Wednesday, March 6, 2019


8 मार्च ते 9 एप्रिल या कालावधीत

महिलांसाठी तपासणी व औषधोपचार मोहिमेचे आयोजन

नांदेड दि. 6 :-  8 मार्च जागत्तिक महिला दिनाच्या अनुषंगाने श्री. गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा  रुग्णालय नांदेड मार्फत दि. 8 मार्च, 2019  ते 9 एप्रिल, 2019   या कालावधीमध्ये सर्व महिलांसाठी उच्चरक्तदाब, मधुमेह, रक्तगट, हिमोग्लोबिन, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच सर्व प्रकारच्या कर्करोग (स्तनाचे, गर्भाशयाचे व मुखाचे ) तपासणी व औषधोपचाराच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. तरी या तपासणी मोहिमेचा सर्व स्त्री रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर व  डॉ. डी. एन. हजारी यांनी केले आहे.

 तसेच दि. 8 मार्च, 2019 रोजी गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथून महिला आरोग्य जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

काचबिंदू : एक दृष्टिक्षेप

12 मार्च हा जागतिक काचबिंदू दिन म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो. आज भारतामध्ये अंधत्व येण्याचे प्रमुख कारणांपैकी ‘काचबिंदू’ हा दुसऱ्या नंबरवर आहे. त्याआधी मोतीबिंदूचा क्रमांक एक अबाधित आहे.

 तर काचबिंदू म्हणजे तरी काय? असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. जसा रक्तदाब {बीपी} हा   120/80 योग्य समजण्यात येतो. त्याचप्रमाणे डोळ्याच्या आतील दाब देखील २० मि.मी. पर्यंत योग्य समजला जातो. जर हा दाब त्यापेक्षा अधिक असला तर त्याला काचबिंदू म्हटले जाते.

       काचबिंदू मुळे डोळ्याच्या आतील दाब वाढल्यामुळे दृष्टी संवेदना वाहून नेणाऱ्या गँगलीआँन पेशींवर परिणाम होऊन उपचाराअभावी त्या मृत पावतात व कायमस्वरूपी नजर जाण्याचा धोका उत्पन्न होतो. आणि त्याचाच परिणाम म्हणून रुग्णांचा दृष्टी परीघ (field) कमी होऊ लागतो. एक वेळ अशी येते की सदर व्यक्तीस समोरची वस्तू सोडून त्या आजूबाजूचा परिसर दिसेनासा होतो. यालाच (tubular vision) म्हणतात. म्हणजेच  नळीतून वा दुर्बिणीतून पाहिल्या सारखे दिसते. बाजूची वस्तू पाहण्यासाठी त्याला मान वळवावी लागते. म्हणूनच अशा व्यक्तीने वाहन (vehicle) चालविणे धोकादायक असते.

 एकदा काचबिंदू झाल्यावर रुग्ण उपचाराखाली असताना काही चाचण्या ह्या सातत्याने    (follow-up) करणे गरजेचे असते. त्यामध्ये नेत्रतज्ञा मार्फत डोळ्याचे सखोल परिक्षण करत असताना tonometry  (आतील दाब मोजमापन करणारे यंत्र),  fundoscopy (दृष्टीपटल व दृष्टीचेता तपासणी यंत्र), gonioscopy (काचबिंदूचा प्रकार तपासणारे माध्यम), topo-pacheymeter (बुबुळाची जाडी तपासणे), OCT (रेटीना तपासणी) इत्यादी चाचण्यांचा समावेश असतो.

काचबिंदू हा चोरपावलाने येणारा डोळ्याचा गंभीर आजार असून यामध्ये दुर्लक्ष केल्यास कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते.

यामध्ये जोखीम कोणाला आहे, तर...ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे. ज्याच्या घरी कोणाला तरी (Family History) कौटुंबिक इतिहास आई-वडील, भाऊ-बहीण, इत्यादींना काचबिंदू असणे. बैठे काम, व्यायामाचा अभाव, अनियंत्रित आहार, ताणतणाव (sedentary lifestyle, stress) रक्तदाबाचा आजार धूम्रपान

लक्षणे...चष्म्याचा नंबर सतत बदलणे .डोळे दुखणे.डोळ्यातून पाणी वाहणे, लाल होणे.डोळ्यासमोर रंगीत वर्तुळे दिसणे इत्यादी.

संभाव्य गंभीर धोका लक्षात घेऊन रुग्णांनी नियमित तपासणी केल्यास, शिल्लक असलेली नजर वाचवता येऊ शकते. त्यामध्ये औषधी (eye drops) च्या स्वरूपात, लेझरच्या पद्धतीने व शस्त्रक्रियेच्या माध्यमातून उपचार शक्य आहे.

      थोडक्यात नियमित तपासणी व प्रतिबंधात्मक उपचार पद्धती याचे अनुकरण केल्यास दृष्टी टिकवता येऊ शकते.

