काय, तो कसा होतो, त्याची करणे कोणती याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समुपदेशक सुवर्णकार सदाशिव व बालाजी गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
00000

Wednesday, November 13, 2019


राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त
शनिवारी रॅलीचे आयोजन
नांदेड दि. 13 :- राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त नालसा. व मालसा. यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना व दिल्या जाणाऱ्या मोफत विधी सहाय्य याबाबत माहिती देण्यासाठी शनिवार 16 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 वा. जिल्हा न्यायालय परिसर ते आयटीआय कॉर्नर पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिपक धोळकिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिपक धोळकिया व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर. एस. रोटे यांनी केले आहे.
00000

राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त
विधी सहायता कक्षाचे उद्घाटन संपन्न
           
नांदेड दि. 13 :- येथील जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त नालसा. व मालसा. यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना व दिल्या जाणाऱ्या मोफत विधी सहाय्यबाबत माहिती देण्यासाठी विधी सहाय्यता कक्षाचे उद्घाटन नुकतेच (12 नोव्हेंबर 2019) रोजी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण दिपक धोळकिया यांच्या मार्गदर्शनाखाली या विधी सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष दिपक धोळकिया, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे, जिल्हा न्यायालयातील सर्व जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तसेच नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरानी समाजातील सर्व स्तरातील गरजुंनी या सहायता कक्षातर्फे देण्यात येणारे सहाय्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
00000

Tuesday, November 12, 2019


जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड कार्यालयामार्फत
घरोघरी जाऊन विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांच्या माहितीचा कार्यक्रम संपन्न

          
नांदेड दि. 12 :- मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये व मा. श्री. दि. अ. धोळकिया, प्रमुख जिल्हा न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड कार्यालयामार्फत कायदेविषयक सेवा दिनानिमित्त दिनांक 09/11/2019 रोजी नांदेड शहरातील नमस्कार चैक व पांडूरंग नगर या भागात विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल विधीज्ञ श्री. एम. एल. गायकवाड, श्री. एस. एम. पवार,  श्रीमती लता नवघडे तसेच एस.आर.टि.एम. विद्यापीठातील सामाजीक सेवा विभागातील विद्यार्थी यांनी आपत्तीग्रस्त पिडीतासाठी विधी सेवा योजना या विषयावर घरोघरी जाऊन माहिती दिली. तसेच उपस्थितांना विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिल्या जाणा-या मोफत विधी सहाय्याबाबत व नुकसान भरपाई बाबतच्या योजनांची माहिती दिली. सदर कार्यक्रमामध्ये त्या परिसरातील 500 ते 600 लाभाथ्र्यानी लाभ घेतला. 
दिनांक 9 नोव्हेंबर 2019 रोजी नांदेड तालुक्यातील वडगाव, पुनेगाव, वाडीपुय्यड, वाजेगाव या भागात विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल विधीज्ञ श्री. एन. बी. पंडीत, श्री. रमेश माने, श्रीमती कुमुताई वाघमारे तसेच एस.आर.टि.एम. विद्यापीठातील सामाजीक सेवा विभागातील विद्यार्थी यांनी अवैध व्यापार व लैंगिक शोषणाचे बळी पडलेल्यांसाठी योजना या विषयावर घरोघरी जाऊन माहिती दिली. तसेच उपस्थितांना विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिल्या जाणा-या मोफत विधी सहाय्याबाबत व नुकसान भरपाई बाबतच्या योजनांची माहिती दिली. सदर कार्यक्रमामध्ये त्या परिसरातील 100 ते 200 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. 
दिनांक 10 नोव्हेंबर 2019 रोजी शिवाजीनगर, सखोजी नगर, फारुख नगर व मित्र नगर या भागात विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल विधीज्ञ श्री. सुरेश कुरेल्लू, श्री. एम. एल. गायकवाड,  तसेच एस.आर.टि.एम. विद्यापीठातील सामाजीक सेवा विभागातील विद्यार्थी यांनी असंघटीत क्षेत्रात काम करणा-या कामगारांसाठी कायदा योजना या विषयावर घरोघरी जाऊन माहिती दिली. तसेच उपस्थितांना विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिल्या जाणा-या मोफत विधी सहाय्याबाबत व नुकसान भरपाई बाबतच्या योजनांची माहिती दिली. सदर कार्यक्रमामध्ये त्या परिसरातील 300 ते 350 लाभाथ्र्यानी लाभ घेतला. 
            या कार्यक्रमाअंतर्गत नांदेड तालूक्यातील इतर गावात व नांदेड शहरातील इतर भागात होणा-या शिबीराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  मा. श्री. दि. अ. धोळकिया, प्रमुख जिल्हा न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड व श्री. आर. एस. रोटे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले आहे.   
00000




तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारास
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची दर्शनासाठी भेट
नांदेड, दि. 12 :- केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायु परिवर्तन आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. यावेळी सुप्रसिद्ध हुजूर साहिब सचखंड गुरुद्वाराच्यावतीने श्री. जावडेकर यांचा पारंपरिक पध्दतीने केसरी चोला, पगडी, शिरोपा देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, माहिती अणि प्रसारण विभागाचे पश्चिम विभागाचे महासंचालक आर. एन. मिश्रा, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, तख्त सचखंड श्री गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा, जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती पुनम पवार, उपवनसंरक्षक अशिष ठाकरे आदींची उपस्थिती होती.
श्री गुरुग्रंथ साहिब दर्शनानंतर लंगर येथे मंत्री श्री. जावडेकर यांनी सेवा दिली. श्री गुरुनानक देवजी यांच्या 550 व्या जयंती निमित्त गुरुद्वारा परिसरात केंद्रीय मंत्री श्री. जावडेकर यांच्या हस्ते बोरीचे वृक्षारोपण करुन 550 वृक्षलागवडीचा शुभारंभ करण्यात आला.
0000




 

नांदेड येथील बहुमाध्यम प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न  
श्री गुरुनानक देवजीनी सत्याच्या मार्गाने
पुढे जाण्याची शिकवण दिली
- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर 
नांदेड, दि. 12 :- श्री गुरुनानक देवजीने ज्ञानाबरोबर सत्याच्या मार्गाने पुढे जाण्याची शिकवण दिली असून त्यांच्या कार्याची आठवण करुन सर्वांनी एकजूट होऊन सत्याच्या मार्गाने भेदभाव विरहित समाज निर्मितीसाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन पर्यावरण, वन व जलवायु परिवर्तन आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.   
श्री गुरुनानक देवजी यांच्या 550 व्या जन्म जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “बहुमाध्यम प्रदर्शनीचे उद्घाटन येथील मल्टीपर्पज हायस्कूल प्रांगणात फित कापून केंद्रीय मंत्री श्री. जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, महापौर श्रीमती दीक्षा धबाले, माहिती अणि प्रसारण विभागाचे पश्चिम विभागाचे महासंचालक आर. एन. मिश्रा, अतिरिक्त महासंचालक डी. जे. नरेन, महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे संचालक संतोष अजमेरा, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर तख्त सचखंड श्री गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा, जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती पुनम पवार आदींची उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री श्री. जावडेकर म्हणाले, श्री गुरुनानक देवजी यांनी जगाला ज्ञान देण्याचे मौलिक कार्य केले आहे. एक ओमकार, एक सत्य हा मंत्र त्यांचा असून जीवनात प्रामाणिक कष्ट करण्याचा संदेश त्यांनी दिलेला आहे. श्री गुरु नानक देवजी यांचे कार्य आणि तत्वज्ञान समाजासाठी महत्वाचे योगदान देणारे आहे. नांदेडच्या तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारावर आधारीत एक फिल्म लवकरच तयार करण्यात येईल, अशी घोषणाही केंद्रीय मंत्री श्री. जावडेकर यांनी यावेळी केली.   
उद्घाटनानंतर श्री. जावडेकर यांनी श्री गुरुनानकजी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन एलईडी स्क्रीनद्वारे कर्तारपुर साहेब आणि नानकानासाहेब या गुरूव्‍दारांचे दर्शन या प्रदर्शनीतून घेतले. शबद आणि चार उदासीची माहिती एलईडी स्क्रीनद्वारे घेतली. त्याचबरोबर श्री गुरुनानकजी यांच्या जीवनावर आधारीत लाईट व साउंड शो तसेच मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शीख मुलमंत्रांने सर्वांची मने जिंकली.  
आजपासून सोमवार 18 नोव्‍हेंबर 2019 पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत चालणाऱ्या या बहुमाध्‍यम प्रदर्शनात श्री गुरूनानक देवजी यांच्‍या जीवनावर आधारित माहिती मिळणार आहे. वायरलेस हेडफोनच्‍या साहयाने एलईडी स्‍क्रीनवर श्री गुरूनानक देवजी यांचे जीवनकार्याबाबतची माहिती पहावयास मिळणार आहे. नांदेड शहरात प्रथमच आयोजित केलेल्या या प्रदर्शनीमध्‍ये व्‍ही. आर. तंत्रज्ञानाच्‍या मदतीने असलेल्‍या कर्तारपुर साहेब आणि नानकानासाहेब या गुरूव्‍दारांचे दर्शन या प्रदर्शनातून घडत आहे. प्रदर्शनी सर्वांसाठी सात दिवस मोफत खुली ठेवण्यात आले आहे, याचा लाभ नागरिक व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असेही आवाहन यावेळी आयोजकामार्फत करण्यात आले.
00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...