Tuesday, May 28, 2019


रास्तभाव धान्य दुकानात साखर उपलब्ध
नांदेड, दि. 28 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने एप्रिल, मे व जून 2019 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो (प्रति महिना) याप्रमाणे मंजूर केले आहे. सदर महिन्यात जिल्ह्यासाठी 1 हजार 970 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणार आहे.
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्यात आले आहे. नांदेड 143.79 , हदगाव -192.68, किनवट -370.35, भोकर-82.06, बिलोली-133.09, देगलूर-112.87, मुखेड-160.6, कंधार-64.97, लोहा-124.5, अर्धापूर-32.46, हिमायतनगर-89.12, माहूर-194.08, उमरी-65.79, धर्माबाद-65.33, नायगाव-115.25, मुदखेड-23.06 याची सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


Monday, May 27, 2019


बारावीचा आज निकाल
चार अधिकृत संकेतस्थळावर
नांदेड, दि. 27:  फेब्रुवारी- मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 28 मे रोजी जाहीर होणार आहे. औरंगाबाद, लातूर, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि कोकण या 9 विभागीय मंडळाअंतर्गत बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
www.mahresult.nic.in,www.hscresult.mkcl.org,www.maharashtraeducation.com, आणिwww.maharashtra12.jagranjosh.com या संकेतस्थळावर मिळेल. सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण सदर संकेतस्थळावर दिसतील तसेच याची प्रिंटआऊटही घेता येईल.याशिवाय बारावीचा निकाल एसएमएस सेवेद्वारेही मोबाईल फोनवरुन मोबाईल ऑपरेटरद्वारे उपलब्ध होतील. MHHSC<space><seat no>असा एसएमएस 57766 या क्रमांकावर पाठविल्यास विद्यार्थ्यांना कळू शकेल.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती मिळेल. तर www.mahahsscboard.maharashtra.gov.in आणि www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल मिळेल.
ऑनलाईन निकालानंतर विद्यार्थ्यांना लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून, यासाठी आवश्यक असणाऱ्या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
बारावीची पुरवणी परीक्षा मागील वर्षाप्रमाणेच जुलै- ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात येणार असल्याचे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.
००००

Friday, May 24, 2019


 गुटखा, पानमसाला कार्यवाहीत
51 हजार रुपयाचा साठा जप्त  
      
नांदेड दि. 24 :- प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकाविरुद्ध माहूर येथे 15 हजार 600 रुपये तर  किनवट येथे 35 हजार 474 रुपयाचा साठा जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थाची विक्री करणाऱ्या विरुद्ध नियमित कारवाई करण्यात येणार आहे. असे अन्न पदार्थ कोणी छुप्या, चोरट्या पद्धतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतूक करु नये असे आवाहन नांदेड येथील अन्न व औषध प्रशासनचे तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.  
            अन्न व औषध प्रशासनचे सुरक्षा अधिकारी यांनी 20 मे रोजी माहूर शहरातील नगीना मसिद जवळ शेख युसुफ शेख रशिद (वय 40 वर्षे) व किनवट नालागड्डा येथील असिफखान मसिदखान (वय 32 वर्षे) या व्यक्तीच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्नपदार्थ गुटखा, सुगंधित तंबाखू आदींचा एकुण 51 हजार 074 रुपयाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध पोलीस स्टेशन माहूर येथे अन्न सुरक्षा कायदा व भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. मा. न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितास आजीवन तुरुगंवास आणि 10 लाख रुपयापर्यंत शिक्षेची तरतुद आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
00000


स्कूल बसेसचे योग्यता प्रमाणपत्र
नूतनीकरणाचे आवाहन
       नांदेड दि. 24 :- मा. उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ यांनी जनहित याचिका क्र.2 / 2012 मध्ये दिलेल्या आदेशान्वये ज्या स्कूल बसेस / स्कूल व्हॅन यांचे योग्यता प्रमाणपत्राची वैधता संपलेली आहे, अशा वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र विहित नमून्यात अर्ज करुन व अपॉईंटमेट घेऊन शालेय सत्र सुरु होण्यापूर्वी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करुन घ्यावे. जर अशी वाहने कार्यालयात योग्यता प्रमाणपत्र तपासणीकरिता हजर न केल्यास संबंधीत वाहनांविरोधात परवाना निलंबनाची कार्यवाही करण्यात येईल याची जिल्हयातील सर्व स्कूलबस मालक / चालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
000000

Wednesday, May 22, 2019


शेतीशाळेच्या माध्यमातून कृषिक्षेत्रात
महिलांचा सहभाग वाढवून त्यांना निर्णयक्षम बनवा
-         जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे
      
