Monday, March 11, 2019


विशेष लेख                                                                                 दि.11-3-2019
आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे
- यशवंत भंडारे
लोकसंभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 10 मार्च 2019 पासून या निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. सर्वत्र लोकसभा निवडणुकीची तयारी वेगाने सुरु आहे. या निवडणूक काळात नेमके काय करावे आणि काय करु नये याबाबत निवडणूक आयोगाने निश्चित केलेली कामे याबाबत माहिती देणारा हा लेख…

       निडणुकीच्या आचार संहिता काळात काय करावे याबाबत आयोगाने म्हटले आहे की, चालू असेलेले कार्यक्रम पुढे सुरु ठेवता येतील.ज्या विषयी शंका निर्माण होईल अशा बाबींच्या संबंधात भारत निवडणूक आयेाग / राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण  / मान्यता प्राप्त करण्यात यावे.पूर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील जनेतेसाठी सहाय्यकारी आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना चालू करता येतील व त्यापूढे सुरु ठेवता येतील. पण त्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी.मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रेाख रक्कम किंवा वैद्यकीय सवलती देण्याचे समुचित मान्यतेने पुढे चालू ठेवता येईल.मैदानासारख्या सार्वजनिक जागा सर्व पक्षांना, निवडणुकीत उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना निवडणूक सभा घेण्यासाठी नि:पक्षपातीपणे उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. त्याच प्रमाणे सर्व पक्षांना / निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना हेलिपॅडचा वापर नि:पक्षपातीपणे उपलब्ध करुन दिला पाहिजे.विश्रामगृहे, डाकबंगले व इतर शासकीय निवासस्थाने केवळ झेड व त्यावरील सुरक्षा असलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना समानतेच्या तत्वावर उपलब्ध करुन देण्यात यावेत.
इतर राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर करण्यात येणारी टीका, त्यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी, पार पाडलेली कामे केवळ या बाबीशी संबंधित असावी.शांततामय व उपद्रवरहीत गृहस्थ जीवन जगण्याच्या प्रत्येक व्यक्तींच्या अधिकाराचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. इतर पक्षांनी आयेाजित केलेल्या सभा व मिरवणुकीमध्ये कोणतेही अडथळे निर्माण करण्यात येऊ नयेत. प्रस्तावित सभेच्या जागी निर्बंधात्मक व प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्यांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. सभेची जागा व वेळेची पूर्व परवानगी घ्यावी. प्रस्ताविक सभेमध्ये ध्वनिवर्धक  व कोणत्याही इतर अशा सवलीतीचा वापर करण्यासाठी परवानगी मिळविली पाहिजे. सभेमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अन्यथा अव्यवस्था निर्माण करणाऱ्या व्यक्तीबरोबर व्यवहार करण्यासाठी पोलीसांचे सहाय्य मिळविण्यात यावे. कोणत्याही रॅलीच्या प्रारंभीचे वेळ आणि जागा, रॅली ज्या मार्गाने जाईल तो मार्ग तसेच मोर्चाची अखेर होईल अशी वेळ, स्थान ही बाब आगाऊ स्वरुपात निश्चितपणे ठरविण्यात यावी. पोलीस प्राधिकाऱ्याकडून त्यासाठी आगाऊ अनुपालन करण्यात यावे.
 रॅली ज्या वस्तीमधून जावयाची असेल त्या वस्त्यांबाबत कोणतेही निर्बंधात्मक आदेश जारी केलेले असल्यास त्याविषयी खात्री करुन त्याचे पूर्ण अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे सर्व वाहतूक नियमांचे व अन्य निर्बंधाचे परवानगी घेण्यात यावी.  रॅली मुळे वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ देऊ नये. ज्यांचा शस्त्रे किंवा हत्यारे म्हणून गैरवापर होऊ शकेल. अशा कोणत्याही वस्तू रॅलीत सहभागी असलेल्या व्यक्तींनी बाळगू नयेत. मतदानाचे काम शांतता व सुव्यवस्थेने पार पाडावे यासाठी सर्व वेळी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य द्यावे. बिल्ले व ओळखपत्र निवडणुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीनी ठळकपणे लावली पाहिजेत. मतदारांना देण्यात येणाऱ्या ओळखचिठया या साध्या पांढऱ्या कागदावर देण्यात येतील आणि त्यावर कोणतेही चिन्हे, उमेदवाराचे किंवा पक्षाचे चिन्ह याचा निर्देश असणार नाही.
मतदानांच्या दिवशी वाहनांच्या वापरावरील निर्बंधाचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. निवडणूक आयोगाने वैध प्राधिकारपत्र असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही वेळेस मतदान कक्षात प्रवेश करता येणार नाही. कोणत्याही व्यक्तींना (उदा.मुख्यमंत्री, संसद सदस्य, विधानसभा सदस्य यांनाही) यातून सुट देण्यात आलेली नाही. निवडणूक पार पाडण्याच्या संबंधितील कोणतीही तक्रार किंवा समस्या निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्र, प्रभाग, दंडाधिकारी यांच्या किंवा भारत निवडणूक आयेाग यांनी नियुक्त केलेल्या  निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. निवडणूक आयेाग, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे निवडणुकीच्या विविध पैलूंच्या संबंधातील सर्व बाबी विषयीचे निर्देश, आदेश, अनुदेश यांचे पालन करण्यात येईल.
