Tuesday, August 28, 2018


कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळी
नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  

नांदेड दि. 28 :- कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळी नियंत्रणासाठी  कृषि विभागामार्फत राबविण्यात आलेली मोहिम अशीच पुढे सुरु ठेवून शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या.
कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळी नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे, कृषि विकास अधिकारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञानकेंद्र येथील शास्त्रज्ञ, जिल्हा समन्वयक क्रॉपसॅप, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, एमएआयडीसी प्रतिनिधी, जिनिंगमिल्सचे प्रमुख, बियाणे व किटक नाशके उत्पादक विक्री संघटनेचे प्रतिनिधी, कापुस उत्पादक प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.
बैठकीत सध्याच्या पिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच लवकर लागवड केलेल्या कापुस क्षेत्रावर जुलै 2018 मध्ये जास्त प्रमाणात दिसुन आलेला प्रादुर्भाव कृषि विभाग, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञानकेंद्र यांचे मार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजना व मार्गदर्शनामुळे सद्यस्थितीत कमी झालेला असुन सदरील प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी Mass Trapping व एकात्मिक किड व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे सर्वानुमते नमुद करण्यात आले.
सोयाबीन व मुग पिकावर सद्या किडींचा प्रादुर्भाव आढळुन येत असुन कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञांनी सोयाबीन वरील खोड माशीसाठी ट्रायझोफॉस व डायक्लोरोव्हासची व करपारोगासाठी कार्बेन्डाझाईम + मंकॉझेब किंवा टेबेकॉनझोले + सल्फर ची  फवारणी करणे तसेच मुगावरील भुरी रोगासाठी गंधकाचा वापर करण्याच्या शिफारशी सांगितल्या.  
000000


शेडनेट व हरीतगृह उभारणी सेवा पुरवठादारांनी नोंदणी करावी
नांदेड दि. 28 :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन 2018-19 अंतर्गत जिल्ह्यात हरितगृह, शेडनेट हाऊस उभारणी करणाऱ्या सेवा पुरवठादारांनी जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांच्याकडे नोंदणी करावी.
प्रस्ताव सेवा पुरवठादार नोंदणीसाठी पुढील प्रमाणे अटी व शर्ती राहतील. हरितगृह, शेडनेट हाऊस उभारणी शेतकऱ्यांना गुणवत्तापुर्ण, दर्जेदार साहित्य मिळावे यासाठी सेवा पुरवठादार हा जीएसटी नोंदणीकृत असावा. शॉपॲक्ट प्रमाणपत्रधारक असणे बंधनकारक आहे. सेवा पुरवठादारास हरितगृह / शेडनेट हाऊस उभारणीचा कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असावा. तसेच मागील 3 वर्षाची उलाढाल प्रतिवर्षी कमीतकमी  एक कोटी रुपये असावी. त्या पुष्टयर्थ सेवा पुरवठादारास मागील लगत तीन वर्षाचा सनदी लेखापालाने प्रमाणित केलेला आर्थिक ताळेबंद सादर करावा लागेल व वर्षवार यापूर्वी उभारणी केलेल्या हरितगृह / शेडनेट हाऊस लाभार्थ्यांच्या याद्या सादर करणे आवश्यक राहील. मार्गदर्शक सुचनेत नमुद असलेल्या मॉडेलनिहाय डिझाईनप्रमाणे व तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य वापरुन हरितगृह / शेडनेटगृह उभारणी करण्याबाबतचे विहीत नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र-13) सेवा पुरवठादाराने द्यावे लागेल. तसेच हरितगृह / शेडनेट हाऊसच्या सांगाड्याची पाच वर्षाची वॉरन्टी द्यावी लागेल (सेवा पुरवठादाराच्या खर्चाने दुरुस्ती करुन देणे) (नैसर्गीक आपत्ती, विध्वंसक प्रवृत्ती वा तत्सम कारणे वगळून). जी आय पाईपच्याबाबत IS 1161:2014 या मानांकनाच्या जी आय पाईपचे अधिकृत वितरक किंवा अधिकृत विक्रेता असल्याबाबतचे पुरावा व प्रमाणपत्र सेवा पुरवठादाराने द्यावे लागेल. शेडनेट (टेपनेट / मोनोनेट), इन्सेक्ट नेट, पॉली फिल्म इत्यादी साहित्य बिआयएस मानांकाप्रमाणे पुरवठा करण्याबाबतचे हमीपत्र (प्रपत्र - 13) द्यावे लागेल. त्यासाठी उत्पादकाचे अधिकृत वितरक / विक्रेता असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. नेट/फिल्म याबाबत 1 वर्षाची गॅरंटी (बदलून देणे) व 2 वर्षाची वॉरंटी द्यावी लागेल. (सेवा पुरवठाराच्या खर्चाने दुरुस्ती करुन देणे) (नैसर्गीक आपत्ती, विध्वंसक प्रवृत्ती वा तत्सम कारणे वगळून). 7) पॉली फिल्मच्याबाबत आयातीत पॉली फिल्म वापरणार असल्यास अधिकृत आयातदार किंवा अधिकृत आयातदाराचे वितरक किंवा विक्रेता असल्याबाबत संबंधीत आयातदाराचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. पॉली फिल्मच्याबाबत उत्पादकाने प्रमाणित केलेले तांत्रिक माहितीचे विविरण पत्र (Technical data sheet), पॉली फिल्मचा दर्जा व गुणधर्माबाबतचे प्रमाणपत्र तसेच सिपेट या संस्थेचा 6 महिन्यांपेक्षा जुना नसलेला तांत्रिक तपासणी अहवाल सादर करणे आवश्यक राहील. सेवा पुरवठादाराची नोंदणी ही साहित्य पुरवठ्यासह संपूर्ण हरीतगृह/शेडनेटगृह उभारण्यासाठी करावयाची असून केवळ साहित्य पुरवठ्यासाठी नाही.
आदी अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या पुरवठादारांस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातर्फे नोंदणी क्रमांक आणि नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.
000000