                                                                                           डॉ. शिरसीकर संतोष

                                                                                           जिल्हा अंधत्व व दृष्टीक्षिणता कार्यक्रम,

      नांदेड

0000

Tuesday, March 5, 2019


आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षणाची संधी

नांदेड दि. 1 :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, किनवट जिल्हा नांदेड या प्रशिक्षण केंद्रात 1 एप्रिल 2019 पासून सुरु होणाऱ्या 99 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करीता प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय किनवट येथे 28 मार्च 2019 तत्पुर्वी पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रवेशासाठीची अटी पुढीलप्रमाणे राहील. उमेदवार अनुसूचित जमातीपैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीतकमी शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: राहाण्याची व जेवण्याची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महिने 15 दिवस असून शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदवीधारांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. उमेदवारांचे वय 30 मार्च, 2019 रोजी 18 वर्ष पूर्ण असावेत व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन संबंधित प्रशिक्षार्थींचे बँक खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थीच्या बँकेमध्ये चालू खाते असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा हे प्रशिक्षण सत्र अर्ध्यातून सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही.

प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेण्यात येते. तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाते. पात्र अशा इच्छूक उमेदवारांनी आपल्या स्वाक्षरीत कोऱ्या कागदावर 28 मार्च, 2019 पर्यंत शैक्षणिक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र , पेटकुलेनगर, गोकुंदा किनवट जि. नांदेड या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02469-221801 या कार्यालयाशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. 

000000

                

इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरजूंना स्वंयरोजगारांसाठी थेट कर्ज योजना अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 05 :-  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेची मर्यादा रुपये 25 हजारावरुन एक लाख वाढविण्यात आलेली आहे .

ही योजना इतर मागासवर्गीय घटकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांना स्वंयरोजगारास प्रोत्सा‍हित करण्याकरिता व इतर मागासवर्गीय समाजातील लोकांना या महामंडळाच्या कर्ज योजनेची माहिती व्हावी व त्यांनी या कर्ज योजनेचा जास्तीत-जास्त लाभधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यान माता शाळेच्या समोर , नांदेड यांनी केले आहे.

लाभार्थ्याची पात्रता अर्जदार इतर मागासवर्ग प्रवर्गातील असावा. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे. अर्जदाराचे सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 इतका असावा. अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा जास्त नसावे (सक्षम प्रधिकाऱ्याने दिलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रानुसार), कुटूंबांतील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय / निमशासकीय संस्थामधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले तरुण युवक, युवतींना तसेच निराधार व विधवा महिलांना कर्जासाठी प्राधान्य राहणार आहे. अर्जदाराने आधार कार्ड सलग्न बँक खात्याचा तपशिल सोबत सादर करावा. अर्जदार महामंडळाच्या कोणत्याही (केंद्र व राज्य) योजनेचा थकबाकीदार नसावा.
000000

Friday, March 1, 2019

परिवहन संवर्गातील व्यवसायाशी निगडीत गॅरेज मेकॅनिक
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

नांदेड, दि. 01 :- जिल्हयातील सर्व 18 वर्ष ते 40 वर्ष या वयोगटातील परिवहन संवर्गातील अनुज्ञप्ती (लायसन्स) धारक, मॅकेनिक, खाजगी बस चालक, ट्रक चालक, टॅक्सी, ऑटोरिक्षा चालक व या व्यवसायाशी निगडीत गॅरेज मेकॅनिक यांच्याकरिता केंद्र शासनाद्वारे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन (PMSYM) योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र व अर्जदाराने भरावयाची हप्ताची माहिती सोबत जोडलेल्या तक्त्यामध्ये दर्शविलेली आहे. तरी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी जिल्हयातील सर्व उपरोक्त लाभार्थीनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केलेले आहे.
                                                                0000

असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी योजना

नांदेड, दि. 01 :-असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन                          ( पीएमएसवायएम) योजना दि. 15 फेब्रुवारीपासून लागू करण्यासंबंधीची अधिसूचना श्रम मंत्रालयाने काढली आहे. 40 वर्षापर्यंत वयातील कामगार ज्यांचे मासिक वेतन 15 हजारांच्या आत आहे, असे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यांना 60 वर्षानंतर 3 हजार रुपये मासिक निवृत्तीवेतन देण्यात येईल. त्यासाठी 18 वर्षाच्या कामगाराला 200 रुपये मासिक रक्कम जमा करावी लागणार आहे. ही रक्कम 60 वर्षापर्यंत भरावी लागेल, असे सहाय्यक कामगार आयुक्त , नांदेड यांनी कळविले.
0000


हमीभावाने तूर खरेदी करण्याकरिता
शेतकरी नोंदणीची मुदत 10 मार्च, 2019 पर्यंन्त

नांदेड, दि. 01 :- केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हंगाम 2018-19 मध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्याकरिता शेतकरी नोंदणीची मुदत शासनाकडून दि. 10 मार्च, 2019 पर्यंन्त वाढविण्यात आली आहे. तरी शेतकरी बांधवानों ऑनलाईन नोंदणी करावी व हमीभाव खरेदी केंद्रावर तूर विक्री तूर विक्री करुन हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी रामप्रसाद दांड यांनी केले आहे.
000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...