या निवडणुकीच्या आचार संहिता काळात काय करु नये याबाबत माहिती अशी- कृपया शासकीय वाहने किंवा कर्मचारी वर्ग किंवा यंत्रणा याचा निवडणूक प्रचारविषयक कामासाठी वापर करण्यात येऊ नये. शासकीय वाहनांत पुढील कार्यालयाच्या वाहनांचा समावेश असेल. 1) केंद्र शासन. 2) राज्य शासन. 3) केंद्र व राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम  4) केद्र व राज्य शासनाच्या संयुक्त क्षेत्रातील उपक्रम  5) स्थानिक संस्था 6)महानगरपालिका 7) नगरपालिका 8)पणन मंडळे (कोणत्याही नावांची) 9) सहकारी संस्था 10) स्वायत जिल्हा परिषदा किंवा  11) ज्यामध्ये सार्वजनिक निधी मग तो एकूण निधीच्या हिश्यातील कितीही अल्पांशाने असो गुंतविण्यात आला आहे. अशी कोणतीही संस्था आणि तसेच 12) संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची तसेच गृह मंत्रालयाच्या व राज्य शासनाने यांच्या पोलीस संघटनेच्या मालकीची असलेली पुढील वाहने अ) मालमोटारी ब) लॉरी क) टेम्पो ड)जीपगाडया इ) मोटारगाडया फ)ऑटो रिक्षा बसगाडया ह)विमाने आय.हेलिकॉप्टरने ज)जहाजे के.बोटी ल) हॉवर क्राप्ट व इतर वाहने.
सत्तेमध्ये असलेला पक्ष, शासन यांनी साध्य केलेल्या उदिष्टांबाबत सरकारी कोषागाराच्या खर्चाने कृपया कोणतीही जाहिरात देण्यात येऊ नये. कोणत्याही वित्तीय अनुदानाची घोषणा करणे, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते बांधण्याचे वचन देणे इ. गोष्टी करु नयेत. शासन/सार्वजनिक उपक्रम यांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ नियुक्या करु नयेत. कोणताही मंत्री तो उमेदवार असल्याखेरीज किंवा प्राधिकृत प्रतिनिधी असल्याखेरीज किंवा मतदानासाठी मतदार या नात्याने असेल त्या खेरीज मतदान कक्षामध्ये किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाही. निवडणूक मोहिम/प्रचार यांच्या जोडीने कोणतेही सरकारी काम पार पाडण्यात येऊ नये. मतदारास आर्थिक किंवा अन्य प्रकारची कोणतेही प्रलोभन दाखविण्यात येऊ नये. मतदारांच्या जातीय भावनांना आवाहन करण्यात येऊ नये. विभिन्न जाती –जमाती यांच्यातील किंवा भाषिक गटातील सध्याचे मतभेद ज्यामुळे अधिक तीव्र होतील किंवा परस्परातील वैमनस्य वाढेल किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये.
 इतर पक्षांचे कोणतेही नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक कार्याशी संबंधित नसेल अशा त्यांच्या खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका करण्याची परवानगी देण्यात येऊ नये. ज्याचा खरे खोटेपणा पडताळून पाहिलेला नाही, असे आरोप करुन किंवा विकृत स्वरुपात देऊन इतर पक्ष यांच्यात टीका करु नये. निवडणूक प्रचार तसेच भाषणे, निवडणूक प्रचाराचे फलक, संगीत इत्यादीसाठी देऊळे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा किंवा कोणत्याही प्रार्थनास्थळाचा वापर करु नये. लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, खोटया नावाने मतदान करणे, मतदान कक्षापासून 100 मीटरच्या आत कक्षापर्यंत प्रचार करणे, मतदानाची वेळ समाप्त होण्याच्या वेळेबरोबर संपणाऱ्या 48 तासाच्या कालावधीत सार्वजनिक सभा घेणे, मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचविणे व तेथून परत येणे यासारख्या भ्रष्ट किंवा निववडणुक विषय अपराध करण्यास प्रतिबंध आहे.
व्यक्तीची मते किंवा कृत्य याविरुध्द निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने किंवा धरणे धरण्यात येऊ नयेत. कोणत्याही व्यक्तीला अन्य कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार, भिंत इ. चा वापर त्याच्या परवानगीखेरीज ध्वजदंड उभारणे , कापडी फलक लावणे, नोटीस चिकटविणे किंवा घोषणा लिहिणे यासाठी करता येणार नाही. यामध्ये खाजगी किंवा सार्वजनिक जागांचा समावेश असेल. इतर राजकीय पक्षांच्या किंवा उमेदवारांच्या सार्वजनिक सभांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करण्यात येऊ नये. एका पक्षाची जेथे सभा चालू असेल अशा जागी दुसऱ्या पक्षाद्वारे मोर्चा काढण्यात येऊ नये. दुसऱ्या पक्षाने किंवा उमेदवाराने काढलेली प्रचार पत्रके काढून टाकण्यात येऊ नये.
मतदानाच्या दिवशी ओळखचिठया वितरीत करण्याच्या जागी किंवा मतदान कक्षानिकट प्रचारपत्रके , पक्षाची ध्वजचिन्हे किंवा प्रचारसाहित्याचे प्रदर्शन करु नये. ध्वनिवर्धकाचा मग ते एकाच जागी लावलेले असोत किंवा फिरत्या वाहनांवर बसविलेले असोत, सकाळी सहा वाजण्यापूर्वी किंवा रात्री दहा वाजल्यानंतर आणि संबंधित प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगी घेतली असल्याखेरीज वापर करु नये. आदर्श आचारसंहितेची ही सूची केवळ वानगी दाखल आहे. सर्वसमावेशक अधिक माहितीसाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधता येईल. ही निवडणूक मोकळया, निर्भय वातावरणात पार पाडता यावी; यासाठी निवडणुकीशी संबंधित सर्वांनी या आदर्श आचार संहितेचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील तरतुदी नुसार कारवाई होऊ शकते.
                                                                                                                                   