Monday, August 27, 2018


कापुस, सोयाबीन पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 27 :- जिल्ह्यात कापुस, सोयाबीन पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी किडीपासून संरक्षणासाठी कृषि संदेश दिला आहे.
कापूस रस शोषण किडीसाठी फलोनीकॅमीड 50 डब्ल्यू जी 2 ग्रॅम आणि गुलाबी बोंडअळीसाठी प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्वरीत फवारावे.
सोयाबीनवरील तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी कामगंध सापळे लावा आणि क्लोरॅनट्रीनीलीप्रोल 3 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
00000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 17.41 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 27 :- जिल्ह्यात सोमवार 27 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 17.41 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 278.50 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 727.14 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 76.10 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 27 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 26.88 (818.39), मुदखेड- 15.67 (923.03), अर्धापूर- 16.00 (788.33), भोकर- 16.50 (944.75), उमरी- 12.67 (785.99), कंधार- 24.00 (719.66), लोहा- 20.17 (677.17), किनवट- 7.71 (771.55), माहूर- 9.50 (964.96), हदगाव- 23.57 (868.15), हिमायतनगर- 18.67 (911.38), देगलूर- 18.00 (342.00), बिलोली- 14.80 (524.20), धर्माबाद- 14.67 (579.00), नायगाव- 15.40 (540.80), मुखेड- 24.29 (474.82). आज अखेर पावसाची सरासरी 727.14 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 11634.18) मिलीमीटर आहे.  
00000


विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांचा दौरा
नांदेड दि. 27 :- महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 30 ऑगस्ट 2018 रोजी लातूर येथून मोटारीने सकाळी 11 वा. लोहा येथे आगमन व श्री संत भगवानबाबा जयंतीस उपस्थिती. नंतर सोयीनुसार लोहा येथून परळी वैजनाथ जि. बीडकडे प्रयाण करतील.
000000