नांदेड दि. 22 :- शेतीशाळेतून कृषिक्षेत्रात महिलांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवून त्यांना निर्णयक्षम बनवणार असल्याचे सांगून शेतीकामामध्ये पुरूषांबरोबर महिलांचा समन्वय तितकाच महत्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.
नांदेड तालुक्यातील मौजे बोंढारतर्फे आज 22 मे 2019 रोजी नेरली येथे या हंगामातील कापूस पिकावरील महिलांची जिल्हयातील पहिली शेतीशाळा घेवून शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन श्री. चलवदे बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डि. व्ही. पाटील हे होते.
कृषि विभागाच्यावतीने सचिव (कृषि) एकनाथ डवले, आयुक्त (कृषि) सुहास दिवसे व लातूर विभागीय कृषि सहसंचालक तुकाराम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात प्रत्येक कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक यांनी एका गावामध्ये शेतीशाळा घेण्यास सुरुवात झाली आहे. याचाच भाग म्हणून नांदेड जिल्हयामध्ये सन 2019 च्या खरीप हंगामामध्ये एकूण 908 क्रॉपसॅप संलग्नीत शेतकऱ्यांच्या शेतीशाळा घेण्यात येणार असून प्रत्येक शेतीशाळेच्या गावामध्ये संपूर्ण हंगामात पिकनिहाय 8 ते 10 वर्ग प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर होणार आहेत.
            या शेतीशाळेमध्ये व.ना.म.कृ.वि.परभणी अंतर्गत कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डी.व्ही.पाटील यांनी कापूस पिक लागवड तंत्रज्ञान विषयी माहिती देवून कापसाची कोणकोणती वाण निवडावीत याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात नांदेड तालुका कृषि अधिकारी विनायक सरदेशपांडे यांनी शेतीशाळेचे महत्व सांगून कृषितील नविन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणार असल्याचे नमुद केले.
            शेतीशाळेमध्ये जमीन तयार करणे, बियाणे उगवण क्षमती प्रयोग, वाणांची निवड करण्याविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. महिला शेतकऱ्यांना कामातून विरंगुळा मिळावा व त्यांच्यामध्ये नवचैतन्य यावे म्हणून सांघीक खेळ (बॉल इन बकेट, पावसाची टाळी) घेण्यात आले.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि पर्यवेक्षक वसंत जारीकोटे यांनी केले तर आभार कृषि सहाय्यक शंकर पवार यांनी मानले. 
            कार्यक्रमाचे विशेष म्हणजे शेतीशाळेतील निवड केलेल्या 100 टक्के महिलांची उपस्थिती होती. शेतीशाळेच्या यशस्वीतेसाठी बोंढार त.ने.च्या कृषि सहाय्यक श्रीमती सलमा बेगम पाळेकर, मंडळ कृषि अधिकारी लिंबगाव प्रकाश पाटील, कृषि पर्यवेक्षक करंजकर एस.एम., कृषि सहाय्यक वडवळे एम.के., बारसे डी.एन., धुतराज आर.यु., कमठेवाड आर.आर.,श्रीमती शिंदे एस.आर, श्रीमती राजूरकर एम..ए, श्रीमती वासलवार ए.आर, श्रीमती मगर यु.जे., श्रीमती हुस्कुलवाड ए. टी. यांनी परिश्रम घेतले.
00000

Tuesday, May 21, 2019


उच्चरक्तदाब दिनाचे उद्घाटन संपन्न
नांदेड, दि. 21 :-  जागतिक उच्चरक्तदाब दिनाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय येथील बाह्य रुग्ण विभागात आज करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  एन. आय. भोसीकर यांनी उपस्थित रुग्णांना उच्चरक्तदाब या आजाराबद्दल मार्गदर्शन केले. रुग्णालयातील एनसीडी विभागाद्वारे 85 रुग्णांचे  उच्चरक्तदाब (बीपी) व शुगरची तपासणी करण्यात आली. तसेच जागतिक दहशतवादी विरोधी दिनानिमित्त दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी रुग्णालयातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते. 
000000



मतमोजणी केंद्र परिसरात चोख बंदोबस्त
नांदेड, दि. 21 :- शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय बाबानगर नांदेड येथे 16-नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची मतमोजणी गुरुवार 23 मे 2019 रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरु होणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय बाबानगर नांदेड  या मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरामध्‍ये मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, मतमोजणीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त इतर व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍याकरीता प्रतिबंध करण्‍यात आले आहे.
या मतमोजणीच्‍या अनुषंगाने कर्मचारी, उमेदवार व त्‍यांचे प्रतिनिधी, प्रसार माध्‍यमांचे प्रतिनीधींना  अधिकृत ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. त्याशिवाय इतर कुणीही प्रवेश करणार नाही. तसेच कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये आणि मतमोजणी सुरळीत पार पाडण्‍यासाठी शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या 5 प्रवेशद्वाराजवळ विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. मुख्‍य प्रवेशद्वार नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्‍या समोर येथून नियुक्‍त अधिकारी / उमेदवार यांचे शिवाय इतर कुणाचेही वाहन प्रवेश करणार नाही.
उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधींना माधव दालमीलकडून आनंदनगरकडे जाणाऱ्या रस्‍त्‍याकडील प्रवेशद्वारातून प्रवेश देण्‍यात येणार आहे व त्‍यांच्‍या वाहनांसाठी कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती नवामोंढा येथे पार्कींगची व्‍यवस्‍था केली आहे. सर्व वाहने वाहनतळावर लावूनच सर्वांनी प्रवेश घ्‍यावा. रहदारीस अडथळा होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...