                                                                                 यशवंत भंडारे                                                                                                                               
                                                                      प्र.संचालक (माहिती)
                                                                                    औरंगाबाद

Wednesday, March 6, 2019


महाडीबीटी पोर्टल प्रणालीमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 10 मार्च, 2019 पर्यंत मुदतवाढ  

नांदेड दि. 6 :-   भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेतंर्गत अनु. जाती, विजाभज,इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2018-2019 पासून महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज भरुन अर्ज व आवश्यक कागदपत्रे संबंधित महाविद्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजनेतंर्गत महाडीबीटी पोर्टल प्रणालीमध्ये अनु. जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दिनांक 10 मार्च, 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनु. जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांनी वरील मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज व आवश्यक कागदपत्रे महाविद्यालयात सादर करावीत, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

00000

विजाभज अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी
                               तात्पुरत्या अतिरिक्त सेवाजेष्ठता यादीवर विहीत मुदतीत आक्षेप नोंदवावेत

नांदेड, दि. 6 :- नांदेड जिल्ह्यातील सर्व विजाभज अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा व माध्यमिक आश्रमशाळा यांच्या सन 2017-2018 च्या संचमान्यतेनुसार ठरलेल्या शिक्षण व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची यादी संबंधित संस्था व शाळेचे मुख्याध्यापक यांच्या स्तरावरुन घोषित करण्यात आली आहे.

या याद्यानुसार जिल्हास्तराची तात्पुरती अतिरिक्त कर्मचारी व त्यांची सेवाजेष्ठता यादी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे.

नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांनी या यादीचे अवलोकन करुन जर कोणाला या घाषित झालेल्या यादीबाबत आक्षेप असल्यास सदरचे आक्षेप      दि. 11 मार्च, 2019 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नांदेड येथे योग्य त्या पुराव्यासह नोंदवावेत.

विहित मुदतीत आक्षेप दाखल न केल्यास तसेच सदर आक्षेपाबाबत सबळ पुरावे नसल्यास सदर अर्जाचा विचार केला जाणार व याची जबाबदारी संबंधित शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची राहिल. त्याबाबत हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.

प्राप्त आक्षेपानुसार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नांदेड येथे सुनावणी ठेवण्यात येईल व सदरच्या सुनावणी दरम्यान कर्मचाऱ्यांनी त्यांचे लेखी म्हणणे पुराव्यासह सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
0000

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत

नांदेड, दि. 6 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार, दि. 12 मार्च 2019 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.   

जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी मंगळवार, दि. 12 मार्च 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

8 मार्च ते 9 एप्रिल या कालावधीत

महिलांसाठी तपासणी व औषधोपचार मोहिमेचे आयोजन

नांदेड दि. 6 :-  8 मार्च जागत्तिक महिला दिनाच्या अनुषंगाने श्री. गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा  रुग्णालय नांदेड मार्फत दि. 8 मार्च, 2019  ते 9 एप्रिल, 2019   या कालावधीमध्ये सर्व महिलांसाठी उच्चरक्तदाब, मधुमेह, रक्तगट, हिमोग्लोबिन, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच सर्व प्रकारच्या कर्करोग (स्तनाचे, गर्भाशयाचे व मुखाचे ) तपासणी व औषधोपचाराच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. तरी या तपासणी मोहिमेचा सर्व स्त्री रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर व  डॉ. डी. एन. हजारी यांनी केले आहे.

 तसेच दि. 8 मार्च, 2019 रोजी गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथून महिला आरोग्य जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

काचबिंदू : एक दृष्टिक्षेप

12 मार्च हा जागतिक काचबिंदू दिन म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो. आज भारतामध्ये अंधत्व येण्याचे प्रमुख कारणांपैकी ‘काचबिंदू’ हा दुसऱ्या नंबरवर आहे. त्याआधी मोतीबिंदूचा क्रमांक एक अबाधित आहे.

 तर काचबिंदू म्हणजे तरी काय? असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. जसा रक्तदाब {बीपी} हा   120/80 योग्य समजण्यात येतो. त्याचप्रमाणे डोळ्याच्या आतील दाब देखील २० मि.मी. पर्यंत योग्य समजला जातो. जर हा दाब त्यापेक्षा अधिक असला तर त्याला काचबिंदू म्हटले जाते.

       काचबिंदू मुळे डोळ्याच्या आतील दाब वाढल्यामुळे दृष्टी संवेदना वाहून नेणाऱ्या गँगलीआँन पेशींवर परिणाम होऊन उपचाराअभावी त्या मृत पावतात व कायमस्वरूपी नजर जाण्याचा धोका उत्पन्न होतो. आणि त्याचाच परिणाम म्हणून रुग्णांचा दृष्टी परीघ (field) कमी होऊ लागतो. एक वेळ अशी येते की सदर व्यक्तीस समोरची वस्तू सोडून त्या आजूबाजूचा परिसर दिसेनासा होतो. यालाच (tubular vision) म्हणतात. म्हणजेच  नळीतून वा दुर्बिणीतून पाहिल्या सारखे दिसते. बाजूची वस्तू पाहण्यासाठी त्याला मान वळवावी लागते. म्हणूनच अशा व्यक्तीने वाहन (vehicle) चालविणे धोकादायक असते.

 एकदा काचबिंदू झाल्यावर रुग्ण उपचाराखाली असताना काही चाचण्या ह्या सातत्याने    (follow-up) करणे गरजेचे असते. त्यामध्ये नेत्रतज्ञा मार्फत डोळ्याचे सखोल परिक्षण करत असताना tonometry  (आतील दाब मोजमापन करणारे यंत्र),  fundoscopy (दृष्टीपटल व दृष्टीचेता तपासणी यंत्र), gonioscopy (काचबिंदूचा प्रकार तपासणारे माध्यम), topo-pacheymeter (बुबुळाची जाडी तपासणे), OCT (रेटीना तपासणी) इत्यादी चाचण्यांचा समावेश असतो.

काचबिंदू हा चोरपावलाने येणारा डोळ्याचा गंभीर आजार असून यामध्ये दुर्लक्ष केल्यास कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते.

यामध्ये जोखीम कोणाला आहे, तर...ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे. ज्याच्या घरी कोणाला तरी (Family History) कौटुंबिक इतिहास आई-वडील, भाऊ-बहीण, इत्यादींना काचबिंदू असणे. बैठे काम, व्यायामाचा अभाव, अनियंत्रित आहार, ताणतणाव (sedentary lifestyle, stress) रक्तदाबाचा आजार धूम्रपान

लक्षणे...चष्म्याचा नंबर सतत बदलणे .डोळे दुखणे.डोळ्यातून पाणी वाहणे, लाल होणे.डोळ्यासमोर रंगीत वर्तुळे दिसणे इत्यादी.

संभाव्य गंभीर धोका लक्षात घेऊन रुग्णांनी नियमित तपासणी केल्यास, शिल्लक असलेली नजर वाचवता येऊ शकते. त्यामध्ये औषधी (eye drops) च्या स्वरूपात, लेझरच्या पद्धतीने व शस्त्रक्रियेच्या माध्यमातून उपचार शक्य आहे.

      थोडक्यात नियमित तपासणी व प्रतिबंधात्मक उपचार पद्धती याचे अनुकरण केल्यास दृष्टी टिकवता येऊ शकते.

                                                                                           डॉ. शिरसीकर संतोष

                                                                                           जिल्हा अंधत्व व दृष्टीक्षिणता कार्यक्रम,

      नांदेड

0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...