लोहा नगरपरिषद निवडणुकीच्या
आरक्षणाची सोडत शुक्रवारी होणार
नांदेड दि. 27 :- नगरपरिषद लोहा सार्वत्रिक निवडणूक 2018 साठी राज्‍य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्‍या आरक्षणाच्‍या प्रमाणानुसार शुक्रवार 31 ऑगस्ट 2018 रोजी तहसिल कार्यालय लोहा येथे सकाळी 11 वा. चिठ्या काढून सदस्‍य पदांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. लोहा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व संबंधित नागरिकांनी आरक्षण  निश्चितीच्‍या कार्यक्रमास सोडतीच्‍या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
आरक्षण सोडतीच्‍या कार्यक्रमाचे अध्‍यक्ष / प्राधिकृत अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी कंधार यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. लोहा नगरपरिषद क्षेत्रातील एकूण प्रभागापैकी अनुसूचित जाती (स्‍त्री), अनुसूचित जमाती (स्‍त्री), नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्‍त्री) आणि सर्वसाधारण स्त्रीयांसाठी आरक्षण निश्चित करण्‍यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  
0000000


नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर
साहिब मंडळ निवडणुक 2018 साठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द
आक्षेप, दुरुस्‍ती असल्यास अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 27 :- नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडणुक 2018 साठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करण्यात आली आहे. सदर प्रारुप मतदार यादीवर आक्षेप / दुरुस्‍ती/ नाव समाविष्‍ट इत्‍यादी बाबत आक्षेप असल्‍यास मतदारांनी 28 ऑगस्‍ट ते 26 सप्‍टेंबर 2018 या कालावधीत विहीत नमुन्‍यातील फॉर्म- 2 भरुन संबंधीत तहसिल कार्यालयात दाखल करावेत. विहीत मुदतीनंतर प्राप्‍त आक्षेप अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
याबाबत आक्षेप किंवा दुरुस्‍तीबाबतचा विहीत नमुन्‍यातील फॉर्म-2 संबंधित तहसिल कार्यालयात तसेच www.nanded.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांना निवडून देण्‍यासाठी मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी अधिसूचना दिनांक 27 ऑगस्‍ट 2018 अन्‍वये मतदार क्षेत्र औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड लातूर, हे संपुर्ण जिल्‍हे व चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपना व जीवती हे तालुके (तत्‍कालीन हैद्राबाद निजाम संस्‍थानाचा मराठवाड्यातील भाग) येथील महाराष्‍ट्र विधानसभेसाठी दि. 1 जुलै 2018 या अर्हता दिनांकास अस्तित्‍वात असलेली विधानसभा मतदार यादीतील समाविष्‍ट शिख धर्मीय मतदारांची मतदार नोंदणी कार्यक्रम 20 जुलै ते 18 ऑगस्‍ट 2018 या कालावधीत फॉर्म-1 नुसार तयार केलेली प्रारुप मतदार यादी मतदार क्षेत्रातील सर्व जिल्‍हाधिकारी कार्यालये व गुरुव्‍दारा तख्‍त सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब बोर्ड नांदेडच्‍या सुचना फलकावर प्रारुप मतदार यादी व अधिसूचना डकवून 27 ऑगस्‍ट रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. तसेच  संबंधित जिल्‍ह्यातील तहसिल कार्यालयांच्‍या सुचना फलकांवर त्‍या-त्‍या तालुक्‍याची प्रारुप मतदार यादी व अधिसूचना डकवून दिनांक 27 ऑगस्‍ट 2018 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे.
प्राप्‍त दावे व हरकती / आक्षेप सक्षम अधिकारी जिल्‍हाधिकारी, नांदेड यांच्‍या कार्यालयात 27 सप्‍टेंबर ते दिनांक 4 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत निकाली काढण्‍यात येणार आहेत. त्‍यानंतर त्‍या जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी दिलेल्‍या निकालाविरुध्‍द अपिल करण्‍यासाठी सक्षम अधिकारी, विभागीय आयुक्‍त औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांचेकडे 5 ऑक्‍टोबर 2018 ते 19 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत अपीलार्थींना  व्दितीय अपील दाखल करता येईल. विभागीय आयुक्‍त औरंगाबाद यांचेकडे 20  ते 26 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत प्राप्‍त अपील निकाली काढण्‍यात येतील. त्‍यानंतर दि. 3 नोव्‍हेंबर 2018 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द होईल, असे जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.  
00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...